जनावरांतील फऱ्या आजाराचे नियंत्रण

फऱ्या हा गायी आणि म्हशींचा तीव्र, ज्वर सूचक जीवाणूजन्य आजार आहे. बहुतेक बाधित प्राणी लंगडत असल्याने त्यास एक टांग्या म्हणतात. सहा ते चोवीस वर्ष वयोगटाच्या धष्टपुष्ट जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतो.
Farrya disease in animal
Farrya disease in animal

फऱ्या हा गायी आणि म्हशींचा तीव्र, ज्वर सूचक जीवाणूजन्य आजार आहे. बहुतेक बाधित प्राणी लंगडत असल्याने त्यास एक टांग्या म्हणतात. सहा ते चोवीस वर्ष वयोगटाच्या धष्टपुष्ट जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतो.  प्रादुर्भाव आणि प्रसार 

  • हा आजार काही भागात वर्षभर दिसत असला तरी पावसाळ्यानंतर तयार होणारे उबदार आणि अति आर्द्रता युक्त वातावरण आणि त्या लगतच्या हिवाळ्यात जास्त  दिसून येतो. 
  • क्लोस्टीडीअम चोवी हे जिवाणू निरोगी जनावराच्या आतड्यांत निसर्गतः वास्तव्यास असतात. शेणावाटे ते सतत शरीराबाहेर टाकले जातात. ते बिजाणूच्या स्वरूपात मातीमध्ये अनेक वर्ष जिवंत राहू शकतात. पावसाळ्यात उगवलेल्या गवताच्या पात्यावर हे जिवाणू बीज असल्याने जनावरे चरताना तोंडावाटे त्यांच्या शरीरात प्रवेश करतात.  कुठल्याही प्रकारची बाह्य जखम नसताना सुद्धा या आजाराचे संक्रमण झाल्याचे आढळून येते.
  •    लक्षणे 

  •  सुरवातीला जनावरांना ताप येतो. मलूल आणि क्षीण होतात. 
  • भूक मंदावते,छाती, मान, खांदा, कंबर आणि मागील पायाच्या जाड स्नायूंवर तीव्र सूज येते. जनावरे लंगडतात. 
  •     निदान

  •  सूज आलेली स्नायू लालसर-काळपट, कोरडी आणि मऊ पडणे या लक्षणांवरून या आजाराचे निदान करता येते. परंतु अतितीव्र प्रकारात लक्षणे दिसत नसल्याने निदान करणे कठीण असते.
  • आजाराचे पक्के निदान करण्यासाठी सूज आलेल्या स्नायुस चिरा देऊन त्या ठिकाणाहून निघणाऱ्या स्त्राव प्रयोगशाळेत पाठवावा. त्याची काचपट्टी सूक्ष्मदर्शकाखाली बघून तसेच जिवाणू संवर्धन करून पक्के रोग निदान करता येते.
  • सुजलेल्या स्नायूवर दाब देऊन हात फिरवल्यास चर-चर आवाज येतो. 
  • बाधित ठिकाणची कातडी थंड पडून संवेदनाहीन बनते.  कंप येतो. 
  • लक्षणे दिसण्यास सुरवात झाल्यानंतर १२ ते ४८ तासांमध्ये  मृत्यू होतो.
  • असा होतो आजार  

  • जिवाणू आतड्यातून रक्तामध्ये आणि रक्तामधून शरीराच्या विविध भागांमध्ये प्रवेश करतात. प्राणवायूच्या सानिध्यात त्यांची वाढ होऊ शकत नसल्याने शरीराच्या मांसल भाग तसेच प्लिहा, यकृत आदी अवयवांत खोलवर जाऊन स्थिरावतात. 
  • अंतर्गत जखमा झाल्यास बाधित ठिकाणी रक्त प्रवाह मंदावतो, प्राणवायू रहित वातावरण तयार होते. प्राणवायू रहित वातावरणात या जीवाणूचे बीजाणू अंकुरतात. त्यांची वाढ झपाट्याने होते. या जीवाणूची वाढ होत असताना अल्फा आणि बिटा ही घातक  प्रकारचे विष तयार होतात. 
  • अतितीव्र प्रकारात या आजाराची अचानक सुरवात होते. काही जनावरांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसत नाहीत. बाधित स्नायूत तयार झालेले विष शोषले जाऊन रक्तावाटे इतरत्र पसरते. सकाळी निरोगी आणि सशक्त दिसत असलेली जनावरे संध्याकाळ पर्यंत मृत्यू पावू शकतात. 
  • छाती, मान, खांदा, कमर आणि मागील पायाच्या जाड स्नायूंमध्ये हे जिवाणू वाढत असून त्या ठिकाणी अंतर्गत जखमा निर्माण करतात. त्यामुळे बाधित स्नायुमध्ये तीव्र सूज येते. प्रसंगी जनावरे लंगडताना दिसतात. 
  • संसर्ग होऊन सूज आलेल्या स्नायुमध्ये जिवाणू हायड्रोजन सल्फाईड नावाचा अत्यंत दुर्गंधी वायू उत्पन्न करतात. हा वायू मांस पेशींमध्ये अडकून बुडबुडे तयार होतात. त्यामुळे सुजलेल्या स्नायूवर दाब देऊन हात फिरविल्यास चर-चर असा आवाज येतो. आजार जसजसा वाढत जातो तशी सूज सुद्धा वाढत जाते.   
  • उपचार आणि प्रतिबंध 

  • आजाराच्या प्रथम चरणात दिलेली पेनिसिलीन गटाची प्रतिजैविके अत्यंत प्रभावी ठरतात. हा आजार होऊ नये यासाठी लसीकरण केल्यास उपचारावर होणारा खर्च, जनावरांना होणारा त्रास आणि मरतुक वाचवू शकतो. 
  • मरतुक झालेल्या जनावरांना खोल खड्डा करून पुरावे किंवा जाळून टाकावे.
  • आजारावर विविध प्रकारच्या मृत लसी उपलब्ध आहेत. साधारणतः तीन ते सहा महिने वयाच्या वासरांना प्राथमिक लसीकरण करावे. या आजाराविरोधी रोग प्रतिकार शक्ती सशक्त होण्यासाठी प्राथमिक लसीकरणानंतर चार महिन्यांनी दुबार लसीकरण करावे. ही रोग प्रतिकार शक्ती एक वर्ष टिकत असल्याने दरवर्षी लसीकरण करावे. 
  • क्वचित काही ठिकाणी जीवाणूमध्ये विकसित झालेल्या भिन्न प्रतिजनामुळे लसीकरण निष्प्रभ झाल्याचे सुद्धा दिसून येते. अशा वेळी पशुवैद्याचा सल्ला घ्यावा. 
  • जनावरांना नेहमीच्या ठिकाणी चरण्यास सोडू नये.
  • आजाराचा प्रादुर्भाव मेंढ्यामध्ये सुद्धा दिसून येत असल्याने गाभण मेंढ्यामध्ये प्रसूतीच्या एक महिने आधी लसीकरण करावे. तीन महिने वयाच्या कोकरांमध्ये सुद्धा लसीकरण करावे.   
  • - डॉ.सुधाकर आवंडकर, ९५०३३९७९२९, 

    (पशुवैद्यकीय सुक्ष्मजीवशास्त्र  विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com