सघन पद्धतीने हापूस आंबा लागवड

हापूस आंब्याची ५ × ५ मीटर अंतरावर सघन लागवड करता येते. यामुळे उत्पादन वाढ करणे शक्य आहे. सघन लागवड केलेल्या बागेचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.
Mango High Density Plantation
Mango High Density Plantation

हापूस आंब्याची ५ × ५ मीटर अंतरावर सघन लागवड करता येते. यामुळे उत्पादन वाढ करणे शक्य आहे. सघन लागवड केलेल्या बागेचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आंब्यावर मुळकांडाचा वापर, छाटणी पद्धतीचा अवलंब, पॅक्लोबुट्राझॉलचा वापर, एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्य, पीक संरक्षण, पाणी व्यवस्थापनाबाबत शिफारशी केल्या आहेत. विद्यापीठाने कोकणात जमिनीवर तसेच कातळावर ५ × ५ मीटर  अंतरावर हापूस जातीची सघन लागवडीची शिफारस केली आहे. त्यामुळे प्रति हेक्टरी आंबा कलमांची संख्या १०० वरून ४०० वर जाते. 

  •  कलमे ५ × ५ मीटर अंतरावर चौरसाकृती पद्धतीने लावावीत. सूर्यप्रकाश जास्तीत जास्त कलमांमध्ये सर्वत्र पोहोचण्याच्या दृष्टीने दोन कलमांतील अंतर उत्तर-दक्षिण व दोन ओळींतील अंतर पूर्व-पश्‍चिम ठेवावे.
  •  लागवडीवेळी १ × १ × १ मीटर आकाराचा खड्डा खणून त्यात चांगली माती, ४ घमेली चांगले कुजलेले सेंद्रिय खत आणि ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण करून खड्डा भरून घ्यावा. 
  • बागेला सुरुवातीपासून ठिबकद्वारे पाणी द्यावे. त्यासाठी  बुंध्यात एक व उत्तर- दक्षिण बाजूला १ फूट अंतरावर ८ लिटर प्रति तास क्षमतेचे ड्रीपर लावावेत. कालांतराने उत्पादन सुरू झाल्यावर कलमाचा विस्तार उत्तर-दक्षिण वाढण्याच्या दृष्टीने उत्तर-दक्षिण असे झाडाच्या बुंध्यापासून पूर्वेला व पश्‍चिमेला पाणी देण्याची सोय करावी. सुरुवातीच्या कालावधीत १५ ते १६ लिटर पाणी प्रति दिवस द्यावे. उत्पादन सुरू झाल्यावर ६० ते ७० लिटर पाणी प्रति दिवस ठिबक पद्धतीने द्यावे. आंबा फळे काढणीपूर्वी १५ दिवस पाणी देणे बंद करावे.
  •  सघन लागवडीसाठी कोकणात हापूसची शिफारस आहे. त्याच बरोबरीने ३० टक्के रत्ना, केसर, आम्रपाली, मल्लिका, केसर या जातींची लागवड करावी.
  •  रोपवाटिकेतून अधिक उंचीची कलमे घेत असताना मुळांची पिशवीत गुंडाळी झालेली नाही याची खात्री करावी. एक वर्ष वयाची १० × १४ इंच आकाराच्या पिशवीत वाढलेली कलमे लावावीत.
  • कलम लागवड केल्यानंतर दरवर्षी पावसाळ्यानंतर १ टक्का बोर्डोमिश्रणाची  फवारणी करावी. तसेच बुंध्याला ५० सें.मी. पर्यंत बोर्डोमिश्रणाचा लेप लावावा. त्यामुळे रोगाचे प्रमाण कमी होते.
  •  लागवडीमध्ये सुरवातीच्या काळात उत्पादन मिळण्यासाठी नाचणी, वरी, तीळ, भुईमूग, भाजीपाला, कंदपिके इत्यादींची लागवड  करता येते.
  • एक वर्षे वयाच्या कलमाला १०किलो कुजलेले शेणखत, १५० ग्रॅम नत्र, ५० ग्रॅम स्फुरद आणि १०० ग्रॅम पालाश सल्फेट ऑफ पोटॅशमधून जून महिन्यात द्यावे. प्रतिवर्षी ही मात्रा समप्रमाणात वाढवत नेऊन १० वर्षांनंतर वरील मात्रेच्या १० पट मात्रा कलमाच्या विस्ताराच्या थोडीशी आत सुमारे ४५ ते ६० सें.मी. रुंद आणि १५ सें.मी. खोल वर्तुळाकार चर खणून द्यावी. या सोबतच २०० ग्रॅम अ‍ॅझेटोबॅक्टर व २०० ग्रॅम पीएसबी  द्यावे.
  •  हापूस आंब्यापासून दरवर्षी उत्पादन मिळण्यासाठी पॅक्लोब्युट्राझॉलचा वापर करावा.  पॅक्लोब्युट्राझॉल वर्षातून एकदा १५ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान पूर्ण वाढलेल्या १० वर्षावरील झाडाच्या पूर्व -पश्‍चिम व उत्तर- दक्षिण विस्तार मीटरमध्ये मोजून प्रति मीटर व्यासास ०.७५ ग्रॅम द्यावे (२३ टक्के पॅक्लोब्युट्राझॉल सरासरी व्यासाला ३ ने गुणून आलेले प्रमाण). ही मात्रा देताना ३ ते ६ लिटर पाण्यात मिसळून बुंध्याभोवती झाडाच्या विस्ताराच्या निम्म्या अंतरावर खणतीने १० ते १२ सें.मी. खोल असे समप्रमाणात २५ ते ३० खड्डे मारून ओतावे. नंतर हे खड्डे बुजवून टाकावेत. हे द्रावण मोठ्या पावसात देऊ नये तसेच द्रावण देण्यापूर्वी बुंध्याजवळील तण काढून टाकावेत.
  •  पावसाळा संपल्यावर ते फळवाढीच्या अवस्थेपर्यंत  एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाचा अवलंब करावा.
  • आंब्यास मोहोर येऊन फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती आकाराची असताना १ टक्का पोटॅशियम नायट्रेटच्या तीन वेळा फवारण्या कराव्यात. यामुळे फळगळ कमी होते, फळांचे वजन व आकार वाढून फळांची प्रत वाढते. तसेच साखर आम्लता प्रमाण सुयोग्य होऊन फळाला बाहेरून व आतील गराला आर्कषक केशरी रंग येतो. फळाचा टिकाऊपणा वाढून साक्याचे प्रमाण कमी होते.
  • कलमांचा आकार छोटा असल्यामुळे अनावश्यक फांद्याची छाटणी किंवा काढणीनंतर विस्तार मर्यादित ठेवण्यासाठी छाटणी गरजेची आहे. 
  • छाटणी तंत्र

  • वाढ मर्यादित ठेवण्याच्या दृष्टीने सघन लागवडीसाठी छाटणीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कलमे ७० ते १०० सेंमी उंचीची झाल्यावर मूळ खोडाला फांद्या फुटण्यासाठी कलमाच्या जोडावर सर्वात वरील पेराखाली एक इंचावर छाट घ्यावा. जेणेकरून पेरातून फांद्या फुटण्याऐवजी वरील डोळ्यातून फांद्या फुटतील. त्या निसर्गतः अधिक अंशाच्या असतील.
  • छाटणी केलेल्या कलमांची वाढ होत असताना पहिली दोन ते तीन वर्षे उत्पादन घेऊ नये. हा काळ कलमांचा सांगाडा अधिक भक्कम करण्यासाठी उपयोगी ठरेल. नवीन फुटलेल्या फांद्या दोन पेर फुटल्यावर दुसऱ्या पेराखाली एक इंच छाटून खोडावरील डोळ्यातून नवीन फांद्या फुटतील हे पहावे. 
  • - महेश कुलकर्णी,  ९४२२६३३०३० (उद्यानविद्या महाविद्यालय, डॉ.बाळासाहेब सावंत  कोकण कृषी विद्यापीठ,दापोली,जि.रत्नागिरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com