विक्रमी दुग्धोत्पादन देणारी ‘जोगन'गाय

हरियानातील गालीब खेरी (कर्नाल) येथील पशूपालक बलदेवसिंग यांच्याकडील जोगन या होल्स्टिन फ्रिजियन गाईने या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पशुश्रेष्ठत्व प्रदर्शनात २४ तासांत ७६.६१ किलो सर्वोच्च दूध उत्पादन देत प्रथम क्रमांक मिळविला.
विक्रमी दुग्धोत्पादन देणारी ‘जोगन'गाय
विक्रमी दुग्धोत्पादन देणारी ‘जोगन'गाय

हरियानातील गालीब खेरी (कर्नाल) येथील पशूपालक बलदेवसिंग यांच्याकडील जोगन या होल्स्टिन फ्रिजियन गाईने या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पशुश्रेष्ठत्व प्रदर्शनात २४ तासांत ७६.६१ किलो सर्वोच्च दूध उत्पादन देत प्रथम क्रमांक मिळविला. प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय दुग्धसंशोधन संस्थेचे पशुपैदास विभागाचे मुख्य संशोधक डॉ. विकास व्होरा यांनी ही नोंद केली आहे.   याबाबत माहिती देताना पशूपालक बलदेवसिंग म्हणाले की, परदेशातून आणलेल्या रेतमात्रेतून जोगन जन्माला आली. योग्य व्यवस्थापनाची बाजू सांभाळल्यामुळे होल्स्टिन फ्रिजियन जातीच्या या गाईने दुसऱ्या, तिसऱ्या वेतास अनुक्रमे ५४  किलो आणि ६२ किलो दूध दैनंदिन सरासरीने दिले आहे. पंजाबमधील एका पशू प्रदर्शनात या गाईने ६६.२० किलो दूध दिले होते. माझ्याकडे सध्या ७० दुधाळ गाई आहेत. राष्ट्रीय दुग्धसंशोधन संस्थेचे पशुपैदास विभागाचे मुख्य संशोधक डॉ. विकास व्होरा म्हणाले की, या अगोदर संकरित गाईने पंजाबमध्ये २४ तासांमध्ये ७२ किलो आणि कर्नालमध्ये ६५ किलो दूध उत्पादन दिल्याची नोंद आहे. कर्नालमध्ये यंदाच्या राष्ट्रीय पशुश्रेष्ठत्व प्रदर्शनामध्ये जोगन गाईने २४ तासांत ७६.६१ किलो सर्वोच्च दूध उत्पादन देत प्रथम क्रमांक मिळविला आहे. राष्ट्रीय दुग्धसंशोधन संस्थेचे संचालक डॉ. एम. एस. चौहान म्हणाले की, बलदेव सिंग आणि त्यांचे बंधू अमनदिप सिंग यांनी आमच्या संस्थेतून पशूपालनाबाबत सविस्तर प्रशिक्षण घेतले आहे. यामध्ये त्यांनी पशू प्रजनन आणि खाद्य व्यवस्थापनातील तंत्र समजाऊन घेत जातिवंत दुधाळ गाईंचे संगोपन केले आहे. त्यामुळे उच्च दुग्धोत्पादन क्षमता असलेल्या गाई त्यांच्या गोठ्यामध्ये पहावयास मिळतात. 

दुग्धाभिषेकाची ‘जोगन' चारचौघींपेक्षा निश्‍चित वेगळी. कुतूहलानं तिच्याकडं पाहावं वाटतं, मात्र सौंदर्यापेक्षा गुण श्रेष्ठ असल्यानं मोठी शंकाही असते. वास्तव का आभास, याचा ताळमेळ बराच काळ मनात सुरू राहतो. सोशल मीडिया कधी फसवेल याचा नेम नाही. विपरित म्हणजे भ्रामक, शक्‍य नाही म्हणून द्या सोडून... असे किती तरी विचार शेतकरी/ पशुपालकांनी केले असतीलच; पण ही सत्यकथा आहे, दुधाचे सर्वोच्च उत्पादन नोंदवणाऱ्या भारतातील होल्स्टिन फ्रिजीयन जोगन गायीची आणि तिला सांभाळासाठी कौशल्याची पराकाष्ठा करणाऱ्या बलदेवसिंग यांची...   प्रत्येक पशुपालकाला स्वतःच्या गोठ्यात जोगन गाय तयार करण्यासाठी संधी आहे. दिवसाकाठी ८० लिटर दूध देणाऱ्या ब्राझीलच्या गिरोलांडा गायीची व्हिडिओ क्‍लिप गेली पाच, सहा वर्षे पाहिलेली असल्याने सर्वोच्च दूध उत्पादन क्षमतेचे गमक समजावून घेण्यात खरा अर्थ दडलेला असतो. मुळात दूध हा आहाराशी संबंधित असलेला विषय व्यवस्थापन कौशल्यातून साकारता येतो. ताणरहित जनावरे ही संकल्पना पशुविज्ञानाशी जोडलेली आहे. जनावरांचा शरीर ताण कमी करणे, आराम वाढविणे, आहाराचे शास्त्रीय समतोल गणित सोडविणे या बाजू पशुपालकांनी अवलंबल्यास दूध उत्पादन हमखास वाढते. मात्र जनावरांच्या अंगी मुळात दूध उत्पादनाची क्षमता असण्यासाठी अनुवांशिक श्रेष्ठत्वाला महत्त्व आहे. 

आनुवंशिकतेला व्यवस्थापनाची जोड     पशुविज्ञानाचा सिद्धांत असा, की पशु अनुवांशिकतेत पाच टक्के दूध उत्पादन क्षमता असल्यास पशुपालकाला स्वतः व्यवस्थापनातून ९५ टक्के प्रयत्नांची जोड देत दूध मिळवता येते. तेव्हा उत्पादक पशुधनासाठी ‘गाय दूध देते' हे अर्थाने चूक ठरून खऱ्या अर्थाने ‘पशुपालक दूध मिळवतो' असेच दिसून येते. सोपा हिशेब असा आहे, की दहा लिटरच्या गायीचे अर्धा लिटर दूध अनुवांशिकतेच्या प्रेरणेचे, तर साडे नऊ लिटर व्यवस्थापन (आहार, निगा, आरोग्य) कौशल्याचे ठरते.   आपल्या राज्यात वीस लिटरपेक्षा जास्त दूध देणाऱ्या हजारो गायी आहेत. मात्र दोनदाच दूध काढणे आणि हाताने दूध पिळणे या दोन मुख्य अडचणी ‘दूधविक्रम'' घडू न देण्यास पूरक ठरतात. दुधाचा धंदा यांत्रिक दोहनाचा करून कासदाह प्रमाण कमी करणे आणि दिवसा तीन वेळा (सकाळी ६ , दुपारी २ आणि रात्री दहा) दोहन करून दूध उत्पादन क्षमता वाढवणे शक्‍य आहे. दोनदा दोहन होणारी गाय २० लिटरवरून २४ लिटरला नेणे केवळ तीन वेळा दोहनाने सहज शक्‍य आहे. यात वाढणारे चार लिटर दूध बीन खर्चिक, आहार न वाढवता मिळते, याचा प्रत्यक्षानुभव घेण्याची संधी आहे. राज्यातील प्रत्येक गोठ्यामध्ये अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम राज्यात पुन्हा जोमाने राबविला जावा, यासाठी पशुपालकांचे संघटित प्रयत्न गरजेचे आहेत. पशुसंवर्धन खात्याची अनुवांशिक सुधारणा योजना पुन्हा दुग्ध व्यावसायिकांनी समजावून घेतल्यास रेतमात्रेचे श्रेष्ठत्व कळू शकेल. - डॉ. नितीन मार्कंडेय, ९४२२६५७२५१ ( पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com