द्राक्षबागेतील अवस्थांनुसार व्यवस्थापन

सध्याच्या काळात बागेतील घडांच्या स्थितीनुसार व्यवस्थापन करणे आवश्‍यक आहे. ज्या बागेमध्ये खरड छाटणीची सुरुवात होत आहे, अशा ठिकाणी डोळे फुटण्याकरिता काही उपाययोजना महत्त्वाच्या असतील.
Thrips on grape leaves
Thrips on grape leaves

सध्याच्या काळात बागेतील घडांच्या स्थितीनुसार व्यवस्थापन करणे आवश्‍यक आहे. ज्या बागेमध्ये खरड छाटणीची सुरुवात होत आहे, अशा ठिकाणी डोळे फुटण्याकरिता काही उपाययोजना महत्त्वाच्या असतील.

सध्याच्या परिस्थितीत अजूनही द्राक्षवेलीवर २५ टक्क्यांपर्यंत फळे तशीच असल्याचे दिसून येत आहे. याचाच अर्थ या बागांमध्ये फळकाढणी अजून झालेली नाही. गेल्या काही दिवसापासून सतत वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रत्येक ठिकाणी लॉकडाऊन परिस्थिती निर्माण झाली आहे असे नाही. मात्र सध्याच्या स्थितीमध्ये फळकाढणीकरिता मनुष्यबळ उपलब्ध होणे शक्य दिसत नाही. या करिता उपलब्ध द्राक्ष घडाचे व्यवस्थापन कसे करायचे याची माहिती  आपण मागील दोन सल्ल्यामध्ये दिली होती.  ज्या बागेत फळकाढणी शक्य होते, तिथे इथाईल ओलिएट १५ मि.लि. अधिक पोटॅशिअम कार्बोनेट २५ ग्रॅम (टॅंक मिक्स) प्रति लिटर प्रमाणे द्रावणामध्ये द्राक्षघड जवळपास ३ ते ५ मिनिटे बुडवून ठेवावा. त्यानंतर बागेत उपलब्ध सावलीमध्ये किंवा बेदाणा शेडमध्ये हे घड पसरवून द्यावेत. या घडांना रोज उलटापालट करत राहावे. दुसरी फवारणी तिसऱ्या दिवशी आणि तिसरी फवारणी सहाव्या दिवशी करावी. बेदाण्यामध्ये जवळपास १५ ते १६ टक्के पाणी राहील, अशा प्रकारे सुकवावे. त्यानंतर बेदाणा एका ठिकाणी गोळा करून पॅकिंग  करावे. बेदाणा तयार करण्यासाठी रसायने एक टन उपलब्ध द्राक्षाकरिता खालील प्रमाणे रसायनांची आवश्यकता असेल ः  

  • आवश्यक द्रावण ः  जवळपास १२५ लिटर  (जर १० लिटर द्रावणामध्ये ८० किलो द्राक्ष घड बुडवणे शक्य झाल्यास.) 
  • याकरिता १.९ लिटर इथाईल ओलिएट (डिपिंग ऑईल) व ३.१ किलो पोटॅशिअम कार्बोनेटची आवश्यकता असेल. 
  • पहिली फवारणीसाठी ः  जवळपास २५ लिटर द्रावण लागेल. ( पंपाद्वारे फवारणी करणे.)
  •  याकरिता ३०० मि.लि. इथाईल ओलिएट आणि ४५० ग्रॅम पोटॅशिअम कार्बोनेटची आवश्यकता असेल. 
  • दुसऱ्या फवारणीसाठी ः  जवळपास २५ लिटर द्रावण लागेल. ( पंपाद्वारे फवारणी करणे.)
  •  याकरिता इथाईल ओलिएट २०० मि.लि. आणि पोटॅशिअम कार्बोनेट ३२५ ग्रॅम ची आवश्यकता असेल. 
  • टीप ः जर बागेत जास्त प्रमाणात संजीवकांचा वापर केला असल्यास एखादी फवारणी जास्त लागू शकेल. मात्र, बागायतदारांनी या शिफारशीपेक्षा अतिरेक टाळावा. 
  • वेलीवर द्राक्षे सुकवण्याकरिता

  • ज्या बागेत घडाची काडी तारेला बांधून आहे, अशा ठिकाणी घडाच्या मागीत दोन ते तीन डोळ्यावर काडी कापून घ्यावी. म्हणजे  घड खाली पडणार नाही. बेदाणा लवकर सुकण्यास मदत होईल.
  • दुसऱ्या परिस्थितीत जर काडी तारेवर बांधलेली नसल्यास घडाच्या मागे काडीचा काप न घेता इथाईल ओलिएट १५ मि.लि. अधिक पोटॅशिअम कार्बोनेट २५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे द्रावण तयार करून फवारणी करावी. ही फवारणी गनचा वापर करून व्यवस्थित द्राक्ष घड भिजेल, या प्रमाणे करावी. 
  • पहिल्या फवारणीनंतर चौथ्या दिवशी दुसरी फवारणी मात्रा कमी करून ( ११ मि.लि. इथाईल ओलिएट अधिक  १८ ग्रॅम पोटॅशिअम कार्बोनेट प्रति लिटर) करावी.
  • अशा प्रकारे १२ ते १५ दिवसामध्ये १४ ते १६ टक्के पाणी उपलब्ध असलेला बेदाणा तयार होऊ शकतो. या नंतर तयार झालेला बेदाणा काडीपासून वेगळा करून सावलीमध्ये काही काळ ठेवावा. निवडून प्रतवारी केल्यानंतर शीतगृहामध्ये ठेवावा. 
  • फवारणी करिता आवश्यक रसायनाची मात्रा (१० फूट बाय ६  फूट अंतर असल्यास व प्रत्येक वेलीवर ४० ते ४५ घडांची संख्या असल्यास)  ः
  • पहिल्या फवारणीकरीता १५० लिटर पाणी प्रति एकर वापरता येईल. ( पंपाद्वारे फवारणी करणे.) याकरिता २.२५ लिटर इथाईल  ओलिएट आणि ३.७५ किलो  पोटॅशिअम कार्बोनेटची आवश्यकता असेल. 
  • दुसऱ्या फवारणीसाठी - १५० लिटर पाणी प्रति एकर वापरता येईल. ( पंपाद्वारे फवारणी करणे.)
  • याकरिता १.६५ लिटर इथाईल ओलिएट आणि २.७ किलो पोटॅशिअम कार्बोनेटची आवश्यकता असेल.
  • लवकर छाटणी झालेल्या बागेतील व्यवस्थापन

    उडद्या

  • बागेत वाढत्या तापमानामध्ये निघालेल्या कोवळ्या फुटीवर किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. छाटणी झाल्यानंतर डोळे फुगलेल्या अवस्थेत उडद्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येईल. ही कीड फुगलेला  डोळा पोखरून घेते. त्यामधील उपलब्ध पदार्थ खाऊन डोळा नष्ट करते. 
  •  किडीच्या नियंत्रणाकरिता इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.४ मि.लि. प्रति लिटर किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (४.९ सीएस) ०.५ मि.लि. प्रति लिटर किंवा फिप्रोनील (८० डब्ल्यूजी) ०.०६ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे सकाळी किंवा सायंकाळी फवारणी करावी. 
  • डोळे फुटलेल्या परिस्थितीत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फक्त इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.४ मि.लि. प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास उडद्या व मिलीबग या दोन्ही किडींचे नियंत्रण शक्य आहे.  
  • गरज असल्यास पुन्हा तीन ते सात दिवसात एक प्रतिबंधात्मक फवारणी घ्यावी.   
  • थ्रिप्स 

  • दुसऱ्या परिस्थितीमध्ये नवीन निघालेल्या फुटीवर शेंड्याकडील कोवळ्या पानांवर वाट्या झाल्याचे चित्र दिसून येईल. 
  • थ्रिप्स ही कीड पानामध्ये तयार झालेला रस शोषत असल्यामुळे पान आकसते.  त्यानंतर पानाची वाटी होते. यामुळे पानामध्ये तयार झालेल्या हरितद्रव्यांचे प्रमाण कमी होते. प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया कमी होऊन वाढ खुंटते. 
  • तिसऱ्या परिस्थितीत मिली बगच्या प्रादुर्भावामुळे वाढत असलेली फूट वेडीवाकडी होऊन वाढ तिथेच खुंटते. यासाठी तातडीने नियंत्रणाच्या उपाययोजना गरजेच्या आहेत. 
  • नियंत्रण ः (प्रति लिटर पाणी)

  • इमामेक्टीन बेंझोएट (५ एसजी) ०.२२ ग्रॅम किंवा 
  • फिप्रोनील (८० डब्ल्यूजी) ०.०६ ग्रॅम प्रती किंवा 
  • सायअॅण्ट्रानिलीप्रोल (१० ओडी) ०.७ मि.लि. 
  • खरड छाटणीचे नियोजन ज्या बागेमध्ये खरड छाटणीची सुरुवात होत आहे, अशा ठिकाणी डोळे फुटण्याकरिता काही उपाययोजना महत्त्वाच्या असतील. त्यात हायड्रोजन सायनामाईडचा वापर कमी मात्रेत (२० ते २५ मि.लि प्रती लिटर पाणी या प्रमाणे हाताने) पेस्टिंग करणे किंवा तितक्या मात्रेने पाठीवरील पंपाने ओलांड्यावर फवारणी करणे अपेक्षीत आहे. मात्र, सध्या असलेल्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये हायड्रोजन सायनामाईडची उपलब्धता होत नसल्याचे बागायतदारांकडून कळत आहे. अशा परिस्थितीत बागेत ओलांड्यावर शेडनेटने सावली करावी किंवा दिवसातून दोन वेळा (सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान व दुपारी २ ते ४ च्या दरम्यान) ओलांड्यावर फक्त पाण्याची फवारणी करावी. ही फवारणी खरडछाटणीच्या पाचव्या दिवसापासून पंधराव्या दिवसापर्यंत केल्यास बाग लवकर व एक सारखी फुटण्याकरिता चांगले परिणाम दिसून येतील. 

    -  डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८  

    (संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र,  मांजरी, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com