दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस शेतकऱ्यांचे नवीन तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदो
कृषिपूरक
जनावरांमधील क्षयरोग
जनावरांमधील क्षयरोग हा एक दीर्घकालीन आजार असून, त्यांच्या उत्पादकतेवर परिणाम करतो. गायी, म्हशी व शेळ्या या आजाराचे कायम वाहक व प्रसारक असतात. आजाराची लक्षणे ओळखून उपाययोजना कराव्यात.
जनावरांमधील क्षयरोग हा एक दीर्घकालीन आजार असून, त्यांच्या उत्पादकतेवर परिणाम करतो. गायी, म्हशी व शेळ्या या आजाराचे कायम वाहक व प्रसारक असतात. आजाराची लक्षणे ओळखून उपाययोजना कराव्यात.
रॉबर्ट कोच या शास्त्रज्ञाने १८८२ मध्ये सर्वप्रथम क्षयरोग जिवाणूंचा शोध लावला. जनावरांमधील क्षयरोग हा एक दीर्घकालीन आजार असून, त्यांच्या उत्पादकतेवर परिणाम करतो. हा आजार सार्वजनिक मानवी आरोग्यास मुख्य धोका आहे. हा आजार जनावरे प्रसारित असून, जनावरांपासून मनुष्यांना तसेच मनुष्यापासून जनावरांना होऊ शकतो.
क्षयरोगाचे कारण
- आजार मुख्यतः मायकोबॅक्टिरियम बोव्हीस या जिवाणूमुळे होतो. हा जिवाणू साबण, सूर्यप्रकाश, पास्चरायझेशन, फेनोलयुक्त जंतुनाशके तसेच ६० अंश सेल्सिअस तापमानास (१५ मिनिटे) संवेदनशील असतो. हा जिवाणू माती, सडके पदार्थ, शेण, थुंकी इत्यादींमध्ये दीर्घकाळ जिवंत राहू शकतो. अभेद्य पेशीभित्तिका व मंद वाढ या गुणांमुळे हे जिवाणू वातावरणात दीर्घकाळ जिवंत राहतात.
- गायी, म्हशी व शेळ्या या आजाराचे कायम वाहक व प्रसारक असतात. तसेच वराह, मांजरे, कुत्रे, घोडे आणि मेंढ्या यांमध्ये हा आजार तुरळकपणे आढळतो.
- आफ्रिकन म्हशी, गवे, हरिण, माकड, अस्वल, चिता, सिंह यांसारखे वन्य प्राणीसुद्धा या आजारास बळी पडतात आणि याचे वाहक व प्रसारक असतात.
प्रसार
जनावरांमधील क्षयरोग रोगाचे जिवाणू रोगग्रस्त जनावराचे मूत्र, शेण, दूध, व वीर्य याद्वारे उत्सर्जित होतात. श्वसनाद्वारे व दूषित खाद्यातून या रोगाचा प्रसार होतो.
निर्माण
- श्वसनाद्वारे या जिवाणूचा शरीरात प्रवेश झाल्यास हे जिवाणू थेट श्वासनलिका व फुफ्फुसामध्ये प्रवेश करतात.
- फुफ्फुसामध्ये असणाऱ्या मॅक्रोफेज नावाच्या पांढऱ्या रक्तपेशी या जिवाणूंना गिळून टाकतात. परंतु हे जिवाणू त्यांच्यातील अनेक संप्रेरके, प्रथिने, विषारी पदार्थ इत्यादींचा वापर करून जिवंत राहतात. पुनरुत्पादन करतात. पेशींचा नाश करून जिवाणू बाहेर पडतात.
- जिवाणू संसर्गाच्या १० ते १४ दिवसांनंतर, मुख्यतः लिम्फोसाइट्स या पांढऱ्या रक्तपेशीद्वारे पेशी मध्यस्थी रोग प्रतिकारकक्षमता निर्माण होते.
- लिम्फोसाइट्स पेशी लिम्फोकाइन हा पदार्थ स्रवतात व त्याद्वारे इतर पांढऱ्या रक्तपेशींना आकर्षित केले जाते. या पांढऱ्या रक्तपेशी जिवाणूंना बंदिस्त करतात, हा भाग गाठीसारखा दिसतो. क्षयरोग रोगामध्ये फुफ्फुसात अशा अनेक गाठी निर्माण होतात.
- खाद्याद्वारे जिवाणूचा शरीरात प्रवेश झाल्यास अन्ननलिका मार्गालगतच्या लीम्फग्रंथी बाधित होतात. आतड्यामध्ये गाठी निर्माण होतात.
लक्षणे
- जनावरे हळूहळू रोडावतात. वजन कमी होते.
- शारीरिक तापमानात नेहमी चढ-उतार आढळतो.
- श्वासनलिका दाह व फुफ्फुस दाह यामुळे दीर्घकाळ खोकला होतो.
- पहाटेच्या वेळी, थंड वातावरणात, थंड पाणी प्यायल्यामुळे, व्यायामामुळे श्वसनास त्रास होतो.
- कासदाह होण्याची शक्यता असते. रक्तमिश्रित हगवण लागते.
- अनियमित माज दिसून येतो. गर्भपात होऊ शकतो.
निदान
लक्षणांवरून
- नाकातील स्रावाच्या नमुन्याची प्रयोगशाळेत थेट तपासणी करावी.
- आजारी जनावरातून घेतलेल्या नमुन्यांमधून जिवाणूंचे विलगीकरण करून ओळख करावी.
- ट्यूबरक्युलिन चाचणी
- इंटरफेरॉन गॅमा चाचणी
- लिम्फोसाइट्स प्रोलीफरेशन चाचणी
- रक्तद्रव चाचणी
- जनुकीय चाचणी
प्रतिबंधात्मक उपाय
- नियमित अंतराने जनावराची क्षयरोग चाचणी करावी.
- रोगग्रस्त जनावरांना कळपातून काढून विलगीकरण करावे.
- नोंदणीकृत पशुवैद्याकडून नियमित तपासणी करून घ्यावी.
- योग्य जंतुनाशकाचा वापर करून गोठा व उपकरणे नियमितपणे निर्जंतुक करावीत.
- नवीन खरेदी केलेल्या जनावरांना कळपात घेण्यापूर्वी २ महिने विलगीकरण करावे.
- आगंतुकांना गोठ्यामध्ये थेट प्रवेश देऊ नये.
- गोठ्याचे कुंपण मजबूत असावे. जेणेकरून वन्यजीवांना दूर ठेवता येईल.
- सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिण्यास नेऊ नये.
- जैवसुरक्षेचा काटेकोरपणे अवलंब करावा.
- गाईला क्षयरोग असेल, तर वासरास वेगळे करून मिल्क रिप्लेसर किंवा पाश्चराइज्ड दूध पाजावे.
- डॉ. महेश कुलकर्णी, ९४२२६५४४७०
-डॉ. सुधाकर आवंडकर, ९५०३३९७९२९
(पशुवैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)
- 1 of 35
- ››