जनावरांमधील हिवाळी अतिसार

हिवाळी अतिसार हा दुधाळ जनावरांच्या पचन संस्थेचा तीव्र आणि अति-संसर्गजन्य आजार आहे. आजारात अतिसारासोबत दूध उत्पादनात लक्षणीय घट होते. हा आजार कळपात आल्यानंतर अत्यंत कमी वेळात जनावरांमध्ये पसरत असला तरी मृत्युदर नगण्य असतो. मात्र बाधित जनावराच्या दूध उत्पादनात लक्षणीय घट होते.
milking
milking

हिवाळी अतिसार हा दुधाळ जनावरांच्या पचन संस्थेचा तीव्र आणि अति-संसर्गजन्य आजार आहे. आजारात अतिसारासोबत दूध उत्पादनात लक्षणीय घट होते. हा आजार कळपात आल्यानंतर अत्यंत कमी वेळात जनावरांमध्ये पसरत असला तरी मृत्युदर नगण्य असतो. मात्र बाधित जनावराच्या दूध उत्पादनात लक्षणीय घट होते. 

कोरोना विषाणू कुळातील बोव्हाइन कोरोना विषाणूमुळे हिवाळी अतिसार आजार होतो असे दिसून आले आहे. हा विषाणू नवजात वासरांतील अतिसार करणाऱ्या कोरोना विषाणूशी साम्यार्ध दर्शविणारा आहे. मनुष्याच्या कोरोना विषाणू सोबत आज तरी त्याचा काही एक संबंध दिसून येत नाही. 

प्रसार 

  • वयस्क आणि दुधाळ जनावरांमध्ये दिसून येतो. नुकत्याच विलेल्या जनावरांत जास्त प्रादुर्भाव दिसतो. तरुण वासरांमध्ये आजाराचा प्रादुर्भाव होतो. 
  • प्रसार खाण्यामार्फत होतो. लक्षणे दाखविणाऱ्या किंवा लक्षण विरहित बाधित जनावराच्या विष्ठेने दूषित झालेली वैरण, खाद्य आणि पाण्यातून प्रसार होतो.  
  • बाधित जनावरांच्या श्‍वसन स्रावांमध्ये विषाणू अतिशय जास्त संख्येने उत्सर्जित होत असल्याने बंदिस्त कळपात प्रसार वाढीस कारणीभूत ठरते.
  •     अत्यंत संसर्गजन्य आजार असून, प्रक्षेत्राला भेट देणारे व्यक्ती, वाहक जनावरे आणि बाधित प्राण्यांच्या स्रावाच्या उडालेल्या आर्द्र सूक्ष्मकणांद्वारे प्रसारित होतो.
  •  विषाणू संसर्गाच्या काही दिवसांत कळपातील बाधित जनावरे लक्षणे दाखविण्यास सुरुवात करतात. कळपातील जनावरे अतिसंवेदनशील असल्यास एका आठवड्यात सर्व जनावरे बाधित होऊ शकतात. मात्र बाधा होऊन गेलेल्या जनावरांमध्ये या आजाराविरुद्ध रोगप्रतिकार शक्ती निर्माण होते. ती साधारणत: एक ते पाच वर्षे टिकू शकते.
  •  विषाणू लहान आतडे आणि कोलोनच्या भित्तिका पेशींना बाधित करतात.  त्यामुळे अतिसार आणि जुलाब होतात.
  • प्रमुख लक्षणे

  •  आजार पटकन जडतो. तीव्र अतिसार किंवा जुलाब होतात.
  •  विष्ठा पातळ, विशिष्ट वास असलेली, गडद हिरवी ते काळ्या रंगाची दिसून येते. अतिसाराआधी किंवा त्यासोबत डोळे आणि नाकांतून स्राव वाहतात. खोकला येतो. पोटात दुखते. 
  •  क्वचित प्रसंगी अतिसाराचे प्रमाण अति जास्त दिसून येते. तीव्र रक्त क्षय, निर्जलीकरण आणि दुर्बलता येते.
  •  बाधित जनावरे क्षीण होतात. त्यांची भूक मंदावते. दूध उत्पादनात २५ ते ९० टक्क्यांपर्यंत घट दिसू शकते.
  • बहुतेक जनावरांमध्ये अतिसार दोन ते तीन दिवस दिसून येतो. त्यानंतर विष्ठा सामान्य होते. एक ते दोन आठवड्यांमध्ये कळपातील जनावर ठीक होतात. मात्र दूध उत्पादन सामान्य होण्यास कित्येक आठवडे किंवा महिने लागू शकतात.   
  • निदान

  •  लक्षणांवरून प्राथमिक निदान होते. सौम्य प्रकारात लक्षणे दुर्लक्षित राहू शकतात.
  •  नियमित पक्क्या निदानासाठी रक्तद्रव्य चाचण्या करतात. आजारी जनावराचे रक्तद्रव्य आजारादरम्यान आणि त्यानंतर आठ आठवड्यांनी तपासले जाते.
  • प्रयोगशाळेत विषाणूंचे विलगीकरण करून ओळख पटवून पक्के निदान करता येते.
  •  जनुकीय चाचण्या आणि विश्‍लेषणाद्वारे पक्के निदान करता येते.
  •  अपचन, विषाणूजन्य अतिसार, आन्त्रविषाक्तता, आंत्रविषार, कोक्सिडिओसिस इत्यादी समान लक्षणे असलेल्या आजारांपासून वेगळे निदान करावे लागते.
  • उपचार 

  •  आजारावर विशिष्ट उपचार उपलब्ध नाही. 
  •  पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनात सहायक उपचार केला जातो.
  •  ताप-दाह निवारक औषध, सलाइन, जीवनसत्त्वे इत्यादी उपचार केले जातात.
  • जनावरांना नेहमी स्वच्छ आणि नितळ पाणी द्यावे.
  •  पचणारे खाद्य द्यावे. योग्य मात्रेत क्षार मिश्रण द्यावे.
  • प्रतिबंध

  • आजाराच्या प्रतिबंधासाठी (श्‍वान आणि मांजर सोडून) लस उपलब्ध नाही.
  • नवीन जनावरे कमीत कमी दोन आठवडे इतर निरोगी जनावरांपासून लांब विलगीकरणात ठेवावी. 
  • नवीन जनावरे विकत घेताना आजार मुक्त असतील याची खात्री करावी.  वैरण, पाणी, गव्हाण इत्यादी दूषित होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. दूषित वैरण आणि पाण्याची योग्य विल्हेवाट लावावी.
  •  बाधित जनावरे कळपातून वेगळी काढावीत. त्यांना तातडीने उपचार करावेत. 
  • प्रक्षेत्रावर जैव सुरक्षेची काटेकोर अंमलबजावणी करावी.
  • - डॉ. सुधाकर आवंडकर,   ९५०३३९७९२९ - डॉ. महेश कुलकर्णी,   ९४२२६५४४७० (पशुवैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com