जांभूळ प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक यंत्रे

औषधी गुणधर्म असूनही व्यावसायिक तत्त्वावरील लागवड नसल्याने अन्य फळांच्या तुलनेमध्ये जांभूळ मागे पडले आहे. या फळाचे व्यापारी महत्त्व ओळखून प्रक्रिया उद्योगावर लक्ष केंद्रित केल्यास मूल्यवर्धित जांभूळ पदार्थांना वर्षभर मागणी राहू शकते.
PULPER
PULPER

औषधी गुणधर्म असूनही व्यावसायिक तत्त्वावरील लागवड नसल्याने अन्य फळांच्या तुलनेमध्ये जांभूळ मागे पडले आहे. या फळाचे व्यापारी महत्त्व ओळखून प्रक्रिया उद्योगावर लक्ष केंद्रित केल्यास मूल्यवर्धित जांभूळ पदार्थांना वर्षभर मागणी राहू शकते.  

जांभूळ फळे अत्यंत नाजूक व नाशवंत आहेत. फळे दोन दिवसांपेक्षा जास्त काळ साठवता येत नाहीत. बाजारात एकाचवेळी फळांची आवक जास्त झाल्यास दरामध्ये घसरण होते. फळांपासून रस, सरबत, स्क्वॅश, सिरप, वाइन, जॅम, जेली, बर्फी, चॉकलेट, आइस्क्रीम टॉफी, पावडर असे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केल्यास औषधी गुणधर्माचा वापर होईल. हंगाम नसताना फळांचा आस्वाद घेता येईल. पिकलेल्या फळांना गर्द जांभळा रंग असल्याने त्याचा रस किंवा सरबत, स्क्वॅश, सिरप अशा पेयाला आकर्षक रंग येतो.  जांभळाची फळे पूर्ण पिकल्यानंतर जमिनीवर पडतात. बियांपासून भुकटी तयार करता येते. ही भुकटी मधुमेही रुग्णांसाठी लघवीतील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी होतो.

 गर काढणारे यंत्र (पल्पर मशिन)  जांभळापासून निघणाऱ्या गरापासून आपण रस, सिरप, स्कॅश, नेक्टर, जॅम, जेली, वाइन, बर्फी, टॉफी, चॉकलेट, आइस्क्रीम इ. प्रक्रिया पदार्थ बनविता येते. जांभळाचा हाताने गर काढण्यासाठी अधिक मजूर लागतात. खर्च वाढतो. अधिक मानवी हाताळणीमुळे गुणवत्तेवर परिणाम होतो. त्यासाठी जांभूळ गर काढण्यासाठी यंत्र विकसित केलेले आहे. या यंत्राद्वारे जांभळाचा घट्ट रस मिळू शकतो. यंत्रामध्ये पिकलेली जांभूळ फळे टाकल्यानंतर त्यांचे विशिष्ट भागावरून फिरणाऱ्या पॅडलद्वारे विभाजन केले जाते. त्यातून द्रव्य आणि इच्छित पदार्थाचे प्रमाण जाळीदार पडद्यावरून ठरते. त्यातून गर निघाल्यानंतर उर्वरित चोथा व जांभळाच्या बिया मोठ्या नॉन-प्लगिंग पोर्टद्वारे बाहेर टाकले जाते. जांभळाचा गर हा विशिष्ट प्रकारच्या भांड्यामध्ये समोरच्या बाजूला साठवला जातो. यंत्रामधून काढलेला जांभळाचा गर एलडीपीई प्लॅस्टिक पिशवीमध्ये सीलबंद करून उणे २० अंश सेल्सिअस तापमानामध्ये डीप फ्रिजमध्ये ठेवल्यास हा गर १ वर्षापर्यंत टिकतो. जांभूळ गर निष्कासन यंत्र पूर्णपणे स्टेनलेस स्टीलपासून बनलेले असते. वजन ६० किलोपर्यंत आहे. या यंत्राला अर्धा एचपीची विद्युत मोटार जोडलेली असून ताशी ७० ते ८० किलो जांभळाचा गर काढता येतो. २२० व्होल्ट ऊर्जा व थ्रीफेजवर हे यंत्र चालते. या अर्धस्वयंचलित यंत्रांचे काही भाग फूड ग्रेड स्टीलचे असून, यंत्र हाताळायला सोपे आहे. कमी जागेमध्येही हे यंत्र बसते. यंत्रांची किंमत ही  ५५ हजारांपासून सुरू होते. या यंत्रामुळे गराची प्रत सुधारते; तसेच वेळ, मनुष्यबळ कमी लागते. यंत्रामुळे हंगाम नसतानासुद्धा गर उपलब्ध होतो. यंत्रांच्या क्षमतेनुसार यंत्रांची किंमत वाढत जाते. हे यंत्र अन्य फळांचा रसही काढता येतो. 

रस गरम करण्याचे यंत्र (स्टीम जॅकेट कॅटल) 

स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर पल्परच्या साह्याने जांभळाचा गर काढून घ्यावा. एकजीव झालेला गर स्टीम जॅकेट कॅटलमध्ये ८० ते ८२ अंश से. तापमानाला २० ते ३० मिनिटे गरम करावा. यामुळे रसामधील रंगद्रव्याचे प्रमाण जास्त मिळते. जांभळाचा गर गरम करण्यासाठी व बाष्पीभवनाद्वारे त्यातील पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी या यंत्राचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे एकसमान उष्णता आणि वाफेद्वारे जांभळाच्या गराचे निर्जंतुकीकरण केले जाते. हा गर अधिक काळ टिकण्यास मदत होते. या यंत्रांमध्ये बाह्य भाग व अंतर्गत भाग असे दोन भाग असून, बाहेरून जोडलेल्या बॉयलरद्वारे आतील पोकळ भागात वाफ सोडली जाते. वाफ नियंत्रित ठेवण्यासाठी प्रेशर गेज आणि सेफ्टी व्हॉल्व असतात. हे यंत्र पूर्णपणे स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले आहे. ती ताशी ५० लिटरपासून १००० लिटर इतक्या क्षमतेमध्ये उपलब्ध आहेत. या यंत्राला १ एचपी क्षमतेची विद्युत मोटार जोडलेली असते. हे यंत्र २२० व्होल्ट ऊर्जा व थ्रीफेजवर चालते. या अर्धस्वयंचलित यंत्रांची किंमत ६० हजारांपासून पुढे आहे.     

 रिफ्रॅक्टोमीटर   पदार्थातील साखरेचे प्रमाण मोजण्यासाठी रिफ्रॅक्टोमीटरचा वापर केला जातो. ३० ते ९० अंश ब्रिक्सपर्यंत गोडी मोजता येते. गोडी मोजण्याचे एकक हे ब्रिक्स आहे. वजन २९० ग्रॅम व लांबी २० सेंमी अशा आकारात सहज हाताळण्यायोग्य रेफ्रॅक्टोमीटर बाजारात उपलब्ध आहेत. त्याच्या किमती २५०० रुपयांपासून सुरू होतात.  प्रथम रिफ्रॅक्टोमीटरची स्क्रीन क्षारविरहित पाण्याने धुऊन घ्यावी. स्वच्छ पुसल्यानंतर त्यात नमुना घ्यावा. तो स्क्रीनला हळूच दाबल्यानंतर प्रकाशाच्या दिशेने धरावे. सामान्यपणे ज्यूस, सिरप, सॉस यासाठी ० ते ३० अंश ब्रिक्स व जॅम आणि कॉन्सट्रेटसाठी ३० ते ७० अंश ब्रिक्स असावा  लागतो.     वाळवणी यंत्र (ड्रायर मशिन)    जांभळाच्या बिया वाळवून त्यापासून तयार केलेल्या भुकटीला बाजारामध्ये चांगली मागणी आहे. बिया वाळवण्यासाठी वाळवणी यंत्राचा उपयोग केला जातो. जांभळामधून गर काढल्यानंतर उरलेला चोथा व स्वच्छ बिया घ्याव्यात. त्यानंतर जांभळाच्या बिया ट्रे मध्ये ठेवून ५५ ते ६० अंश तापमानाला १६ ते २० तासासाठी ठेवावेत, त्यानंतर वाळलेल्या बिया किंवा चोथा पुढील प्रक्रियांसाठी साठवून ठेवता येतो. ट्रे ड्रायर हे लोखंड व पत्र्यापासून बनवलेले असून, अंतर्गत भाग अॅल्युमिनिअमचा बनलेला असतो. त्याची क्षमता ६, ८, १२, ३६, ४८, ७२, ९६ ट्रे इतकी आपल्या गरजेनुसार घेता येते. यंत्राचे वजन ६० ते ६५ किलो असते. थ्रीफेजवर चालणारे हे यंत्र स्वयंचलित आहे. त्यात ५५ अंश ते २०० अंश तापमानापर्यंत उष्णता देता येते. याला डिजिटल डिस्प्ले जोडलेला असतो. आत उष्ण हवा खेळती ठेवण्यासाठी लहान पंखा जोडलेला असतो. प्रतिबॅच १० ते २० किलो क्षमतेच्या यंत्राची किंमत ३५ हजार रुपयांपासून सुरू होते.  क्षमतेनुसार यंत्राची किंमत वाढते.  भुकटी बनवणारे यंत्र (ग्राइंडर मशिन)  जांभळाचा गर काढल्यानंतर शिल्लक बिया स्वच्छ पाण्याने धुऊन उन्हात वाळवाव्यात. त्या वाळलेल्या बिया पॅल्व्हरायझरमध्ये दळून भुकटी तयार करावी. या भुकटीचा वापर विविध औषधांमध्ये, रंग उद्योग आणि पशुखाद्यामध्ये केला जातो. त्याचप्रमाणे बेकरीजन्य उत्पादने, खाद्य उद्योगातही केला जातो. जांभळाच्या बियांपासून भुकटी बनवण्यासाठी १० ते २५० किलो प्रती तास क्षमतेचे बहुउपयोगी ग्राईंडर बाजारात उपलब्ध आहेत. 

कॉर्न कॉर्किंग यंत्र  जांभळाचा रस, सरबत, सिरप, स्कॅश, नेक्टर हे प्रदार्थ काचेच्या बाटल्यांमध्ये पॅक करतात. ते सीलबंद करण्यासाठी कॉर्न कॉर्किंग यंत्रांचा वापर करतात. क्राउन कॉर्क्स हे यंत्र अर्ध स्वयंचलित असून एका हाताने चालवले जाते. त्यामध्ये क्राउन कॉर्क ठेवण्यासाठी चकवर चुंबकासह एक लहान पोकळी बनवली जाते. बाटली एका खास तयार केलेल्या प्लॅटफॉर्मवर ठेवली जाते, जेणेकरून क्राउन कॉर्क हेड दाबल्यावर स्वयंचलितपणे बाटलीच्या मध्यभागी येईल. सामग्री भरल्यानंतर बाटली प्लॅटफॉर्मवर ठेवली जाते. एक क्राउन कॉर्क डोक्यावर ठेवला जातो. साध्या हातांनी क्रॉन कॉर्क बाटलीवर दाबला जातो. उत्तम हवाबंद झाल्यामुळे बाटल्या जास्त काळ जतन करता येतात. यंत्रामध्ये एका वेळी एक बाटली पॅक करता येते. यंत्र हे मिश्र धातूपासून बनवले असते. यंत्राची क्षमता ही मिनिटाला १५ बाटल्या अशी आहे. वजन २ किलो असून यंत्राची किंमत १० हजारांपासून पुढे आहे. 

सिलिंग यंत्र  प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये पदार्थ भरल्यानंतर सिलिंग यंत्राने हवाबंद करता येते. यात १० मिलीपासून ५ किलो पदार्थांचे पॅकेजिंग करता येते. हस्तचलित यंत्राची किंमत १५०० रुपयांपासून सुरू होते. स्वयंचलित यंत्राची किंमत ६० हजार रुपयांपासून पुढे आहेत.   

- सचिन शेळके, ८८८८९९२५२२,  

- गोपाळ सोळंके, ८३७८९५१००५,

(आचार्य पदवी विद्यार्थी,  अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग,  सॅम हिग्गिनबॉटम कृषी, प्रौद्योगिकी आणि विज्ञान विश्वविद्यालय, प्रयागराज, उत्तर प्रदेश.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com