Agriculture Agricultural News Marathi article regarding fish farming | Page 3 ||| Agrowon

निमखाऱ्या पाण्यातील जिताडा, कोळंबीसंवर्धन तंत्र

. गजानन घोडे,डॉ. अनिल पावसे
बुधवार, 18 ऑगस्ट 2021

जिताडासंवर्धन तलाव आणि जलाशयात पिंजरा पद्धतीने करता येते. कोळंबी संवर्धनासाठी जागेची निवड करताना चढ-उतार, मातीचा प्रकार, मातीची पाणीधारण क्षमता आणि उत्पादकता, पाण्याची उपलब्धता आणि दर्जा तपासणी करावी.

जिताडासंवर्धन तलाव आणि जलाशयात पिंजरा पद्धतीने करता येते. कोळंबी संवर्धनासाठी जागेची निवड करताना चढ-उतार, मातीचा प्रकार, मातीची पाणीधारण क्षमता आणि उत्पादकता, पाण्याची उपलब्धता आणि दर्जा तपासणी करावी.

निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यशेतीमध्ये प्रामुख्याने जिताडा आणि कोळंबीसंवर्धन करता येते. सुधारित तंत्राचा वापर केल्याने मत्स्य उत्पादनामध्ये चांगली वाढ करता येते.

जिताडा संवर्धन 

 • महाराष्ट्रात जिताडा आणि भारतभर भेटकी या नावाने ओळखला जाणारा हा कणखर मासा बदलत्या वातावरणाशी पटकन जुळवून घेतो. 
 • जिताडा संवर्धन तलाव आणि जलाशयात पिंजरा पद्धतीने करता येते. 
 • केंद्रीय निमखारे पाणी मत्स्य संवर्धन संस्था, चेन्नई आणि राजीव गांधी मत्स्यपालन केंद्र, सिरकाली या तमिळनाडूस्थित केंद्रीय संस्थांच्या बीजोत्पादन केंद्रातून मत्स्यबीज आणि बोटुकली आकाराचे बीज उपलब्ध होऊ शकते. 

पारंपरिक संवर्धन  

 • रायगड जिल्ह्यात खाडी भागातील नैसर्गिक स्रोतामधून संचयित केलेले जिताडा बीज भातशेतीमध्ये तसेच खाजण जमिनीमध्ये पारंपरिक पद्धतीने संवर्धन करण्यासाठी वापरले जाते. 
 • या पद्धतीमध्ये जिताडा ६ ते ८ महिन्यांच्या कालावधीत २५० ग्रॅम ते १ किलोपर्यंत वाढतो. 

संवर्धन पद्धती  

 • जिताडा माशांमध्ये स्वजातीय भक्षण आढळते. त्यामुळे संवर्धन दोन टप्प्यांमध्ये करतात.
 • पहिल्या टप्प्यामध्ये बीज केंद्रात तयार झालेले १.५ ते २.५ सेंमीचे मत्स्य जिरे आरसीसी संगोपन टाक्यामध्ये किंवा संवर्धन तलावामध्ये जाळी लाऊन बंदिस्त केलेल्या संगोपन तलावात ७ ते ८ सें.मी.पर्यंत वाढवले जाते. 
 •  तलावामधील नर्सरी संगोपनासाठी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार १ ते २.५ सेंमी आकाराचे बीज २० ते ३० नग प्रति चौ.मी. या प्रमाणात सोडावे. 
 • तिलापियासारखे मासे आणि तयार खाद्य एकूण संचयित माशांच्या वजनाचा १० टक्के प्रमाणात दररोज द्यावे. 
 • दुसऱ्या टप्प्यामध्ये जिताडा मासा खाण्यायोग्य आकारापर्यंत वाढविला जातो. या मध्ये पिंजरा संवर्धन व तलावातील संवर्धन या पद्धतीचा समावेश आहे. 

पिंजरा संवर्धन 

 • यामध्ये ५ × ५ × २ मी. (५० घनमीटर) आकारमानाच्या पिंजऱ्यामध्ये २.५ ते ३ सेंमी लांबीचे बीज ५० नग प्रति घनमीटर एवढ्या घनतेने संचयन करावे. 
 • प्रत्येक महिन्याला वाढीनुसार एक सारख्या आकाराचे बीज संचयन घनता कमी करत वाढवावे. ३ ते ४ महिन्यांनंतर ही संचयन घनता १०-२० नग/प्रती घनमीटर एवढी असावी.
 • खाद्य म्हणून तिलापिया किंवा कमी प्रतीचे मासे किंवा कृत्रिम खाद्याचा वापर करावा. खाद्याची मात्रा वजनाच्या १० टक्के आणि  संवर्धनाच्या शेवटी ५ टक्क्यांपर्यंत असावी. 
 •  सर्वसाधारणपणे ५ ते १० महिन्यांच्या संवर्धन कालावधीत माशांची २५० ते १२०० ग्रॅम एवढी वाढ मिळते. 
 •  कोकणामध्ये कांदळवन प्रतिष्ठानच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात राई, मालगुंड, जयगड, सागवे, गावखडी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात चेंदवन, मायने आणि रायगड जिल्ह्यामध्ये वढाव-पेण, तोराडी, सुडकोळी-म्हसळा या ठिकाणी जिताड्याचे पिंजरा पद्धतीने  संवर्धन केले जाते. 

तलावातील संवर्धन 

 •  प्रथम तलाव सुकवून घ्यावा. सुकविणे शक्य नसल्यास उपद्रवी मासे नष्ट करण्यासाठी ब्लिचिंग पावडर वापरावी. आठवड्यानंतर पाण्याची पातळी वाढवून चुन्याची मात्रा द्यावी. 
 • आठवड्यानंतर खत मात्रा द्यावी. शेणखत ५ टन प्रति हेक्टरी किंवा कोंबडीची विष्ठा ५०० किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात वापरावी.
 • विद्यापीठाच्या शिफारशीनुसार खार जमीन तलावामध्ये मिश्र प्राणिजन्य प्लवंगाच्या उत्तम वाढीसाठी १०० टक्के गाईच्या शेणाऐवजी कोंबडीची विष्ठा आणि गाईचे शेण ७०:३० या प्रमाणात विभागून दिलेल्या खत योजना तंत्रज्ञानाप्रमाणे वापरावे. 
 • तलावामध्ये प्रथम तिलापिया मासे ८००० ते १०००० नग प्रति हेक्टर या प्रमाणात सोडावेत. यांचा जिताड्याचे खाद्य म्हणून उपयोग होतो. 
 •  तलावामध्ये ५ ते १० सेंमी आकाराची बोटुकली किंवा १० सेंमीपेक्षा जास्त आकाराची बोटुकली वापरून संवर्धन करता येते. बोटुकलीच्या आकारानुसार संवर्धन कालावधी ६ ते १० महिने असतो. बोटुकली संचयन घनता ४००० ते ५००० नग प्रति हेक्टर इतके असते. 
 • जीवीततेचे प्रमाण ७०-८० टक्के असते. काढण्यावेळी माशांचे वजन ७०० ते ८०० ग्रॅम मिळते. प्रति हेक्टरी २ ते २.५ टन उत्पादन मिळू शकते. 

निमखाऱ्या पाण्यातील कोळंबीसंवर्धन 

 • प्रामुख्याने लिटोपिनियस व्हेनामी या कोळंबीचे संवर्धन केले जाते. 

योग्य जागेची निवड 

 •  जागेचा चढ-उतार, मातीचा प्रकार, मातीची पाणीधारण क्षमता आणि उत्पादकता, पाण्याची उपलब्धता आणि दर्जा तपासणी करावी.
 • हवामान व त्यामध्ये होणारे बदल, प्रदूषण, पूर-वादळ व इतर नैसर्गिक आपत्ती, रस्ता, वीज आणि सामाजिक-आर्थिक स्थिती यांचा सखोल अभ्यास करून योग्य जागेची निवड करावी. 

रचना आणि बांधकाम  

 • संवर्धन तलाव हे आयताकृती किंवा चौरसाकृती असावेत. व्यवस्थापनाच्या दृष्टीने तलावाचे क्षेत्र ०.५ ते १.० हेक्टर असावे. 
 • तलावामध्ये पाण्याची पातळी १.५ मीटरपर्यंत असावी. प्रत्येक तलावास पाणी आत घेण्याची व बाहेर काढण्याची स्वतंत्र व्यवस्था असावी.  

  बीज साठवणुकीपूर्वी पाणी काढून तळास भेगा पडेपर्यंत तलाव सुकविला जातो. सुकविलेल्या तलावामध्ये नांगरट करून सामू तपासून आवश्यक प्रमाणात चुन्याची मात्रा दिली जाते. पाणी गाळून भरले जाते. त्यानंतर ब्लिचिंग पावडर वापर करून पाणी निर्जंतुक केले जाते. 

बीज साठवणूक 
कोळंबी बीज हे शासकीय मान्यताप्राप्त बीज उत्पादन केंद्रातून घेणे गरजेचे आहे. बीज पीसीआर चाचणीद्वारे तपासून महत्त्वाच्या विषाणूपासून मुक्त आहे याची खात्री करावी.  व्हेनामी  कोळंबी बीज साठवणूक कमी घनतेच्या संवर्धन पद्धतीमध्ये २० बीज प्रति चौ.मी. या दराने  करावी. जास्त घनतेच्या पद्धतीमध्ये ६० बीज प्रति चौ.मी. या दराने करावी.

बीज साठवणुकीनंतरचे व्यवस्थापन 
खाद्य व्यवस्थापन  

 • कोळंबीच्या वाढीसाठी साधारणत: ३८-४० टक्के प्रथिने असलेले खाद्य वापरले जाते. 

पाण्याचा दर्जा आणि व्यवस्थापन 

 • संवर्धनादरम्यान कोळंबीचे शिल्लक राहिलेले खाद्य, विष्ठा, मृत व कुजणारे सेंद्रिय पदार्थ यामुळे पाण्याचा दर्जा खालावतो. पाण्याचा दर्जा सुधारण्यासाठी संवर्धन तलावातील पाणी बदलावे. पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण वाढविणेसाठी एअरेटर्सचा वापर करावा. 

आरोग्य व्यवस्थापन 

 •  कोळंबीचे नियमितपणे निरीक्षण करावे. रोगाची लक्षणे आढळल्यास तज्ज्ञांच्या सल्याने  त्वरित उपचार करावेत. 
 • रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास इतर तलावामध्ये किंवा नैसर्गिक जलीय स्रोतामध्ये त्याचा प्रसार होणार नाही याची दक्षता घ्यावी.
 • उपचार करण्यासाठी मान्यताप्राप्त औषधे व रसायनांचा वापर करावा. 

काढणी आणि त्यानंतरचे व्यवस्थापन 

 • चार महिन्यांच्या संवर्धन कालावधीनंतर कोळंबीची विक्री योग्य वाढ होते. 
 • तलावातील टाकाऊ पाणी प्रक्रिया करून पाणी निर्गमित करावे. 
 • काढलेली कोळंबी बर्फाच्या पाण्यामध्ये थोडावेळ ठेवून लगेच प्लॅस्टिक क्रेटमध्ये बर्फासोबत साठवावी. ही कोळंबी इन्स्युलेटेड गाडीतून कोळंबी प्रक्रिया केंद्राकडे पाठवावी. 
 • कमी घनतेच्या संवर्धन पद्धतीद्वारे कोळंबीचे साधारण ३ ते ४ टन आणि जास्त घनतेच्या संवर्धन पद्धतीद्वारे १० ते १२ टन प्रति हेक्टरी उत्पादन मिळते.

- डॉ. गजानन घोडे,  ९४२४०९६६६०,    
- डॉ. अनिल पावसे,  ९४२२४३०४९८. 
(मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)


इतर कृषिपूरक
जनावरांमध्ये ज्वारी धाटांची विषबाधाजनावरे ज्वारीचे कोवळे पोंगे खाणार नाहीत याकडे...
योग्य नियोजनातून सक्षम करा गोशाळाराज्यातील विविध गोशाळांची ओळख विशिष्ट देशी...
तुती, रेशीम कीटकांचे व्यवस्थापन तंत्रप्रौढ रेशीम कीटक संगोपनगृहात रेशीम किटकास...
मत्स्य व्यवसाय अन् शिक्षणामधील संधीमाशांपासून प्रथिने अत्यंत सहज उपलब्ध होत असल्याने...
जनावरांच्या आहारात द्या गुणवत्तापूर्ण...चारापिकांची लागवड केल्यानंतर त्यांची ठरावीक...
मत्स्यबीज गुणवत्तेचे महत्त्वअलीकडील काळात मत्स्य व्यवसायात झपाट्याने होणारी...
जनावरांपासून मानवाला होणारे आजारप्राणिजन्य मानवी आजारांचे (झुनोटिक आजार) योग्य...
प्रतिजैविक संवेदनशीलता चाचणीचे फायदेपशुपालक आणि पशुवैद्यकांनी प्रतिजैविक संवेदनशीलता...
जनावरांमध्ये दिसतो थंडीचा ताणतणावअचानक तापमान खूप कमी झाले तर जनावरे थंडीपासून...
कुक्कुटपालनासाठी शास्त्रोक्त पद्धतीचे...आहाराच्या दृष्टीने विचार केला तर कोंबड्याच्या...
शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायामध्ये संधी...शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय जागतिक स्तरावर वेगाने...
पशुआहारात तंतुमय पदार्थांचे महत्त्वपशूआहारातील तंतुमय पदार्थांमुळे जनावरांच्या...
शेळ्यांमधील सांसर्गिक प्लुरोन्युमोनियाज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो, कोंदट व दमट...
हिवाळ्यातील कोंबड्यांचे व्यवस्थापनकोंबड्यामध्ये विषाणूजन्य, जिवाणूजन्य, प्रजीवजन्य...
शेळ्या-मेंढ्यांमधील थायलेरिओसिसरोगग्रस्त जनावरांना गोचीड रक्त शोषण्यासाठी चावतात...
शेळ्या, मेंढ्यांमधील अगॅलेक्शियाअगॅलेक्शिया आजारामुळे शेळ्या, मेंढ्यांचे दूध देणे...
मत्स्यपालनामध्ये खाद्याचा योग्य वापर...माशांच्या वाढीसाठी सकस व प्रथिनयुक्त आहाराची गरज...
टाळा जनावरांची विषबाधा...​ज्वारीच्या कोवळ्या धाटांची विषबाधा जनावरांनी...
संकल्प करूया देशी गोवंश संवर्धनाचा...सुजाण पिढीने आपल्या देशी गोवंशाचे माहात्म्य...
मूल्यवर्धित चारानिर्मिती तंत्रपावसाळ्यानंतर कोकणात हिरव्या चाऱ्याची टंचाई असते...