Agriculture Agricultural News Marathi article regarding FMD in animals. | Agrowon

लाळ्या खुरकूत नियंत्रणासाठी लसीकरण हाच पर्याय

डॉ रवींद्रकुमार हातझाडे, डॉ.अनिल भिकाने
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

लाळ्या खुरकूत हा एक संसर्गजन्य आजार आहे. त्याचा प्रसार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संसर्गाने होतो. लाळ्या खुरकूत आजारात मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी जनावराची कार्यक्षमता खूप कमी होते, आर्थिक नुकसान होते. त्यामुळे लसीकरण हाच एक महत्त्वाचा उपाय आहे. 

लाळ्या खुरकूत हा एक संसर्गजन्य आजार आहे. त्याचा प्रसार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संसर्गाने होतो. लाळ्या खुरकूत आजारात मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी जनावराची कार्यक्षमता खूप कमी होते, आर्थिक नुकसान होते. त्यामुळे लसीकरण हाच एक महत्त्वाचा उपाय आहे. 

आपल्या देशात लाळ्या खुरकूत रोगाच्या साथी वारंवार येतात. त्यामुळे या आजाराचे निर्मूलन करण्यासाठी नियमित लसीकरण करणे क्रमप्राप्त ठरते. राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २०१९- २० पासून  १०० टक्के केंद्र सरकारच्या निधीतून वर्षातून दोन वेळा ही लसीकरण मोहीम राबविली जात आहे. “स्वस्थ पशू-खुशहाल किसान, उत्पादक पशू-संपन्न किसान” हे सदर योजनेचे बोधवाक्य आहे. 
 
लसीकरण करणे गरजेचे 

 • लाळ्या खुरकूत आजारात मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी जनावराची कार्यक्षमता खूप कमी होते, आर्थिक नुकसान होते. 
 • देशी जनावरांमध्ये मृत्यूचे प्रमाण अल्प असून संकरित दुभत्या जनावरांत दुग्धोत्पादन घटणे, प्रजोत्पादन क्षमता कमी होणे, वांझपणा येणे इत्यादी नुकसान होऊ शकतात. 
 • बैलांची शेतीकामाची क्षमता घटणे किंवा नष्ट होणे, जनावरांच्या विक्रीत, मांसाच्या निर्यातीत, चामड्याच्या उद्योगात घट होऊन पशुपालकांना व देशाला खूप आर्थिक नुकसान सहन करावे लागते. आजारातून जनावर बरे होण्याचा कालावधी अधिक असून, कालावधीनुसार उपचाराचा खर्च वाढत जातो. 
 • दुधाळ जनावरास कासेवर पुरळ येऊन कासदाह झाल्यामुळे दूध उत्पादनात मोठी घट होते. गाभण जनावरांत गर्भपात होऊ शकतो. काही जनावरांत तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वांझपणा येऊ शकतो. 
 • खुरांची जखम वाढून त्यात अळ्या होतात. पूर्ण खूर गळून पडू शकते. जनावरात कायमस्वरूपी लंगडेपणा येऊ शकतो.
 • जनावरांच्या फुफ्फुसावर परिणाम होऊन अशी जनावरे उष्णता सहन न झाल्याने कायम धापा देत असतात. त्वचेवर केसांची वाढ व्हायला लागते व लहान जनावरांची वाढ खुंटते. हृदयात कमकुवतपणा येऊन 
 • लहान वासरांचा जागीच मृत्यू होऊ शकतो.

 कारणे आणि प्रसार 

 • लाळ्या खुरकूत आजार विषाणूजन्य आहे. हा ‘पिकोर्ना’ विषाणूमुळे होतो.  विषाणूच्या ओ, ए, सी, आशिया-१, सॅट-१, सॅट-२, व सॅट-३ अशा एकूण सात प्रमुख जाती व साठ पेक्षा अधिक  उपजाती आहेत.  मात्र भारतात हा आजार ओ, ए व आशिया-१ या विषाणू जातीमुळे होतो असे संशोधनातून दिसून आलेले आहे. 
 • हे विषाणू प्रखर सूर्यप्रकाशात अकार्यक्षम होतात तसेच आम्ल व अल्कलीमध्ये कृश होतात. थंड वातावरणात विषाणूची कार्यक्षमता वाढते. रोगट गोठ्यात एक वर्षापर्यंत तर चाऱ्यात १५ दिवस ते ३ महिन्यापर्यंत हे विषाणू जिवंत राहू शकतात. 
 • हा एक संसर्गजन्य आजार असून त्याचा प्रसार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संसर्गाने होतो. प्रसार झपाट्याने होत असल्याने १०० टक्के जनावरात याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. 
 • मृत्युदर देशी जनावरात २-३ टक्के तर संकरित जनावरात १०-२० टक्के आहे. वासरात मृत्यूचे प्रमाण जास्त असून प्रौढ जनावरात मृत्यूचे प्रमाण अत्यल्प आहे. हा आजार आपल्या देशात केव्हाही होऊ शकतो. परंतु जानेवारी ते एप्रिल दरम्यान याचे प्रमाण अधिक असते. 

 लक्षणे 

 • विषाणूचा जनावराच्या शरीरात प्रवेश झाल्यानंतर ४ ते ६ दिवसांत जनावरास खूप ताप (१०४-१०६ अंश फॅरानाइट) ताप येतो. 
 • जनावराचे चारा न खाणे, रवंथ करणे बंद होणे, दुधाळ जनावरात दूध बंद अथवा कमी होणे इत्यादी प्रमुख लक्षणे दिसून येतात. 
 • दोन तीन दिवसांनंतर ताप कमी होऊन तोंडात, जिभेवर, टाळूवर, गालाच्या व तोंडाच्या आतील बाजूला अगोदर लहान पुरळ येतात. ते नंतर मोठे होऊन फुटतात. त्या जागेवर छोट्या छोट्या जखमा व्हायला सुरवात होते. तोंडातून लाळ गळत राहते. तोंडातील जखमांचा दाह झाल्यामुळे जनावरास चारा खाणे अशक्य होते. 
 • चारही खुरांच्या फटीत पुरळ येऊन फुटतात. जनावर लंगडायला लागते. सडावर पुरळ येऊन बरेच वेळा कासदाह होतो. गाभण जनावरात गर्भपात होतो. शेळ्या- मेंढ्यांत याची लक्षणे कमी तीव्रतेची असतात, पुरळ तोंडापेक्षा पायात जास्त येऊन लंगडण्याचे प्रमाण अधिक असते.

प्रतिबंधात्मक उपाय 

 • आजार  विषाणूजन्य असल्यामुळे यावर ठोस कोणताही उपचार नाही. त्यामुळे उपचारापेक्षा प्रतिबंध करणे महत्त्वाचे ठरते. यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. 
 • निरोगी जनावरांना वर्षातून दोन वेळा मार्च-एप्रिल व 
 • सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात लाळ्या खुरकूत रोगाचे लसीकरण करून घ्यावे. 
 • गाय, म्हैस, शेळी व मेंढीवर्गीय जनावरात वासरू/ पिलू ४ महिन्याचे झाल्यावर प्रथम मात्रा द्यावी. 

लसीकरणाबाबतचे गैरसमज आणि त्यामुळे होणारे नुकसान 

 • लसीकरणामुळे जनावरांच्या अंगावर गाठी येतात हे खरे आहे परंतु गाठ येते म्हणून लसीकरण टाळू नये. 
 • लसीकरणामुळे गर्भपात होतो असा समज असून हा प्रकार क्वचित एखाद्या अशक्त जनावरांमध्ये घडू शकतो. 
 • लसीकरणामुळे जनावरावर ताण येऊन दूध उत्पादनात घट होऊ शकते परंतु ही घट तात्पुरतीच असते. काही दिवसातच जनावर पूर्ववत दुधावर येते.
 • गावातील एखाद्या पशुपालकाने लसीकरण केले नाही तर आपले काही नुकसान होत नाही हा पण एक गैरसमजच आहे. या लसीकरण मोहिमेत १०० टक्के जनावरांना लसीकरण होणे अपेक्षित आहे. एखाद्या पशुपालकाने लसीकरण करून घेतले नाही तर त्यांच्या जनावरात विषाणूचा प्रादुर्भाव होऊन त्याचा गावातील जनावरांना धोका आहे. म्हणूनच पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून जनावरांना लसीकरण करावे. 

प्रत्येक जनावराला होणार टॅगिंग 

 • केंद्र शासनाने सप्टेंबर २०१९ मध्ये राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून २०१९-२०२० ते २०२९-२०३० या दहा वर्षांच्या काळात लाळ्या खुरकूत रोगाचे संपूर्ण उच्चाटन करण्याचे उदिष्ट ठरविले आहे. हा लसीकरण कार्यक्रम मोहीम स्वरूपात कमीत कमी ३० दिवसांत व जास्तीत जास्त ४५ दिवसांत राबविला जातो. 
 • सध्याची राबविण्यात येणारी लसीकरण मोहीम काहीशी वेगळी असून, यात लसीकरण केलेल्या प्रत्येक जनावराला टॅगिंग करून त्याची नोंद इनाफ प्रणालीमध्ये घेतली जाणार आहे. त्यामुळे जनावराची एक ओळख निर्माण होणार असून, येथून पुढे सर्व शासकीय योजना राबविण्यासाठी त्याची मदत होणार आहे. 
 •  प्रत्येक वर्षी मार्च-एप्रिल व सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत हे लसीकरण केले जाणार असून, प्रत्येक पशुपालकाने आपल्या प्रत्येक जनावराला लस टोचून घ्यायची आहे.सध्या लसीकरण मोहीम चालू असून,  १२ नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. प्रत्येक पशुपालकाने लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन आपल्या प्रत्येक जनावराला लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.

-  डॉ. रवींद्रकुमार हातझाडे,  ९४२२१३३०७०   
 -  डॉ. अनिल भिकाने, ९४२०२१४४५३
(स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

 


इतर कृषिपूरक
दूधनिर्मिती अन् प्रत टिकविण्यासाठी...दुधाचा दर हा गुणवत्तेवर अवलंबून असतो. त्यामुळे...
देशी, जर्सी, एचएफ गाईंचे अर्थशास्त्रशेतीला पूरक म्हणून पशुपालन हा व्यवसाय...
शिफारशीनुसार जनावरांना लसीकरण आवश्यक...जनावरे आजारी पडल्यामुळे दूध उत्पादनात घट, गर्भपात...
उन्हाळ्यातील म्हशींचे व्यवस्थापन जनावरांसाठी पुरेसे पाणी, खाद्याची व्यवस्था ठेवावी...
जनावरातील मूतखड्यावर गोखरू, कुलशी...मूतखडा हा आजार जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात...
नियोजन चारा, खाद्यमिश्रणाचे..जनावरांना वर्षभर लागणाऱ्या पशुखाद्य घटक, हिरवा...
शेळीपालनातील महत्त्वाच्या बाबीआपल्या गोठ्यातील शेळी स्थानिक जातीची असली तरी...
उन्हाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनगोठ्यामध्ये जनावरांना हालचाल करण्यासाठी...
फलोत्पादनासाठी शासनाच्या योजनाकृषी विभागातर्फे फलोत्पादनवाढीसाठी विविध योजना...
अळिंबी स्पॉन करताना घ्यावयाची काळजीसंशोधनाच्या आधारे भारतामध्ये अळिंबी स्पॉनसाठी...
पैदाशीच्या बोकडाचे व्यवस्थापनशेळीपालकांनी आपल्या प्रक्षेत्रावर जातिवंत बोकड...
मृदूअस्थी ः दुधाळ गाई- म्हशीतील आजारमृदूअस्थी आजार दुधाळ व गाभण गाई-म्हशींना निव्वळ...
शाश्वत गिनी पालनासाठी नवे तंत्रज्ञानस्थानिक पातळीवर गिनी, तितारी आणि चित्रा या...
सातत्यपूर्ण दूध उत्पादन देणारी निली...निली रावी म्हशीची दूध उत्पादन क्षमता ही मुऱ्हा...
जनावरातील लिस्टेरियोसिस आजारलिस्टरियोसिस आजारामध्ये जनावरे मान एकीकडे खेचून...
कोंबड्यांमधील उष्माघातावरील उपचारउन्हाळ्यात कोंबड्यांना खाद्य सकाळी व संध्याकाळी...
मत्स्य बीज खरेदी, संचयन करतानाची काळजीमत्स्य जिरे ते मत्स्य बोटुकलीपर्यंतचा काळ...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज द्रव्येपचनसंस्था, प्रजनन संस्था किंवा शरीराच्या प्रत्येक...
निकृष्ट चाऱ्याचे मूल्यवर्धननिकृष्ट चाऱ्याचे रूपांतर सकस व असलेल्या...
अळिंबी स्पॉन निर्मिती प्रयोगशाळेची...चांगल्या प्रतीचे शुद्ध स्पॉन तयार करण्यासाठी...