Agriculture Agricultural News Marathi article regarding milk fever in milch animals. | Page 2 ||| Agrowon

कॅल्शिअम कमतरतेमुळे होतो दुग्धज्वर

डॉ. रवींद्र जाधव
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

दुग्धज्वर हा कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे प्रामुख्याने जास्त दूध उत्पादन देणाऱ्या संकरित गाई व म्हशींमध्ये आढळून येणारा महत्त्वाचा आजार आहे. साधारणपणे व्यायल्यानंतर पहिल्या ७२ तासांपर्यंत हा जास्त प्रमाणात आढळून येतो. लक्षणे ओळखून तातडीने उपाययोजना कराव्यात.

दुग्धज्वर हा कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे प्रामुख्याने जास्त दूध उत्पादन देणाऱ्या संकरित गाई व म्हशींमध्ये आढळून येणारा महत्त्वाचा आजार आहे. साधारणपणे व्यायल्यानंतर पहिल्या ७२ तासांपर्यंत हा जास्त प्रमाणात आढळून येतो. लक्षणे ओळखून तातडीने उपाययोजना कराव्यात.

दुधाळ गायी-म्हशींमध्ये आहारातील पोषणतत्त्वांच्या कमतरतेमुळे होणारे विविध उत्पादकतेशी निगडित आजार आढळून येतात.  आहारात ऊर्जेच्या कमतरतेमुळे होणारा किटन बाधा (किटोसिस), कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे होणारा दुग्धज्वर (मिल्क फीवर) आणि स्फुरद कमतरतेमुळे होणारा लाल मूत्र आजार (पोस्ट-पार्च्युरियंट हिमोग्लोबिन युरिया) दिसून येतो. या आजारांमुळे बाधित जनावरांचे दुग्ध उत्पादन घटते, औषधोपचारावर मोठा खर्च होतो. आजारातून सावरलेल्या जनावरांत प्रजननाशी निगडित व्याधी जडून अजून आर्थिक नुकसान होते. गाभण काळातील शेवटचा टप्पा व व्यायल्यानंतर जास्त दूध उत्पादनाचा काळ यामध्ये दुधाळ जनावरांची निगा, आरोग्य, आहार व व्यवस्थापन योग्यप्रकारे करून उत्पादकतेशी निगडित आजार टाळता येतात व एकूणच होणारे आर्थिक नुकसान टाळता येते.

दुग्धज्वर आजाराची कारणे 

 • कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे प्रामुख्याने जास्त दूध उत्पादन देणाऱ्या संकरित गाई व म्हशींमध्ये आढळून येणारा महत्त्वाचा आजार आहे. 
 • आजाराचा प्रादुर्भाव साधारणपणे व्यायल्यानंतर पहिल्या ७२ तासांपर्यंत जास्त प्रमाणात आढळून येतो. 
 • उच्च दूध उत्पादकता असणाऱ्या संकरित गाईमध्ये या आजाराचे प्रमाण ५ ते ७ टक्के एवढे आढळून येते. जवळपास ५० टक्के गायींमध्ये सुप्त प्रकारचा दुग्धज्वर आढळून येतो. 
 • साधारणपणे ५ ते १० वर्षे वयोगटातील तिसऱ्या ते सातव्या वितामधील गायींमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळून येतो. विदेशी गायींच्या प्रजातीमध्ये या आजाराचा सर्वांत जास्त प्रादुर्भाव जर्सी गोवंशामध्ये आढळतो तर म्हशींमध्ये या आजारावर विशिष्ट असा अभ्यास न झाल्यामुळे म्हशींच्या विविध प्रजातीची या आजारास बळी पडण्याची माहिती उपलब्ध नाही. 
 • दुग्धज्वर हा आजार दृश्य (ज्यामध्ये आजाराची लक्षणे दिसून येतात) व सुप्त (ज्यामध्ये आजाराची लक्षणे दिसत नाहीत) प्रकार आढळून येतात.
 • आजारी गायी-म्हशींमध्ये अवघड प्रसूती, मायांग बाहेर येणे, झार अडकणे, स्तनदाह, कितन बाधा, पोट सरकणे, प्रतिकारशक्ती कमी होणे यांसारख्या समस्या दिसतात. यामुळे आर्थिक नुकसान होते. 
 • व्यायलेल्या जनावरांत चिकामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शिअम श्रवल्यामुळे रक्तातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होते. हे प्रमाण हाडांतून रक्तामध्ये सोडण्यात येणाऱ्या कॅल्शिअमच्या प्रमाणापेक्षा जास्त असल्याने रक्तातील कॅल्शिअम कमी होते. अशा जनावरांना दुग्धज्वर हा आजार होतो. 
 • सर्वसाधारणपणे १० किलो चीक देणाऱ्या गायीच्या शरीरातून जवळपास २३ ग्रॅम कॅल्शिअम चिकामध्ये श्रवले जाते जे एकूण रक्तात असणाऱ्या कॅल्शिअमच्या ९ पट जास्त असते. म्हणून अशावेळी रक्तातील कॅल्शिअम कमी होते. जनावरे दुग्धज्वर आजारास बळी पडतात. 

प्रतिबंध 

 •  विण्यापूर्वी २-३ दिवस व व्यायल्यानंतर ३ दिवस दुधाळ जनावर निरीक्षणाखाली ठेवल्यास पशुपालकाला आजाराचे निदान तत्काळ करून वेळेतच पशुवैद्यकाकडून उपचार करून घेता येतील. 
 • भाकड काळातील २ ते ३ आठवड्यांत आहारातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी ठेवल्यास हाडांतून कॅल्शिअम रक्तात वहनाचे कार्य सुरळीत राहते. त्यामुळे व्यायल्यानंतर चिकामध्ये कॅल्शिअम स्रवले तरीसुद्धा हाडातील कॅल्शिअम रक्तात निरंतर येत राहिल्याने अशी जनावरे दुग्धज्वर आजारास बळी पडत नाहीत. 
 • अमोनिअम क्लोराईड, कॅल्शिअम क्लोराईड, कॅल्शिअम सल्फेट, मॅग्नेशिअम सल्फेट इत्यादी घटक पोटातील आम्लता वाढवून हाडातील कॅल्शिअम रक्तामध्ये स्रवण्याचे कार्य निरंतर ठेवून जास्त उत्पादकता असलेल्या गायी-म्हशींना दुग्धज्वर आजारापासून वाचविण्यासाठी मदत करतात. साधारणपणे विण्यापूर्वी १५ ते २१ दिवस जर हे घटक आहारातून दिले तर हा आजार होत नाही. 
 • विण्यापूर्वी शेवटच्या आठवड्यात ‘ड’ जीवनसत्त्व १० मिलियन युनिट स्नायूमध्ये किंवा विण्यापूर्वी दररोज ५ दिवस २० मिलियन युनिट ‘ड’ जीवनसत्त्व पाजल्यास या आजारास बळी पडण्याचे प्रमाण एकदम कमी होते.
 • विण्यापूर्वी २४ तास व व्यायल्यानंतर ४८ तासांपर्यंत ३०० ग्रॅम कॅल्शिअम जेल दररोज पाजल्यास दुधाळ जनावरांत दुग्धज्वर आजार टाळता येतो. 

लक्षणे
गायी-म्हशींमध्ये दुग्धज्वर आजाराची लक्षणे ही प्रामुख्याने तीन टप्प्यांत दिसून येतात. 
पहिला टप्पा 

 • ही अवस्था थोड्या वेळासाठी दिसते. आजारी जनावरामध्ये हालचाल वाढलेली आढळून येते, डोके व पायांची हालचाल करणे, थरथर कापणे, तोंडातून लाळ गळणे अशी लक्षणे दिसून येतात. 
 • खाणे मंदावते, जनावर एका जागी उभे राहते,  दात खाते व जीभ बाहेर काढते. हा टप्पा अतिशय छोटा असल्याने बऱ्याचदा  पशुपालाकास माहिती होत नाही. 

दुसरा टप्पा 

 • आजाराच्या दुसऱ्या टप्प्यात जनावर पोटावर बसते व सुस्त होते, मान पोटाकडे वळवून बसून राहते, उठता येत नाही, नाकपुड्या कोरड्या पडतात, शरीर थंड पडते व शरीराचे तापमान कमी होते (९७-१०१ अंश फॅरनहाइट). 
 •  ओटी पोटाची हालचाल कमी झाल्यामुळे पोट फुगते, गुदद्वार ढिले पडते, डोळे सुकतात व डोळ्यांची हालचाल मंदावते. 
 •  शेवटच्या टप्प्यातील गाभण जनावरांत प्रामुख्याने म्हशीमध्ये कॅल्शिअम कमी होऊन मायांग बाहेर येते. गाभण जनावरांत विण्याच्या काळात हा आजार झाल्यास, गर्भाशयाची हालचाल मंदावल्यामुळे गाय व नवजात वासरू यांच्या सर्व  बाबी योग्य असूनही नैसर्गिक प्रसूती होत नाही. अशा गायींना कॅल्शिअम सलाईन दिल्यास रक्तातील कॅल्शिअमचे योग्य प्रमाण होते व गायी नैसर्गिक प्रसूतीसाठी सक्षम बनते.

तिसरा टप्पा 

 • दुसऱ्या टप्प्यात योग्य उपचार न झाल्यास जनावर या आजाराच्या तिसऱ्या टप्प्यात जाते. यामध्ये जनावर आडवे पडते व सर्व अंग सैल पडते, गुदद्वार बाहेर येते, जनावर बेसावध असते, शरीराचे तापमान अजून कमी होते, हृदयाचे ठोके क्षीण होऊन वाढलेले आढळतात. 
 • तिसऱ्या टप्प्यातील आजाराच्या या अवस्थेत तत्काळ उपचार न मिळाल्यास अशी जनावरे दगावू शकतात. 

निदान आणि उपचार 

 • आजाराचे निदान व्यायल्यानंतर पहिले ७२ तास व लक्षणे यावरून सहजपणे लावता येतो. याशिवाय आजारी जनावराचे रक्तजल नमुने प्रयोगशाळेत तपासल्यास कॅल्शिअमचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून येते. 
 • निरोगी जनावरांच्या रक्तामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण ८-१२ मिलिग्रॅम/डेसीलिटर एवढे असते. दुग्धज्वर आजारात ते कमी होते. 
 • हा आजार अचानकपणे उद्‍भवणारा असून त्याचा कालावधी छोटा असतो, त्यामुळे तत्काळ उपचार करून घेणे आवश्यक असते. फक्त कॅल्शिअम किंवा कॅल्शिअम बरोबर मॅग्नेशिअम, स्फुरद व ग्लुकोज अशी दोन प्रकारची सलाईन दुग्धज्वर आजाराच्या उपचारासाठी उपलब्ध आहेत. पशुवैद्यकाकडून दुग्धज्वर ग्रासित गायी-म्हशींचा उपचार करून घेतल्यास तत्काळ रक्तातील कॅल्शिअमचे प्रमाण ८-१२ मिलिग्रॅम/डेसीलिटर एवढे वाढते. आजाराची सर्व लक्षणे तत्काळ नाहीशी होतात.
 • कॅल्शिअमचे सलाईन बाकीच्या इतर सलाईनसारखे जास्त वेगाने दिले तर हृदयाचे ठोके जास्त प्रमाणात वाढून जनावर उपचारादरम्यान दगावू शकते म्हणून या आजाराचा उपचार पशुवैद्यकाकडूनच करून घेण्यात यावा. 
 • उपचार झाल्यानंतर तत्काळ आडवे पडलेले किंवा बसलेले जनावर उठून उभे राहते, नाकपुडीवर पाणी सुटते, जनावर लघवी करते. लगेच चारा खाण्यास व रवंथ करण्यास सुरुवात करते. त्यानंतर दूध उत्पादन लक्षात घेऊन आहारात नियमितपणे योग्य प्रमाणात कॅल्शिअम पुरवठा केल्यास दुधाळ जनावरे या आजारास परत बळी पडत नाहीत. 

- डॉ. रवींद्र जाधव, ९४०४२७३७४३
(चिकित्सालयीन पशुवैद्यकीय औषधशास्त्र, न्यायशास्त्र व नीतिशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)


इतर कृषिपूरक
उन्हाळ्यातील ब्रॉयलर कोंबड्यांचे संगोपनवाढते तापमान आणि शारीरिक बदलांशी लढणारी...
लकवा आजारावर ब्राह्मी, वेखंड उपयुक्त लकवा  किंवा पॅरेलिसिस या आजारात अवयवांचे...
उष्ण वातावरणात टिकणारी बेरारी शेळी बेरारी शेळी रंगाने फिक्कट ते गडद तपकिरी असून,...
जनावरांमधील पायाचा वातया आजारामध्ये जनावरात तात्पुरते अपंगत्व म्हणजेच...
कुक्कुटपालनामधील जैवसुरक्षा महत्त्वाची...कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांचे विषाणू, जिवाणू तसेच...
श्‍वसनसंस्थेच्या आजारावर अडुळसा, तुळस...मानवाप्रमाणेच जनावरांना देखील श्‍वसनसंस्थेचे आजार...
निरोगी पशुधनासाठी शुद्ध, निर्जंतुक पाणीदुधाळ प्राण्यांचे आहारातील गवत आणि अन्य...
अखाद्य वस्तूंमुळे जनावरांना होणारे अपाय जनावरांना होणारे सर्वसामान्य संसर्गजन्य आजार हे...
कासदाह तपासणीसाठी विविध चाचण्याकासदाहामुळे दुधाळ जनावराचे सड निकामी किंवा खराब...
कासदाहावर हळद, करंज, निर्गुडी उपयुक्तगाय, म्हैस, शेळी, मेंढी या प्राण्यांमधील सर्वांत...
कॉर्डिसेप्स अळिंबी उत्पादनाचे तंत्रकोर्डिसेप्स अळिंबी ही परोपजीवी बुरशी असून ती...
शेतकरी नियोजन : पशूपालनआम्ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दूध व्यवसाय...
आसडीवर वनस्पतिजन्य तेल फायदेशीर...जनावरांना होणाऱ्या जखमेवर तत्काळ उपचार नाही केले...
वेळेवर उपचार करा, कासदाह टाळाकासदाह बाधित जनावरांना पशुवैद्यकाच्या सह्याने...
त्वचाविकारावर कडुलिंब, करंज उपयुक्तसंक्रमित त्वचा विकाराच्या आजारांमुळे हे...
अळिंबी उत्पादनामध्ये मोठ्या संधीभारतामध्ये अळिंबीचे विविध प्रकार उत्पादित केले...
कुक्कुटपालनाचे नियोजनकरार पद्धतीने कुक्कुटपालन करत असल्याने...
जनावरांतील गर्भाशयाचा दाहगर्भाशयाचा दाह हा विशेषतः दुधाळ व कमी...
प्रतिजैविकांचा योग्य वापर महत्त्वाचा...प्रतिजैविकांच्या अनावश्‍यक वापरामुळे...
जनावरांना उन्हाळ्यात द्या ऊर्जायुक्त...उन्हाळ्यामध्ये वाढलेल्या तापमानाचा जनावरांचे...