गुणवत्तापूर्ण दुग्धोत्पादनावर भर

milk testing lab
milk testing lab

जर्मनीमध्ये सहकारी संस्थांमार्फत दुधाचे संकलन केले जाते. दूध घेताना दर्जा पाहिला जातो. येथील सरकारने डेअरी व्यवसायाला चालना दिली आहे. दुधापासून विविध प्रक्रिया पदार्थ तयार केले जातात. दुधाची गुणवत्ता वाढावी म्हणून विशेष लक्ष दिले जाते. अत्याधुनिक पद्धतीने गाईंचे व्यवस्थापन केले जाते.

जर्मनी हा देश दुग्ध उत्पादनात अग्रेसर आहे. जर्मनीमध्ये पशुपालन व्यवसाय हा उत्तर पश्चिम भाग तसेच दक्षिण पूर्व भागामध्ये केला जातो. दूध उत्पादनासाठी जर्मन होल्स्टिन ब्लॅक अॅण्ड व्हाईट आणि जर्मन होल्स्टिन रेड अॅण्ड व्हाईट या जातिवंत दुधाळ गाईंचे संगोपन केले जाते. याचबरोबरीने जर्मन ब्रोस आणि इतर स्थानिक जातीदेखील दुग्धोत्पादनासाठी सांभाळल्या जातात. होल्स्टिन जातीची गाय एका वेतामध्ये सरासरी दहा हजार लिटर दूध देते. या देशामध्ये एका पशुपालकाकडे ५० गाईंपासून ते २००० गाईंचे संगोपन केले जाते. ७५ टक्के गाई मोकळ्या कुरणात असतात. गाईंना खाद्य म्हणून हिरवे गवत, धान्य, वाळलेले गवत, सातू- गव्हाचा कोंडा, प्रथिनयुक्त खाद्य, सोयाबीन, शुगर बीटचा वापर केला जातो. दुधाची विक्री सहकारी संस्थेच्या माध्यमातून केली जाते. वैयक्तिक शेतकरी खासगी स्वरूपात दुधाची विक्री करत नाही.  अद्ययावत प्रयोगशाळा  सुमारे ७० वर्षांपूर्वी सात वेगवेगळ्या संस्थांनी एकत्र येऊन दूध तपासणी प्रयोगशाळेची स्थापना केली आहे. अद्ययावत साधनांनी सुसज्ज प्रयोगशाळेत एसएनएफ, फॅट, प्रथिने, सोमॅटिक सेल, जीवाणू, रक्त आदी चाचण्या केल्या जातात. सोसायटीमार्फत दूध प्रक्रियेसाठी पाठविण्यापूर्वी नमुना गोळा करून दर्जा तपासला जातो. प्रत्येक गाईच्या दुधाचा नमुना चाचणीसाठी घेतला जातो. दररोज तीन लाख नमुन्यांची तपासणी केली जाते. त्याचा अहवाल पशुपालकाला पाठविला जातो. सर्व चाचण्या झाल्यानंतर अहवालाप्रमाणे दुधाला दर दिला जातो. जोपर्यंत योग्य दर्जाप्रमाणे दूध येत नाही तोपर्यंत पशुपालकाकडून दूध घेतले जात नाही. दुधाचे पैसे पशुपालकाच्या बॅंक खात्यावर जमा होतात. पशुपालकांची होकवॉल्ड सोसायटी  होकवॉल्ड दूध सोसायटीला तीन हजार पशुपालक दुधाचा पुरवठा करतात. वर्षाला २२३.८० कोटी लिटर दुधाचे उत्पादन होते. सभासदाने जेवढे शेअर्स घेतले आहेत, त्या प्रमाणात संस्थेस दूध विक्री करता येते. एक सभासद वर्षासाठी एका शेअर्सला ३,००० लिटर दूध संस्थेला देऊ शकतो. एक सभासद ४१६ शेअर्स घेऊ शकतो. सभासदाला शेअर्सप्रमाणे फायदा दिला जातो. सोसायटी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होते. सोसायटीतर्फे पर्यावरण संवर्धन आणि गाईंच्या व्यवस्थापनासाठी विविध उपक्रम राबविले जातात. शासनाचे सहकार्य  सहकारी संस्थांमार्फत दुधाचे संकलन केले जाते. दूध घेताना दर्जा पाहिला जातो. दुधाचे संकलन करून शासनाकडे पाठविले जाते. पशुपालकाला दुधाचे पैसे दुसऱ्या दिवशी मिळतात. येथील सरकारने डेअरी व्यवसायाला चालना दिली असून, दुधापासून विविध प्रक्रिया पदार्थ तयार केले जातात. विविध देशात प्रक्रिया उत्पादनांची निर्यात केली जाते. दुधाची गुणवत्ता वाढावी म्हणून विशेष लक्ष दिले जाते. वेळोवेळी शासकीय पशुतज्ज्ञांकडून गाईंची तपासणी केली जाते. दुधाचा दर कमी झाल्यास शासकीय हमी दिली जाते. विमासेवादेखील उपलब्ध आहे. आवश्यकतेनुसार पशुपालकाला २ टक्के दराने कर्ज पुरवठा केला जातो. पशुपालकाची झोकून काम करण्याची पद्धत, जिज्ञासा, व्यवसायाबद्दल आपुलकी यामुळे जर्मनीमध्ये दूध व्यवसाय किफायतशीर पद्धतीने केला जातो.

आधुनिक गोठ्याला भेट 

  • अभ्यास दौऱ्यामध्ये वीस वर्षांपासून पशुपालन व्यवसायात असलेल्या शेतकऱ्याच्या बरोबरीने आम्हाला चर्चा करण्याची संधी मिळाली. त्याने ५०० गाईंचे व्यवस्थापन केले होते. यापैकी १६० गाई दुधाळ होत्या. कुटुंबातील चार जण आणि एक मदतनीस गाईंचे व्यवस्थापन पहात होते. 
  •  या ठिकाणी गाईंचे गोठे साधे आहेत. थंड हवामानात तग धरणाऱ्या गाईंचे संगोपन केले जाते. उष्ण हवामानाच्या काळात गाईंना हवेशीर गोठ्यामध्ये ठेवले जाते. शेडची उंची ५ ते ८ मीटर असते. गोठ्याची रुंदी २४ मीटरपेक्षा जास्त असल्यास उंची ८ मीटर असते. रखरखीत सूर्यप्रकाश असणाऱ्या भागांमध्ये छतासाठी वेत/बांबू किंवा गवत वापरले जाते. यामुळे उष्णता नियंत्रणात राहाते. शेडची उभारणी पूर्व-पश्चिम दिशेस केली जाते. यामुळे उन्हाळी वारे शेडमध्ये जास्त प्रमाणात फिरते. शेजारील शेडमधील दूषित हवा अन्य शेडमध्ये पसरू नये म्हणून दोन शेडमधील अंतर किमान १५ मीटर ठेवले जाते. गाईंसाठी गव्हाण ही उभे राहण्याच्या जागेपेक्षा २० सेंमीने उंच असते. त्यामुळे गाईंना चारा खाताना जास्त वाकावे लागत नाही. उन्हाळ्याच्या झळा गाईंना बसू नयेत म्हणून सूक्ष्म तुषार सिंचन आणि कुलिंग फॅन शेडमध्ये असतात.
  • गाईंना खाद्य देण्यापासून ते दूध काढणीपर्यंतची सर्व कामे यंत्र मानव करतो. गाईंचा हा फार्म अत्यंत आधुनिक पद्धतीचा होता. सकाळ, दुपार आणि संध्याकाळी गाईंची धार काढली जाते. दूध काढणीसाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जातो. यंत्रमानव सात मिनिटांत एका गाईचे दूध काढतो. यंत्रमानवाची कार्यप्रणाली व्यवस्थित चालू आहे किंवा नाही हे सातत्याने पाहिले जाते. दूध साठवणुकीसाठी शीतकरण यंत्रणा आहे. 
  •  दूध देणारी गाई, दूध न देणारी गाई आणि वासरांचे स्वतंत्रपणे व्यवस्थापन केले जाते. गाईंना दर्जेदार खाद्य दिले जाते. यामध्ये सुके व पौष्टिक घटकांचे योग्य प्रमाण (६०:४०) ठेवले जाते. प्रत्येक गाईची स्वतंत्रपणे नोंद ठेवलेली आहे.
  •  आम्ही भेट दिलेल्या पशुपालकाकडे १६० हेक्टर जमीन होती. त्यापैकी १०० हेक्टर क्षेत्रामध्ये गवत, सातू, गहू, मका इत्यादी पिकांची लागवड होती. त्याचे बारकाईने लक्ष होते.
  • चांगली दुधाळ गाय दिवसाला सरासरी ४० लिटर दूध देते. एका गाईपासून सहा वेत मिळतात. दूध उत्पादनाचा खर्च प्रति लिटर ३५ रुपये होता. त्या वेळी विक्री दर ५० रुपये होता. सहा वेतानंतर गाय कत्तलखान्याकडे पाठवतात. गाईच्या मांसाला प्रति किलो २०० रुपये दर मिळतो. 
  • - डॉ. राजेंद्र सरकाळे, ९८५०५८६२२० (लेखक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com