लिंबूवरील खैऱ्या रोगाचे व्यवस्थापन

लिंबावरील खैऱ्या (कँकर) हा रोग संसर्गजन्य आहे. प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी एकात्मिक रोग नियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा.
disease on lemon
disease on lemon

लिंबावरील खैऱ्या (कँकर) हा रोग संसर्गजन्य आहे. प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी एकात्मिक रोग नियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा.

लिंबू पिकावर येणाऱ्या खैऱ्या किंवा कँकर रोगाची समस्या सातत्याने उद्भवत आहे. या रोगाची लक्षणे जाणून वेळीच व्यवस्थापन करण्याची आवश्यकता आहे. लिंबू लागवडीमधील प्रमुख अडचणींपैकी एक कॅंकर रोग होय. 

  • रोगकारक जिवाणू ः झान्थोमोनास सिट्री उप-प्रजाती सिट्री.  
  • रोग अत्यंत जलद गतीने पसरतो, नुकसानाची उच्च संभाव्यता असते. 
  • फळावर डाग पडत असल्यामुळे अशा फळांना बाजारात मागणी राहत नाही. अशी फळे प्रतवारीमध्ये वेगळी करूनच बाजारात न्यावी लागतात. 
  •  कँकर रोगामुळे ५०-६० टक्के उत्पन्न कमी होण्याची नोंद आहे.
  • लक्षणे 

  • रोगाचे संक्रमण रोपे अवस्था ते विकसित झाड यावर दिसून येते. रोगाचा प्रादुर्भाव व लक्षणे पाने, फांद्या, जुन्या शाखा आणि फळे यावर दिसून येतो. 
  • सुरवातीला पानांवर टाचणीच्या टोकाएवढे लहान, गोल, गर्द हिरवे व पाणीयुक्त ठिपके पृष्ठभागावर दिसतात. हे ठिपके तांबूस रंगाचे खरबरीत होऊन पानांच्या दोन्ही बाजूस दिसतात. ठिपक्यांभोवती पिवळ्या रंगाचे वलय तयार होऊन कालांतराने ते नाहीसे होते. पुढे हे ठिपके फांद्यावर वाढतात आणि झाड देवीचे व्रण ग्रासल्यासारखे दिसते. परिणामी शेंड्याकडील फांद्या मरतात. 
  • झाडे खुरटल्यासारखी दिसतात. फळांवर ठिपक्यांची वाढ झाल्यास फळे तडकतात. अशा फळांना बाजारात मागणी नसते. रोगाचे प्रमाण जास्त असल्यास पाने गळतात, फांद्या जळतात व फळांना बाजारात भाव मिळत नाही. 
  • प्रसार

  •  हा रोग फार संसर्गजन्य असून, प्रामुख्याने पावसाचे थेंब, पाने पोखरणारी अळी, पानातील रंध्रे व अवजारांद्वारे त्याचा प्रसार होतो. 
  • पावसाच्या थेंबांमुळे फोडातील सूक्ष्मजंतूमार्फत रोग झाडाच्या सर्व भागांवर पसरतो. पावसामुळे पानांच्या पृष्ठभागावर पाणी साठते.  पर्णरंध्रे (स्टोमॅटो) मध्ये जिवाणूयुक्त पाण्याचे थेंब आतमध्ये प्रवेश करून संसर्ग वाढवितात. रोगग्रस्त पानांवर पावसाचे थेंब पडून उडणारे थेंब, जिवाणूसह वाऱ्याबरोबर शेजारील झाडावर पडून रोगाचा प्रसार होतो. 
  •  रोपवाटिकेत किंवा बागेत वापरात येणाऱ्या अवजाराद्वारेसुद्धा प्रसार होतो. 
  • या रोगाच्या प्रसारास पाने पोखरणारी अळी (नाग अळी) ही कारणीभूत ठरते. ही अळी पाने पोखरत आतील हरितद्रव्य खाते. या प्रक्रियेमध्ये पानांमध्ये असंख्य जखमा होतात. या जखमांमधून जिवाणूंचे संक्रमण पेशींना होते. हा रोग वाढण्यास मदत होते. 
  •  या रोगाचा फैलाव झपाट्याने होण्यास पावसाळ्यातील उष्ण, दमट, व ढगाळ व आर्द्रतायुक्त हवामान अतिशय अनुकूल असते. २५ ते ३० अंश सेल्सिअस दरम्यान तापमान व समान वितरित पाऊस अशा  वातावरणात रोगाची वाढ जलद होते.
  • एकात्मिक रोग नियंत्रण व्यवस्थापन  

  • नवीन लागवडीसाठी निरोगी रोपे वापरावीत.
  • मॉन्सूनच्या प्रारंभापूर्वी संक्रमित झाडाच्या फांद्यांची छाटणी करावी. त्यावर बोर्डो मिश्रणाची (१ टक्का तीव्रता) फवारणी करावी. 
  • फांद्या छाटणी प्रक्रियेतील आणि व्यापक संपर्कात असलेल्या अवजारांचे निर्जंतुकीकरण करणे महत्त्वाचे आहे.
  • रोगग्रस्त फांद्या, पाने  व फळे यांचा नायनाट करावा.   
  • कॉपर ऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन* ०.१ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये एक महिन्याचे अंतराने तीन फवारण्या कराव्यात. चौथी फवारणी फेब्रुवारी महिन्यात करावी.  
  • पाने पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भावाकडे लक्ष देऊन वेळीच नियंत्रण करावे. 
  • - डॉ. योगेश इंगळे, ९४२२७६६४३७  - डॉ. दिनेश पैठणकर, ९८८१०२१२२२ (भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (लिंबूवर्गीय फळे), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com