'फर्टिगेशन' तंत्राद्वारे खत वापरात बचत

ठिबक सिंचनातून पाणी आणि खतांचे व्यवस्थापन केल्याने सर्व ठिकाणी प्रत्येक झाडास एकसमान पाणी व खते दिली जातात. ठिबक सिंचनामधून विद्राव्य खते दिल्याने (फर्टिगेशन) त्यांच्या वापरात २५ ते ३० टक्के बचत होते.
fertigation
fertigation

ठिबक सिंचनातून पाणी आणि खतांचे व्यवस्थापन केल्याने सर्व ठिकाणी प्रत्येक झाडास एकसमान पाणी व खते दिली जातात. ठिबक सिंचनामधून  विद्राव्य खते दिल्याने (फर्टिगेशन) त्यांच्या  वापरात २५ ते ३० टक्के बचत होते.

पारंपरिक खते सदोष पद्धतीने दिल्याने जमिनीच्या वर पडून राहतात, झाडांपासून दूर पडतात. पिकांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात उपलब्ध होत नाहीत. त्यांची कार्यक्षमता ३५ ते ४५ टक्के मिळते. स्फुरद आणि पालाशयुक्त खतांचा मातीच्या कणांशी संपर्कात आल्याने त्यांचे स्थिरीकरण होते. युरिया, अमोनियम सल्फेटसारखी खते जमिनीवर उघडी पडून राहिल्यास त्यातील अमोनियाच्या स्वरूपातील नत्र हवेत उडून जातो. युरिया आणि अमोनियम सल्फेट आणि इतर मिश्र संयुक्त खते दिल्यानंतर पाटपाणी पद्धतीने पाणी दिल्यास अन्नद्रव्ये मोठ्या प्रमाणावर झिरपून जातात. त्यामुळे पारंपरिक खतांची खतवापर कार्यक्षमता कमी मिळते.

  • शेतकरी पारंपरिक खते पिकांच्या एकूण कालावधीच्या मध्ये दोन ते तीन वेळा पिकांना देतात. स्फुरद आणि पालाश प्रामुख्याने पीक लागवडीच्या वेळी आणि नत्र खते दोन ते तीन वेळा देतात. त्यातील अन्नद्रव्ये लवकर उपलब्ध होत नाहीत. पिकांच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करणे शक्‍य होत नाही. स्फुरद आणि पालाश यांचे स्थिरीकरण होऊ लागते. त्यामुळे जमिनीमध्ये क्षारही वाढू लागतात. 
  • जमिनीचा सामू आणि विद्युतवाहकता वाढल्याने जमिनीची उत्पादन देण्याची क्षमता कमी होते. अजूनही शेतकरी पाणी आणि खते ही पिकांना देण्याऐवजी जमिनीला देत असल्याने समस्या वाढत आहे.
  • बऱ्याचवेळा खतातील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण किती, ते कधी उपलब्ध होतील, तसेच खतांची मात्रा कशी ठरवावी, त्यासाठी कोणकोणती खते किती वापरावीत, याबाबत अभ्यास नसल्याने अनियंत्रित पद्धतीने खते वापरली जातात.
  • ठिबक सिंचन असताना काही शेतकरी पिकांना हाताने खते देताना दिसतात. काही शेतकरी ऊस, कापूस, केळी, डाळिंब या पिकांना निम्मी मात्रा पारंपरिक खते आणि निम्मी मात्रा पाण्यात विरघळणारी खते ठिबकमधून देतात. द्राक्ष, गुलाब, कार्नेशन, जरबेरा, स्ट्रॉबेरी उत्पादक १०० टक्के फर्टिगेशन करतात.
  • ठिबक सिंचनातून खते दिल्याने पाण्याच्या प्रत्येक थेंबावर आणि अन्नद्रव्यांच्या प्रत्येक कणावर आपले नियंत्रण असल्यामुळे पिकांच्या अवस्थेनुसार आणि गरजेनुसार पाणी व खतांचे व्यवस्थापन केल्याने पिकांचे विक्रमी उत्पादन मिळते. तसेच, उत्पादनांची उत्कृष्ट गुणवत्ताही मिळेल. पाणी आणि खते यांची कार्यक्षमता ९० टक्के मिळते. खतांवरील खर्च वाया जात नाही. जमिनी क्षारयुक्त होत नाहीत.
  • ' फर्टिगेशन'चे फायदे  

  • पिकांच्या उत्पादनात चांगली वाढ होते. 
  • निर्यातक्षम गुणवत्तेचे उत्पादन मिळते. 
  • पिकांच्या अवस्थेनुसार आणि गरजेनुसार पाणी आणि खतांचे अचूक, काटेकोर व्यवस्थापन करता येते. 
  • ठिबक सिंचनातून पाणी आणि खतांचे व्यवस्थापन केल्याने सर्व ठिकाणी प्रत्येक झाडास एकसमान पाणी व खते दिली जातात. 
  • खतांची मात्रा कमी प्रमाणात आणि रोज दिली जात असल्याने स्थिरीकरणास वाव मिळत नाही, अन्नद्रव्ये झिरपून जात नाहीत. 
  • जमिनीमध्ये क्षार वाढत नाहीत. 
  • ठिबक सिंचनामधून आम्लधर्मीय खतांचा नियमित वापर होत असल्याने ठिबक सिंचन संचामध्ये क्षार साचत नाहीत, ड्रिपरमध्ये क्षार साचून बंद पडत नाही, संचाचे आयुष्य वाढते. ठिबक सिंचन संच दीर्घकाळ कार्यरत राहतो.
  •  आम्लधर्मीय खतांचा वापर केल्याने पाण्याचा आणि जमिनीचा सामू आणि विद्युतवाहकता नियंत्रणात आणता येते. 
  • ठिबक सिंचनमधून खतांच्या वापरामुळे खते वापरामध्ये २५ ते ३० टक्के बचत शक्‍य होते. हलक्‍या जमिनीतही अधिक उत्पादन मिळते.
  • साधने 

  •  फर्टिगेशन करण्यासाठी फर्टिगेशन टॅंक किंवा व्हेंचुरीचा उपयोग करावा. 
  •  स्वयंचलित यंत्रणांचा किंवा डोसिंग पंपाचा वापर करावा. 
  • फर्टिगेशन टॅंकद्वारे फर्टिगेशन केल्यास खतांची तीव्रता सुरुवातीस जास्त असते. नंतर मात्र हळूहळू कमी-कमी होत जाते.
  • व्हेंचुरीद्वारे फर्टिगेशन केल्यास खतांची तीव्रता सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकसमान राहते. ठिबक सिंचनास स्वयंचलित यंत्रणेचा वापर करावा. ऑटोमेशन केलेले असल्यास डोसिंग पंपाचाही उपयोग करता येतो.
  • फर्टिगेशन दुपारी ४ नंतर करावे. त्या वेळी पाणी कोमट असल्याने खते लवकर विरघळतात आणि मुळाच्या कार्यक्षेत्रात तापमानही योग्य असते. त्यामुळे पिकांची पांढरी मुळे पाणी आणि अन्नद्रव्यांचे शोषण उत्तमरीत्या करतात. सकाळी फर्टिगेशन करू नये. कारण, सकाळी पाणी थंड असल्याने खते लवकर विरघळत नाहीत, तसेच पिकांच्या मुळांजवळ तापमान कमी असल्याने अन्नद्रव्यांचे शोषण कमी होते. 
  • द्रावण तयार करण्याची पद्धत   

  •  खतांचे द्रावण करताना प्रत्येक खताची मात्रा एका लिटर पाण्यामध्ये किती विरघळू शकते, या माहितीनुसार त्या खतांची किती मात्रा द्यावयाची आहे, तसेच फर्टिगेशनसाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांचा व्हेंचुरी, फर्टिगेशन टॅंक, स्वयंचलित यंत्रणेचा सक्‍शन किंवा इंजेक्‍शन रेट माहिती असणे गरजेचे आहे. 
  • फर्टिगेशनसाठी युरिया, १२ः६१ः० आणि १३ः०ः४५ एकत्र द्यावयाची असल्यास सर्वप्रथम पाण्यात १३ः०ः४५ विरघळून घ्यावे. नंतर १२ः६१ः० आणि सर्वांत शेवटी युरिया पाण्यात विरघळावा. युरिया सर्वांत प्रथम पाण्यात विरघळल्यास पाणी थंड होते. त्यानंतरची खते १३ः०ः४५, १२ः६१ः० विरघळण्यास वेळ लागतो. 
  • खतांचा वापर 

  •  नत्र ः युरिया, अमोनियम सल्फेट, कॅल्शियम नायट्रेट. 
  •  स्फुरद ः युरिया फॉस्फेट (१७ः४४ः०), १२ः६१ः०, ०ः५२ः३४, १३ः४०ः१३, फॉस्फोरिक ॲसिड, १९ः१९ः१९. 
  • पालाश ः १३ः०ः४५, ०ः०ः५०. 
  • अन्नद्रव्यांचा वापर  

  • मातीपरीक्षण अहवाल आणि पिकांच्या गरजेनुसार दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा.
  • अलिकडे कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम सल्फेटचा वापर वाढू लागला आहे. सूक्ष्म अन्नद्रव्ये ठिबकमधून देताना चिलेटेड स्वरूपातील वापरावीत. 
  • कोणती खते कशामध्ये मिसळू नयेत?  

  • अमोनियम सल्फेट कॅल्शियम नायट्रेटसोबत मिसळू नये. 
  • १२ः६१ः०, १७ः४४ः०, ०ः५२ः३४, स्फुरदयुक्त खते कॅल्शियम नायट्रेट किंवा मॅग्नेशियम सल्फेटसोबत मिसळू नयेत. 
  • कॅल्शियम नायट्रेट हे मॅग्नेशियम सल्फेटसोबत मिसळू नये. 
  • कॅल्शियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम सल्फेट हे फॉस्फोरिक ॲसिडसोबत मिसळू नये. 
  • कॅल्शियम नायट्रेटसोबत ०ः०ः५० मिसळून देऊ नये. 
  • कॉपर, झिंक, फेरस, मॅंगनीज सल्फेटसोबत कॅल्शियम नायट्रेट, ०ः५२ः३४, १२ः६१ः०, १७ः४४ः० आणि फॉस्फोरिक ॲसिड देऊ नये.
  •  म्युरेट ऑफ पोटॅशसोबत अमोनियम सल्फेट मिसळू नये. 
  • वरील खते देण्याची गरज पडल्यास  

  • ही खते स्वतंत्ररीत्या ठिबकमधून द्यावीत किंवा रोज वेगवेगळी खते स्वतंत्ररीत्या द्यावीत, आलटूनपालटून द्यावीत किंवा ही खते देण्याकरिता प्रत्येकासाठी स्वतंत्र टॅंक बसवून घ्यावा; म्हणजे ३ फर्टिगेशन टॅंक बसवावेत.
  • -  बी. डी. जडे, ९४२२७७४९८१  (लेखक जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जळगाव येथे वरिष्ठ कृषी विद्याशास्त्रज्ञ आहेत. )

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com