Agriculture Agricultural News Marathi article regarding farming in manmar. | Agrowon

म्यानमारी शेतकऱ्याची जीवनदायिनी : इरावडी

डॉ. सतीलाल पाटील
शनिवार, 10 एप्रिल 2021

इरावडी ही म्यानमारमधील सर्वांत मोठी आणि देशातील सर्वांत लांब नदी आहे. व्यापारासोबत इरावडी नदीचे येथील शेती व्यवसायात भरीव योगदान आहे. तब्बल चार लाख वर्ग किलोमीटरचं सिंचन क्षेत्र एकट्या इरावडी नदीचे आहे. यावरून तिचं महत्त्व लक्षात येईल. या नदीच्या आश्रयाला साडेतीन कोटी लोक राहतात.

इरावडी ही म्यानमारमधील सर्वांत मोठी आणि देशातील सर्वांत लांब नदी आहे. व्यापारासोबत इरावडी नदीचे येथील शेती व्यवसायात भरीव योगदान आहे. तब्बल चार लाख वर्ग किलोमीटरचं सिंचन क्षेत्र एकट्या इरावडी नदीचे आहे. यावरून तिचं महत्त्व लक्षात येईल. या नदीच्या आश्रयाला साडेतीन कोटी लोक राहतात.

म्यानमारच्या प्रवासात खराब रस्ते जाऊन चकाचक डांबरी रस्ते लागले. लोण्यासारख्या रस्त्यावर बुलेटचे टायर कॅरमच्या स्ट्रायकर प्रमाणे फिरू लागले. हा बदल एकदम कसा झाला हे कळेना. पण रस्त्यावरील दिशादर्शक फलकाने याचे उत्तर दिले. राजधानीचं शहर ‘न्यापीदाव’ जवळ येत होतं. म्यानमारची जुनी राजधानी ‘रंगून’ हे ऐतिहासिक शहर होते. मेरे पिया गये रंगून असं म्हणत भारतीय सिनेमे सुद्धा ‘रंगून’च्या गुणगानात रंगून जातं. पण म्यानमारच्या लष्करी सरकारने नवीन राजधानी बांधायचं ठरवलं आणि चीनच्या मदतीने चकचकीत नवीन राजधानीच शहर उभं केलं. या शहराचं नाव आहे ‘न्यापीदाव’. सुंदर डांबरी रस्ते हे राजधानी जवळ आल्याचं प्रतीक होते. 

इरावडीच्या शेजारी नांदते संस्कृती 
न्यापीदाव शहरात जाणाऱ्या सुंदर रस्त्याने एका अवाढव्य पुलावर नेऊन सोडले. समोर एक मोठ्ठी नदी दिसतेय. त्या नदीवरचा हा पूल होता. मोठ्ठा म्हणजे किती तर तब्ब्ल साडेतीन किलोमीटरचा हा लांबच लांब अजगर पाण्यावर पसरलाय असं वाटतं. नदीचं नाव आहे ‘इरावडी’ नदी. स्थानिक लोक हिला ‘इरावडी’ किंवा ‘अईरावडी’ असं म्हणतात. पहिल्यांदा ऐकलं तेव्हा इरावतीच वाटलं. पण माझा कयास खरा होता. संस्कृत शब्द ‘ऐरावत’ म्हणजे इंद्राच्या ‘ऐरावता’वरून हे नाव पडलं. साडेतीन किलोमीटरचा हा पूल भारत - म्यानमार - थायलंड त्रिपक्षीय महामार्ग प्रकल्पातील  सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा पूल आहे. म्हणजे भारतातून थायलंडच्या उद्यानात रस्त्याने जायचे असेल तर या ऐरावताच्या अंबारीतूनच जावं लागते. 
इरावडी ही म्यानमारमधील सर्वांत मोठी आणि देशातील सर्वांत लांब नदी आहे. उत्तर म्यानमारमधून तिबेटच्या बाजूने वाहत येऊन ती दक्षिणेला अंदमान समुद्रात स्वतःला झोकून देते. नदीचा ९१ टक्के भाग म्यानमारमध्ये, ५ टक्के चीनमध्ये आणि ४ टक्के भारतात येतो.  पावसाळ्यात या नदीचं पाणी फार गढूळ असतं. पात्राची झीज होऊन सुपीक माती पाण्याबरोबर मिसळते आणि अगदी चहासारख्या रंगाचं पाणी नदीच्या पात्रात उकळल्या सारखं वाहत असतं. मग हा पौष्टिक चहा आग्रहाने पाजत ही इंद्राची ‘ऐरावती’ शेताशेतांतून आणि गावागावांतून फिरते. उन्हाळ्यात बऱ्याचदा काही ठिकाणी पाणी एवढं कमी होतं, की वाळवंटासारखी वाळूची बेटं उघडी पडतात. पण पावसाळ्यात मात्र या वाळूची लाज झाकत पात्र दुथडी भरून वाहते.  
जगातल्या सर्वोच्च जैव विविधता असलेल्या क्षेत्रात इरावडी नदीचा समावेश होतो. १४०० सस्तन प्राणी, पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांना ती आसरा देते. त्यातले १०० प्राणी तर जगातून नष्ट होत जाणाऱ्यांपैकी आहेत. इथं ३८८ प्रकारचे मासे सापडतात; त्यापैकी ५० टक्के माश्यांशांचा मूळ अधिवास इरावडीतच आहे. अजूनही जेव्हा जेव्हा सर्वेक्षण केले जाते, तेव्हा एखादी नवीन जात इथं नोंदवली जातेच. 
एक प्रमुख जलमार्ग म्हणूनही तिचं महत्त्व आहे. पुराणातल्या कवितांनुसार इरावडी नदीला मंडालेचा मार्ग असं म्हटलंय. सहाव्या शतकापासून या नदीचा वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातोय. शतकानुशतके हा जलमार्ग म्यानमारच्या अर्थव्यवस्थेला पाणी घालतोय. पुढे इंग्रजांनी बर्मा बळकावलं. अत्याधुनिक नौसेनेच्या बळावर जग काबीज करणाऱ्या गोऱ्या साहेबासाठी ‘इरावडी’ वरदान, तर म्यानमारसाठी इष्टापत्ती ठरली. येथील हिरे, सोने, बर्माचं सागवान यांसारख्या सामानाची लूट इंग्लंडला नेण्यासाठी ही नदी वाहतुकीचे उपयुक्त साधन बनली. आजही म्यानमारच्या निर्यातीत या नदीचा मोठा वाटा आहे. 
नदीच्या काठाने फिरताना दिसणारं दृश्य एखाद्या जुन्या चित्रपटातल्यासारखं वाटतं. बायका धुणे धुतायेत, लोकं सागवानाचं लाकूड कापण्यात गुंतलेत. कोळी जाळं विणण्याच्या राष्ट्रीय कार्यक्रमात मग्न आहेत. रेडे पाण्यातून लाकडाचे ओंडके ओढून नेताहेत. शेतकऱ्याची लगबग सुरू आहे. असा हा इरावडी नदीचा काठ सदा गजबजलेला असतो.  

भात शेतीला वरदान 
व्यापारासोबत इरावडी नदीचे येथील शेती व्यवसायात भरीव योगदान आहे. तब्बल चार लाख वर्ग किलोमीटरचं सिंचन क्षेत्र एकट्या इरावडीच आहे. यावरून तिचं महत्त्व लक्षात येईल. या नदीच्या आश्रयाला साडेतीन कोटी लोक राहतात. म्हणजे देशाच्या ६६ टक्के लोकांना ही नदी आश्रय देते. उत्तरेकडून दक्षिणेकडे शेतीला आणि लोकांना पाणी पाजत ही नदी वाहतेय. इरावडीच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात भाताचं पीक घेतलं जात. इथं ८० लाख हेक्टरवर भात शेतीचे क्षेत्र पसरले आहे. त्यानंतर नंबर लागतो कडधान्य आणि तेलबियांचा. ४० लाख हेक्टरवर या द्विदल पिकांची लागवड असते. त्यानंतर मक्यासारख्या इतर दुय्यम पिकांचा नंबर लागतो. 
गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली आहे. शेती, खाणी आणि गाव, शहरांनी जमिनीचा हिरवा शालू फेडायला सुरुवात केली. त्यामुळे मातीची धूप मोठ्या प्रमाणात होत आहे. इरावडीच्या गढूळ पाण्यातून सुपीक माती वाहत अंदमान समुद्राच्या वाटेला निघते. इरावडी खोऱ्यात वापरली जाणारी खते आणि कीटकनाशके नदीत पोहोचताहेत. मासेमारी आणि औद्योगिकीरणामुळे जैवविविधतेला धोका निर्माण झालाय. करोडो लोकांची जीवनदायिनी इरावडी मलूल होतेय की काय असं वाटतंय. डोक्यातील विचार इरावडीच्या पाण्यासारखे गढूळ झाले. 
आमची गाडी पुलावर नेली. पुलावरून इरावडीचं विस्तीर्ण लांबवर पसरलेलं पात्र विलोभनीय दिसत होतं. मोटार रस्त्याच्या जोडीला शेजारून रेल्वेचा पूलही धावत होता. पुलावर बाइकच्या फायरिंगचा आवाज बदलून स्पीकरचा बास वाढवावा, तसा येत होता. त्या स्पीकरच्या बासचा धडधडता आनंद घेत इरावडीच्या अंबारीची सफर आटोपली.

डॉल्फिन माशांचे आश्रय स्थान 
इरावडी नदीची एक खासियत आहे, ती म्हणजे येथील डॉल्फिन मासे. इरावडी-डॉल्फिनची खासियत अशी आहे, की ते समुद्री  प्रकारात मोडत असूनसुद्धा नदीतील गोड्या पाण्यात आरामात राहतात. इरावडीसाठी ते परप्रांतीयच. पण या परप्रांतातही ते वसले, समृद्ध झाले. जगातल्या सात मानांकित डॉल्फिनच्या मानाच्या यादीत त्यांना स्थान आहे. त्यांचं रुपडं देखील वेगळंच आहे. इतर डॉल्फिनसारखी चोच नाही, लांबुळकं तोंड नाही. कपाळ देखील गोलगुळगुळीत. कल्ले लहान, त्रिकोणी. रंग वरच्या बाजूला गर्द करडा तर खालच्या अंगाला फिक्कट करडा. असा हा इरावडीचा डॉल्फिन एखाद्या एलियनच्या स्पेसशिप सारखा दिसतो. ८ फूट लांब आणि १८० किलो वजनाचा हा इरवाडी किंग दिमाखात नदीपात्रात फिरत असतो. हे डॉल्फिन तसे पोहण्यात संथ असतात; पण जीवर बेतलं तर तासाला २० ते २५ किलोमीटर वेगाने पोहू शकतात. मादी दर दोन-तीन वर्षांनी एका बाळाला जन्म देते. दहा किलो वजनाचे आणि सव्वातीन फूट लांब गोंडस बाळ जन्मानंतर दोन वर्षांपर्यंत आईच्या देखभालीखाली असतं. त्यानंतर मात्र ते स्वतःच्या कल्ल्यांवर उभं राहत आत्मनिर्भर होतं.  तसा हा जीव एकटा दुकटा राहत नाही. पाच, सहाच्या गटाने नदीत फिरतात. शिकार सुद्धा ते एकत्र करतात. सात डॉल्फिन सिंहाच्या काळपासारखे एकत्र येऊन शिकार करतात. माशांच्या मोठ्या घोळक्याला रिंगण करून ते घेरतात. विशिष्ट प्रकारचा द्रव थुंकतात. या द्रवाचा वापर करून माशाच्या कळपाला जाळ्यात पकडतात. एकढचं नाही तर हे डॉल्फिन कोळ्यांना मासे पकडायलादेखील मदत करतात.  

(लेखक हे ग्रीन-व्हिजन लाइफ सायन्सेस 
 प्रा. ली. कंपनीचे संचालक आणि ‘ड्रीमर अँड डुअर्स’ पुस्तकाचे लेखक आहेत.)

 


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताऊते या...
रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ पुणे ः केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ...
लॉकडाउमुळे बेदाणा उत्पादकांची कोंडी सांगली ः जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली बाजार...
नामपूर बाजार समितीत कांद्याला किमान दर...नाशिक : सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर...
खरिपात यंदा कपाशी, रब्बीत गहू चांगले...भेंडवळ, जि. बुलडाणा ः या हंगामात सर्वसाधारण...
विमा कंपन्यांनी गोळा केले २३ हजार कोटी...पुणे ः नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना आधार...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर : कामात अनियमिततेच्या कारणाने महात्मा फुले...
निर्यात केंद्रामुळे कृषी व्यापाराला...पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड...
ढगाळ हवामान, पावसाची शक्यतामहाराष्ट्रावरील हवेचा दाब १००२ हेप्टापास्कल इतके...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
मुसळधार पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची...
शेतकऱ्यांच्या खात्यात १९ हजार कोटी जमा नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
मित्राच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मदतीचा...कोल्हापूर : एकेकाळी महाविद्यालयात एकत्र धमाल...
पाच हजार कोटींचा विमा कंपन्यांना नफा पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याचे कवच...
रमजान सणासाठी दर्जेदार कलिंगडेयंदा सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना...
वर्षभर उत्पन्नासाठी पपई ठरली फायदेशीरहणमंगाव (ता. दक्षिण सोलापूर. जि. सोलापूर) येथील...
बांबूलागवडीसह इंधनासाठी पॅलेट्‌सनिर्मितीसराई (जि. औरंगाबाद) येथील कैलाश नागे यांनी साडेनऊ...
वेगवान वाऱ्याचा कोकण किनारपट्टीला फटका...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या...
विमा कंपन्यांना आयुक्तांचा दणका पुणे ः राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा...
सोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः देशात सध्या सोयाबीनचा मोठा तुटवडा जाणवत...