फायदेशीर पशुपालनाचे तंत्र

गाई,म्हशींची उत्पादकता वाढवायची असेल तर आपल्याकडे चांगली पैदास असणे आवश्यक आहे. तसेच गोठा व्यवस्थापन,आहार व्यवस्थापन, निरोगी वातावरण आणि सुधारित तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे गरजेचे आहे.
cow shed
cow shed

गाई,म्हशींची उत्पादकता वाढवायची असेल तर आपल्याकडे चांगली पैदास असणे आवश्यक आहे. तसेच गोठा व्यवस्थापन,आहार व्यवस्थापन, निरोगी वातावरण आणि सुधारित तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे गरजेचे आहे. 

गाई,म्हशींना योग्य वातावरणात ठेवले तर त्या चांगले  दूध उत्पादन देतात. आपला दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जातिवंत दुधाळ गाई,म्हशींची गरज असते. कमी दूध उत्पादन क्षमता असणारी १० जनावरे सांभाळण्यापेक्षा ४ ते ५ जनावरे जास्त दूध देणारी जनावरे सांभाळावीत. गाई,म्हशींची उत्पादकता वाढवायची असेल तर आपल्याकडे चांगली पैदास असणे आवश्यक आहे. तसेच गोठा व्यवस्थापन,आहार व्यवस्थापन, निरोगी वातावरण आणि सुधारित तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे आवश्यक आहे.  उत्पादन खर्च कमी ठेवण्यासाठी दुग्धोत्पादन व्यवसायात आधुनिक पद्धतीचा अवलंब आवश्यक आहे.

मुक्तसंचार गोठा पद्धत फायदेशीर  

  • मुक्तसंचार गोठा करत असताना गाई,म्हशींची गरज काय आहे, त्यांना आपण काय सुविधा देतो, याचा प्राधान्याने विचार करावा. 
  • जनावरांचे शेड आणि त्यापुढे ४० ते ५० फूट मोकळ्या जागेत कुंपण करून आपणास मुक्तसंचार गोठा करता येतो. सर्वसाधारणपणे एका गाईस २०० ते ३०० चौरस फूट जागा आवश्यक असते. या पैकी ३० टक्के जागेत सावली आणि ७० टक्के जागा ही सावली व्यतिरिक्त फिरण्यासाठी असावी.
  •  उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक साधनसामग्रीचा वापर करून अगदी कमी खर्चात सुद्धा आपण मुक्तसंचार गोठा करू शकतो. मुक्तसंचार गोठा मोठ्या झाडाच्या सावलीत किंवा गवताचे छप्पर , पत्र्याचे  शेड यांचा वापर करून  करता येतो. कुंपण करण्यासाठी बांबू, लाकूड, दगडाची भिंत, लोखंडी जाळी किंवा लोखंडी पाईप याचा वापर करता येतो. 
  • मुक्त संचार गोठ्यामध्ये गाई,म्हशींना बांधणे गरजेचे नसते. दररोज गोठ्यातील शेण काढायची गरज नाही. गोठ्यामध्ये पाणी पिण्याची व्यवस्था असावी. जनावरांना दररोज धुण्याची गरज नाही. मुक्त संचार गोठ्यामध्ये सकाळी चारा टाकणे, धारा काढणे आणि सायंकाळी चारा टाकणे व धारा काढणे येवढे काम राहते. यामुळे सुमारे ६० टक्के काम कमी होते. 
  • गाई,म्हशींचा मुक्त वावर, पाहिजे त्या वेळेस पाणी,चारा, ऊन, सावली आणि विश्रांती असल्यामुळे  रोग प्रतिकारशक्ती चांगली राहते. व्यायाम होत असल्याने आजाराचे प्रमाण ६० ते ८० टक्के कमी होते.
  • वेळच्या वेळी पाणी मिळत असल्यामुळे चयापचयाची प्रक्रिया चांगली होते. खाल्लेल्या चाऱ्याचे चांगले पचन होते. त्यामुळे कमी आहारात जास्त दूध उत्पादन होते. 
  •  मुक्त संचार गोठ्यात जनावर आनंदी राहते. ताणविरहित वातावरणात असल्याने व अन्न पचन चांगले झाल्याने दुधाची गुणवत्ता चांगली असते. 
  • जनावरास व्यायाम व चांगला आहार मिळतो. जनावराने दाखविलेला माज लक्षात आल्याने गाभण राहण्याचे प्रमाण वाढते.  रोग प्रतिकारशक्ती वाढल्याने जनावर जास्त दूध देते. 
  •   मुक्त संचार गोठ्यामध्ये खताचे उत्पन्न चार पटीने वाढते. कारण या खतात शेण,गोमूत्र, पालापाचोळा आणि उपयुक्त जिवाणूंचा समावेश असतो. त्यामुळे असे खत चांगल्या दर्जाचे होते.  मुक्तसंचार गोठ्यात तयार होणाऱ्या शेणखताला चांगली मागणी आहे. 
  • चांगल्या वंशावळीच्या वासरांच्या संगोपनातून आपणास उत्पन्न मिळू शकतो.  मुक्तसंचार गोठ्यात जनावरांतील गोचीड नियंत्रणासाठी कोंबड्या पाळू शकतो. यातून कोंबड्या आणि अंड्याचे अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते.   
  • संतुलित आहार 

  • पशुखाद्य तयार करत असताना प्रथिनयुक्त चारा आणि ऊर्जा युक्त चारा यांचे योग्य नियोजन आहे असे गृहीत धरून संतुलित  पशुखाद्याची निर्मिती केलेली असते.
  •  जनावरांच्या आहारात ७० टक्के एकदल म्हणजे ऊर्जायुक्त चारा आणि ३० टक्के द्विदल म्हणजे प्रथिनयुक्त चारा, त्याबरोबर पशुखाद्य, खनिजे दिली तर आपल्या जनावराला संतुलित आहार देऊ शकतो.  
  •  आपण १०० टक्के एकदल चारा आणि संतुलित पशुखाद्य, खनिजे दिली तरी आपला आहार हा संतुलित आहार होत नाही. यामुळे कमी दूध उत्पादन, कमी फॅट, एसएनएफ मिळते.  आरोग्य बिघडते.  प्रथिनयुक्त चारा नसेल तर पशुखाद्यातून जास्त प्रथिने, कमी ऊर्जा देणे आवश्यक आहे, तरच आपल्या जनावराचा आहार संतुलित होईल. 
  • जास्तीत जास्त आहार हा मिश्र स्वरूपात देणे आवश्यक आहे. एक वेळ एक चारा, दुसऱ्या वेळेला दुसरा आणि तिसऱ्या वेळेला पशुखाद्य दिल्यामुळे आहाराचे संतुलन होत नाही.
  • तापमानावर नियंत्रण 

  •  काही पशूपालक गोठ्यातील तापमान नियंत्रित करून  संकरित गाईंपासून चांगले दूध  उत्पादन घेत आहेत. फलटण परिसरातील पशुपालकांनी गोठ्यामध्ये कमी खर्चात स्वयंचलित तापमान  नियंत्रक तयार करून बसविले आहे. याचा चांगला फायदा दिसून आला आहे. यामध्ये तापमान दाखविणाऱ्या सेन्सरचा वापर करून फॉगर्सच्या माध्यमातून गाई,म्हशींच्या अंगावर पाणी फवारून तापमान नियंत्रित केले जाते. 
  • अझोला उत्पादन 

  •  दुग्धव्यवसायातील सर्वात महत्त्वाचा खर्च म्हणजे पशुखाद्य. हा खर्च मर्यादित ठेवायचा असेल तर अझोलचा वापर करावा. 
  • अझोलामध्ये २१ ते २३  टक्के प्रथिने असून अमिनो आम्ल, उपलब्ध खनिजांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हे जनावरांसाठी पौष्टिक आहे. 
  •  एका जनावरासाठी दोन किलो अझोला दररोज दिला तर २५ टक्यांपर्यंत पशुखाद्य कमी करू शकतो. 
  •  अझोला तयार करताना २ X २ मिटर  किंवा आपणास आवश्यक त्या आकाराचा वाफा तयार करून त्यात शेण,माती,पाणी, खनिज मिश्रणाच्या वापराने उत्पादन घेता येते.
  • हायड्रोपोनिक्स चारा उत्पादन  

  • ज्या ठिकाणी आपणास ओला चारा मिळणे कठीण आहे किंवा जनावरांना जास्त अन्नघटक द्यावयाचे असतात, अशा वेळी खाद्य पूरक म्हणून हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा तयार करून अडचणींवर मात करू शकतो.
  • हायड्रोपोनिक्स चारा उत्पादन युनिट योग्य खर्चात बांबू, लाकूड, पी.व्ही.सी. पाईप, लोखंडी पाईप, एस एस मध्ये तयार करू शकतो. आपणास याचे तंत्र लक्षात आले की, कमी खर्चात आणि आपल्या वातावरणाला पूरक अशा पद्धतीने चारा उत्पादन घेऊ शकतो. 
  •  सुरुवातीस १२ ते १८ तास  बियाणे पाण्यात भिजत ठेवावे. त्यानंतर असे भिजलेले बियाणे मोड येण्यासाठी एका  बारदानामध्ये बांधून उबदार जागेत सर्वसाधारणपणे ३६ तास ठेवावे.
  • मोड आलेले धान्य हायड्रोपोनिक्स चारा उत्पादन युनिट मधील ट्रेमध्ये पसरावे. त्यासाठी दररोज २ किंवा ४ तासाने पाण्याची फवारणी करावी. आठ दिवसात ट्रेमध्ये सर्वसाधारणपणे ८ ते १२ इंच उंचीचा चारा तयार होतो. 
  • व्यवस्थितपणे देखभाल घेऊन उत्पादन घेतले तर एक किलो बियाण्यापासून १० किलो हिरवा पौष्टिक चारा तयार होतो. 
  • - डॉ.एस.पी.गायकवाड,९८८१६६८०९९.

    (गोविंद मिल्क ॲन्ड मिल्क प्रॉडक्टस प्रा.लि.,फलटण,जि.सातारा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com