प्रयोगशाळांतून होईल पशू आजाराचे योग्य निदान

जनावरांचे आरोग्य अबाधित राखणे, जनावरातील आजारांचे निदान अचूक करून पशूतज्ज्ञांच्याकडून उपचार करणे महत्त्वाचे आहे. यासाठीच पशुरोग निदान प्रयोग शाळा महत्त्वाची आहे.
cow shed
cow shed

जनावरांचे आरोग्य अबाधित राखणे, जनावरातील आजारांचे निदान अचूक करून पशूतज्ज्ञांच्याकडून उपचार करणे महत्त्वाचे आहे.  यासाठीच पशुरोग निदान प्रयोग शाळा महत्त्वाची आहे. पाळीव जनावरांचा मानवी समूहाशी थेट संबंध असल्यामुळे दूध, अंडी आणि मांस इत्यादी पदार्थातून वापरलेल्या औषधांचा अंश मानवी शरीरात जात असल्यामुळे त्यांच्या शरीरात अशा औषधांचे परिणाम दिसून येतात. हे होऊ नये म्हणून आपल्या जनावरांचे योग्य निदान करूनच उपचार करावेत.औषधोपचार केल्यानंतर काही दिवस अशा जनावरांचे दूध, अंडी व मांस इत्यादी उपयोगात आणू नये. अधिक संख्येत जनावरे असणाऱ्या जनावरांच्या ठरावीक काळामध्ये आरोग्य चाचण्या महत्त्वाच्या आहेत. प्रयोगशाळेत टीबी  जे.डी., इन्फेकशियस् ब्होवाईन रीयानोट्रीकयाटीस, ब्होवईन व्हायरल डायरिया,बृसेल्लोसीस, लेपटोस्पय्रोसीस इत्यादी आजारासाठी चाचण्या केल्या जातात. या सगळ्या चाचण्या ‘ईलायझा’ (ELISA) किंवा ‘पीसीआर’ (PCR) पद्धत वापरून केल्या जातात. यात लाळया-खुरकूत आजाराचेही निदान केले  जाते. बृसेल्लोसीस 

  • जिवाणूंपासून होणारा संसर्गजन्य आजार आहे. यात ५ ते ७ महिन्याच्या गाभण काळात गर्भपात होतो. याचे जिवाणू रक्तात आहेत का याची चाचणी प्रयोग शाळेत केली जाते.
  • हा आजार जनावरांपासून मानवाला होतो.यावरील तातडीच्या उपाययोजना अतिशय महत्त्वाच्या ठरतात.
  •  दुग्धज्वर  

  • जनावर व्यायल्यानंतर शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे हा आजार होते. आजारी जनावराच्या पायाचे स्नायू थरथरतात, अंग थंड पडू लागते. जनावर झटकन खाली बसते. 
  • लक्षणे आढळून आल्यास प्रयोगशाळेत रक्तजल तपासणी करावी. या चाचणीतून शरीरात कॅल्शिअमची पातळी समजते. त्वरित पशुवैद्यकाला उपचार करता येतात.
  •    लाल लघवीचा आजार 

  • जास्त दूध देणाऱ्या म्हशी व्यायल्यानंतर प्रसूती पश्चात हा आजार होतो. 
  • रक्तात फॉस्फरसची मात्रा कमी झाल्यामुळे हा आजार दिसून येतो. रक्ताशय व डोळ्यातील आतल्या कडा पांढऱ्या होतात. 
  • लक्षणे आढळल्यास लघवी व रक्तजल नमुने पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रयोगशाळेत पाठवावे. अशी लक्षणे इतर आजारांमध्ये दिसतात. त्यामुळे नक्की कुठल्या कारणामुळे अशी लक्षणे आढळून येतात, हे प्रयोगशाळा तपासणीतून कळते. त्यानुसार उपचार करावेत. 
  • किटोसीस 

  • जनावरांची भूक कमी होते, त्यामुळे दूध उत्पादन घटते.वजन कमी होते.
  • जनावरांची नजर धूसर होते, श्वासाला गोडसर वास येऊ लागतो.
  • लक्षणे दिसताच पशुवैद्यकांचा सल्ला घेऊन जनावराच्या लघवीचा नमुना प्रयोगशाळेत पाठवावा.
  • पोषणदोषाबाबत तपासणी 

  • सेलेनियमच्या कमतरतेमुळे कोकरांना पंडू,स्नायू रोग, मॅंगेनिजमुळे होणारा   पोषणदोष.
  • लोह कमतरतेमुळे सर्व जनावरांमध्ये हेमोग्लोबिनची निर्माण क्षमता कमी होऊन रक्त कमतरता होते.
  • तांब्याच्या अभावामुळे सर्व प्रकारच्या जनावरांमधील आकुंचित रक्तपेशी, रक्त कमतरता दिसते.
  • कोबाल्टमुळे सर्व प्रकारच्या जनावरांमध्ये रक्तपेशी, रक्त कमतरता दिसते.
  • जस्ताच्या  कमतरतेमुळे डुकरांमधील त्वचा रोग दिसतो. 
  • कॅल्शिअम, फॉस्फरस आणि मॅग्नेशिअमच्या बदल झालेल्या पातळीमुळे चयापचयाचे आजार होतात.
  • आवश्यक खनिजांची तपासणी करावयासाठी पशुवैद्यकाच्या साहाय्याने रक्तजलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासावेत. 
  •  यकृत, मूत्रपिंडातील दोष ओळखण्यासाठी तपासणी 

  • यकृत आणि मूत्रपिंडातील दोष ओळखण्यासाठी प्रयोग शाळेतून एस.जी.ओ.टी., एस.जी.पी.टी. आणि युरिया, क्रियाटीनीन यासारख्या तपासण्या करून पुढील उपचार करावेत.
  • कर्करोग निदान तपासणी  

  • पहिल्या पद्धतीमध्ये स्खलित पेशींचा सूक्ष्मदर्शक यंत्रातून अभ्यास केला जातो. स्खलित पेशी एका विशिष्ट पद्धतीने रंगवून त्यातील पेशी केंद्रे आणि पेशीद्रव यांच्या तपासणीमुळे त्या पेशी कर्करोग गाठीतून निखळलेल्या पेशी आहेत का ?  याबाबत अंदाज घेतला जातो. 
  • दुसऱ्या पद्धतीत रक्तातील हार्मोन्सवरून किंवा पेशी रसायन शास्त्राच्या  आधारे काही कर्करोगाचे निदान करता येते.
  • संबंधित कर्करोग गाठीचा छोटासा तुकडा जीवपेशिबंध परीक्षातंत्र शस्त्रक्रियेने काढला जातो. त्याच्या छेदाचे सूक्ष्मदर्शक यंत्राखालून अवलोकन केले जाते. पेशी बंध तुकडा कर्करोगाच्या गाठीचा आहे की, ती गाठ म्हणजे केवळ प्रदाहप्रकियोत्तर पेशीबंध दुरुस्तीतील अति वाढ आहे हे ठरवले जाते. ती गाठ कर्करोगाचीच असल्यास पुढील तपासणीमध्ये तो कोणत्या प्रकारचा कर्करोग आहे किंवा असावा या बाबत निदान केले जाते.
  • लघवी तपासणीतून आजाराच्या चाचण्या  

  • लघवीचा नमुना प्रयोगशाळेत दिल्यास रॅपिड यूरीन टेस्ट या पद्धतीने जे घटक आढळून येतात त्याच्या प्रमाणात कमी जास्त होणारा प्रादुर्भाव जनावरांमध्ये रोखता येतो. 
  •  सामू हा ॲसिडीटी ओळखण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. प्रोटीन, ग्लुकोज, नॅट्राइस,केटोन बॉडीस, बिलीरुबीन, युरोबिलीनोजेन, लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी हे सर्व घटक लघवीत सहसा नसतात पण यातील प्रत्येक घटक लघवीत वेगवेगळ्या आजारांसाठी कारणीभूत आहे.
  • लघवीचा रंग,पातळपणा,रासायनिक रचना व सूक्ष्मयंत्राद्वारे पेशी व जिवाणू ओळखून वेगवेगळे निदान करता येते. 
  • मूत्रमार्गातील संक्रमण, रक्तस्राव, यकृत, मूत्रपिंडातील रोग, मधुमेह, रक्तातील आजार, ब्लँडर मधले मूत्रखडे, जिवाणू, बुरशी ओळखून त्वरित उपचार सुरू करावेत. 
  •     शेणाची चाचणी 

  • शेणाचे नमुने प्रयोग शाळेत दिल्यानंतर शरीरातील कृमीचे आजार ओळखता येतात.  त्यानुसार आजार ओळखून पशुवैद्यकास त्वरित उपचार करता येतात.
  •    आजाराच्या निदानासाठी शवविच्छेदन 

  • झालेला आजार संसर्गजन्य किंवा कोणतेही लक्षण दाखवत नसल्यास बाकी जनावरांना त्याचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. अशा परिस्थिती मध्ये आजाराचे योग्य निदान होत नाही. हे रोखण्यासाठी मृत जनावरांचे शव परीक्षण करून आजाराचे निदान करणे महत्त्वाचे आहे. 
  • नवीन किंवा माहिती नसलेल्या आजारामुळे जनावर दगावल्यास, शवविच्छेदनाद्वारे शरीरामधून विविध अवयव, रक्त, विष्ठा इत्यादी नमुने काढले जातात. हे नमुने शासकीय किंवा खासगी प्रयोगशाळेत पाठवून मृत्यूच्या कारणाचा शोध घेता येतो.
  • शवविच्छेदनाद्वारे आजाराचे अचूक निदान होते. योग्य ते प्रतिबंधात्मक उपचार करता येतात. त्यामुळे मरतुक कमी होते. औषधोपचारावरील खर्च सुद्धा कमी होतो.
  • कासदाह तपासणी

  • आजारामुळे दूध उत्पादन घटते. कोणतीही लक्षणे बरेचदा दिसून येत नाहीत. 
  • निदानासाठी आजारी गाय, म्हशीच्या चारही सडातील सुमारे ५ मिलि दुधाचा निर्जंतुक नमुना चार वेगवेगळ्या स्वच्छ बाटलीमध्ये गोळा करून प्रयोग शाळेत पाठवावा.  तपासणीमध्ये कोणत्या प्रकारच्या जिवाणूमुळे कासदाह झाला आणि कोणत्या प्रतिजैविकाला जिवाणू प्रतिसाद देतात याची चाचणी केली जाते.
  • चाचणीचे फायदे  

  • शरीरात नेमक्या कोणत्या रोग जंतूचा संसर्ग झाला, याचे निदान.
  • कोणत्या प्रकारच्या प्रतिजैविकाला प्रतिसाद देते, याचे निदान.
  • अनावश्यक प्रतिजैविकाचा वापर टाळता येतो.
  • अनावश्यक औषधांच्या वापरामुळे होणाऱ्या वाईट परिणाम व खर्च टाळता येतो.  
  •  - डॉ.नूपुर हलमारे, ९४२१०६८९२६ ( डॉ. हलमारे या बाएफ, उरुळीकांचन, जि.पुणे येथे वरिष्ठ संशोधन अधिकारी आहेत. डॉ.प्रतिक इंगळे पाटील हे वळुमाता प्रक्षेत्र, वडसा जि. गडचिरोली  येथे पशुधन विकास अधिकारी आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com