पावसाळी वातावरणातील द्राक्षबागेतील व्यवस्थापन

गेल्या आठवड्यात ठिकठिकाणी पाऊस झाला, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. या आठवड्यात पावसाची शक्यता जास्त नसली तरी ढगाळ वातावरण व काही ठिकाणी हलक्या सरी अनुभवास येतील. यामुळे बागेतील तापमानात घट झाली असून आर्द्रतेत आवश्यकतेपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
growth of grape vine
growth of grape vine

गेल्या आठवड्यात ठिकठिकाणी पाऊस झाला, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. या आठवड्यात पावसाची शक्यता जास्त नसली तरी ढगाळ वातावरण व काही ठिकाणी हलक्या सरी अनुभवास येतील. यामुळे बागेतील तापमानात घट झाली असून आर्द्रतेत आवश्यकतेपेक्षा जास्त वाढ झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत उपलब्ध खालील परिस्थितीमध्ये येणाऱ्या अडचणी व त्यावर संभाव्य उपाययोजनांची माहिती घेऊ. 

खुंट लागवड केलेली बाग फेब्रुवारी- मार्च महिन्यात खुंटाची लागवड केलेल्या व वाढही चांगली असलेल्या बागेत आता बऱ्याच फुटी वाढलेल्या दिसून येतील. या फुटींपैकी सर्वच फुटी आवश्यक नसून, उपलब्ध फुटींपैकी दोन ते तीन फुटी कलम करण्याकरिता गरजेच्या आहेत. फुटींची संख्या जास्त असलेल्या बागेत या वातावरणामुळे फुटी जोमात वाढताना दिसतील. अशा लुसलुशीत फुटीवर अळी व उडद्या या किडींचा प्रादुर्भाव दिसू शकेल. उडद्या किडीच्या प्रादुर्भावामुळे पानावर चिरा मारल्यासारखी दिसून येईल. अळीच्या प्रादुर्भावामुळे नवीन पाने कुरतडल्याप्रमाणे दिसतील. यामुळे पानांची कार्य करण्याची क्षमता कमी होईल. परिणामी काडी परिपक्व होण्यास विलंब होईल.  नुकताच रिकट झालेल्या बागेत सध्याच्या वातावरणामुळे भरपूर फुटी निघाल्या असतील. या निघालेल्या सर्वच फुटी अशाच राखल्या गेल्यास प्रत्येक फूट बारीक राहून कलम करण्यासाठी आवश्यक जाडी मिळणार नाही. या फुटींवरसुद्धा अळी व उडद्या अशा दोन्ही किडींचा प्रादुर्भाव दिसून येईल. यावर महत्त्वाची कार्यवाही म्हणजे आवश्यक असलेल्या दोन ते तीन फुटी राखून इतर फुटी काढून टाकाव्यात. निवडून ठेवलेल्या फुटी तशाच ठेवल्यास गर्दी होईल व त्या फुटीच्या डोळ्यावरून मुळी तयार होऊन जमिनीत रुतेल.  या परिस्थितीवर मात करण्याकरिता निवडलेली काडी बांबूला सुतळीच्या साह्याने बांधून घेणे. कलम करण्याकरिता जमिनीपासून वर सव्वा ते दीड फुटापर्यंत ८ ते १० मि.मी. असणे गरजेचे असते. ही जाडी मिळण्याकरिता निवडलेल्या काडीच्या तळापासून टप्प्याटप्प्याने ( १२ ते १३ दिवसांच्या अंतराने) बगलफुटी काढत राहाव्यात. दोन ते तीन वेळा या फुटी काढल्यास कलम करण्याकरिता आवश्यक ती जाडी सहज मिळेल. किडीचा प्रादुर्भावसुद्धा टाळता येईल.  

जुनी बाग  अ) जुन्या बागेत छाटणी लवकर झाली असल्यास (एप्रिल महिन्यात) 

  • या बागेत काडीच्या परिपक्वतेचा कालावधी सुरू असेल. गेल्या आठवड्यातील पावसामुळे वातावरणात झालेले बदल हे वाढीकरिता अगदी पोषक होते. परिणामी फुटींची वाढ जोमात होताना दिसून येईल. ही वाढ तशीच राहिल्यास काडी परिपक्वता लांबणीवर जाईल. काडीमध्ये तयार होत असलेले अन्नद्रव्य हे पुढील कोवळ्या फुटींमध्ये रूपांतरित होण्यास प्रवृत्त होईल. ती काडी फळछाटणीकरिता लवकर तयार होणार नाही. काडी परिपक्वतेला जास्त कालावधी लागल्यास काडीमध्ये आवश्यक तो अन्नद्रव्यांचा साठा तयार होणार नाही किंवा काडीचा ठिसूळपणा मिळणार नाही. 
  • बऱ्याचशा बागेमध्ये पावसानंतर फुटींचा जोम जास्त प्रमाणात होत असल्याचे दिसते. याकरिता त्या बागेत उपलब्ध असलेली काळी जमीन व बागायतदारांनी जास्त प्रमाणात वापरलेली नत्र, स्फुरदयुक्त खते ही कारणे असू शकतात. काडी हिरवी राहिल्यानंतर जेव्हा नवीन फूट वाढायला लागते, तेव्हा मागील काडी पाहिजे तशी सशक्त राहत नाही. अशा परिस्थितीमध्ये पुढील फुटींवर निघालेल्या कोवळ्या फुटींवर अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते. बऱ्याचशा बागेत या पानांवर किंवा फुटींवर लोह, मॅग्नेशिअम यांची कमतरता दिसून येते. यामुळे पाने पूर्ण पिवळी झालेली दिसतात. ज्या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून उघडीप आहे, अशा बागेत वाढते तापमान व आर्द्रता यामुळे उडद्या या किडीचा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. कोवळ्या फुटी तशाच राहिल्या व अचानक पाऊस झाल्यास करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता असेल.  
  • अशा परिस्थितीतील बागेत रोग कीड नियंत्रणासोबत अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी नवीन कोवळ्या फुटी काढून टाकणे आवश्यक असेल. काडी दुधाळ रंगाची झाली असलेल्या बागेत बोर्डो मिश्रण अर्धा टक्के या प्रमाणे फवारणी करता येईल. या सोबत ०-०-५० किंवा ०-५२-३४ किंवा ०-४०-३७  जमिनीतून ठिबकद्वारे एक ते सव्वा किलो प्रती एकर प्रती दिवस  याप्रमाणे १० दिवसांपर्यंत द्यावे. हीच खते फवारणीद्वारे ३ ते ४ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणे देता येतील. साधारणतः प्रति एकरी ३५० ते ४०० लिटर पाणी पूर्ण कॅनोपीवर फवारणीसाठी लागेल. 
  • ब) जुन्या बागेत उशिरा छाटणी झालेली असल्यास (मे महिना)  सध्या या बागेत सूक्ष्मघड निर्मितीचा कालावधी असेल, या कालावधीत फुटींची वाढ नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. परंतु, काही ठिकाणी पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे फुटींची वाढ जोमात होताना दिसून येईल. ही वाढ सध्या तरी थांबवणे शक्य होणार नाही. अशा परिस्थितीत या नवीन फुटींमध्ये सूक्ष्मघड निर्मितीची समस्या निर्माण होऊ शकते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध स्थितीत पुढील गोष्टी करणे महत्त्वाचे असेल. 

  • नत्रयुक्त खतांवर नियंत्रण ठेवणे ः ज्या खतांमध्ये नत्र आहे, असे खत वापरण्याचे टाळावे. त्याऐवजी स्फुरद व पालाशयुक्त उपलब्ध ग्रेडचा (०-४०-३७)  वापर करावा किंवा फक्त स्फुरदयुक्त खतांचा वापर फायद्याचा ठरू शकेल. 
  • शेंडा पिंचिंग करणे महत्त्वाचे ः सबकेनच्या बगलफुटी निघाल्यानंतर जर पानांची संख्या पूर्ण झाली असल्यास शेंडा पिंचिंग महत्त्वाचे असेल. या वेळी जर ३ ते ४ पाने काढल्यास बगलफुटी जोमात निघतील. जमिनीतून फक्त पालाश उपलब्ध असलेले खत (एसओपी) ८ ते १० किलो प्रती एकर या प्रमाणे द्यावे. 
  •  बगलफुटी वेळोवेळी काढून काडीच्या प्रत्येक डोळ्यावर सूर्यप्रकाश मिळत राहील, याकडे लक्ष द्यावे. 
  • संजीवकांचा वापर

  • बगलफुटीच्या तीन ते चार पाने अवस्थेमध्ये ६ बीएची १० पीपीएम या प्रमाणात फवारणी करावी. त्यानंतर चार ते पाच दिवसाने युरासीलची २५ पीपीएम प्रमाणे फवारणी करावी. बागेत फुटींची वाढ थांबवण्याकरिता शक्यतोवर पाणी एकदम नियंत्रणात ठेऊन पालाशची उपलब्धता फवारणीद्वारे तसेच जमिनीतून केल्यास काडीची वाढ नियंत्रणात ठेवता येईल. 
  • बऱ्याच भागात द्राक्ष बागायतदार इतर फळपिकांवर वापरण्यात येणारी वाढ विरोधकांचा (पॅक्लोब्युट्राझॉल, क्लोरमेक्वाट क्लोराईड व इथेफॉन) वापर करीत असल्याचे समजते. पॅक्लोब्युट्राझॉल वापरामुळे या वर्षी बागेत वाढ नियंत्रणात राहिली तरी पुढील वर्षी ही बाग ताणामध्ये जाऊन मृत वेलींचे प्रमाण वाढेल. असाच सतत वापर करत राहिल्यास काही वर्षांतच वेल काढावी लागण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. हे टाळण्याकरिता बागायतदारांनी या वाढ विरोधकांचा वापर टाळून बागेतील परिस्थिती समजून घेऊन खतांचा व पाण्याचा वापर संतुलित करावा. 
  • (ॲग्रोवन टीप ः कोणत्याही वाढ नियंत्रकाचा वापर करण्यापूर्वी त्याला लेबल क्लेम असल्याची खात्री करणे व एनआरसीतील संबंधित शास्त्रज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.)

    -  डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९८२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com