गवळाऊ संगोपनाचे पाऊल पडते पुढे

विदर्भामध्ये गवळाऊ दुधाळ गाय आणि शेतीकामासाठी बैलजोडीला आजही चांगली मागणी टिकून आहे. परंतु, संगोपनातील दुर्लक्ष, कमी होणाऱ्या चराऊ कुरणामुळे गोवंशाची संख्या मर्यादित झाली. काळाची गरज ओळखून गोवंशाचे संगोपन, संशोधन आणि प्रसार करण्यासाठी वर्धा जिल्ह्यात गवळाऊ गोवंश जतन, संवर्धन, संशोधन व पैदासकार चॅरिटेबल ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला. या उपक्रमाचा घेतलेला आढावा...
Gavlaou cattle
Gavlaou cattle

विदर्भामध्ये गवळाऊ दुधाळ गाय आणि शेतीकामासाठी बैलजोडीला आजही चांगली मागणी टिकून आहे. परंतु, संगोपनातील दुर्लक्ष, कमी होणाऱ्या चराऊ कुरणामुळे गोवंशाची संख्या मर्यादित झाली. काळाची गरज ओळखून गोवंशाचे संगोपन, संशोधन आणि प्रसार करण्यासाठी वर्धा जिल्ह्यात गवळाऊ गोवंश जतन, संवर्धन, संशोधन व पैदासकार चॅरिटेबल ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला. या उपक्रमाचा घेतलेला आढावा...

गवळाऊ हा विदर्भातील काटक गोवंश. आजही हा जातिवंत गोवंश वर्धा जिल्ह्यातील आर्वी, आष्टी, कारंजा आणि सेलू तालुक्यांतील पशुपालकांच्या गोठ्यात आहे. गेल्या काही वर्षांत या गोवंशाकडे दुर्लक्ष झाल्याने जातिवंत दुधाळ गाई आणि बैलांची संख्या कमी होऊ लागली. हे लक्षात घेऊन पशुपालक आणि अभ्यासू पशुतज्ज्ञांनी वर्धा जिल्ह्यात गवळाऊ गोवंश जतन, संवर्धन, संशोधन व पैदासकार चॅरिटेबल ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेची सुरुवात केली. या गोवंशाच्या संवर्धनापुरते मर्यादित न राहता जातिवंत पैदास, दूध उत्पादनवाढ आणि प्रक्रिया उत्पादनांच्या विक्रीसाठी ही संस्था कंपनीदेखील सुरू करणार आहे. यामुळे गवळाऊ पशुपालकांच्या अर्थकारणाला चालना मिळणार आहे.  याबाबत माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष पुष्पराज कालोकार (तळेगाव रघुजी, ता. आर्वी, जि. वर्धा) म्हणाले की, आम्ही गेल्या दहा वर्षांपासून विदर्भातील स्थानिक गोवंश गवळाऊच्या संवर्धनासाठी एकत्र आलो. पहिल्या टप्यात द्वारकाधीश सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गवळाऊ गोवंश आणि पशुपालकांचा अभ्यास केला. चांगल्या प्रकारे माहिती जमा झाल्यानंतर गवळाऊ पशुपालकांची आम्ही नोंदणीकृत संस्था तयार केली. यामुळे संवर्धन, संशोधन आणि प्रसाराला चालना मिळाली. अभ्यासू पशुतज्ज्ञांनी चांगले मार्गदर्शन केले. जातिवंत गवळाऊ गोवंश संगोपन करणाऱ्या ३०० पशुपालकांच्या गोठ्यामध्ये भेट देऊन तांत्रिक माहिती गोळा केली. यातून २५० जातिवंत गवळाऊ गाईंची नोंदणी झाली.     विदर्भातील नंद गवळी समाजाने या गाईंचे संगोपन चांगल्या पद्धतीने केले आहे. पूर्वी पशुपालकांकडे गवळाऊचे कळप होते. या भागात मोठ्या प्रमाणात चराऊ कुरणे होती, तसेच जंगल परिसरात गाईंना चराईला सोडले जायचे. परंतु, काळाच्या ओघात गावातील चराऊ कुरणे कमी झाली. वन विभागानेही जंगल चराईला बंदी केली. राखणदार कमी झाल्याने गाईंचे कळप सांभाळणे अवघड झाले. त्यामुळे आता ठरावीक पशुपालकांच्या गोठ्यामध्ये केवळ चार, पाच गवळाऊ गाई दिसतात. कमी होणारी संख्या लक्षात घेऊन या गोवंशांचे संवर्धन करण्यासाठी आम्ही पुढे आलो. ही जात काटक आहे. विदर्भातील उष्ण तापमानाचा या गोवंशाच्या आरोग्य तसेच दूध उत्पादनावर फारसा परिणाम होत नाही. उपलब्ध चाऱ्यावर संगोपन चांगल्या पद्धतीने होते. आमच्या संस्थेतर्फे ज्या पशुपालकांकडे गवळाऊ गाई आहेत, त्यांना शास्त्रशुद्ध संगोपन, खाद्य आणि आरोग्य व्यवस्थापनाबाबत माहिती दिली जात आहे.     गाईंना रेतन करताना दुसऱ्या जातीच्या रेतमात्रा न वापरता नोंदणीकृत गवळाऊ वळूच्या रेतमात्रा वापरण्याबाबत जागृती केली आहे. ज्या गावात गवळाऊ गाई जास्त प्रमाणात आहेत, तेथे रेतनासाठी जातिवंत वळू उपलब्ध करून देत आहोत. जेणेकरून पशुपालकाच्या गोठ्यातच जातिवंत कालवडी तयार होतील. सध्या पशुपालक गवळाऊ गाईचे दूध रतीब किंवा डेअरीला देतात. मर्यादित दूध उत्पादन असल्याने स्वतंत्र दूध विक्री व्यवस्था तयार झालेली नाही. आर्वी परिसरातील काही पशुपालक दूध विक्रीपेक्षा खवा तयार करतात. या खव्याला उत्तम चव असल्याने २०० रुपये किलो दराने विक्री होते. त्यामुळे येत्या काळात दूध विक्री आणि प्रक्रिया उद्योगाला गती देण्याचे नियोजन झाले आहे.   - पुष्पराज कालोकार, ८७६६८७४५२९

संशोधन, संगोपनावर भर  संस्थेचे सल्लागार आणि गोवंश अभ्यासक सजल कुलकर्णी म्हणाले की, विदर्भातील आर्वी, आष्टी, सेलू आणि कारंजा भागातील कोरडवाहू पट्ट्यातील नंद गवळी समाजाकडे गवळाऊ गोवंश आहे. अत्यंत काटक असणारा हा गोवंश उपलब्ध चाऱ्यावर चांगल्या प्रकारे दूध उत्पादन देतो. सरासरी पाच ते सहा लिटर दूध उत्पादन मिळते. योग्य व्यवस्थापन केले तर निश्चितपणे दररोज सात, आठ लिटर दूध देणाऱ्या गाई पशुपालकांकडे आहेत. सध्या १५० गवळाऊ पशुपालक संस्थेचे सभासद आहेत. दर वर्षी प्रत्येक सभासदाकडून १०० रुपये मेंबर फी घेतली जाते. जमा होणाऱ्या रकमेतून आम्ही नोंदणीकृत गोवंशाची लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. दरवर्षी एकदा गीता जयंतीला प्रदर्शन होते. या माध्यामातून जातुवंत गाई, वळू पशुपालकांसमोर येतात. सध्या गवळाऊच्या बैलजोडीची किंमत पन्नास ते पंचाहत्तर हजार आणि जातिवंत दुधाळ गाईची किंमत सरासरी ४५ हजार रुपयांच्या पुढे आहे.   गटातील पशुपालकाकडे दोन ते चार गवळाऊ गाई आहेत. यांची नोंद ठेवली आहे. गोवंश संवर्धनाबरोबरीने प्रसारावर भर आहे. गावशिवारातील चराऊ कुरणे कमी झाली आहेत. तसेच जनावरे चराईला वनक्षेत्रात प्रतिबंध आहे. आर्वी तालुक्याचा विचार केला तर सुमारे ५०० हेक्टर क्षेत्र चराऊ कुरणांचे आहे. याची मालकी जर गावाकडे आली, तर पुरेशा प्रमाणात पशुपालकांना चारा उपलब्ध होईल. या जमिनीत चांगल्या गुणवत्तेच्या चाऱ्याची लागवड करता येईल. सध्या बरेचशे पशुपालक स्वतःच्या स्तरावर दूध विक्री करतात. काही जण खवा आणि तूपनिर्मितीमध्ये आहेत. मध्यंतरी आम्ही नागपूर शहरात तूप विक्रीस सुरुवात केली. सरासरी १२०० ते १५०० रुपये किलो दराने तुपाची विक्री झाली. विदर्भाचे वैशिष्ट्य असणारा हा गोवंश टिकून राहावा तसेच त्याच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.  

-  सजल कुलकर्णी, ९८८१४७९२३९  

आनुवंशिक सुधारणा कार्यक्रमाला गती वर्धा जिल्ह्याचा विचार करता आर्वी, आष्टी, कारंजा आणि सेलू भागात गवळाऊ गोवंश पशुपालकांनी सांभाळला आहे. पशुसंवर्धन विभागाच्या हेटीकुंडी (जि. वर्धा) येथील प्रकल्पामध्ये गवळाऊ गोवंशाचे संवर्धन आणि संशोधन केले जात आहे. याबाबत डॉ. सतीश राजू (उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, भंडारा) म्हणाले  की, पशुसंवर्धन विभागाने वर्धा जिल्ह्यातील गवळाऊ पशुपालकांचा अभ्यास केला. आम्हाला यातून १०० जातिवंत गाई आणि ३८ वळू मिळाले. काही पशुपालकांकडे प्रतिदिन सरासरी ७ ते ८ लिटर दूध देणाऱ्या गाई आहेत. त्यांची आम्ही शास्त्रीय नोंद घेतली आहे. ‘इनाफ’ प्रणालीच्या माध्यामातून अनुवंश सुधारणा कार्यक्रमासाठी जातिवंत गाई, वळूंची नोंद घेऊन त्यांचे टॅगिंग करीत आहोत. यातून जन्मलेल्या मादी आणि नर वासरांचा वंश सुधारण्यासाठी उपयोग होणार आहे. गवळाऊ पशुपालकांच्या संस्थेच्या माध्यमातून गोवंश सुधारणा, पशुआहार, लसीकरण, जातिवंत कालवडी आणि वळूंच्या पैदास, दूध प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन केले जाते. येत्या काळात जातिवंत वळूंची रेतमात्रा पोहोचविणार आहे.  

-  डॉ. सतीश राजू, ९७३००१०४१५

गवळाऊची वैशिष्ट्ये 

  • उष्ण हवामानातही शेतीकाम, दूध उत्पादनात सातत्य असणारा गोवंश.
  • चांगली रोगप्रतिकारशक्ती. शेतीकामासाठी बैल उत्तम.
  • चांगल्या व्यवस्थापनात प्रतिदिन सरासरी ८ लिटर दूध देण्याची क्षमता.
  •  दुधातील फॅट ५ पर्यंत. खवा, तूपनिर्मितीला संधी.
  • भविष्यातील उद्देश  

  • जातिवंत दुधाळ गाईंचे संगोपन. शेतीमधील नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब.
  • जातिवंत कालवडी, वळूंचे संगोपन. रेतमात्रांची उपलब्धता.
  • दूध उत्पादनवाढीसाठी खाद्य, आरोग्य व्यवस्थापनावर भर.
  • दूध आणि प्रक्रिया पदार्थांच्या विक्रीसाठी स्वतंत्र व्यवस्थेची उभारणी.
  • माफसू आणि पशुसंवर्धन विभागातील तज्ज्ञांसोबत समन्वय.
  • दूध उत्पादक आणि प्रक्रिया उत्पादन कंपनीची स्थापना.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com