काळीमिरीची लागवड

मिरी लागवडीसाठी आधाराच्या झाडांपासून किमान ४५ सें.मी ते १ मी अंतर सोडून ६० बाय ६० बाय ६० सें.मी आकाराचे खड्डे खणावेत. पूर्व व उत्तर दिशेला हे खड्डे खणावेत.पन्नीयुर-१ ही संकरित जात चांगले उत्पादन देते. या जातीच्या प्रति वेलापासून २.५ किलो काळ्या मिरीचे उत्पादन मिळते.
black pepper cultivation
black pepper cultivation

मिरी लागवडीसाठी आधाराच्या झाडांपासून किमान ४५ सें.मी ते १ मी अंतर सोडून ६० बाय ६० बाय ६० सें.मी आकाराचे खड्डे खणावेत. पूर्व व उत्तर दिशेला हे खड्डे खणावेत.पन्नीयुर-१ ही संकरित जात चांगले उत्पादन देते. या जातीच्या प्रति वेलापासून २.५ किलो काळ्या मिरीचे उत्पादन मिळते. 

उत्तम निचरा होणारी जमीन मिरी लागवडीसाठी निवडावी. या जमिनीत भरपूर अन्नद्रव्ये आणि सेंद्रिय घटक असावेत. अति विम्ल किंवा आम्लयुक्त जमीन निवडू नये. ज्या जमिनीत पावसाळ्यात पाणी वारंवार साचते, अशी जमीन लागवडीसाठी निवडू नये. 

लागवडीची पद्धत  मिरी लागवड स्वतंत्रपणे तसेच नारळ व सुपारीच्या बागेत मिश्रपीक लागवड आणि परसबागेत देखील करता येते.

अ) स्वतंत्रपणे मिरी लागवड 

  • मिरी वेलाला सावली व आधाराची आवश्यकता असते. म्हणूनच स्वतंत्र मिरीच्या लागवडीसाठी आधारासाठीच्या झाडांची लागवड करावी.
  • मिरी लागवडीपूर्वी किमान ६ ते १० महिने अगोदर बिनकाटेरी पांगारा, सिल्व्हर ओक किंवा मॅंजियम या झाडांची ३ मी बाय ३ मी अंतरावर लागवड करावी. अशा प्रकारे लागवड केली असता मिरीचे उत्पादन व प्रति हेक्‍टरी उत्पादकता चांगल्या प्रकारे वाढते. 
  • सुधारीत जाती

  •  काळीमिरीच्या पन्नीयूर १ ते ८, श्याम, पंचमी, पूर्णिमा, करीमुंडा, श्रीकारा, शुभकारा या जाती आहेत. 
  • कोकणातील हवामानात पन्नीयुर-१ ही संकरित जात चांगले उत्पादन देते. या जातीच्या प्रति वेलापासून २.५ किलो काळ्या मिरीचे उत्पादन मिळते. मिरीच्या दाण्यात ३.५ टक्के तेल असते. अति सावलीच्या ठिकाणी या जातीच्या उत्पादनावर परिणाम होतो.
  • ब) नारळ व सुपारी बागेतील आंतरपीक  

  •  नारळ व सुपारी बागेत मिरी उत्पादन चांगल्या प्रकारे येते.  मात्र या लागवडीत योग्य अंतर असणे आवश्यक आहे.
  • नारळ बागेत ७.५ मी. बाय  ७.५ मी. तर सुपारीमध्ये २.७ मी बाय २.७ मी अंतर असणे आवश्यक आहे. 
  • क) परसबागेत लागवड  

  • परसबागेतील अनेक झाडांवर मिरी वेल चढवता येतात. फणस, नारळ, आंबा, सुपारी, तसेच परस बागेतील इतर झाडांवर मिरी लागवड करता येते. 
  • परसबागेत पुरेसा सूर्यप्रकाश असणे आवश्यक आहे. 
  • लागवडीची पूर्व तयारी 

  • लागवड जून महिन्यामध्ये किंवा पावसाळा संपताना ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात करावी. 
  • लागवडीसाठी आधाराच्या झाडांपासून किमान ४५ सें.मी ते १ मी अंतर सोडून ६० बाय ६० बाय ६० सें.मी आकाराचे खड्डे खणावेत. पूर्व व उत्तर दिशेला हे खड्डे खणावेत. 
  •  चांगली माती, शेणखत (२ ते ३ घमेली) व अर्धा किलो सिंगल सुपर फॉस्फेट मिसळून हे खड्डे पूर्ण भरून घ्यावेत. खड्ड्यामध्ये मुळे फुटलेली दोन मिरीची छाट कलमे प्रत्येक झाडाजवळ लावावी. 
  • छाट कलमांची लागवड 

  • मिरी कलमे काळजीपूर्वक लावावीत. कलमाच्या पिशव्या ब्लेड, चाकुने कापून अलगदपणे मातीचा गड्डा न फोडता कलम प्लॅस्टिक पिशवीपासून अलग करावे. 
  • लागवडीसाठी भरलेल्या खड्ड्याच्या मध्यभागी कलमाच्या मातीचा गोळा बसेल इतकी माती खड्ड्यातून काढून घ्यावी. कलमाची लागवड करावी. बाजूची माती हाताने चांगल्याप्रकारे दाबावी. 
  • कलम लावताना पिशवीतील मातीच्या वरील एक ते दोन वेलाचे पेर जमिनीत पुरावेत.  पावसाचे पाणी साचू नये म्हणून वेलाजवळ मातीची भर द्यावी. वेलाला आधारासाठी काठी लावावी. 
  • आंतर मशागत आणि निगा  

  • मिरी हे बागायती पीक आहे. पावसाळा संपल्यावर वेलास पाणी पुरवठ्याची सोय करावी. आधाराचे झाड जर नारळ किंवा सुपारी असेल तर पाणी पुरवठा करताना विशेष अडचणी येत नाही. 
  • स्वतंत्रपणे लागवड करताना स्वतंत्र पाणी पुरवठ्याची व्यवस्था करावी. ठिबक किंवा सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. 
  • वाढ जोमदार होण्यासाठी व चांगले उत्पादन मिळण्यासाठी खताचा पुरवठा करणे आवश्यक ठरते. सेंद्रिय खत किंवा सेंद्रिय आणि रासायनिक खत मात्रा द्यावी. 
  •  पूर्ण वाढलेल्या एका मिरीच्या झाडाला तिसऱ्या वर्षापासून १० किलो शेणखत, १५० ग्रॅम नत्र, ७५ ग्रॅम स्फुरद, व १५० ग्रॅम पालाश देणे आवश्यक आहे. खताची मात्रा वर्षातून दोनदा ऑगस्ट आणि फेब्रुवारी महिन्यात विभागून द्यावी. लागवड केल्यावर पहिल्या वर्षी वरील मात्रेच्या एक तृतीयांश तर दुसऱ्या वर्षी दोन तृतीआंश मात्रा द्यावी.खत देण्यासाठी मिरीच्या  वेलापासून सभोवार किमान ३० सें.मी अंतर सोडून १५ ते २० सें.मी रुंदीचा उथळ चर काढून त्यात खत द्यावे. 
  • वेला सभोवती सातत्याने आच्छादन ठेवावे. आधाराच्या झाडांची गळून पडलेली पाने, गवताचा वापर करावा. आच्छादन केल्याने पाण्याची बचत होते. तण वाढत नाही. वेलाची वाढ अंत्यत चांगली होते.
  • वेलांना झाडावर चढेपर्यंत सैल बांधावे. वेलांची उंची ५ ते ६ मीटर पेक्षा वाढू देऊ नये. पावसाळ्यात मिरी बागेमध्ये पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. 
  • अभिवृध्दी 

  • सर्वसाधारणपणे मिरीची अभिवृद्धी फेब्रुवारी ते एप्रिलच्या कालावधीत छाट कलमांपासून करतात. तयार केलेली छाट कलमे सावलीमध्ये ठेवून त्यांना नियमित पाणी द्यावे. 
  • छाट कलमांना सुमारे २० दिवसानंतर धुमारे फुटण्यास सुरुवात होते. चांगली वाढलेली छाट कलमे लागवडीसाठी वापरावी.
  • - ०२३५२ - २५५०७७  (प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये, जि. रत्नागिरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com