परोपजीवी सूत्रकृमींद्वारे हुमणीचे नियंत्रण

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने हुमणी नियंत्रणासाठी द्रवरूप स्वरूपातील इपीएन घटक विकसित केला आहे. इपीएन म्हणजे किडीच्या शरीरावर वाढणारे सूत्रकृमी. हे जमिनीमध्ये हुमणीला शोधून तिच्या शरीरात प्रवेश करून रोगग्रस्त करतात.
white grub infection sugarcane
white grub infection sugarcane

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने हुमणी नियंत्रणासाठी द्रवरूप स्वरूपातील इपीएन घटक विकसित केला आहे. इपीएन म्हणजे किडीच्या शरीरावर वाढणारे सूत्रकृमी. हे जमिनीमध्ये हुमणीला शोधून तिच्या शरीरात प्रवेश करून रोगग्रस्त करतात. तिच्या शरीरात वाढतात. मृत किडीच्या शरीरातून बाहेर पडून जमिनीमध्ये दुसऱ्या हुमणीला शोधून तिला रोगग्रस्त करतात. जैविक पद्धतीने हुमणीचे प्रभावी नियंत्रण करणे शक्य होते. 

बदलते हवामान व अवर्षण   परिस्थितीमुळे ३ ते ४ वर्षांत हुमणीचा प्रादुर्भाव कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यांमध्ये वाढला आहे. हुमणीच्या ३०० प्रजातींची नोंद भारतात झाली आहे. राज्यात हुमणीच्या प्रामुख्याने  ल्युकोफोलीस लेपिडोफोरा आणि होलोट्रॅकिया सेराटा या दोन प्रजाती आढळतात. तसेच नव्या दोन प्रकारच्या (फायलोग्याथस आणि अ‍ॅडोरेटस) हुमणीच्या प्रजातीही आढळल्या आहेत. हुमणीचे नदीकाठावरील व माळरानावरील हुमणी असे वर्गीकरण केले जाते. यापैकी ल्युकोफोलीस ही नदीकाठावर तर होलाट्रॅकिया माळरानावर आढळते. माळरानावरील हुमणी मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान करते. प्रादुर्भावामुळे ऊस उगवणीत ४० टक्के तर उत्पादनात हेक्टरी १५-२० टनांपर्यंत नुकसान होते. 

किडीचा जीवनक्रम

अवस्था ः अंडी, अळी, कोष व भुंगेरे

  • मॉन्सूनच्या पहिल्या सरीनंतर प्रौढ भुंगेरे संध्याकाळी जमिनीतून कोषावस्थेतून बाहेर येतात. कडुनिंब, बाभूळ, बोर आदी झाडांची पाने खातात. 
  • नर-मादीचे मिलन झाल्यानंतर मादी जमिनीत अंडी घालते. प्रति मादी ५० ते ६० अंडी घालते. 
  • अळीची पहिली अवस्था २५-३० दिवस, दुसरी ३० ते ४५ दिवस तर तिसरी अवस्था १४०-१४५ दिवस असते. 
  • तिसऱ्या अवस्थेतील पूर्ण वाढ झालेली अळी जमिनीत खोल जाऊन मातीची गादी करते. त्यात कोषावस्थेत जाते.
  • एक पिढी पूर्ण होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो. 
  • नुकसानीचे स्वरूप  

  • काहीवेळा चांगल्या वाढलेल्या उसाला हुमणी लागलेली आहे, हे ऊस वाळून गेल्यानंतरच कळते. त्यासाठी उपद्रव वेळीच लक्षात येणे गरजेचे आहे. हुमणीची उपद्रवी जीवनक्रिया दोन भागात आढळून येते. एक म्हणजे अळी अवस्था. जी जमिनीमध्ये आढळते तर दुसरी भुंगा अवस्था झाडांवर आढळते. 
  • अळीची पहिली अवस्था जमिनीतील सेंद्रिय पदार्थ व मुळांवर उपजीविका करते.
  • दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळ्या जून-ऑक्टोबरमध्ये आढळतात. प्रामुख्याने उसाच्या मुळ्या खातात. त्यामुळे अन्नद्रव्ये व पाणी कमी पडते. ऊस हळूहळू निस्तेज दिसायला लागतो. पाने मरगळतात. कालांतराने ऊस संपूर्ण वाळतो.
  • एका वाळलेल्या उसाच्या बेटाखाली ५ ते ६ अळ्या आढळतात. अळी अवस्था मुळावर जगत असल्यामुळे तसेच हा कालावधी जास्त असल्याने नुकसानीचे प्रमाण जास्त असते.
  • आडसाली ऊस दोनवेळा प्रादुर्भावाला बळी पडतो.   
  • हुमणी नियंत्रण पद्धती

    उन्हाळ्यात खोल नांगरट करावी. त्यामुळे किडींच्या अंडी, अळी सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येऊन नष्ट होतात. जमिनीतून बाहेर आलेल्या सुप्त अवस्थांचा पक्षी खाऊन टाकतात. 

  • पीक फेरपालट व सापळा पीक पद्धतीचा वापर करावा. 
  • प्रौढ भुंगेरे गोळा करणे  
  • मॉन्सूनच्या पहिल्या सरीनंतर भुंगेरे जमिनीतून बाहेर पडतात. रात्रीच्या  वेळी बाभूळ व कडुनिंबाच्या झाडावर मोठ्या प्रमाणात जमा होतात. सायंकाळी सात ते नऊच्या दरम्यान फांद्या हलवून जमिनीवर पडलेले भुंगेरे गोळा करावेत. रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून मारावेत. कामगंध व प्रकाश सापळ्यांचा वापर भुंगेरे गोळा करण्यासाठी करावा. 
  • रासायनिक पद्धत  कडूनिंब किंवा बाभळीच्या झाडांची पाने खाल्लेली दिसल्यास भुंगेऱ्याचा बंदोबस्त करावा. शेणखत, कंपोस्ट खत आदींद्वारे  हुमणीची अंडी व अळ्यांचे शेतात प्रसारण होते. रासायनिक पद्धतीने त्यांचे नियंत्रण करता येते.   जैविक पद्धत 

  • रासायनिक कीडनाशकांच्या वापरामुळे जमिनीतील उपयुक्त मित्रकीटकांची संख्या कमी झाली आहे. जैविक पद्धतीने हुमणीचे नियंत्रण करण्यासाठी बिवेरिया बॅसियाना, मेटारायझिम ॲनीसोप्ली या बुरशींचा वापर करावा. 
  • एंटोमोपॅथोजेनिक निमॅटोड (इपीएन) म्हणजे किडीच्या शरीरावर वाढणारे सुत्रकृमी हुमणीचे नियंत्रण करतात. 
  • हुमणीला रोगग्रस्त करणारे सूत्रकृमी हेटेरोरॅबडिटिस व स्टईर्नेनिमटीडीस असे या दोन प्रकाराचे आहेत. ते सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये आढळतात. 
  • हेटेरोरॅबडिटिस या सूत्रकृमीद्वारे रोगग्रस्त झालेली हुमणी तपकिरी तांबड्या रंगाची दिसते. 
  • सूत्रकृमींचा वापर

  • वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने हुमणी नियंत्रणासाठी द्रवरूप स्वरूपातील इपीएन घटक विकसित केला आहे. हे जमिनीमध्ये आढळणारे सूत्रकृमी असून जमिनीमध्ये हुमणीला शोधून तिच्या शरीरात त्वचेवरील छिद्रांवाटे किंवा तोंडावाटे प्रवेश करतात. किडीला रोगग्रस्त करून तिच्या शरीरात वाढतात. मृत किडीच्या शरीरातून बाहेर पडून जमिनीमध्ये दुसऱ्या हुमणीला शोधून तिला रोगग्रस्त करतात. 
  • एकरी एक लिटर प्रति २०० लिटर पाणी किंवा ५ मिली प्रति १ लिटर पाण्यातून पिकाच्या मुळाशी वाफसा स्थितीत आळवणी केल्यास हुमणी नियंत्रण करता येते. वापर केल्यानंतर जमिनीमध्ये वाफसा स्थिती सतत ठेवल्यास चांगला परिणाम दिसून येतो. इपीएन हे हुमणीचे नैसर्गिक शत्रू असल्याने त्यांचा जमिनीतील उपयुक्त जीवाणू, वातावरण, पिकांवर तसेच मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाही.  
  • - क्रांती निगडे, ८३७९९४६९८७, ०२०-२६९०२२६७,  (संशोधन अधिकारी,कृषी सूक्ष्मशास्त्र विभाग,वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे)  ( लेखक वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथे महासंचालक आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com