शेळ्यांमधील प्लेग (पीपीआर) आजार

पीपीआर आजाराच्या विषाणूंचा प्रसार मुख्यतः बाधित जनावराच्या सरळ संपर्कात आल्यामुळे होतो. याचा अप्रत्यक्षरीत्या प्रसार दूषित पाणी व खाद्य, भांडी, उपकरणे, काम करणारी माणसे इत्यादी मार्फत होतो.
Goat farm
Goat farm

पीपीआर आजाराच्या विषाणूंचा प्रसार मुख्यतः बाधित जनावराच्या सरळ संपर्कात आल्यामुळे होतो. याचा अप्रत्यक्षरीत्या प्रसार दूषित पाणी व खाद्य, भांडी, उपकरणे, काम करणारी माणसे इत्यादी मार्फत होतो. 

पेस्टे-डेस-पेटीटस रुमीनेनट म्हणजे लहान रोमांथक प्राण्यातील प्लेग हा मुख्यतः शेळ्या-मेंढ्याचा विषाणूजन्य आजार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर प्रतिकूल परिणाम होत असल्यामुळे अन्न व कृषी संस्था आणि ओ.आय.ई. यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी सन २०३० पर्यंत या रोगाचे निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

पीपीआर आजाराचे कारण 

  • हा आजार पॅरामीक्झोव्हायरिडी वंशातील पी.पी.आर. विषाणूमुळे होतो. हा विषाणू प्राण्यांच्या शरीरबाहेर जास्त काळ जिवंत राहू शकत नाही. 
  • जनुकीय विश्‍लेषणाद्वारे या विषाणूचे चार गट पडतात. यातील पहिले ३ गट आफ्रिका तर ४ था गट आशिया खंडात आढळतो. 
  • लहान रोमांथक प्राणी उदा. शेळी, मेंढी, हरीण इत्यादी या आजारास नैसर्गिकरीत्या अति संवेदनशील असतात. गायी, म्हशी, उंट, वराह यांसारखे प्राणी या आजारास कमी प्रमाणात बळी पडतात.
  • प्रसार 

  • आजारी जनावर या विषाणूचा मुख्य स्रोत असतात. अशा जनावराच्या विष्ठेमधून मोठ्या प्रमाणात विषाणू उत्सर्जित होतात. 
  • विषाणूंचा प्रसार मुख्यतः बाधित जनावराच्या सरळ संपर्कात आल्यामुळे होतो. याचा अप्रत्यक्षरीत्या प्रसार 
  • दूषित पाणी व खाद्य, भांडी, उपकरणे, काम करणारी माणसे इत्यादी मार्फत होतो. 
  • जनवरांचे बाजार व जंगली प्राणी यामार्फत सुद्धा याचा प्रसार होतो.
  • आजाराचा शरीरातील प्रसार

  • श्‍वसन किंवा खाद्याद्वारे या विषाणूचा शरीरात शिरकाव झाल्यानंतर हे विषाणू घसा व जबड्यातील लसिका गाठीवरती आक्रमण करतात. त्यात पुनरुत्पादन करून रक्तात प्रवेश करतात. 
  •  या विषाणूंना अन्ननलिका व श्‍वसनमार्गातील शेष्मल आवरण तसेच लिम्फ पेशी यांची आत्मियता असते. या पेशींमध्ये पुनरुत्पादन केल्यानंतर विषाणू पेशी नष्ट करतात परिणामी अन्ननलिका व श्‍वसनमार्गातील शेष्मल आवरण यामध्ये विकृती निर्माण होते.
  •  हे विषाणू जननेंद्रीय व डोळे यामध्ये सुद्धा संसर्ग करतात. 
  • लक्षणे 

  • आजाराचा उष्मायन काळ (रोगजंतूस शरीरात प्रवेश मिळाल्यानंतर प्रत्यक्ष रोगास आरंभ होईपर्यंतचा काळ) सर्वसाधारणपणे २ ते ६ दिवस असतो.
  • शरीराचे तापमान १०४ ते १०६ अंश फॅरानाईट इतके असते. 
  • जनावरांना औदासिन्य येते,  सुस्तपणा वाढतो.
  • डोळे व नाकातून चिकट स्राव स्रवतो. हा स्राव नंतर ‘पू’ सारखा बनतो. 
  • त्याचे डोळ्यावर व नाकामध्ये आवरण तयार होऊन पापण्या बंद होतात. श्‍वसनास अडथळा निर्माण होतो.
  • ताप आल्यानंतर २ ते ३ दिवसांनी हगवण दिसून येते. शेण सुरुवातीस मऊ असते व नंतर पातळ होते, शेणास घाण वास येतो. क्वचित शेण रक्तमिश्रित असते.
  • आजाराची तीव्रता जसजशी वाढत जाते, तसतशी शरीरामध्ये तीव्र निर्जलता, अशक्तपणा, श्‍वसनास अडथळा होणे, शरीराचे तापमान कमी होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. न्यूमोनिया होऊन मृत्यू ओढवतो.
  • आजारामध्ये मरतुकीचा दर २० ते ९० टक्के इतका असतो.
  • आजारामध्ये  तोंडात, हिरड्या, टाळू, जीभ, गाल याचे आवरण फाटते व फोड येतात. वेदनेमुळे जनावरे चारा खात नाहीत.
  • निदान

  • लक्षणाद्वारे
  • रक्तद्रव चाचण्या
  • विषाणूंचे विलगीकरण करून ओळख करणे
  • जनुकीय चाचणी (आरटी-पीसीआर) आणि विश्‍लेषणाद्वारे 
  • प्रतिबंधात्मक उपाय

  • आजारावर अनेक लसी उपलब्ध आहेत. उत्पादकाने दर्शविल्याप्रमाणे लसीकरण करावे. साधारणतः पहिले लसीकरण वयाच्या तिसऱ्या महिन्यात करतात.
  • पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार ३ ते ७ दिवस प्रतिजैविके द्यावीत.
  • बाधित जनावराचे तोंड ०.१ टक्का पोटॅशिअम परमॅंगनेटच्या द्रावणाने दिवसातून ३ ते ४ वेळा धुऊन घ्यावे.
  • बोरिक पावडर व ग्लिसरीनची पेस्ट करून तोंडामध्ये लावावी.
  • शरीराचे निर्जलीकरण कमी होण्यासाठी सालाइन लावावे.
  • जीवनसत्त्वांची मात्रा द्यावी.
  • सहज पचणारे मऊ खाद्य द्यावे.
  •  - डॉ. महेश कुलकर्णी, ९४२२६५४४७०  - डॉ. सुधाकर आवंडकर, ९५०३३९७९२९ (पशुवैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र  विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com