नियोजन आले लागवडीचे

साधारणपणे ९ ते १० महिने पूर्ण झालेल्या कंदाची बेणे म्हणून निवड करावी. गादीवाफा पद्धतीने लागवड केल्यास १५ ते २० टक्के उत्पादन जास्त मिळते. ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा.
ginger
ginger

साधारणपणे ९ ते १० महिने पूर्ण झालेल्या कंदाची बेणे म्हणून निवड करावी. गादीवाफा पद्धतीने लागवड केल्यास १५ ते २० टक्के उत्पादन जास्त मिळते. ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा.

महाराष्ट्रातील एप्रिल-मे महिन्यातील तापमान आले उगवणीसाठी अनुकूल आहे. लागवडीसाठी  उत्तम निचऱ्याची सेंद्रिय खतयुक्त तांबडी तसेच नदी काठाची गाळाची जमीन चांगली असते. हलक्या-मुरमाड जमिनीत जमिनीत पाणी धारणक्षमता वाढविण्यासाठी आणि जमिनीची प्रत सुधारण्यासाठी शेणखत, गांडूळ खत किंवा हिरवळीच्या खताचा वापर केल्यास चांगले पीक येते. कंद चांगले पोसण्यासाठी जमिनीची खोल नांगरणी करावी.  कुळवाच्या शेवटच्या पाळी अगोदर प्रति एकरी १२ ते १५ टन चांगले कुजलेले शेणखत पसरावे. शेणखताची मात्रा अधिक प्रमाणात उपलब्ध होत नसल्यास गांडूळखत, कंपोस्ट खत, मासळीचे खत, हाडांचा चुरा, प्रेसमड कंपोस्ट, वेगवेगळ्या पेंडीच्या मिश्रणाचा वापर करावा. शक्यतो ओल्या मळीचा वापर टाळावा.जमीन तयार करतेवेळी स्फुरद व पालाश या खतांचा संपूर्ण हप्ता द्यावा. एप्रिल किंवा मे महिन्यात लागवड केल्यानंतर पावसाळ्यापूर्वी बेण्यास मुळ्या फुटून पीक स्थिर होते.   लागवडीचे तंत्र      सरी वरंबा पद्धत : मध्यम व भारी जमिनीमध्ये सरी वरंबा पद्धतीने लागवड करावी. लाकडी नांगराच्या साह्याने ४५ सें.मी. वर सऱ्या पाडून घ्याव्यात. वरंब्याच्या दोन्ही बाजूंस वरून १/३ भाग सोडून २ इंच खोल लागवड करावी. दोन रोपांमधील अंतर २२.५ सेंमी. ठेवावे.      सपाट वाफे पद्धत :  जेथे पोयटा किंवा वाळू मिश्रित जमीन आहे, अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड करतात. जमिनीच्या उतारानुसार २ × १ मी. किंवा २ x ३ मी. आकाराचे सपाट वाफे तयार करावेत. सपाट वाफ्यामध्ये २० x २० सेंमी किंवा २२.५ × २२.५ सेंमी अंतरावर लागवड करावी.  गादी वाफा पद्धत

  •   काळी जमीन तसेच तुषार सिंचन, ठिबक सिंचनाचा वापर केला जातो, अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड फायदेशीर ठरते. या पद्धतीने लागवड केल्यास १५ ते २० टक्के उत्पादन जास्त मिळते. जमिनीच्या उतारानुसार गादी वाफ्याची लांबी ठेवावी. १३५ सेंमीवर सरी पाडून घ्यावी, म्हणजे मधील वरंबा ९० सेंमी रुंदीचा होईल. दोन रुंद वरंब्यातील पाटाची रुंदी ४५ सेंमी सोडावी. वरंब्याची उंची २० ते २५ सेंमी ठेवून २२.५ × २२.५ सेंमी वर लागवड करावी. 
  •  जमिनीची पूर्वतयारी पूर्ण झाल्यानंतर गादीवाफे ६० सेंमी रुंद आणि ३० सेंमी उंच आणि सोयीप्रमाणे लांबी ठेवावी. दोन गादीवाफ्यांमध्ये ३०  सेंमी अंतर ठेवावे. प्रत्येक गादीवाफ्यावर दोन ओळींत ४०  सें. मी. अंतर ठेवून दोन बेण्यातील अंतर २० सेंमी ठेवून लागवड पूर्ण करावी. 
  • बेणे निवड 

  •  कीड व रोगग्रस्त बेणे लागवडीस वापरू नये. 
  •  ९ ते १० महिने पूर्ण झालेल्या कंदाची बेणे म्हणून निवड करावी. बेण्यास एक ते सव्वा महिन्याची सुप्तावस्था असते. निवडलेले बियाणे सावलीच्या ठिकाणी आढी लावून साठवावे. 
  • बेण्याची साठवण केलेल्या ठिकाणी कायम हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी. ढिगावर दिवसातून एकवेळ पूर्णपणे भिजलेले गोणपाट पिळून टाकावे.
  •  लागवडीसाठी प्रति एकरी १० क्विंटल बेण्याची आवश्यकता असते. लागवडीच्या अगोदर एक ते दोन दिवस मातृकंदापासून बियाण्याचे २५ ते ५५ ग्रॅम वजन व २.५ ते ५ सेंमी लांब तुकडे वेगळे करावेत. बेण्यावर एक ते दोन फुगलेले डोळे येतील याकडे लक्ष द्यावे. 
  •  बेणे प्रक्रियेनंतर सावलीत सुकविल्यानंतर लागवडीस वापरावे. बेणे ४ ते ५ सेंमी खोल गादीवाफ्यावर लावावे. मातीने झाकून घ्यावे.
  •  बेणे प्रक्रिया 

  • कंदमाशी आणि कंदकूज रोग होऊ नये म्हणून बेणे प्रक्रिया आवश्यक आहे.
  • बेण्यावर प्रथम रासायनिक कीडनाशक आणि त्यानंतर जिवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया करावी. 
  • बेणे प्रक्रियेसाठी दहा लिटर पाण्यात २० मिलि क्लोरपायरिफॉस (२० टक्के) आणि १५ ग्रॅम कार्बेन्डाझिम मिसळावे. या द्रावणामध्ये कंद १५ ते २० मिनिटे चांगले बुडवावेत. बियाणे २० मिनिटे सावलीत सुकवावे.(ॲग्रेस्को शिफारस) 
  • रासायनिक प्रक्रियेनंतर जिवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया करावी. यासाठी प्रति लिटर पाण्यात ॲझोस्पिरिलम १० ग्रॅम, पीएसबी१० ग्रॅम, केएमबी २५ ग्रॅम मिसळून या द्रावणात बेणे १० ते १५ मिनिटे बुडवून ठेवावे. त्यानंतर लागवड करावी. (ॲग्रेस्को शिफारस) 
  • दहा लिटरचे द्रावण १०० ते १२० किलो बेण्यास पुरेसे होते. बेणे द्रावणामध्ये ३० मिनिटे बुडवून ठेवावे.
  • खत व्यवस्थापन

  • हे पीक सेंद्रिय आणि रासायनिक खतास चांगला प्रतिसाद देते. खत मात्रा योग्यवेळी देणे गरजेचे आहे.
  • माती परीक्षणानुसार हेक्टरी १०० किलो नत्र, ७५ किलो स्फुरद आणि ७५ किलो पालाशची मात्रा जमीन तयार करतेवेळी द्यावी.
  • नत्र खताचा निम्मा हप्ता उगवण पूर्ण झाल्यानंतर एक महिन्यांनी द्यावा. राहिलेली अर्धी नत्राची मात्रा उटाळणीच्या वेळी २.५ ते ३ महिन्यांनी द्यावी.या वेळी हेक्टरी १.५ ते २ टन करंज पेंड किंवा निंबोळी पेंड जमिनीत मिसळावी.
  • गादीवाफ्यावर लागवड केलेल्या पिकास ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांची मात्रा देता येते. पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार खतमात्रा द्यावी. (नत्र १०० किलो, स्फुरद ६० किलो, पालाश ६० किलो प्रति हेक्टरी).
  • पिकाला अॅझोटोबॅक्टर, पीएसबी, केएमबीचा वापर नियमित करावा. याचा पीकवाढीसाठी फायदा होतो.
  • पाणी व्यवस्थापन

  • प्रथम क्षेत्रात पाणी देऊन वाफसा आल्यावर बेणे लागवड करावी. लागवडीनंतर आंबवणीचे पाणी जमिनीच्या मगदुराप्रमाणे द्यावे. पावसाळ्यानंतर ६ ते ८  दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. प्रत्येक वेळी पिकास हलके पाणी द्यावे. 
  •  पारंपरिक लागवडीच्या पद्धतीमध्ये पाणी देताना पिकाच्या क्षेत्रात पाणी साचू देऊ नये. 
  •  शक्यतो ठिबक, तुषार सिंचनाचा वापर करावा. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देताना पीकवाढीच्या अवस्थेनुसार दररोजचे बाष्पीभवन विचारात घेऊन पिकाची दररोजची पाण्याची गरज निश्‍चित करावी. तेवढेच पाणी मोजून द्यावे.
  •  पिकाच्या वाढीच्या अवस्थेत पाण्याची कमतरता पडू देऊ नये. पाण्याबरोबरच विद्राव्य खते वापरून खतांच्या मात्रा ठिबक सिंचनाद्वारे द्याव्यात.
  • जाती 

  •  सातारा भागामध्ये माहीम (सरासरी ६ ते १२ फुटवे, मध्यम उंचीची सरळ वाढणारी जात, कालावधी २१० दिवस, सुंठेचे प्रमाण १८.७ टक्के, उत्पादन प्रतिहेक्‍टरी २० टन).
  • औरंगाबाद भागातील औरंगाबादी जात.  
  •  राज्यात सध्या ‘माहीम’ या स्थानिक जातीची लागवड आहे.  या जातीमध्ये मोक्या आणि अंगऱ्या असे दोन प्रकार पडतात. मोक्या हा रसरशीत आणि ठोसर असतो. त्यामुळे बियाण्यात हा प्रकार चांगला समजला जातो. 
  • भारतीय मसाला पीक संशोधन केंद्र, कालिकत येथील जाती       वरदा : सरासरी ९ ते १० फुटवे, पिकाचा कालावधी २०० दिवस, तंतूचे प्रमाण ३.२९ ते ४.५० टक्के, सुंठेचा उतारा २०.०७ टक्के, रोग व किडीस सहनशील, उत्पादन ः  प्रतिहेक्‍टरी २२.३ टन.      महिमा : सरासरी १२ ते १३ फुटवे, पिकाचा कालावधी २०० दिवस, तंतूचे प्रमाण ३.२६ टक्के, सुंठेचा उतारा १९ टक्के, सूत्रकृमीस प्रतिकारक, उत्पादन ः प्रतिहेक्‍टरी २३.२ टन.     रीजाथा : सरासरी ८ ते ९ फुटवे, कालावधी २०० दिवस, तंतूचे प्रमाण ४ टक्के, सुगंधी द्रव्याचे प्रमाण २.३६ टक्के, सुंठेचा उतारा २३ टक्के (प्रामुख्याने सुंठ बनविण्यासाठी प्रसारित जात), उत्पादन ः प्रतिहेक्‍टरी २२.३ टन सुधारित जाती      सुप्रभा : भरपूर फुटवे असतात. गड्डे जाड असून टोके गोलाकार असतात. साल चमकदार करड्या रंगाची असते. तंतू ४.४ टक्के, सुगंधी तेल १.९ टक्का व ओलीओरेझीन ८.९ टक्के. हिरवे आले आणि सुंठीसाठी योग्य जात. उत्पादन ः प्रति हेक्टरी ३.४० टन.      सुरुची : गड्डे हिरवट पिवळ्या रंगाचे. ओलीओरेझीन १० टक्के असते. उत्पादन ः प्रति हेक्टरी २.२७ टन.      सुरभी : गड्ड्यांचा आकार सिलिंडर सारखा, साल गर्द चमकदार असते. भरपूर फुटवे असतात. तंतू ४ टक्के, तेल २.१ टक्के.उत्पादनः प्रति हेक्टरी ४ टन. प्रक्रियेसाठी जातींची निवड      सुंठनिर्मिती : करक्कल, नादिया, नरन, वैनाड, मननतोडी, वाल्लुवानाद, एरनाड, कुरूप्पमपाडी.      आले : रिओ दी जेनेरिओ, चायना, वैनाड स्थानिक, ताफेन्जिया.     बाष्पशील असलेल्या तेलाचे जास्त प्रमाण असणाऱ्या जाती ः  नरसापटलम, एरनाड, चेरनाड.      जास्त तेलयुक्त जाती : एरनाड, चेरनाडू, चायना, कुरूप्पमपाडी, रिओ दी जेनेरिओ      तंतूचे प्रमाण कमी असणाऱ्या जाती : जमैका, बँकॉक, चायना.

    - यशवंत जगदाळे, ९९२३०७१२६५ (जगदाळे हे कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) आणि मच्छिंद्र आगळे हे कृषी महाविद्यालय, बारामती येथे कार्यरत आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com