व्यवस्थापन म्हशींच्या माजाचे

दुग्ध व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी म्हशीने दर १३ ते १४ महिन्याला एक वेत देणे गरजेचे आहे. आपली म्हैस व्याल्यानंतर ६० ते ९० दिवसात माजावर येऊन गाभण राहील याकडे लक्ष द्यावे. म्हशीचे खाद्य आणि योग्य आरोग्य व्यवस्थापन ठेवावे.
Turmeric cultivation
Turmeric cultivation

दुग्ध व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी म्हशीने दर १३ ते १४ महिन्याला एक वेत देणे गरजेचे आहे. आपली म्हैस व्याल्यानंतर ६० ते ९० दिवसात माजावर येऊन गाभण राहील याकडे लक्ष द्यावे. म्हशीचे खाद्य आणि योग्य आरोग्य व्यवस्थापन ठेवावे.

म्हैसपालन करताना जास्तीत-जास्त नफा मिळविण्यासाठी साधारणपणे दर १३ ते १४ महिन्याने तिचे वेत मिळणे अपेक्षित आहे. यासाठी म्हैस वेळेवर गाभण रहाणे गरजेचे आहे.  कृत्रिम रेतन यशस्वी होण्यासाठी माज ओळखणे अतिशय महत्त्वाचे आहे.  ज्या म्हशी वेळेवर माजावर येऊन व्यवस्थित गाभण राहत नाहीत, त्यांचा बराच काळ दूध न देता वाया जातो. म्हणून माजाचे व्यवस्थापन करून हा दूध न देण्याचा भाकड काळ काही अंशी कमी करता येईल.  वेळेवर माज न ओळखणे म्हशी वेळेवर गाभण न राहाण्याची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये म्हशीच्या माजाची लक्षणे पूर्णपणे माहीत नसणे, म्हशीचे दररोज पुरेशा प्रमाणात निरीक्षण न करणे, पाहिलेल्या माजाच्या लक्षणांची नोंद न ठेवणे या कारणांचा समावेश होतो.  ऋतू परत्वे माज लक्षणे  म्हशीमध्ये ऋतू परत्वे माजाची लक्षणे कमी-जास्त होताना दिसतात. उन्हाळ्याच्या दिवसात जास्त तापमानामुळे म्हशी नैसर्गिकपणे माजाची लक्षणे व्यवस्थित दाखवत नाहीत. हिवाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात माजावर येतात. संतुलीत चाऱ्याचा अभाव  कर्बोदके, प्रथिने यांचा खाद्यामध्ये अभाव, खनिज मिश्रणांचा वापर कायम स्वरुपी नसणे. कमी प्रतीचा चारा तसेच जास्त खाद्यामुळे   स्त्रीबीजावर चरबी साचून माजावर येण्याचे प्रमाण कमी होते. एकाच प्रकारचा चारा जास्त दिवस खाऊ घालणे.  गर्भाशयाचे आजार  गर्भाशयात पू होणे, व्याल्यानंतर वार व्यवस्थित न पडणे, स्त्रीबीजावर गाठी तयार होणे,  शरीरात संप्रेरके (हार्मोन्स) अनियमित तयार होणे, तसेच काही जुनाट आजार जसे क्षय इत्यादींचा समावेश होतो.  माजावर येण्याची वेळ  नैसर्गिकरित्या ६०-७० टक्के म्हशी पहाटेच्या म्हणजे ४ ते ६ या वेळेत माजावर येतात. ३०-४० टक्के म्हशी या दुपारी ४ नंतर माजावर येतात. म्हशीच्या जातीपरत्वे माजाची लक्षणे माजाच्या काळात योनीतून येणारा पातळ चकचकीत पारदर्शक चिकट स्त्राव (सोट) स्पष्टपणे दिसून येतो. उदा: मुऱ्हा, मेहसाणा या जातीच्या म्हशीमध्ये सोट गाळण्याचे प्रमाण जास्त असते. गावठी म्हशीमध्ये याचे प्रमाण अतिशय कमी असते किंवा बहुतेक वेळा माज दिसूनसुद्धा येत नाही. 

आरोग्याकडे द्या लक्ष

  • म्हशीचा माज ओळखण्यासाठी माजाची लक्षणे माहिती असणे आवश्यक आहे. म्हैस माजावर आल्यानंतर पुढील पैकी एक किंवा अनेक लक्षणे दाखविते. 
  • ज्या म्हशी ओरडून माजावर येतात, त्या सतत जोरजोरात ओरडत राहातात. योनी मार्गातून काचेसारखा पारदर्शक चिकट स्त्राव बाहेर येताना दिसतो. बहुतेक वेळा हा स्त्राव म्हैस जेथे बसलेली असते तेथे पडलेला दिसतो. 
  • निरणावरील सुरकुत्या नाहीशा होतात. निरण सुजलेले दिसते. निरण उघडून पाहिल्यास आतील अंतरत्वचा लाल व ओलसर झालेली दिसते. 
  • चारा खाण्यात व पाणी पिण्यात म्हशीचे लक्ष नसते. सतत कावऱ्या बावऱ्या नजरेने इकडे तिकडे पाहत राहतात.
  • दूध देणाऱ्या म्हशीत उत्पादन आणि दुधातील स्निग्धांशात तात्पुरती घट होते.
  • म्हैस थांबून थोडी-थोडी लघवी करते. शेपूट वरचेवर बाजूला घेते. डोळ्याची अंतर त्वचा लालभडक होते. निरणाच्या खालच्या बाजूला पांढरी रेष तयार होते.
  • पाठीवर थाप मारली असता शरीर एकदम ताठ करते. अवेळी सडे पान्हावते.
  • यावर लक्ष ठेवून एकदा म्हैस माजावर आल्यानंतर ती तारीख लिहून ठेवावी. त्या तारखेनंतर १८ ते २४ दिवस मिळवून पुढील तारीख निश्चित करावी. अशा तऱ्हेने प्रत्येक म्हशीसाठी स्वतंत्र अपेक्षीत माजाची तारीख दाखविणारा तक्ता तयार करावा. त्याप्रमाणे प्रत्येक म्हशीवर लक्ष ठेवावे.
  • जास्तीत जास्त ६० ते ७० टक्के म्हशी  पहाटेच्या वेळी म्हणजे ४ ते ६ या वेळेत माजावर येतात. त्यावेळी सकाळी उठल्यावर म्हैस बसलेली असेल तर तिला न उठवता आजू-बाजूला किंवा शेणावर म्हशीने चिकट स्त्राव (सोट) टाकलेला आहे का ते पाहावे. म्हशी ज्यावेळी रवंथ करण्यासाठी बसलेल्या असतात, त्यावेळी सोट टाकतात का हे वरचेवर पाहावे. 
  • म्हशी माजावर येण्याचे आणि गाभण राहण्याचे प्रमाण थंडीच्या दिवसात म्हणजे हिवाळ्यात जास्त असते. आपल्या देशात सप्टेंबर ते फेब्रुवारी या सहा महिन्यात म्हशी जास्तीत जास्त माजावर येतात, गाभण राहातात. उन्हाळ्याच्या दिवसात म्हशी माजावर येण्याचे व गाभण राहण्याचे प्रमाण कमी असते. जरी या दिवसात म्हशी माजावर आल्या तरी माज सहजा-सहजी ओळखता येत नाही. अंगावर रेडकू पाजणाऱ्या म्हशीत अशा मुक्या माजाचे प्रमाण जास्त आहे. जो पर्यंत रेडकू अंगावर पिते तोपर्यंत मुका माज टिकून राहतो. यासाठी चिमटलेल्या रेडयाचा म्हशीचा माज ओळखण्यासाठी उपयोग करावा. 
  • उन्हाळ्याच्या दिवसात कडक उन्हापासून म्हशीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. यासाठी म्हशीच्या अंगावर गोणपट किंवा जाड पोते भिजवून ठेवावे. दिवसातून दोन ते तीनवेळा दर चार ते सहा तासाच्या अंतराने ते गोणपाट ओले करावे. यामुळे म्हशीच्या शरीराचे तापमान थंड राहाण्यास मदत होते.ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी उन्हाळ्याच्या दिवसात दिवसातून कमीत कमी चार ते पाच वेळा म्हशीच्या अंगावर थंड पाण्याचे फवारे मारावेत किंवा त्यांना पाण्यात डुंबण्यास सोडावे. 
  •  म्हशींना दररोज पिण्यास किती पाणी द्यावे हे बऱ्याच बाबीवर अवलंबून असते. यामध्ये म्हशीची जात, दिवसाचे तापमान, खाऊ घालत असलेल्या चाऱ्या प्रकार म्हणजे हिरवा चारा किंवा कोरडा चारा, म्हैस देत असलेले दररोजचे दुध आणि खाद्यात असलेले शुष्क पदार्थाचे (ड्राय मॅटर) प्रमाण याचा समावेश होतो. सर्व साधारणपणे म्हशीचे वजन ४०० ते ५०० किलो असेल तर दररोज ८० ते ९० लिटर पाणी म्हशीला पाजावे लागेल. तसेच हे पाणी स्वच्छ असावे. त्याचे तापमान १५ ते २० डिग्री अंश सेल्सिअस असेल हे पाहावे. 
  • म्हशींना शरीर पोषणासाठी दररोज २ किलो खुराकाची गरज असते. या व्यतिरिक्त म्हैस दुधात असेल तर दर एक किलो दूध उत्पादनासाठी १/२ किलो या प्रमाणात खुराक द्यावा. म्हशीच्या गाभण काळात शेवटच्या ३ महिन्यात वाढीव खुराक द्यावा. म्हशीचे वजन ४०० ते ५०० किलो असेल तर दररोज ३५ ते ४० किलो हिरवा चारा अधिक ४ ते ५ किलो वाळलेला चारा लागेल. हिरव्या चाऱ्यातील एकदल व व्दिदल चाऱ्याचे प्रमाण समान असावे. 
  • म्हशींना दिवसभरात जेवढा चारा लागतो तो एकदम गव्हाणीत टाकण्यापेक्षा दोन ते तीन वेळा विभागून तसेच लहान-लहान तुकडे करून टाकावा. हिरवा, वाळलेला किंवा एकदल व व्दिदल चारा एकत्र करून टाकावा. तसेच दररोज ४० ते ५० ग्रॅम खनिज मिश्रणाची पावडर द्यावी. 
  • गर्भाशय हा प्रजनन क्षमतेचा तसेच संपूर्ण आरोग्याचा आरसा आहे. म्हैस व्याल्यानंतर तिची वार (जार) व्यवस्थित पडली आहे याची खात्री करावी. पडलेली वार म्हैस खाणार नाही याची काळजी घ्यावी. विशेषतः म्हैस जर रात्रीच्यावेळी व्यायली तर जास्त काळजी घेण्याची गरज असते. 
  • म्हैस विण्याच्यावेळी गर्भाशयात हात घालून पारडू ओढून काढले असेल आणि वार व्यवस्थित पूर्णपणे पडलेली नसेल आणि म्हशीच्या योनीतून येणाऱ्या स्त्रावास उग्र वास येत असेल तर, अशा म्हशी व्याल्यानंतर वेळेवर माजावर येत नाहीत, म्हणून तज्ञ पशुतज्ज्ञांच्याकडून तातडीने उपचार करावेत.
  • - डॉ.आर.एल.भगत, ९२८४४५३६४५  

     (बायफ मध्यवर्ती संशोधन केंद्र, उरुळीकांचन,जि.पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com