feed management for buffalo
feed management for buffalo

जनावरातील ताण कमी करा

दुपारच्या वेळी जनावरांना उष्णतेच्या झळा लागू नयेत यासाठी गोठ्यामध्ये गोणपाटाचे पडदे लावून त्यावर पाणी शिंपडावे. यामुळे वातावरण थंड राहण्यास मदत होते.जनावरांना पिण्याचे थंड व स्वच्छ पाणी दिवसभर मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावे.

दुपारच्या वेळी जनावरांना उष्णतेच्या झळा लागू नयेत यासाठी गोठ्यामध्ये गोणपाटाचे पडदे लावून त्यावर पाणी शिंपडावे. यामुळे वातावरण थंड राहण्यास मदत होते.जनावरांना पिण्याचे थंड व स्वच्छ पाणी दिवसभर मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावे.

सर्वसाधारणपणे जनावराच्या शरीराचे तापमान हे वय, जात, प्रजात, लिंग, वजन, उत्पादन स्थिती (गाभण काळ/दुग्धउत्पादन काळ/माजावर येणे) याचबरोबर वातावरणातील तापमान व आर्द्रता यांवर अवलंबून असते. वातावरणातील असे तापमान ज्यामध्ये जनावरे त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवून कमीत कमी ऊर्जा निर्माण करतात, त्याला ‘थर्मोन्युट्रल झोन’ असे संबोधतात. वातावरणातील ५ ते २५ अंश सेल्सिअस तापमान हे जनावरांच्या आरोग्य व उत्पादनासाठी उत्तम मानले जाते. तसेच हे तापमान जनावरांचा थर्मोन्युट्रल झोन म्हणून मानांकित केले आहे. वातावरणातील तापमान २५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास त्याचा विपरीत परिणाम जनावरांच्या आरोग्य, उत्पादकता, प्रजनन व कार्यक्षमतेवर होऊ शकतो. 

  • वातावरणातील वाढलेल्या तापमानामुळे जनावरांना त्यांच्या शरीरातील अतिरिक्त उष्णता उत्सर्जित करण्यामुळे चयापचय प्रक्रियेवर ताण येतो. जनावरांच्या शरीरात वातावरणातील जास्त उष्णता शोषल्यामुळे किंवा शरीरातून उष्णता उत्सर्जित करण्याच्या प्रक्रियेत बाधा येऊन जनावरांचे शारीरिक तापमान वाढते. त्यामुळे तापमानाचा ताण (हिट स्ट्रेस) येतो, याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. 
  • उन्हाळ्यातील तीव्र उन्हामुळे तापमानात वाढ झाल्यास जनावरांची शारीरिक सहनक्षमता कमी पडते. त्यामुळे जनावरांना जोराची धाप लागणे, शारीरिक तापमानात जास्त होणे (१०६ ते १०८ डिग्री फॅरानाईट) अशी लक्षणे दिसून येतात. अशा जनावरांवर वेळेवर उपाययोजना न केल्यास ती दगावू शकतात, यालाच उष्माघात म्हणतात. 
  • उन्हाळ्यात वातावरणातील वाढलेल्या तापमानामुळे दुधाळ गायी, म्हशी आणि बैल उष्माघातास बळी पडतात. उन्हाळ्यात उष्मा, ताण-तणावापासून प्रतिबंध करणे हा दुधाळ जनावरांच्या व्यवस्थापनातील एक महत्त्वाचा घटक आहे. 
  • अति तापमानाचा जनावरांच्या आरोग्य, दुग्धउत्पादन आणि प्रजननावर विपरीत परिणाम होतो. वाढत्या तापमानामुळे दुधाळ जनावरांचे दूध उत्पादन घटते, दुधातील स्निग्धांश व प्रथिनांचे प्रमाण कमी होऊन दुधाची गुणवत्ता ढासळते. व्यायलेली जनावरे माजावर न येणे, मुका माज किंवा गर्भधारणा न होणे अशी लक्षणे दिसून येतात. शेतीकामासाठी वापरल्या जाणाऱ्या बैलांची कार्यक्षमता कमी होऊन ते आजारी पडू शकतात. 
  • दुधाळ जनावरे कासदाह, व्यायलेल्या जनावरांमध्ये गर्भाशय दाह याचबरोबर उष्णतेच्या ताणामुळे गोचीड ताप, फुफ्फुसदाह यांसारख्या आजारांनी बाधित होण्याचे प्रमाण वाढते.
  • उष्णतेच्या ताणाने बाधित जनावरांमध्ये बद्धकोष्ठता व पोटदुखी सदृश लक्षणे आढळून येतात. त्यामध्ये सारखे उठ-बस करणे, पाय झाडणे, लघवी थेंब-थेंब करणे, घट्ट व लेंडीसदृश शेण टाकणे व मल-मूत्र विसर्जन करताना कण्हतात. 
  • दुधाळ गायी-म्हशींमध्ये वाढत्या तापमानाचा जास्त विपरीत परिणाम आढळून येतो. याउलट देशी गोवंश प्रजातीमध्ये तुलनेने कमी असतो.
  • उष्माघात, ताण-तणावाची कारणे 

  • वाढलेले तापमान व आर्द्रता.
  • गोठ्यातील कोंदट वातावरण व खेळत्या हवेचा अभाव.
  • प्रवासादरम्यान वाहनांत जनावरे दाटीवाटीने भरणे, जास्त तापमानात जनावरांची वाहतूक.
  • गर्दीच्या ठिकाणच्या गोठ्यात जनावरांचे व्यवस्थापन करणे.
  • जनावरे जास्त वेळ उन्हात बांधणे किंवा चरायला सोडणे. 
  • जनावरांना पिण्यासाठी वेळेवर पाणी उपलब्ध न होणे किंवा पिण्याच्या पाण्याची मर्यादित उपलब्धता.
  •  जनावरांना झाडांच्या सावलीत बांधल्यास दिवसांतील काही वेळ सरळ सूर्यप्रकाश अंगावर येणे.   
  • लक्षणे 

  • खाद्य व चारा खाणे कमी होते. रवंथ करण्याची क्रिया मंदावते.
  • दुधाळ जनावरांचे दूध उत्पादन व गुणवत्ता घटते. 
  • शरीराचे तापमान वाढते. श्‍वसनाचा वेग वाढणे व धापा टाकते. 
  •  तोंडातून सतत लाळ गाळते. 
  • पाणी पिण्यासाठी सतत पाण्याच्या स्त्रोताकडे जाणे. 
  • शरीरातील पाणी व क्षार कमी होऊन अशक्तपणा येतो. 
  •  चरावयास सोडलेली जनावरे सावलीमध्ये आराम करतात.
  • जास्त वेळ उभे राहतात. जनावरांच्या शरीराचे तापमान १०८ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्यास  उष्माघाताने दगावू शकतात. 
  •  तीव्र उन्हाच्या चटक्यामुळे बद्धकोष्ठता व पोटदुखीची लक्षणे दिसतात. (पाय झाडणे, उठ-बस करणे, थेंब थेंब लघवी करणे, घट्ट लेंडीसदृश शेण, मलमूत्र विसर्जन करताना कण्हतात.)
  • उपचार व प्रतिबंध 

  • गोठा व परिसराचे योग्य व्यवस्थापन करून वातावरणातील तापमान नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करणे.
  • जनावरांचे व्यवस्थापन १० ते १२ फूट उंची असलेल्या व खेळती हवा असलेल्या गोठ्यात करावे.
  • दिवसातून किमान ३ ते ४ वेळा जनावरांच्या शरीरावर थंड पाणी फवारावे. व्यावसायिक पशुपालनात गोठ्यांमध्ये फॉगर किंवा मिस्टर द्वारे जनावरांच्या अंगावर तापमान नियंत्रित करण्यासाठी ठरावीक वेळेनंतर थंड पाण्याचा शिडकावा करावा.
  • दुपारच्या वेळी जनावरांना उष्णतेच्या झळा लागू न देण्यासाठी गोठ्यामध्ये गोणपाटाचे पडदे लावून त्यावर पाणी शिंपडावे. यामुळे गोठ्यातील वातावरण थंड राहण्यास मदत होते.
  • जनावरांना सकाळी लवकर किंवा संध्याकाळी चरावयास सोडावे.
  • बैलांकडून सकाळी १० वाजेपर्यंत व सायंकाळी ४ वाजल्यानंतर मशागतीची कामे करावीत. 
  • पिण्याचे थंड व स्वच्छ पाणी दिवसभर मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावे. पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यास म्हशींना काही वेळ पाण्यात पोहण्यासाठी सोडावे.
  •  शक्य असल्यास गोठ्यामध्ये हवा खेळती राहण्यासाठी पंख्यांची सोय करावी.  मुक्त संचार गोठ्याच्या परिसरात मुबलक सावली देणारी मोठी झाडे लावावीत.
  • पत्र्याच्या गोठ्यामध्ये वरच्या बाजूला पांढरा रंग तर खालच्या बाजूला काळा रंग द्यावा. यामुळे गोठ्यातील तापमान कमी होण्यास मदत होते.
  • तसेच पत्र्यांवर शेतातील उसाचे पाचट, तुराट्या, पराटया, कडबा, गव्हाचे काढ किंवा वनस्पतींचा पालापाचोळा अंथरल्यास गोठ्यातील तापमान कमी होते. 
  • आहारात नियमित २५ ते ५० ग्रॅम मिठाचे खडे द्यावेत. जेणेकरून उन्हाळ्यात शरीराला आवश्यक क्षार उपलब्ध होतील. आहारात नियमित २५ ते ५० खनिजक्षार मिश्रण खुराकातून द्यावे.
  • दुधाळ जनावरांना उष्णतेचा ताण टाळण्यासाठी आहारात तंतुमय पदार्थ कमी प्रमाणात तर उर्जायुक्त पदार्थ जसे की कर्बोदकयुक्त खुराक जास्त प्रमाणात द्यावीत.
  • आहारात बायपास स्निग्धपदार्थ व प्रथिने यांचा पुरवठा करावा.
  • आहारात जीवनसत्त्वांचा पुरवठा करावा. विशेषकरून उष्मा ताण कमी करण्यासाठी अ जीवनसत्त्वाचा पुरवठा करावा.   
  • - डॉ.रविंद्र जाधव, ९४०४२७३७४३ (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि.लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com