दुर्लक्षित पिकांनाही येत्या काळात संधी

द्राक्ष, डाळिंब, आंबा, केळी, संत्रा ही राज्याच्या शेती अर्थकारणातील महत्त्वाची पिके.या पिकांनी गुणवत्तेच्या जोरावर देश-विदेशातील बाजारपेठ काबीज केली.येत्या काळातील हवामान बदल, बाजारपेठ आणि प्रक्रिया उद्योगातील मागणीचा विचार करता चारोळी, कवठ, बिब्बा, कोकम,वटसोल या दुर्लक्षित पिकांनाही संधी आहे.
Surangi Flowers
Surangi Flowers

द्राक्ष, डाळिंब, आंबा, केळी, संत्रा ही राज्याच्या शेती अर्थकारणातील महत्त्वाची पिके.या पिकांनी गुणवत्तेच्या जोरावर देश-विदेशातील बाजारपेठ काबीज केली.येत्या काळातील हवामान बदल, बाजारपेठ आणि प्रक्रिया उद्योगातील मागणीचा विचार करता चारोळी, कवठ, बिब्बा, कोकम,वटसोल या दुर्लक्षित पिकांनाही संधी आहे. राज्यातील कृषी विद्यापिठांमध्ये याबाबत सुरू असलेल्या संशोधनाचा घेतलेला आढावा...

तिरफळ, कडीकोकमास व्यावसायिक मूल्य

को कण म्हटलं की, आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागा डोळ्यासमोर येतात. या पिकांनी कोकणाला आर्थिक समृद्धी दिली. याचबरोबरीने शेती बांध, परसबागेत कोकम, फणस, जांभूळ, करवंद, वटसोल, वावडिंग, तिरफळ, नीरफणस,पपनसाची लागवड दिसते. ही पिके हवामान बदलाच्या काळात आर्थिकदृष्टया महत्त्वाची आहेत. याचे कारण म्हणजे त्यांचे औषधी आणि प्रक्रियामूल्य. हे लक्षात घेऊन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने दुर्लक्षित पिकांना व्यावसायिक शेतीमध्ये आणण्यासाठी संशोधन आणि लागवड प्रकल्प सुरू केला आहे. याबाबत संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर म्हणाले, की हवामान बदलामुळे आंबा, काजू उत्पादनावर परिणाम झाल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडत आहे. त्यामुळे या पिकांच्या बरोबरीने कोकम, फणस, जांभळाच्या व्यावसायिक लागवडीकडे वळले पाहिजे. विद्यापिठाने या पिकांच्या अधिक उत्पादन देणाऱ्या जाती शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविल्या आहेत. याचबरोबरीने वटसोल, कडीकोकम, वावडिंग, तिरफळ, रामफळ, पपनस, नीरफणस आणि सुरंगीसारखे फूलपीक देखील फायदेशीर ठरणार आहे. कोकम, जांभूळ फळांमध्ये उत्तम गुणवत्तेचे फायटोकेमिकल्स आहेत.कोकमामध्ये हायड्रॉक्सिसिट्रीक आम्ल असते. हे विविध प्रकारच्या औषधांमध्ये वापरले जाते.विद्यापिठाने फणसाची कोकण प्रॉलिफिक, कोकमाची हातीस आणि अमृता तसेच जांभळाची बहाडोली जात विकसित केली आहे.  वटसोलाच्या वाळळेल्या फोडी आमसुलासारख्या वापरल्या जातात. तिरफळाचा वापर मसाला आणि औषधांमध्ये होतो. कडीकोकम, वावडींगाचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये करतात. सुरंगीच्या फुलांना अत्तर उद्योगात मागणी आहे. विद्यापिठाने पहिल्या टप्यात दुर्लक्षित पिकांचे लागवड क्षेत्र आणि अधिक उत्पादन देणाऱ्या झाडांची नोंद घेतली. त्यांच्या अभिवृद्धीसाठी प्रयोग सुरू आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये रामफळ,पपनस आणि नीर फणस लागवडीला अनुकूल वातावरण आहे.  - डॉ. पराग हळदणकर,  ९४२१८०९७२१

चारधारी वाल, करटोलीवर विशेष संशोधन आ रोग्यवर्धक आणि बाजारपेठेत मागणी असणारी काही दुर्लक्षित भाजीपाला पिके आहेत. यामध्ये प्रामुख्याने चारधारी वाल, करटोलीवर विशेष संशोधन महात्मा फुले कृषी विद्यापिठामध्ये झाले आहे.याबाबत वनस्पती शास्त्र विभागातील पीक पैदासकार डॉ.मुकुंद भिंगारदे म्हणाले की, चारधारी वालाची खरिपात लागवड करतात. यास शतावरी वाटाणा, मनिला बीन, गोवा बीन या नावाने ओळखले जाते. याच्या शेंगा १५ ते २० सें.मी लांब असून बाजूला चार पंख असतात. शेंगांच्या दाण्यात प्रथिनांचे प्रमाण ३६ टक्के आहे. या पिकामुळे जमिनीत नत्राचे स्थिरीकरण होते. या पिकाच्या इंदिरा विंग्ड बीन आणि अकोला विंग्ड बीन या जाती विकसित करण्यात आल्या आहेत. हेक्टरी हिरव्या शेंगांचे १५० ते २०० क्विंटल आणि धान्याचे १० ते १२ क्विंटल उत्पादन मिळते.  करटोली ही डोंगरपट्यातील आरोग्यदायी भाजी आहे. यास करठुली,कंटोळा आणि रानकारली या नावाने ओळखले जाते. यामध्ये तंतूमय घटक आणि ॲन्टी ऑक्सिडंटचे चांगले प्रमाण आहे. रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे, शरीरातील घातक पदार्थ बाहेर टाकणे, सर्दी, खोकल्यावर गुणकारी आहे. खरीप आणि उन्हाळी हंगामात लागवड करतात. आरएमएफ-३७ ही सुधारित जात आहे.एकरी १८०० किलो फळांचे उत्पादन मिळते. - डॉ.मुकुंद भिंगारदे,  ९४०४११२४९६

प्रक्रियेसाठी बेल, कवठ,चिंच मराठवाड्याचा विचार करता कमी पाण्यातही अपेक्षित उत्पादन देणारी आणि बाजारपेठेत मागणी असणारी दुर्लक्षित पिके म्हणजे चिंच, कवठ,बेल आणि बिब्बा.या पिकांतील संशोधनाबाबत बदनापूर (जि.जालना) येथील संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.संजय पाटील म्हणाले की, कमी पाण्याच्या विभागामध्ये चिंच, बिब्बा आणि कवठ लागवडीला चांगली संधी आहे. या फळांना प्रक्रिया उद्योगामध्ये मागणी वाढत आहे. हिमायतबाग येथील फळ संशोधन केंद्राने कवठाची एलोरा, बिब्याची परभणी-१६, नांदेड-८ आणि चिंचेची शिवाई,नंबर-२६३, प्रतिष्ठान या जाती विकसित केल्या आहेत. केवळ बांधावर दिसणाऱ्या या पिकांची व्यावसायिक लागवड वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुकामेव्यात बिब्यातील गोडंबी आणि कवठाला दक्षिण भारतात प्रक्रिया उद्योगामध्ये वाढती मागणी आहे. - डॉ.संजय पाटील,  ९८२२०७१८५४  

विदर्भात चारोळी, बिब्बा लागवडीला संधी वि दर्भामध्ये दुर्लक्षित कोरडवाहू पिकांसाठी अनुकूल वातावरण आहे. याबाबत सुरू असलेल्या संशोधनाबाबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठातील उद्यानविद्या तज्ज्ञ डॉ.सुरेंद्र पाटील म्हणाले की, आम्ही चारोळी, बिब्बा, बेल आणि कवठ या पिकांबाबत विशेष संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे. आरोग्य आणि प्रक्रियेच्या दृष्टीने ही फळे महत्त्वाची आहेत. पौष्टिक चारोळी   विदर्भाच्या डोंगरी भागातील चारोळी हे पीक फायदेशीर आहे. कृषी संशोधन केंद्र, सोनापूर येथे गडचिरोली, चंद्रपूर भागातील चारोळीच्या चांगले उत्पादन देणाऱ्या झाडांची नोंद घेऊन नवीन जाती विकसित होत आहेत.  बी बदामाप्रमाणे उपयुक्त, पौष्टिक आहे. मिठाईमध्ये वापर, सालीपासून डिंक आणि टॅनिन उत्पादन. सालीचा उपयोग रक्तशुद्धीसाठी. फळातील प्रमाण ः कर्बोदके(१७ टक्के), प्रथिने (२२ टक्के), पिष्टमय पदार्थ (१२ टक्के), साखर (५ टक्के), तेल (५२ टक्के). ८ ते १० वर्षांच्या झाडापासून १५ ते २० किलो फळांचे उत्पादन, त्यापासून २ ते २.५ किलो चारोळी बी मिळते.  बिब्बातील गोडंबीला मागणी   बिब्बा फळाच्या टरफलापासून तेल काढतात. विद्यापिठामध्ये बिब्याच्या नवीन जाती विकसित होत आहेत.     खाण्यासाठी बोंडाचा उपयोग.   पूर्ण वाढलेल्या एका झाडापासून प्रती वर्षी ३० ते ६० किलो फळे.   बियातील गोडंबी काजू सारखी पौष्टिक, मऊ, रुचकर असून ड्रायफ्रूट म्हणून मागणी.  गोडंबीतील घटक ः  कर्बोदके (२८.४ टक्के),पिष्टमय पदार्थ (२८.४ टक्के),प्रथिने (२६.४ टक्के), मेदाम्ले (३६.४ टक्के), तंतुमय पदार्थ (१.४ टक्के) आणि खनिजे (३.६ टक्के).   औषधी बेल   विद्यापीठामध्ये बेलाच्या गरापासून सिरप, मुरांबा आणि आसव निर्मितीचे तंत्र विकसित झाले आहे. दशमूळ अर्क निर्मितीसाठी उपयुक्त.      बेलामधील घटक ः  कर्बोदके (३०.४ टक्के),पाणी (६४.२ टक्के), प्रथिने (१.३ टक्के), लोह (०.६ टक्के), तेल (०.२ टक्के), चुना (०.०९ टक्के), खनिजे (१.५ टक्के), जीवनसत्त्व अ (२४० आय.यु.प्रती १०० ग्रॅम), स्फुरद (५० मि.ग्रॅम), थायमिन (०.१३ मि. ग्रॅम), जीवनसत्त्व क (८ मि. ग्रॅम). प्रक्रियेसाठी कवठ चांगल्या वाढलेल्या झाडास २५० ते ४०० फळे लागतात. विद्यापिठामध्ये स्थानिक जातींचे संकलन करून नवीन जात विकसित होत आहे. गरापासून चटणी, कोशिंबीर, जेली, जाम, मुरंबा, पंचामृत निर्मिती. खोडावरील डिंक आवेवर गुणकारी. कवठाच्या ताज्या १०० ग्रॅम गरातील घटक ः  प्रथिने(७.३ टक्के), मेदाम्ले(०.६ टक्के),खनिजे(१.९ टक्के), पिष्टमय पदार्थ (१५.५ टक्के), तंतुमय पदार्थ (५.२ टक्के),  रिबोफ्लावीन, जीवनसत्त्व क,जीवनसत्त्व अ, थायमिन (०.०४ मि. ग्रॅम) - डॉ. सुरेंद्र पाटील,  ९८८१७३५३५३  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com