Agriculture Agricultural News Marathi article regarding milch animal management. | Agrowon

दुधाळ जनावरांतील किटोसीस, दुग्धज्वरावर उपचार

डॉ. विठ्ठल धायगुडे, डॉ. भुपेश कामडी
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

दुधाळ जनावरातील चयापचय प्रक्रियेतील बिघाडामुळे किटोसीस आणि दुग्धज्वर  आजार होऊ शकतो. यामुळे दूध उत्पादनात घट होते, औषधोपचाराचा खर्च वाढतो. आजाराची कारणे लक्षात घेऊन उपचार करावेत.

दुधाळ जनावरातील चयापचय प्रक्रियेतील बिघाडामुळे किटोसीस आणि दुग्धज्वर  आजार होऊ शकतो. यामुळे दूध उत्पादनात घट होते, औषधोपचाराचा खर्च वाढतो. आजाराची कारणे लक्षात घेऊन उपचार करावेत.

दुधाळ गाई,म्हशींचे आहारांचे व्यवस्थापन योग्य नसेल, त्यांच्यावर ताण असेल किंवा व्यवस्थापनात काही त्रुटी असतील तर अशी जनावरे चयापचय प्रक्रियेतील बिघाडामुळे होणाऱ्या दुग्धज्वर आणि किटोसीस  आजार होऊ शकतो. त्यामुळे दुधाच्या उत्पादनात घट होते, औषधोपचारावर खर्च होतो. अशा जनावरांमध्ये वार न पडणे, डाऊनर्स काऊ सिंड्रोम, पोटाचा भाग सरकणे, पिशवीचा संसर्ग व कास दाहसारखे आजार होतात. त्यामुळे आर्थिक नुकसान होते. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य आहार व्यवस्थापन केले असता, तसेच दररोजच्या व्यवस्थापनातील बारीकसारीक त्रुटी टाळल्यास हे आजार होत नाहीत. 

किटोसीस

 •  जास्त दूध देणाऱ्या संकरित गायींमध्ये हा आजार दिसतो. देशी गाई आणि म्हशींमध्ये हा आजार सहसा दिसत नाही. 
 • गाभण काळात गाईला योग्य आहार न दिल्यास, तसेच गाय विल्यानंतर कर्बोदकांच्या कमतरतेमुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी होते. गरजेपुरती ऊर्जा तयार होत नाही. त्यामुळे मग चरबीपासून ऊर्जा मिळविण्याचा प्रयत्न शरीराकडून होतो. यामध्ये चरबी फॅटी ॲसिडच्या स्वरूपात यकृतात आणली जाते. त्यापासून ॲसिटेट तयार होते आणि नंतर ऊर्जा तयार केली जाते; परंतु प्रोपिओनेटची खूपच कमतरता झाल्यास  ॲसिटेटपासून किटोन बॉडीज तयार होतात, त्यांचे रक्तातील प्रमाण वाढते. त्यामुळे आम्लता वाढून किटोसीस आजाराची लक्षणे दिसतात. 
 • हा आजार व्यायल्यानंतर पहिल्या एक ते दोन आठवड्यांमध्ये पाहायला मिळतो. कधी-कधी व्यायल्यानंतर एक ते दीड महिन्यानंतरही होतो. 

   लक्षणे 

 • जनावरे चारा कमी खातात. खास करून खुराक/ खाद्य कमी प्रमाणात किंवा खातच नाही.  कमी दूध देते. 
 •  हळूहळू अशक्तपणा वाढत जातो. बरगड्या दिसायला लागतात. 
 • वेळेत औषधोपचार झाले नाहीत तर जनावर चारा खात नाही.
 • बऱ्याच वेळा मेंदूला इजा झाल्यामुळे गोल-गोल फिरणे, भिंतीला धडका मारणे इत्यादी लक्षणे जनावरांमध्ये दिसतात. 
 • जनावरांना या आजारात तापाची लक्षणे दिसत नाहीत. 
 • सुप्त स्वरूपातील आजारात कुठलीही विशेष लक्षणे दिसत नाही. दूध उत्पादन घटते. अशा स्वरूपातील आजार खूप जास्त प्रमाणात होतो. 

    प्रतिबंध व उपचार 

 • आहाराचे योग्य व्यवस्थापन केले असता हा आजार टाळता येतो.
 • शेतकऱ्यांनी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने आहार नियोजन आणि उपचार करावेत. 

दुग्धज्वर

 • या आजारास दुग्धज्वर असे म्हटले असले तरी जनावरांच्यामध्ये तापाची लक्षणे दिसत नाहीत. उलट शरीराचे तापमान नेहमीपेक्षा कमी म्हणजेच ९८ ते १०० डिग्री फॅरनहाईटपर्यंत असते. 
 • हा आजार मुख्यत्वेकरून जास्त दूध देणाऱ्या संकरित गायींमध्ये आढळून येतो; परंतु बऱ्याच वेळा देशी गाई तसेच म्हशींमध्येसुद्धा हा आजार होतो. 

कारणे 

 • गाभणकाळ आणि दुधाळ जनावरांमध्ये कॅल्शियमची वाढलेली गरज. 
 • चाऱ्यातून कमी प्रमाणात कॅल्शिअम मिळणे. 
 • जास्त दूध देणाऱ्या जनावरांमध्ये चिकाद्वारे/ दुधातून शरीरातील कॅल्शिअम कमी होणे. 
 • आहारामध्ये ऑक्‍सॅलेट्‌सयुक्त चाऱ्याचे म्हणजेच उसाचे वाढे, पेंढाचे प्रमाण जास्त असणे. 
 • ‘ड' जीवनसत्त्वाची कमतरता. 
 • जनावर विण्यापूर्वी गाभणकाळात गरजेपेक्षा जास्त कॅल्शिअम देणे. 
 • कधी-कधी शरीरात पॅराथहार्मोन्स या संप्रेरकाची कमतरता.

 कॅल्शियमचे महत्त्व 
कॅल्शिअम हे अतिशय महत्त्वाचे खनिजद्रव्य आहे. शरीरातील महत्त्वाच्या चयापचय प्रक्रियांमध्ये त्याची गरज असते. उदा. मांसपेशी व मज्जासंस्थेवर नियंत्रण ठेवणे. याची  कमतरता झाल्यास वरील प्रक्रियेमध्ये बिघाड होऊन दुग्धज्वराची लक्षणे दिसतात.
 लक्षणे 

 • आजाराच्या पहिल्या टप्प्यात जनावर सुस्त होते. चारा खाणे, दूध देणे कमी होते. 
 • डोके हलविणे, जीभ बाहेर काढणे, दात खाणे व अडखळत चालणे अशी प्रमुख लक्षणे दिसतात. ही अवस्था फार कमी काळ राहते. कधी-कधी लक्षणे तीव्र नसल्यास पशुपालकाच्या लक्षातही येत नाहीत. 
 • आजाराच्या दुसऱ्या टप्प्यात जनावर खाली बसते. बसलेल्या अवस्थेत मान एका बाजूला वळवते, शरीर थंड पडते, श्वासोच्छ्वास व नाडीच्या ठोक्‍यांची गती वाढते, नाकपुड्या कोरड्या पडतात, शेण टाकणे, लघवी करणे, रवंथ करणे बंद होते. कधी-कधी पोटफुगीही होते. दूध देणे बंद होते. 
 • तिसऱ्या टप्प्यात मात्र जनावर आडवे पडते. टोचल्यास प्रतिसाद मिळत नाही. शरीराचे तापमान कमी होते. जर उपचार योग्य वेळी झाले नाहीत तर जनावर दगावते. 

     प्रतिबंध 

 • गाभणकाळात व विण्यापूर्वी योग्य आहार द्यावा. हिरवा पालेदार चारा तसेच द्विदलवर्गीय चारापिकांचा (उदा. चवळी, लुसर्ण, दशरथ, स्टायलो) आहारात समावेश असावा. गाभणकाळात खूप जास्त प्रमाणात आणि खूप कमी प्रमाणात खुराक देऊ नये. 
 • खाद्यामध्ये साधारणतः २५ ते ५० ग्रॅम खनिज मिश्रण द्यावे. 
 • उसाचे वाढे किंवा साळीचा पेंढा जास्त प्रमाणात खाऊ घालू नये. विण्यापूर्वी साधारणतः एक आठवडा अगोदर जीवनसत्त्व 'ड'चे इंजेक्‍शन देणे फायदेशीर ठरते. 
 • जनावरांना थोडा व्यायाम दिल्यास कॅल्शियमची चयापचय प्रक्रिया क्रियाशील राहते. 

     उपचार 

 • उपचार तज्ज्ञ पशुवैद्यकाकडूनच करावा. कारण या आजारात कॅल्शियमचे इंजेक्‍शन द्यावे लागते. हे इंजेक्‍शन जर कमी प्रमाणात आणि खूप वेगाने दिले तर त्याचा हृदयावर विपरीत परिणाम होऊन जनावर दगावते, तसेच कॅल्शिअमच्या द्रावणाच्या बाटलीचे तापमानही शरीराच्या तापमानाबरोबर असणे गरजेचे असते. 
 • योग्य औषधोपचार झाल्यास जनावर ताबडतोब प्रतिसाद देते. ते उठून उभे राहते, लघवी करते तसेच शेणही टाकते, चारा खाण्यास सुरुवात करते. नाकपुड्या ओल्या होऊन शरीराचे तापमान पूर्ववत होते. 
 • या आजारांतून जनावर न उठल्यास डाउनर्स काऊ सिंड्रोम होऊ शकतो. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होतो. जनावर औषधोपचारास प्रतिसाद देत नाही, जागेवरून ते उठत नाही. 

 

- डॉ. विठ्ठल धायगुडे, ९०८२२९२३४१,  

- डॉ. भुपेश कामडी, ९३०७३८९४२५

 (क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ,जि.सातारा)

 

 

 

 

 

 

टॅग्स

इतर कृषिपूरक
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
व्यवस्थापन म्हशींच्या माजाचेदुग्ध व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी म्हशीने दर १३...
सुधारीत पद्धतीने लाव्ही पक्षीपालनजपानी लाव्ही पक्षांची खाद्याची गरज फार कमी असते....
जनावरांची रक्त तपासणी महत्त्वाची...आजार करणारे रोगजंतू जनावरांच्या शरीरामधील आंतरिक...
गोठ्यातील माश्यांचे एकात्मिक व्यवस्थापनगोठ्यात होणाऱ्या अस्वच्छतेमुळे कीटकवर्गीय...
जनावरांतील परोपजिवींचे नियंत्रण...सध्याच्या काळातील परोपजिवींच्या प्रादुर्भावामुळे...
पावसाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनपावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आर्द्रता वाढते आणि अशा...
दुधाळ जनावरांच्या आहारात कॅल्शिअम...जनावरांच्या खाद्यामध्ये विकसित होणारी बुरशी तसेच...
प्रसुती दरम्यान जनावरांची काळजीगाभण जनावरांना शेवटचे तीन आठवडे रानात तसेच डोंगर...
गाई, म्हशीमधील प्रजनन व्यवस्थापनकालवडी साधारण १२ ते १८ महिने आणि वगारी २४ ते ३६...
स्वीकारा फक्त दुग्धसमृद्धी रेतमात्राभरपूर उत्पादक पिढी देणाऱ्या रेतमात्रेचा वापर...
मजुरांशिवाय कुटुंब झाले दुग्धव्यवसायात...पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यालगत शहरीकरण वाढले...
बाजारपेठेत वाढतेय ‘चीज'ला मागणीआपल्या देशामध्ये प्रामुख्याने प्रक्रियायुक्त चीज...
लंम्पी स्कीन डिसीज आजाराचे नियंत्रणलंम्पी स्कीन डिसीज हा प्रामुख्याने गाई, बैल,...
दुग्धोत्पादनासाठी प्रजननाची पंचसूत्रीदुग्धोत्पादन हे गाई,म्हशींच्या प्रजननावर अवलंबून...
अन्न सुरक्षेेचा प्रश्न ऐरणीवर...अंतर्गत संघर्ष, हिंसा या मानवी कारणांसोबतच विविध...
जनावरांतील धर्नुवाताची लक्षणे अन्...जनावरांच्या शरीरावरील जखमांतून धर्नुवात आजाराचे...
परसबागेमध्ये वनराजा कोंबडीपालनमुक्तपद्धत, अर्धबंदिस्त पद्धत आणि, बंदिस्त...
शेळ्या- मेंढ्यांमधील आंत्रविषारमोठ्या शेळ्या-मेंढ्या तीव्रतेनुसार काही...
शेततळ्यातील मत्स्यपालन झाले उत्पन्नाचे...करडा (जि. वाशीम) येथील कृषी विज्ञान केंद्राने...