दर्जेदार केळी उत्पादनाचे तंत्र

Banana bunch covering
Banana bunch covering

केळी घडातील फळांच्या आकारात एकसमान बदल होऊन घड लवकर परिपक्व होण्यासाठी फण्यांची विरळणी करावी. केळीला सरासरी १० ते १२ पेक्षा जास्त फण्या येतात. दर्जेदार उत्पादनासाठी घडावर ८ ते १० फण्या ठेवून अतिरिक्त फण्यांची विरळणी करावी.  केळीची निसवण सुरू झाल्यानंतर १० ते १५ दिवसांत घडातील सर्व फण्या केळ कमळातून बाहेर येतात. शेवटची फणी बाहेर आल्यानंतर २ ते ३ दिवसांत खाली उमलणारे केळफूल धारदार विळ्याच्या सहाय्याने कापून घ्यावे. योग्य वेळी केळफूल कापल्याने घडातील वरील भागातील फण्यांना अन्नपुरवठा होऊन त्यांच्या वाढीस मदत होते. तसेच केळफुलात दिवसा लपणाऱ्या फुलकिडींचा प्रादुर्भाव कमी करता येतो. कापलेली केळफुले बागेत इतरत्र न टाकता कंपोस्ट खड्ड्यात टाकावीत.

फण्यांची विरळणी

  •  घडातील फळांच्या आकारात एकसमान बदल होऊन घड लवकर परिपक्व होण्यासाठी फण्यांची विरळणी करावी. केळीला सरासरी १० ते १२ पेक्षा जास्त फण्या येतात. विरळणी न केल्यामुळे सर्व फण्यांना योग्य पोषण मिळत नाही तसेच फळांचे आकारमान एकसमान राहत नाही. परिणामी फळांचा दर्जा कमी होतो. दर्जेदार उत्पादनासाठी घडावर ८ ते १० फण्या ठेवून अतिरिक्त फण्यांची विरळणी करावी. घडात राखावयाच्या फण्या ठरवून त्या लगतच्या खालच्या फणीत १ केळी ठेवून उर्वरित खालील फण्या कापून टाकाव्यात.
  • घड निसवणी पूर्ण झाल्यावर विरळणी केल्यामुळे अन्नद्रव्यांचा योग्य पुरवठा होऊन फळांच्या आकारात सकारात्मक बदल होतो. घडाच्या फण्यात आलेली वेडीवाकडी केळीफळे, जोड फळे चाकूच्या सहाय्याने कापावीत.
  •  घड पूर्ण निसवल्यानंतर व विरळणीनंतर घडावर पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट ५ ग्रॅम अधिक युरिया १० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून द्रावणाची एकत्रित फवारणी करावी. फवारणीमुळे फळांची लांबी आणि घेर वाढून वजनात वाढ होते. तसेच घड लवकर कापणीस तयार होतो.
  • घड झाकणे फायद्याचे

  • १०० गेज जाड, ७५ बाय १०० सेंमी आकाराच्या २-६ टक्के सच्छिद्रता असलेल्या प्लॅस्टिक पिशवीने घड झाकावा. पिशवी बांधताना दांड्यांचा अधिकाधिक भाग झाकून पिशवीचे खालील तोंड मोकळे सोडावे. यामुळे घडाचे तीव्र सूर्यप्रकाश वारा, पाऊस, फुलकिडी, थंडी आणि धूळ यांपासून संरक्षण होते. 
  • घडाभोवती पोषक सूक्ष्म वातावरण निर्माण होऊन घड लवकर पक्व होतो. घडाचा दांडा झाकल्याने तीव्र सूर्य प्रकाशामुळे घड तुटणे आणि सटकण्याचे प्रमाण कमी होते. 
  • पाने कापणे 

  • घड वाढीच्या अवस्थेत घडाशेजारील पाने घडांतील फळांना घासून इजा होते. त्यामुळे फळांना इजा करणारी व रोगट पाने वेळीच कापून नष्ट करावीत.
  • झाडांना आधार

  • झाडाच्या कक्षेबाहेर लोंबणाऱ्या वजनदार घडामुळे अनेक वेळा झाड वाकते. वारा आल्यास काही वेळा मोडून पडते. त्यासाठी आधार देणे आवश्‍यक असते. झाडाला आधार मिळण्यासाठी लागवड खोल करावी तसेच वेळोवेळी मातीची भर द्यावी. झाडांना आधार दोन प्रकारे दिला जातो. 
  •  झाडाला आधार देण्यासाठी बांबूचा वापर केला जातो. यामध्ये दोन बांबूची कैची करून आधार दिला जातो. निलगिरी किंवा सुरू झाडाच्या फांद्या तोडून Y (इंग्रजी वाय) आकाराच्या टेकूच्या सहाय्याने झाडांच्या मुखाशी आधार दिला जातो.
  • झाडाला आधार देण्यासाठी पॅकिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या पॉलीप्रॉपीलीन पट्ट्यांचा वापर केला जातो. आधार देताना झाडाच्या गळ्याभोवती पट्टीचे एक टोक (सैलसर) बांधून दुसरे टोक विरुद्ध दिशेच्या समोरील झाडाच्या बुंध्यालगत बांधण्यात येते. झाडांना आधार देण्याची ही अत्यंत स्वस्त आणि सुलभ पद्धत आहे. या पट्ट्या किमान दोन वेळा वापरता येतात.
  • घडांची काढणी

  • घडांच्या योग्य पक्वतेला कापणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. धारदार विळ्याच्या सहाय्याने सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळी १५ ते २० सेंमी लांबीच्या घड दांडा ठेवून अलगद कापून घ्यावा. 
  • घड कापणाऱ्या व्यक्तीने खांद्यावर ‘कुशन’ किंवा मऊ फोम वर घड घेऊन नंतर कापणी करावी. जेणेकरून घड वजनाने खाली कोसळून फण्यांना इजा होणार नाही. 
  • कीड नियंत्रण

    फुलकिडे  लक्षणे

  • कीड अपरिपक्व फळांची साल खरडून त्यातून येणारा अन्नरस शोषते, त्यामुळे तेथील पेशी मरतात.
  • केळी परिपक्व होताना त्या ठिकाणी तांबूस तपकिरी किंवा लालसर रंगाचे चट्टे तयार होतात. सालीवर बारीक तडे पडतात.  
  • नियंत्रण ः (प्रतिलिटर पाणी)  

  •  ॲसिटामिप्रीड (२० एस.पी.) ०.१२५ ग्रॅम किंवा
  •  डायमिथोएट (३० टक्के प्रवाही) २ मिलि किंवा
  •  व्हर्टिसीलीयम लेकॅनी ३ ग्रॅम किंवा
  •  अॅझाडिरेक्टिन (१५०० पीपीएम) ५ मिलि 
  •  कीडनाशकाच्या द्रावणात १ मिलि स्टिकर मिसळून फवारणी करावी. 
  • टीप ः वरील शिफारशी लेबलक्लेम आहेत.

     -  एन.बी. शेख, ०२५७-२२५०९८६ (केळी संशोधन केंद्र‚ जळगाव)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com