पंजाबचे पशुपालक वापरतात सुधारित तंत्र

jersey breed of cow
jersey breed of cow

लुधियाना (पंजाब) येथे प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स असोशिएशनतर्फे दरवर्षी आंतरराष्ट्रीय डेअरी आणि कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. नुकतेच हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन संपन्न झाले. हे प्रदर्शन म्हणजे पंजाब, हरियाना राज्यांतील पशुसंवर्धन आणि दुग्धविकास क्षेत्रातील प्रगतीचा आरसा आहे. पंजाब आणि हरियाना येथील दूध उत्पादकांनी एकत्र येऊन प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स असोशिएशनची सुरुवात केली. या संस्थेने पशू संवर्धन व दुग्धविकास क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे . या प्रदर्शनात जास्तीत जास्त दूध देणाऱ्या होल्स्टिन फ्रीजियन, जर्सी गाई तसेच मुऱ्हा व नीलीरावी जातीच्या म्हशी पहावयास मिळतात. या सोबतच, व्यवस्थापनातील  उत्कृष्टता, दूध उत्पादन आणि जनावरांच्या प्रकाराप्रमाणे खाद्य नियोजनाचे सूत्रही या प्रदर्शनात पशुपालकांना मिळते. पशुपालन व्यवसायात झोकून देऊन अतिशय आवडीने काम करण्याची तयारी यामुळे पंजाब आणि हरयाणातील पशुपालकांनी प्रगती साधली आहे. 

दुग्ध व्यवसायाची सूत्रे  प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स असोशिएशनने खासगी कंपन्यांच्या सहकार्याने जातिवंत होल्स्‍टिन फ्रीजियन गाईंची दुधाळ वंशावळ तयार केली आहे. या गाई सरासरी प्रति दिन ३५ लीटर पर्यंत दूध देतात. काही पशुपालक जर्सी गाईचे पालन करीत आहेत. या गाई सरासरी प्रतिदिन २५ लिटर दूध देतात. हरियानामध्ये म्हैसपालन जास्त प्रमाणात होते. येथील मुऱ्हा म्हैस सरासरी प्रतिदिन १५ लीटर दूध देतात. काही पशुपालक नीली रावी आणि जाफराबादी म्हशीचे संगोपन करतात. याचबरोबरीने काही पशुपालक सहिवाल या देशी गाईंचे संगोपन करतात. संकलित दूध हे खासगी कंपन्या तसेच सहकारी दूध संघ खरेदी करतात. मोठे डेअरी फार्म्स स्वतः दूध, तुपाचे पॅकिंग करून विकतात. दूध वितरणासाठी काही शहरात कंपन्यांनी दूध एटीएम यंत्रे बसविली आहेत.  

  •  उच्च दर्जाचे सेक्स सीमेन किंवा सॉर्टेड सीमेन तसेच भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर येथील पशुपालक करतात. या तंत्रज्ञानाद्वारे जातिवंत दुधाळ पिढी गोठ्यात तयार होत आहे.
  • उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये जनावरांवर येणारा ताण दूध उत्पादन आणि प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम करतो. हे लक्षात घेऊन उन्हाळ्यात गोठ्यामध्ये तुषार संच तसेच फॅनचा वापर केला जातो. गोठ्यामध्ये जनावरांना पिण्यासाठी थंड पाणी उपलब्ध करून दिले जाते.
  • चांगल्या पशू आहार व्यवस्थापनाची सुरुवात संक्रमण काळापासूनच केली जाते. गाई, म्हशींना उच्च प्रतीची प्रथिने व ऊर्जायुक्त आहार दिला जातो. त्यांचे एकूण शुष्क पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढविल्याने अपेक्षित परिणाम मिळतो. एकदा गाय, म्हैस उच्च दूध उत्पादनाला पोचली, की त्यानंतरचे खाद्य हे दूध उत्पादनाच्या प्रमाणात दिले जाते. एकूण मिश्र खाद्य किंवा टीएमआर तंत्रज्ञान पशुखाद्य व चाऱ्याचा  पुरेपूर वापर आणि पोटातील आम्लता कमी करणेसाठी केला जातो.
  • व्यवस्थापनातील आधुनिकीकरण, गोठ्याचे आधुनिक बांधकाम, मिल्किंग पार्लर, ताण कमी करण्यासाठी स्प्रे कुलिंग, ग्रुमिंग ब्रश, दूध व शेण काढण्यासाठी यांत्रिकीकरण, वासरांचे शिंग कापणे, वासरू अडकल्यास लागणारी सामग्री, खुरे कापणी यंत्रणेमुळे पशुपालन व्यवस्थापन सुधारण्यास मदत झाली आहे.
  • उत्तम चाऱ्याची निर्मिती  चांगल्या दूधनिर्मितीसाठी वर्षभर चांगल्या प्रतीचा हिरवा व कोरड्या चाऱ्याची उपलब्धता महत्त्वाची आहे. पंजाबमध्ये युरोपात उपलब्ध असणाऱ्या पौष्टिक रायग्रासची लागवड केली जाते. रायग्रासमध्ये १६ टक्के प्रथिने असल्यामुळे दूध वाढीला मदत होते. पंजाब, हरयाणामध्ये चांगल्या प्रतीच्या लसूण घासाचे बियाणे देखील येथे उपलब्ध होते. या चाऱ्यामध्ये सुमारे २१ टक्के इतकी प्रथिने असतात.

    मुरघासनिर्मिती यंत्रणा वर्षभर हिरवा चारा हा मुरघासाच्या स्वरूपात साठवणूक करण्यासाठी ट्रॅक्टरचलीत सायलेज बेलिंग यंत्र पंजाबातील पशुपालकांच्याकडे पहावयास मिळते. येथील पशुपालक वर्षभरासाठी लागणारे मुरघास तयार करून ठेवतात. या यंत्रणेमुळे मुरघासनिर्मिती तसेच चाऱ्यामधील पोषणमूल्य देखील वाढते. यामध्ये बेल सायलेज, बॅग सायलेज, बंकर सायलेजचा समावेश होतो. 

    टोटल मिक्स राशन वॅगन टोटल मिक्स राशन म्हणजे गाई, म्हशी व इतर जनावरांना हिरवा-कोरडा चारा, सायलेज, खाद्य, भरडा, चुनी, पेंड, बायपास फॅट, मिनरल प्रीमिक्स इत्यादी घटक एकत्र एकजीव करून खायला दिले जातात. पारंपरिक पशुखाद्य पद्धतीमध्ये आंबोण किंवा खाद्य, हिरवा चारा, कोरडा चारा, पशुखाद्य पुरके वेगवेगळी दिली जातात. मात्र टोटल मिक्स राशन या प्रकारात हे सर्व घटक वेगवेगळे न देता एकत्र करून दिले जातात. टीएमआर हे गाई, म्हशींबरोबरच शेळी-मेंढी व इतर रवंथ करणाऱ्या जनावरांनाही खाऊ घालता येते. टीएमआरमुळे गाई, म्हशींचे पचन सुधारते, कोठीपोटाचा सामू सुधारून आम्लता कमी होण्यास मदत होते. दुभत्या गाई, म्हशींच्या दूध उत्पादनाप्रमाणे टीएमआर बनवता येते.  पशुखाद्य किंवा आंबोण आणि चारा हे घटक संपूर्ण मिसळून दिल्यामुळे कोठीपोटातील पचन करणाऱ्या जिवाणूंना सर्व प्रकारची पोषणतत्त्वे उपलब्ध होतात. फक्त आंबोण किंवा खाद्य खाल्यामुळे कोठीपोटात होणारी तीव्र आम्लता टाळता येते.

    बीटा कॅरोटीन, गाभण जनावर ओळखणारी यंत्रणा जनावरांच्या रक्तातील बीटा कॅरोटीनची कमतरता ओळखणारे उपकरण पशुपालकांसाठी उपलब्ध झाले आहे. याचबरोबरीने प्रेग्नन्सी टेस्ट कीट ज्यामध्ये केवळ २८ दिवसांची गाभण गाय किंवा म्हैस ओळखणे शक्य होते. अशी यंत्रणा गोठ्यात असणे आता महत्त्वाचे आहे.  गाई, म्हशींसाठी ग्रुमिंग ब्रश  दुभत्या जनावरांच्या शरीरातील रक्ताभिसरण जितके चांगले तितके दूध उत्पादन वाढण्यास मदत होते. यासाठी स्वयंचलित ग्रुमिंग ब्रश गोठ्यात लावल्यास गाऊ, म्हशी ओळीने आपले अंग या ब्रशच्या साहाय्याने खरारा करतात. 

    वायुवीजन यंत्रणा उन्हाळ्यात गाई, म्हशींना तापमान वाढीचा त्रास जाणवतो. त्यामुळे दूध उत्पादनावर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन यासाठी गोठ्यामध्ये मोठे पंखे लावल्यास हवा खेळती राहण्यास मदत होते. गोठ्यामध्ये एका बाजूने हवा सोडून दुसऱ्या बाजूने हवेचा वेग नियंत्रित करून बाहेर सोडल्यास आतील दूषित हवा बाहेर जाऊन नवीन ताजी हवा आत येण्यास मदत होते. यासाठी हवेचा वेग एका विशिष्ट पातळीवर नियंत्रित करावा लागतो. यासाठी विविध क्षमतेचे पंखे उपलब्ध झाले आहेत.

    आर.एफ.आई.डी.पट्टे  जनावरांची ओळख तसेच विमा योजनेसाठी लागणारे टॅग तसेच रस्त्यावर बसलेल्या गायी दुरून ओळखण्यासाठी त्यांच्या गळ्यात बांधता येणारे प्रकाश परावर्तित करणारे पट्टे लावणे महत्त्वाचे असते. जनावरांची ओळख होण्यासाठी आर.एफ.आई.डी.पट्टे देखील प्रदर्शनात पाहता आले. पंजाब, हरयाणातील जातिवंत जनावरे सांभाळणारे पशुपालक याचा वापर करतात.

     - डॉ. पराग घोगळे, ९८९२०९९९६९  (लेखक पशुआहार व व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com