दुधाळ गायींमधील लंगडेपणावर उपाय

खुरांच्या समस्या हे लंगडेपणाचे प्रमुख कारण आहे. लंगडेपणा हा वेदनादायक असल्याने गायी, म्हशी चारा खाणे कमी करतात. दूध उत्पादन कमी होते, प्रजोत्पादन कमी होते. हे लक्षात घेऊन पहिल्यापासूनच जनावरांचे गोट्यातील व्यवस्थापन, आरोग्य नियोजनावर भर द्यावा.
cow shed
cow shed

खुरांच्या समस्या हे लंगडेपणाचे प्रमुख कारण आहे. लंगडेपणा हा वेदनादायक असल्याने गायी, म्हशी चारा खाणे कमी करतात. दूध उत्पादन कमी होते, प्रजोत्पादन कमी होते. हे लक्षात घेऊन पहिल्यापासूनच जनावरांचे गोट्यातील व्यवस्थापन, आरोग्य नियोजनावर भर द्यावा.

गाई, म्हशींमधील लंगडेपणामुळे आरोग्य, उत्पादनावर परिणाम होतो. लंगडेपणामुळे हालचाल करण्यामध्ये अडथळा येतो.   खुरांच्या समस्या हे लंगडेपणाचे प्रमुख कारण आहे.  ओलसर काँक्रीट जमिनीच्या तळभागाशी जनावरांचा सतत संपर्क आल्यास खुरांच्या जखमा आणि संसर्गजन्य रोगांचा धोका वाढतो.

  •   जनावरांच्या गोठ्याच्या जागेचा पृष्ठभाग असमतल आणि कडक, अपुरा आणि अस्वच्छ असेल तर जनावरे जास्त वेळ बसून, राहण्याऐवजी उभी राहण्यात जास्त वेळ घालवतात. यामुळे शरीरावरील ताण वाढतो, जनावरे आहार कमी घेतात, चयापचयाचे आजार होतात. तसेच लंगडेपणाची समस्या उद्‍भवण्याची शक्यता वाढते. दूध उत्पादनात घट येते.
  •   गोठ्याचा आराखडा आणि बांधकाम योग्य नसेल, गोठ्यात जनावरांना अपुरी जागा असेल आणि गायी किंवा कालवडी यांचा काँक्रीट पृष्ठभागाशी अधिक संपर्क येत असल्यास अशी जनावरे लंगडेपणासाठी अधिक संवेदनक्षम असतात. 
  •   पायाचा लंगडेपणा हा सर्वसाधारणपणे मागच्या पायात आणि विशेषतः बाहेरील खुरांत होतो. लंगडेपणा हा गोठ्याचा अशास्त्रीय आराखडा व खराब बांधणी यामुळे पायाला होणाऱ्या हानीमुळे आणि विण्याच्या वेळी होणाऱ्या जखमेमुळे होतो. 
  • लंगडेपणासंबंधी जोखमीचे घटक 

  •  खुरांची विकृती, खुरे योग्य प्रकारे न कापणे. कडक,ओल्या आणि खडबडीत पृष्ठभागावर जास्त वेळ उभे राहणे.
  •  गोठ्यातील अस्वच्छता, गोठ्यात बिछाना नसणे.
  • खाद्यामध्ये अधिक धान्य खाऊ घातल्यास पोटामध्ये आम्लता तयार होणे. खाद्यामध्ये अपुऱ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ असणे.
  • दूध देणाऱ्या गायींच्या खाद्यामध्ये अपुऱ्या प्रमाणात जीवनसत्त्वे आणि क्षार असणे.
  •  कमी जागेत जास्त जनावरे ठेवणे
  • लंगडेपणाची कारणे    दुधाळ गायीला किण्वनशील कर्बोदके जसे की बारीक भरडलेली ज्वारी, मका, गहू तसेच दीड इंचांपेक्षा लहान लांबीची हिरव्या चाऱ्याची कुट्टी जास्त प्रमाणात खाऊ घातल्यास किण्वन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात लॅक्टिक आम्ल तयार होते. यामुळे पोटातील सामू कमी होतो. यामुळे ग्राम नेगेटिव्ह बॅक्टरिया मरतात आणि सूक्ष्मजीव उत्पादित विष तयार होते. जनावरांच्या पोटात हिस्टामाईनचे स्रवण होते. ज्यामुळे रक्तवाहिन्याचे प्रसारण होऊन त्यांची पारगम्यता वाढते आणि रक्तदाब कमी होतो. यामुळे खुरांच्या पटलांना कमी रक्तप्रवाह मिळतो, पटलांना इजा होते. शेवटी पटलांना सूज येते आणि लंगडेपणा येतो.  लंगडेपणाच्या प्रतिबंधासाठी व्यवस्थापन  

    गोठा व्यवस्थापन 

  •  खुरांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि भरघोस दूध उत्पादनासाठी दुधाळ गायी-म्हशींना दिवसात कमीत कमी १२ ते १४ तास आराम पाहिजे. दुधाळ गायींना जास्तीत जास्त आराम मिळण्याकरिता मुक्तसंचार गोठा असावा.
  • गोठ्यात जनावरांची गर्दी टाळण्यासाठी त्यांना पुरेशी जागा मिळावी.       
  • गोठ्यातील आच्छादित तसेच मोकळ्या जागेचा व दुग्धशाळेचा भूभाग हा घसरडा नसावा. समतल परंतु पाण्याचा योग्य निचरा होणे आवश्यक आहे.
  • जनावरांना गोठ्यातून मोकळ्या आवारात किंवा दुग्धशाळेत प्रवेश किंवा निकास या दोन्ही ठिकाणी जाण्याकरिता वापरात येणाऱ्या चढा-उतार असलेल्या जागेचा भूभाग घसरडा नसावा.  
  • गोठ्यात जनावरे बसण्याच्या भूभागावर मऊ अच्छादन असावे. याकरिता ६ ते ८ इंच जाडीचा बिछाना वाळू, लाकडी भुसा, वाळलेले गवत, तांदळाचे तूस, रबरी चटई इत्यादीचा वापर करता येऊ शकतो. 
  • दुधाळ जनावरांच्या बिछान्याकरिता वाळू हे सर्वोत्तम आच्छादन साहित्य आहे, त्यावर जंतूची वाढ होत नाही, कृत्रिमरीत्या खडके फोडून तयार झालेल्या वाळूपेक्षा नैसर्गिक वाळू जनावरांच्या बिछान्यासाठी वापरायला पाहिजे कारण वाळूमध्ये गोलाकार खडे असतात, जे जनावरांसाठी खूप आरामदायी असतात. वाळूच्या कणांचा आकार हा .०.१ ते १ मिलीमीटर एवढा असावा.
  • खुरांचे व्यवस्थापन 

  • खुरांची वाढ नियमितपणे होत असते. प्रमाणाबाहेर वाढलेली खुरे नियमित अंतराने कापावीत.
  • लंगडेपणामध्ये मागच्या पायाच्या खुरांपेक्षा पुढच्या पायांच्या खुरांकडे अधिक लक्ष द्यावे लागते. ज्या गायीमध्ये नियमित अंतराने खुरे कापलेली आहेत, त्यामध्ये खुरे न कापलेल्या गायींच्या तुलनेत लंगडेपणाचा प्रादुर्भाव कमी आहे.
  • दुधाळ गायी-म्हशींची खुरे वर्षातून कमीत कमी दोनदा आणि विण्यापूर्वी ४ ते ६ आठवडे कापायला हवीत. 
  • खुरांचे आरोग्य सुस्थितीत राहण्यासाठी तसेच गोठ्यातील गायी-म्हशींची इतर रोगजंतूंचा गोठ्यात प्रवेश  होण्यापासून प्रतिबंध होणे तसेच गोठ्याची जैवसुरक्षा अबाधित ठेवण्याकरिता गोठ्यात फूट बाथ असावा.
  • असा असावा फूटबाथ  

  • खुरांच्या काही समस्यांसाठी जसे की - डिजिटल डरम्याटायटिस, सोल अल्सर, हिल इरोझन याकरिता फूटबाथ परिणामकारक आहे.
  •    गोठ्यातील सर्व जनावरांसाठी आठवड्यातून किमान दोन वेळा फूटबाथचा वापर करावा.
  •    फूटबाथची लांबी ६ ते ९ फूट, तळाला ३ फूट रुंद, आणि खोली ६-१० इंच असावी. 
  •    काँक्रीट फूटबाथ, प्लॅस्टिकचे हलविण्यायोग्य फुटबाथ, लोखंडी फूट बाथ हे फूट बाथचे प्रकार आहेत.
  •    डेअरी फार्मवरील फूटबाथचा वापर हा फूटबाथमधून चालणे, फूटबाथमध्ये थांबणे आणि पोर्टेबल सिस्टीम पद्धतीने केला जातो.
  • फूटबाथचा वापर करताना  

  • फूटबाथचा पृष्ठभाग घसरडा नसावा. 
  • संसर्ग होऊ नये म्हणून फूटबाथच्या सभोवतालची जागा स्वच्छ ठेवावी. पाण्याचा नळ जवळ असावा.  
  • फूटबाथची खोली पुरेशी असावी. जेणेकरून खुरे चांगल्या प्रकारे फूटबाथमध्ये भिजतील.
  •  फूटबाथची खोली कमीत कमी ४ इंच आणि लांबी २ ते ४ मीटर असावी. 
  •  फूटबाथ नियमितपणे स्वच्छ करावा. 
  •  फूटबाथसाठी फॉर्मेलिन (४%), कॉपर सल्फेट (५%), झिंक सल्फेट (५%) आणि प्रतिजैविकांचा वापर करता येऊ शकतो. मात्र ज्या गायींना खुरांच्या उघड्या जखमा आहेत त्यांना फॉर्मेलिन फूटबाथ देऊ नये. ज्या वेळेस प्रतिजैविके फूटबाथ म्हणून वापरतात तेव्हा सर्वांत चांगले प्रतिजैविक एरिथ्रोमायसिनचा (३५ मिलिग्रॅम प्रति लिटर) वापर करावा.    
  • - डॉ. गिरीश पंचभाई, ९७३०६३०१२२  

      (पशुउत्पादन व व्यवस्थापन विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com