Agriculture Agricultural News Marathi article regarding goat management. | Agrowon

शेळ्यांमधील पैदास तंत्र

डॉ. सचिन टेकाडे
शनिवार, 9 जानेवारी 2021

शेळीपालन करताना शेळीपालकांना उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने सुधारित व्यवस्थापन पद्धती तसेच तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे.

शेळीपालन करताना शेळीपालकांना उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने सुधारित व्यवस्थापन पद्धती तसेच तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे. यामध्ये जातिवंत शेळ्यांसाठी निवड पद्धतीचा अवलंब,एकाच वेळी शेळ्या माजावर आणण्याचे तंत्र आणि कृत्रिम रेतन पद्धतीचा वापर करणे आवश्यक आहे.

शेळ्या या लवकर वयात येतात, त्यांचा गाभण काळ तुलनेने कमी असतो. त्यामुळे दोन वर्षांच्या कालावधीमध्ये त्या तीन वेळा वितात. शेळीपालन करताना उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने सुधारित व्यवस्थापन पद्धती तसेच तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे. 

पैदाशीसाठी निवड पद्धतीचा अवलंब  

 •    शेळी पालनामध्ये प्रजनन व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रती शेळी मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये वाढ होत नाही. 
 •    प्रत्येक शेळीमध्ये आनुवंशिक संरचनेमध्ये भिन्नता असते. त्यामुळे पैदाशीकरिता निवड पद्धतीचा अवलंब करावा. यामध्ये  उभय गुणधर्म असणाऱ्या शेळ्या जसे जुळी पिल्ले देणे, पिल्लांमध्ये वजनवाढीचा वेग जास्त असणे, शेळ्यांना दूध जास्त असणे, दोन वेतामधील अंतर कमी असणे, पिल्लांचे जन्मताचे वजन जास्त असणे, गर्भधारणेचे प्रमाण जास्त असणे यासर्व बाबींचा विचार करून पैदाशीकरिता शेळ्यांची निवड करावी.
 •    पैदाशीचा बोकड जातिवंत असावा. उभय गुणधर्म असलेला म्हणजेच त्यापासून भरविलेल्या शेळ्यांमध्ये जुळी पिल्ले होणे, शेळ्यांमध्ये गर्भपात किंवा शेळ्या न उलटणे, सशक्त पिल्ले निपजणे हे चांगल्या नराचे गुणधर्म आहे. त्यानुसार निवड करून पैदाशीकरिता शेळ्या व बोकड कळपामध्ये ठेवावा. निरुपयोगी किंवा कमी प्रतीच्या शेळ्यांचा पैदाशीकरिता वापर टाळावा. 
 •    शेळ्यांच्या दोन वेतामधील अंतर कमी करणे व करडांची चांगली वाढ होण्याच्या दृष्टिकोनामधून निवड पद्धतीचा अवलंब करावा. 

एकाच वेळी माजावर आणण्याचे तंत्र 

 •  एकाच वेळी शेळ्या माजावर आणण्याच्या तंत्राचा अवलंब करून कळपातील बहुतांश शेळ्या एकाच वेळी माजावर आल्यास सुधारित रेतन पद्धतीचा अवलंब करण्यास फायदेशीर होऊ शकते. 
 •  याकरिता काही संप्रेरकाचा वापर करून शेळ्या एकाच वेळी माजावर आणण्याचे तंत्र वापरण्यात येते. याकरिता केंद्रीय बकरी संशोधन संस्था (मखदूम, मथुरा, उत्तर प्रदेश) या संस्थेमार्फत संप्रेरक वापरून स्पंजेस तयार करण्यात आलेले आहेत. हे स्पंजेस शेळ्यांच्या योनीमार्गामध्ये (गर्भाशयाच्या मुखाजवळ) साधारणपणे १४ दिवस ठेवले जातात, सदर स्पंजेस योनीमार्गामधून काढल्यानंतर ४८ ते ७२ तासामध्ये बहुतांशी शेळ्या माज दाखवतात. त्यानंतर शेळ्या कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक रेतन पद्धतीने भरविल्या जातात. परंतु या पद्धतीचा अवलंब तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या मार्गदर्शन व देखरेखीखाली करणे आवश्यक आहे.

गर्भधारणा निदान  

 •  शेळीचा गाभण काळ हा पाच महिन्याचा असतो. गाभण काळामध्ये शेळयांची विशिष्ट काळजी घेणे आवश्यक असते. परंतु बऱ्या वेळा शेळ्यांच्या गर्भधारणेची वेळ माहिती नसल्यामुळे गाभण काळामध्ये शेळ्यांकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे प्रसूतीच्या वेळी शेळ्यांना त्रास होतो किंवा सशक्त पिल्ले जन्मास येत नाही. यामुळे शेळीपालकांना नाहक नुकसान सोसावे लागते. याकरिता गर्भधारणा निदान झाल्यास गाभण शेळ्यांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर होऊ शकते. 
 •  गर्भधारणेचे प्राथमिक निदान करण्याकरिता काही महत्त्वाच्या बाबी विचारात घ्याव्यात. शेळ्यामध्ये सलग दोन ऋतुकालामधील अंतर  सरासरी १८ ते २२ दिवस एवढे असते. म्हणजेच एकदा शेळी माजावर आल्यानंतर गर्भधारणा न झाल्यास शेळी पुढील १८ ते २२ दिवसांनी परत माज दाखवते. असे न झाल्यास शेळ्यांमध्ये गर्भधारणा झालेली असावी असा प्राथमिक अंदाज आपण घेऊ शकतो. 
 •  गाभण काळातील शेवटच्या ४५ दिवसांमध्ये शेळीच्या पोटाचा आकार किंवा गर्भाच्या हालचालीवरून गर्भधारणेचा अंदाज घेण्यात येतो. परंतु यामध्ये अचूक गर्भधारणा निदान होऊ शकत नाही. याकरिता वैद्यकीय पद्धतीचा जसे अल्ट्रासोनोग्राफी किंवा प्रयोगशाळेमध्ये काही चाचण्याकरून गर्भधारणा निदान होऊ शकते. यामुळे गाभण काळाच्या निश्चित वेळेनुसार शेळयांचे खाद्य व इतर व्यवस्थापन झाल्यास याचा फायदा शेळीपालकांना निश्चितच होऊ शकतो.

कृत्रिम रेतन पद्धतीचा वापर  

 • राज्यामध्ये नोंदणीकृत चार शेळ्यांच्या जाती आहेत. यामध्ये उस्मानाबादी शेळ्यांची संख्या जास्त आहे. त्याखालोखाल संगमनेरी, बेरारी आणि कोकण कन्याळ  जातीची क्रमांक लागतो. उर्वरित शेळ्या या गावठी प्रकारच्या आहेत.
 •  सध्या शेळ्या आणि बोकडाच्या मांसाची मागणी वाढली आहे. बोकड मांसाची मागणी जास्त असल्यामुळे कमी वयामध्ये बोकड मांसाकरिता विकले जातात. त्यामुळे पैदाशीकरिता चांगली आनुवंशिक गुणधर्म असलेले बोकड उपलब्ध होत नाहीत. बोकड वाढवून पैदाशीकरिता विक्री करणे ही संकल्पना राज्यामध्ये रुजलेली नाही. शेळ्यांचा व्यवसाय हा प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकडून केला जात असल्यामुळे त्यांच्या उपजीविकेकरिता कमी वयात बोकड विक्री करणे भाग पडते. त्यामुळे कमी प्रतीच्या बोकडापासून पैदास केली जाते किंवा बोकड उपलब्ध न झाल्यामुळे शेळ्यांचा माज वाया जाऊन दोन वेतातील अंतर वाढल्याने उत्पादनामध्ये घट होते. याकरिता चांगल्या बोकडाचे वीर्य संकलित करून कृत्रिम रेतन पद्धतीचा अवलंब केल्यास चांगले आनुवंशिक गुणधर्म असलेली पिढी निर्माण होऊ शकते. 
 •  कृत्रिम रेतन केल्यामुळे चांगले जातिवंत बोकडाच्या विर्याचा वापर होऊन उच्च दर्जाच्या शेळ्या तयार होऊ शकतात. तसेच प्रजननापासून प्रसारित होणाऱ्या आजारांचे संक्रमण थांबविण्यास सुद्धा मदत होऊ शकते. 
 • कृत्रिम रेतन आपण दोन प्रकारे करू शकतो, एक म्हणजे गोठविलेल्या रेत मात्रा वापरून किंवा बोकडाचे ताजे वीर्य वापरून कृत्रिम रेतन करता येऊ शकते. या पद्धतीचा अवलंब करण्याकरिता याबाबतचे प्रशिक्षण घेणे किंवा तज्ञ पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम रेतन करणे फायदेशीर ठरते. 

- डॉ. सचिन टेकाडे, ८८८८८९०२७०
(सहाय्यक संचालक,पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, पुणे)


इतर कृषिपूरक
सुधारित तंत्रातून वाढते पशुआहाराची...सर्वसाधारणपणे भौतिक, रासायनिक, जैविक,...
शेळ्यांच्या खाद्यामध्ये झाडपाला, ॲ...झाडपाल्याचा शेळ्यांसाठी चारा म्हणून वापर केल्यास...
दुधी अळिंबी लागवड तंत्रज्ञान दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी...
प्लॅस्टिकमुळे जनावरांच्या कोठीपोटावर...पॉलिबॅग आणि प्लॅस्टिक साहित्य जनावरांच्या...
भूक मंदावण्यावर सुंठ, जिरे, ओवा उपयुक्तजनावरांनी खाद्य न खाणे, त्याचे पोट गच्च होणे,...
जातिवंत बिटल, सिरोही आणि सोजत शेळी...मी जातिवंत बिटल, सिरोही आणि सोजत शेळी जातींच्या...
कोंबडी खत : सेंद्रिय खताचा उत्तम...कोंबडी खताच्या वापरामुळे जमिनीची जलधारणा शक्ती...
शेळ्यांमध्ये रोग निदानात्मक चाचणी,...रोग संक्रमण होऊन शेळ्या आजारी पडण्याचे  ...
‘बर्ड फ्लू’बाबत जागरूक राहापक्ष्यांमध्ये अनेकदा बर्ड फ्लूचा संसर्ग...
पोल्ट्रीशेडमध्ये जैवसुरक्षा आवश्यकजैविक कारणांमध्ये रोगकारक जिवाणू, विषाणू, कवक,...
लेयर कोंबड्यांसाठी संतुलित आहारकोंबड्यांना संतुलित खाद्य नियोजन करावे. शुद्ध आणि...
शेळ्यांमधील पैदास तंत्रशेळीपालन करताना शेळीपालकांना उत्पन्न...
शेळीपालनाचे नियोजनमाझी शिंदेवाडी गावामध्ये अडीच एकर शेती आहे....
जनावरांमधील हिवाळी अतिसारहिवाळी अतिसार हा दुधाळ जनावरांच्या पचन संस्थेचा...
शेवाळ उत्पादन प्रक्रियाशेवाळाचे उत्पादन हे पोषक अन्न, औषधे, जैवइंधनासाठी...
अन्नासह विविध कारणांसाठी शेवाळ शेती शेवाळ म्हणजेच सुक्ष्म आकारापासून विविध आकारामध्ये...
शेळ्या, मेंढ्यांमधील देवी आजारदेवी आजाराच्या नियंत्रणासाठी मेंढ्यांसाठी शीप...
जनावरांच्या कातडी आजारांवरील उपचारजनावरांमध्ये विविध प्रकारचे आजार होत असतात....
जनावरांमधील क्षयरोगजनावरांमधील क्षयरोग हा एक दीर्घकालीन आजार असून,...
कॅल्शिअम कमतरतेमुळे होतो दुग्धज्वरदुग्धज्वर हा कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे प्रामुख्याने...