सुप्तावस्थेतील गुलाबी बोंड अळीकडे नको दुर्लक्ष

गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम लक्षात घेता सध्या कापसाची फरदड घेऊ नये. पिकाच्या अवशेषाची तातडीने विल्हेवाट लावावी. तरच पुढील वर्षीच्या हंगामात कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे.
pink boll warm
pink boll warm

गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम लक्षात घेता सध्या कापसाची फरदड घेऊ नये. पिकाच्या अवशेषाची तातडीने विल्हेवाट लावावी. तरच पुढील वर्षीच्या हंगामात कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे.

सध्या महाराष्ट्रामध्ये कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. मागील दोन महिन्यांत सतत पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना कीड व्यवस्थापन करता आले नाही. सध्या कपाशीची एकदा वेचणी झाली आहे. या वर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे फरदड घेण्याचे प्रमाण वाढू शकते. परंतु गुलाबी बोंड अळीचा धोका लक्षात घेता शेतकऱ्यांनी फरदड घेऊ नये. अळी अवस्था सुप्तावस्थेत राहून पुढील हंगामातील प्रादुर्भावाचे स्रोत बनते. 

गुलाबी बोंड अळी नियंत्रणातील यश 

  • मागील दोन वर्षांमध्ये कृषी विद्यापीठे, कृषी विभाग, खासगी कंपन्या आणि इतर संस्था त्यांच्यामध्ये उत्तम समन्वय झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक जनजागृती निर्माण करण्यात यश आले. शेतकऱ्यांनी कपाशीच्या पऱ्हाट्याची लवकर विल्हेवाट लावली.
  • जिनिंग मिलमध्ये पतंगाचे कामगंध सापळ्याद्वारे सामूहिकरीत्या आकर्षित करून नियंत्रण केले. जिनिंग मिलमध्ये कीडग्रस्त सरकी व सुप्तावस्थेतील अळ्यांचेही चांगले नियंत्रण झाले.  
  • कपाशीच्या बियाण्याची उपलब्धता जूनमध्ये करण्यात आली. त्यामुळे पूर्वहंगामी कपाशीची लागवड झाली नाही. कमी कालावधीच्या कपाशीच्या वाणावर भर देण्यात आला, तसेच बिगर बीटी बियाणे बीटी बियाण्यात मिसळूनच बियाण्याची विक्री केली. कामगंध सापळे याचे महत्त्व शेतकऱ्यांना पटले. 
  • गुलाबी बोंड अळीची सुप्तावस्था 

  • कपाशीवरील गुलाबी बोंड अळी ही अळी अवस्थेत सुप्तावस्थेत जाते. अळी स्वत:भोवती रेशमी धाग्याचे आवरण करुन त्यात सुप्तावस्थेत जाते. जमिनीवर पडलेल्या पालापाचोळा किंवा झाडावर न वेचलेल्या बोंडामध्ये आणि सूत गिरण्यामध्ये साठविलेल्या कपाशीमध्ये व भेगामध्ये सुप्तावस्थेतील अळ्या आढळून येतात. 
  • अळी बोंडातील बियाच्या आतील भाग खाऊन शिल्लक राहिलेल्या टरफलामध्ये सुप्तावस्थेत जाते.
  • सुप्तावस्थेवर परिणाम करणारे घटक 

  • दिवस व रात्रीचा कालावधी : कमी कालावधीचा दिवस आणि जास्त कालावधीची रात्र यानुसार गुलाबी बोंड अळी सुप्तावस्थेत जाते. कमी कालावधीच्या दिवसाच्या प्रमाणानुसार अळीचे सुप्तावस्थेतचे प्रमाण वाढत जाते.
  • तापमान : कमी होणाऱ्या तापमानानुसार गुलाबी बोंड अळीचे सुप्तावस्थेत जाण्याचे प्रमाण बदलते. 
  • खाद्य : जवळपास पक्व होणाऱ्या बोंडामध्ये अळी सुप्तावस्थेत जाते.
  •     सर्वसाधारणपणे जेव्हा दिवसाचा कालावधी कमी होतो आणि तापमान कमी होते, त्यानुसार अळ्यांचे सुप्तावस्थेत जाण्याचे प्रमाण वाढते. महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबर- डिसेंबर यानंतरच्या कालावधीत अशी परिस्थिती असते.

    कपाशी हंगाममध्ये गुलाबी बोंड अळी सुप्तावस्थेत जाण्याचे प्रमाण 

  • गुलाबी बोंड अळीच्या सुरुवातीच्या म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या अगोदरच्या ज्या पिढ्या तयार होतात, त्यामध्ये अळ्या सुप्तावस्थेत जात असल्याचे आढळून आले नाही. नोव्हेंबर -डिसेंबरमध्ये कमी कालावधीचा दिवस यासोबत कमी तापमान व कोवळ्या बोंडाची संख्या कमी झाल्यावर गुलाबी बोंड अळी सुप्तावस्थेत जाण्याला सुरुवात होते.
  • या जीवनक्रमात काही अळ्या सुप्तावस्थेत जातात, तर शिल्लक राहिलेल्या अळ्या कोषात जातात आणि त्यातून पतंग बाहेर पडून पुढील पिढी तयार होते. यानंतरच्या जीवनक्रमातील अळ्यांचे सुप्तावस्थेत जाण्याचे प्रमाण हळूहळू वाढते.
  • हंगामाच्या शेवटी शेतात शिल्लक राहिलेल्या बोंडामध्ये आणि जिनिंग मिलमध्ये साठविलेल्या कापसामध्ये सर्व अळ्या सुप्तावस्थेत जातात.
  • सुप्तावस्थेत गेलेली बोंड अळी प्रामुख्याने पुढील हंगामामध्ये पावसाळ्यामध्ये कोषात जाऊन त्यातून पतंग बाहेर पडतात. नवीन लावगड केलेल्या कपाशीवर अंडी घालतात. ज्या ठिकाणी शेतामध्ये पऱ्हाटी लवकर काढली नाही आणि जिनिंग मिलजवळील शेतामध्ये नवीन लागवड केलेल्या कपाशीवर पहिल्यांदा प्रादुर्भाव आढळून येतो. सुप्तावस्थेतून बाहेर येण्यासाठी जास्त आर्द्रता असावी लागते. गुलाबी बोंड अळीची सुप्तावस्था ४ ते ८ महिन्याची सर्वसाधारणपणे असते. परंतु हा कालावधी अडीच वर्षांपर्यंत आढळून आल्याची नोंद आहे.
  • सुप्तावस्था लक्षात घेता व्यवस्थापन  गुलाबी बोंड अळीचे आपल्या भागामध्ये कापूस हेच प्रमुख खाद्य पीक आहे. तिच्या सुप्तावस्थेत जाण्याचा कालावधी आणि नंतरच्या हंगामातील नवीन कपाशीच्या लावगडीवरील प्रादुर्भाव या वेळा नोंद करून विविध उपाययोजना केल्यास गुलाबी बोंड अळीचे शाश्‍वत व्यवस्थापन होईल.

    फरदड घेऊ नका 

  • फरदड घेतल्यास शेंड्याकडे बोंडे लागतात. ही बोंडे लहान असून यामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून येतो. त्यामुळे फरदड घेतलेल्या कपाशीपासून कमी व निकृष्ट दर्जाचे उत्पादन येते. तसेच बोंड अळीचा जीवनक्रम चालू राहतो. पुढील हंगामामध्ये जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. 
  • हंगामाच्या शेवटी झाडावर शिल्लक राहिलेल्या व खाली पडलेल्या बोंडामध्ये सुप्तावस्थेतील अळ्या असतात. हंगाम संपल्यावर शेतातील पऱ्हाटी काढून पुढील हंगामाअगोदर विल्हेवाट लावावी. तसेच जमिनीवर पडलेले किडकी बोंडे व पिकाचे अवशेष वेचून नष्ट करावी. यामध्ये सुप्तावस्थेतील अळ्यापासून पुढील हंगामामध्ये होणारे प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी करता येईल.
  • उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीच्या आतील व भेंगामध्ये सुप्तावस्थेत असलेल्या अळ्या प्रखर सूर्यप्रकाशाने मरतील किंवा पक्षी वेचून त्यांना खातील.
  • कपाशीवर जिनिंग मिलमध्ये प्रक्रिया करावी. जर प्रक्रिया करण्यास उशीर होणार असेल तर धुरीजन्य कीटकनाशकाची प्रक्रिया करावी. किडलेल्या सरकीची विल्हेवाट लावावी.
  • कपाशीची वेचणी झाल्यावर जेथे कापूस साठवून ठेवला आहे तिथे कामगंध सापळे लावून नर पतंग सामूहिकरीत्या आकर्षित करून ते नष्ट करावेत.
  • पूर्वहंगामी कपाशीची लागवड टाळावी. यामुळे पाऊस पडल्यानंतर पहिल्यांदा जे पतंग बाहेर निघतात त्या वेळी पिकाची अवस्था लहान असल्यास ते त्यावर अंडी घालत नाहीत किंवा घातली तरी त्यातून निघणाऱ्या अळा खाद्य नसल्यामुळे जगणार नाहीत.
  • कामगंध सापळयाचा वापर करावा. नवीन लागवड केलेल्या कपाशीमध्ये कामगंध सापळे लावावेत. यामुळे गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाची सुरुवात कळू शकते. त्याचबरोबर जास्त प्रमाणात कामगंध सापळे लावल्यास अधिक संख्येने नर पतंग आकर्षित करून त्यांचा नायनाट करता येतेा. मादी पतंग कोषातून निघाल्यानंतर १० दिवसांच्या आत जवळपास सगळी अंडी घालते. कामगंध सापळ्यातील पतंगाच्या नोंदी लक्षात घेऊन त्यानंतर आठवड्यामध्ये शिफारशीत रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी.
  • गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम  कोषातून पतंगाची उत्पत्ती झाल्यानंतर २ ते ३ दिवसांनी नर व मादीचे मिलन होते. मादी पतंग पहिल्या पिढीची अंडी ही कपाशी कायिक वाढीच्या अवस्थेत असताना पात्याजवळ किंवा पात्यावर घालते. दुसऱ्या व त्यानंतरच्या पिढीची अंडी बोंडावर घालते. अंडी एकेकटी किंवा ४ ते ५ च्या समूहात असतात. एक मादी १०० पेक्षा जास्त अंडी घालते. अंडी अवस्था ३ ते ७ दिवसांची असते. अंड्यातून निघालेली अळी ताबडतोब पाते, फुले किंवा बोंडामध्ये शिरते. अळी तीन वेळा कात टाकते. अळीचे दोन प्रकारचे जीवनक्रम असतात. कमी कालावधीचा जीवनक्रम

  • पूर्ण वाढलेली अळी कोषावस्थेत जाते. त्यातून ताबडतोब पतंग बाहेर पडून पुढील जीवनक्रम होतो.
  • कमी कालावधीचा जीवनक्रम असलेल्या अळ्या बोंडाला छिद्र करून बाहेर निघून जमिनीवर पालापाचोळ्यात कोषावस्थेत जातात किंवा पूर्ण वाढलेली अळी बोंडाला छिद्र करते. बोंडामध्ये कोषावस्थेत जाते. 
  • अळी अवस्था ८-२१ दिवस असते. कोषावस्था ६-२० दिवस असते. 
  • कोषावस्थेतून पतंग बाहेर पडतात. साधारणपणे नर-मादीचे प्रमाण १:१ असते. पतंग ५-३१ दिवस जगतात.
  • दीर्घ कालावधीचा जीवनक्रम

  • पूर्ण वाढलेली अळी सुप्त अवस्थेत राहते. 
  • दीर्घ कालावधीचा जीवनक्रम असलेल्या अळ्या स्वत:भोवती गोलाकार कोष विणून त्यात सुप्तावस्थेत राहतात. ही सुप्तावस्था पुढील हंगामापर्यंत किंवा दोन वर्षे देखील राहते. हा दीर्घ कालावधीचा जीवनक्रम हंगामाच्या शेवटी आढळून येतो. कमी कालावधीचा जीवनक्रम ३-४ आठवड्यात आणि दीर्घ कालावधीचा एक जीवनक्रम ५-१० महिन्यांत पूर्ण होतो. वर्षभरात ४-६ पिढ्यांची उत्पत्ती होते.
  • किडीची सुप्तावस्था  कीटक निसर्गातील नियमितपणे वारंवार येणाऱ्या प्रतिकूल हवामानावर मात करण्यासाठी त्यांची वाढ लांबणीवर टाकतात आणि निष्क्रिय राहतात, यास सुप्तावस्था असे म्हणतात. सुप्तावस्था ही कीटकाच्या जीवनक्रमातील ठरावीक अवस्थेत आनुवंशिकरीत्या आढळून येते. सुप्तावस्थेतील कीटकाची लक्षणे 

  • चयापचय क्रिया कमी होते.
  • किंचित किंवा काहीच वाढ होत नाही.
  • अति कमाल किंवा किमान हवामानास प्रतिकारक्षम होतात. 
  • वागणूकीत बदल होऊन ते निष्क्रिय राहतात.
  • कीटकांची सुप्तावस्थेत जाण्याची अवस्था 

  • वेगवेगळे कीटक वेगवेगळ्या अवस्थेत सुप्तावस्थेत जातात. 
  • नाकतोडे अंडी अवस्थेत, गुलाबी बोंड अळी व खोडकिडा अळी अवस्थेत,काही पतंगवर्गीय किडी कोष अवस्थेत आणि हुमणी प्रौढ अवस्थेत सुप्तावस्थेमध्ये जातात.
  •  काही कीटकाचा वर्षभरात एकच जीवनक्रम पूर्ण होतो, असे कीटक कोणत्यातरी एका अवस्थेत सुप्तावस्थेत जातात. उदा. नाकतोड्याचा वर्षभरात एकच जीवनक्रम पूर्ण होतो आणि ते अंडी अवस्थेत सुप्तावस्थेत जातात. 
  • काही कीटकांचे वर्षभरात अनेक जीवनक्रम पूर्ण होतात. अशा कीटकामध्ये एका जीवनक्रमात कोणत्यातरी एका अवस्थेत सुप्तावस्थेत जाते. उदा. कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे वर्षभरात अनेक जीवनक्रम होतात. हिवाळ्याच्या सुरुवातीपासूनच्या जीवनक्रमात काही अळ्या सुप्तावस्थेत जातात.
  •  - डॉ. बी. व्ही. भेदे ७५८८०८२०२८ (कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com