Agriculture Agricultural News Marathi article regarding management of animals. | Page 2 ||| Agrowon

जनावरांतील विषाणूजन्य आजार ः तिवा

डॉ. सुधाकर आवंडकर,डॉ. महेश कुलकर्णी
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

तिवा आजार होण्याचे प्रमाण सुदृढ प्रकृतीच्या, अधिक दूध देणाऱ्या गायी आणि नर जनावरांत अधिक असते. तिवा हा चिलटांद्वारे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. आजाराची लक्षणे ओळखून तातडीने उपाययोजना कराव्यात.

तिवा आजार होण्याचे प्रमाण सुदृढ प्रकृतीच्या, अधिक दूध देणाऱ्या गायी आणि नर जनावरांत अधिक असते. तिवा हा चिलटांद्वारे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. आजाराची लक्षणे ओळखून तातडीने उपाययोजना कराव्यात.
तिवा हा चिलटांद्वारे पसरणारा जनावरांचा विषाणूजन्य आजार आहे. या आजारास डेंगी किंवा तिव असेही म्हणतात. या आजारामुळे बहुतांश जनावरे तीन दिवस बाधित होतात आणि त्यानंतर निसर्गतः बरी होतात. बाधित जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण नगण्य असले, तरी दुग्धोत्पादन आणि वळूच्या कार्यक्षमतेत प्रचंड घट होते. 

कारणे 

 • आजार प्रामुख्याने गो आणि महिषवंशीय जनावरांमध्ये आढळून येत असला, तरी शेळ्या, मेंढ्या आणि वराह यांना प्रादुर्भाव होतो. 
 • आजार गोवर्गीय प्राण्यांत जास्त आढळतो. आजार होण्याचे प्रमाण सुदृढ प्रकृतीच्या, अधिक दूध देणाऱ्या गायी आणि नर जनावरांत अधिक असते. महिष वंशीय जनावरांमध्ये आजाराची तीव्रता कमी दिसून येते.
 • अशक्त जनावरांपेक्षा सुदृढ जनावरांत हा आजार अधिक प्रमाणात दिसून येतो. हा आजार तीन ते सहा महिन्यांच्या वासरांत सहसा दिसून येत नाही. 
 • सहा ते बारा महिन्यांच्या वासरांना प्रादुर्भाव झाल्यास लक्षणे अतिशय सौम्य असतात. दोन वर्षांपेक्षा जास्त वयाच्या जनावरांत आजाराची तीव्रता जास्त असते. 

 प्रसार

 • आजार रेबीज कुळ आणि एफेमेरो गटातील बोव्हायीन एफेमेरल विषाणूमुळे होतो. 
 • लक्षणे न दाखविणारी बाधित जनावरे आणि क्युलिकोइड चिलटे या आजाराचा प्रसार करतात. वातावरण आणि चिलटांचा प्रादुर्भाव यावर रोगप्रसार अवलंबून असतो. 
 • पावसाळा आणि हिवाळ्यातील वातावरणात अचानक होणाऱ्या बदलांमुळे जनावरांवर येणारा ताण या आजाराच्या प्रादुर्भावाची पूर्वनिश्‍चिती करतो. 
 • आपल्याकडे पाऊस उन्हाळ्याच्या उत्तरार्धात पडतो. या काळात उष्णता भरपूर असते. उष्णता आणि पावसामुळे हवेतील आर्द्रता जास्त प्रमाणात वाढते. या काळात अचानक हवामान बदल होत असतात. तसेच या काळात चिलटांचे प्रजोत्पादन जास्त प्रमाणात होते. म्हणून साधारणतः पावसाळ्याच्या उत्तरार्धात आणि त्यानंतर हा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो.
 • चिलटे वाऱ्याच्या प्रवाहासोबत इतरत्र वाहून जात असल्याने हा आजार आजूबाजूच्या गावांत सुद्धा पसरतो.
 • आजाराचा प्रादुर्भाव आणि तीव्रता दरवर्षी बदलत जाते. एकदा आजार येऊन गेल्यानंतर ठरावीक काळानंतर या आजाराचा प्रादुर्भाव पुनःपुन्हा जाणवू शकतो. मात्र बाधा होऊन बऱ्या झालेल्या जनावरांत जीवनभरासाठी रोगप्रतिकारशक्ती तयार होते. 

लक्षणे आणि प्रकार 

 • बहुतांश जनावरे आजाराची लक्षणे साधारणपणे तीन दिवस दाखवतात. त्यानंतर आपोआप बरी होतात. 
 • काही जनावरांत आजारपणाची लक्षणे आठवडाभर राहू शकतात. 

तीव्रतेवरून प्रकार 
सौम्य प्रकार 

 • एक वर्ष वयाखालील वासरांत सौम्य प्रकार दिसून येतो. बाधित वासरांना ताप येतो. नाका-डोळ्यांतून पाण्यासारखा स्राव वाहतो. तोंडातून लाळ गळते. खाणे, पिणे कामी होते. 
 • आजारी जनावरांचे मागील पाय ताठरतात. त्यामुळे हालचाल मंदावते. एका किंवा जास्त पायांनी लंगडते.
 • बाधित जनावरे जागेवर सुस्त बसून राहतात. एक ते दोन दिवसांत जनावरे बरी होतात.

तीव्र प्रकार 

 • जनावरांना अचानक १०५ ते १०६ अंश सेल्सिअसपर्यंत ताप येऊन थरथर कापते. जनावर ताठरते, काळवंडते, खाणे, पिणे आणि रवंथ बंद करते. आडवे पडते. 
 • नाका-डोळ्यांतून पांढरा स्राव वाहतो. अति प्रमाणात लाळ गळते. शरीराचे निर्जलीकरण होते. श्‍वसनाचा वेग आणि हृदयाचे ठोके वाढतात.
 • आजारी जनावरांचे विशेषतः मागील पाय ताठरतात. काही जनावरांच्या पायांवरील सांध्यावर सूज दिसून येते. काही जनावरांत पोटफुगी दिसून येते. 
 • दूध उत्पादन घटते. आठ ते नऊ महिन्यांच्या गाभण जनावरांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता असते. दोन ते तीन दिवसांत जनावरे बरी होतात.

अति तीव्र प्रकार  

 • बाधित जनावर सडकून ताप येऊन अचानक आडवे पडते. मज्जासंस्थेची प्रतिक्षिप्त क्रिया बंद पडून कायमस्वरूपी पक्षाघात होण्याची शक्यता असते. तापानंतर तीन ते चार दिवसांनी जनावरांच्या पाठीवर वायुयुक्त सूज येते. त्यावर हात फिरविल्यास चर-चर आवाज येतो.  
 • काही जनावरांत पोटफुगी, बद्धकोष्ठता आणि त्यानंतर हगवण दिसून येते. आजारी जनावर जलद किंवा हळूहळू बरे होते. आजारातून बरे झालेल्या जनावरांत लुळेपणा काही दिवस राहू शकतो. तो पूर्ववत न झाल्यास जनावर कायमचे लुळे राहते.
 • शेतीकाम करणाऱ्या बैलाची तसेच वळूची कार्यक्षमता घटते. दुभत्या जनावरांचे दूध उत्पादन ५० ते ६० टक्यांपर्यंत घटते. घटलेले दूध बरे झाल्यानंतर हळूहळू दूध उत्पादन वाढत जाते पण ते पूर्वीएवढे होत नाही. 
 • काही जनावरांत कासदाह होतो. ५ ते ६ टक्के गाभण जनावरांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता असते. 

निदान 

 • आजाराचे निदान लक्षणांवरून करता येते. 
 • पक्के निदान करण्यासाठी हेप्यारीनाइज्ड रक्त नमुन्यांवर  पी.सी.आर. ही जनुकीय चाचणी, तर आजारादरम्यान आणि २ ते ३ आठवड्यांनंतर घेतलेल्या रक्ताजल नमुन्यांवर एलायझा चाचणी करतात. 

उपचार 

 • आजारावर कोणताही विशिष्ठ उपचार नाही. परंतु आजार जडल्यास पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैविके, सलाइन, कॅल्शिअम, ब जीवनसत्त्वे, ताप निवारक आणि वेदनाशामक औषधे द्यावीत.
 • औषधोपचारासह बाधित जनावरांची शुश्रूषा करणे आवश्यक असते. जमिनीवर बसून किंवा आडवे पडून असलेल्या किंवा पक्षाघात झालेल्या जनावरांना मालीश व इन्फ्रारेड उपचार उपयुक्त ठरतो.

प्रतिबंध 

 • लसीकरण हा योग्य उपाय आहे. परंतु तिवा प्रतिबंधक लस भारतात उपलब्ध नाही. म्हणून या आजाराचे वाहक असलेल्या चिलटांचा नायनाट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 
 • साचलेले पाणी, पाणथळ जागा, चिखल, तुंबलेले गटार, अस्वच्छ गोठे इत्यादी ठिकाणी कुलीकोइड्‍स चिलटांची वाढ होते. अशा ठिकाणी कीटकनाशकांची नियमित फवारणी करावी.
 • गोठा नेहमी कोरडा आणि स्वच्छ ठेवावा. गोठा आणि परिसरात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
 • आजारी जनावरास प्राधान्याने उपचार करून घ्यावेत.
   

डॉ. सुधाकर आवंडकर, ९५०३३९७९२९,

डॉ. महेश कुलकर्णी, ९४२२६५४४७०,

(पशुवैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र  विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)


इतर कृषिपूरक
कोंबडी खत : सेंद्रिय खताचा उत्तम...कोंबडी खताच्या वापरामुळे जमिनीची जलधारणा शक्ती...
शेळ्यांमध्ये रोग निदानात्मक चाचणी,...रोग संक्रमण होऊन शेळ्या आजारी पडण्याचे  ...
‘बर्ड फ्लू’बाबत जागरूक राहापक्ष्यांमध्ये अनेकदा बर्ड फ्लूचा संसर्ग...
पोल्ट्रीशेडमध्ये जैवसुरक्षा आवश्यकजैविक कारणांमध्ये रोगकारक जिवाणू, विषाणू, कवक,...
लेयर कोंबड्यांसाठी संतुलित आहारकोंबड्यांना संतुलित खाद्य नियोजन करावे. शुद्ध आणि...
शेळ्यांमधील पैदास तंत्रशेळीपालन करताना शेळीपालकांना उत्पन्न...
शेळीपालनाचे नियोजनमाझी शिंदेवाडी गावामध्ये अडीच एकर शेती आहे....
जनावरांमधील हिवाळी अतिसारहिवाळी अतिसार हा दुधाळ जनावरांच्या पचन संस्थेचा...
शेवाळ उत्पादन प्रक्रियाशेवाळाचे उत्पादन हे पोषक अन्न, औषधे, जैवइंधनासाठी...
अन्नासह विविध कारणांसाठी शेवाळ शेती शेवाळ म्हणजेच सुक्ष्म आकारापासून विविध आकारामध्ये...
शेळ्या, मेंढ्यांमधील देवी आजारदेवी आजाराच्या नियंत्रणासाठी मेंढ्यांसाठी शीप...
जनावरांच्या कातडी आजारांवरील उपचारजनावरांमध्ये विविध प्रकारचे आजार होत असतात....
जनावरांमधील क्षयरोगजनावरांमधील क्षयरोग हा एक दीर्घकालीन आजार असून,...
कॅल्शिअम कमतरतेमुळे होतो दुग्धज्वरदुग्धज्वर हा कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे प्रामुख्याने...
आरोग्यदायी अन् औषधी अळिंबीचे प्रकारलायन्स मेन मशरूम अळिंबी कच्ची (सॅलड), शिजवून,...
शेळ्यांमधील प्लेग (पीपीआर) आजारपीपीआर आजाराच्या विषाणूंचा प्रसार मुख्यतः बाधित...
स्वच्छ दूध उत्पादनासाठी उपयुक्त यंत्रणा...दुधामध्ये स्निग्धांश, प्रथिने, मेद, जीवनसत्त्वे...
अळिंबीचे विविध प्रकार जागतिक बाजारात सध्या विविध प्रकारच्या अळिंबी (...
शाश्‍वत भविष्यासाठी मृदा संवर्धनाकडे...मृदा दिन या संकल्पनेचे एक प्रमुख उद्‌गाते व...
गुणवंत मेंढी पैदाशीसाठी नर, मादीची निवडमेंढ्यांमध्ये निवड पद्धतीने करावयाच्या आनुवंशिक...