शास्त्रीय पद्धतीने मियावाकी जंगल निर्मिती

जपानमधील अकिरा मियावाकी या वनस्पती शास्त्रज्ञाने जंगल निर्मितीची नवी पद्धत विकसित केली. सध्या मियावाकी पद्धतीनुसार अनेक देशांमध्ये स्थानिक, देशी वृक्षांच्या रोपांची निवड करून यशस्वीरीत्या जंगल निर्मिती केली जात आहे.
miyawaki forest
miyawaki forest

जपानमधील अकिरा मियावाकी या वनस्पती शास्त्रज्ञाने जंगल निर्मितीची नवी पद्धत विकसित केली. सध्या मियावाकी पद्धतीनुसार अनेक देशांमध्ये स्थानिक, देशी वृक्षांच्या रोपांची निवड करून यशस्वीरीत्या जंगल निर्मिती केली जात आहे. या पद्धतीचे मूळ जपानी असले तरी रचना संपूर्णपणे स्थानिक आणि देशी जैवविविधतेला अनुसरून करणे महत्त्वाचे आहे.

जपानमधील वनस्पती शास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांनी कमी जागेत व कमी वेळेत उत्तम जंगल निर्माण करण्याची मियावाकी ही पद्धत १९७० मध्ये विकसित केली. अकिरा हे योकोहामा राष्ट्रीय विद्यापीठामध्ये जंगलाच्या परिस्थितीचा अभ्यास करत होते. अभ्यासातून त्यांना असे लक्षात आले की, देशातील ६४ टक्के क्षेत्रावरील देशी वृक्षांचे जंगल विविध कारणांमुळे नाहिसे झाले आहे. यावर उपाय म्हणून त्यांनी देशी झाडांच्या बियांची साठवण (बियाणे बॅंक) करून रोपवाटिका तयार केली. सहकाऱ्यांसोबत जंगल निर्मितीचे प्रयोग सुरू केले. काही वर्षांच्या प्रयत्नातून त्यांनी कोणत्याही ठिकाणी जंगल उभारणीची यशस्वी पद्धत विकसित केली. लोकसहभागातून त्यांनी जपानमध्ये १३०० पेक्षा जास्त ठिकाणी मियावाकी जंगलाची उभारणी केली. त्यामुळे हरित क्षेत्र वाढण्यास मदत झाली. या अनोख्या जंगल निर्मिती पद्धतीस जगभरात मियावाकी जंगल असे ओळखले जाऊ लागले. अकिरा मियावाकी यांचे  वय ९२ असून त्यांच्या कार्यास “अशाही प्राईज” व “ब्लू प्लानेट प्राईज” अशा नामांकित पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.   आज देशभरामध्ये अनेक ठिकाणी निसर्गप्रेमी मियावाकी या जंगलांची निर्मिती करत आहेत. पारंपारिक वृक्षलागवडीस ही एक यशस्वी पर्यायी पद्धत मिळाली आहे. परंतू या जंगल निर्मितीस काही कारणांमुळे निसर्ग अभ्यासकांचा आक्षेप आहे. त्यांचे मुद्दे असे आहेत की, मियावाकी जंगलाची चुकीच्या ठिकाणी लागवड, लागवडीसाठी योग्य झाडांची निवड होत नाही, ही जपानी पद्धत आहे, आणि हे जंगल नैसर्गिक जंगलाची जागा घेऊ शकत नाही. यातील काही मुद्दे नक्कीच महत्त्वाचे आहेत. या मुद्यांचा विचार करून मियावाकी पद्धतीने जंगल निर्मिती करताना काही शास्त्रीय मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे. मियावाकी जंगल निर्मितीतील शास्त्रीय मुद्दे  जागेची निवड  

  • मोकळे डोंगर, माळरान, गवताळ प्रदेश, पाणथळ प्रदेश असलेली जागा या प्रकल्पासाठी निवडू नये. कारण त्या ठिकाणी अनेक प्राणी, पक्षी, साप, सरडे, बेडूक, कीटक अशा देशी प्रजातींचा नैसर्गिक अधिवास आणि परिसंस्था असण्याची शक्यता आहे. देशी प्रजातींच्या आधिवासातील बदल हा त्यांच्या संख्येत व इतर परिसंस्थेमध्ये बदल करतो. हा बदल हानिकारक होऊ शकतो.
  • शेत जमीन, घराशेजारी, सोसायटीमध्ये, एमआयडीसी मधील कारखान्यांचा मोकळा परिसर,  शाळा- कॉलेज व विद्यापीठांचे आवार, महानगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मोकळ्या जागा तसेच विविध देवस्थानच्या आवारातील मोकळ्या जागांवर मियावाकी जंगलाची उभारणी करणे योग्य राहील.
  • प्रकल्पाची जागा निवडताना त्या ठिकाणच्या जैवविविधतेचा अभ्यास आणि निसर्ग तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.  
  •  मियावाकी जंगलाच्या लागवडीनंतर जैवविविधतेतील अनेक घटक जसे कीटक, पक्षी, प्राणी, साप, सरडे, मुंग्या, कोळी आणि सूक्ष्मजीव या जंगलासोबत एकरूप होण्यास सुरुवात करतात. कालांतराने या जंगलाचे रूपांतर एका उत्तम जंगल  परिसंस्थेत होते. स्थानिक निसर्गास मदत होते. तसेच या जंगलाची कार्बन साठवून ठेवण्यासाठीही मदत होते.
  •  झाडांची निवड 

  • मियावाकी प्रकल्पाची जागा आणि आसपासच्या परिसरातील जैवविविधतेचा अभ्यास करावा.
  • प्रकल्पासाठी स्थानिक झाडांची रोपे उपलब्ध करावीत. विदेशी झाडांच्या रोपांची या प्रकल्पात लागवड करू नये.
  • स्थानिक जैवविविधतेला मदत होईल अशा     देशी झाडांची निवड करावी.
  • मियावाकी जंगल निर्मितीचे टप्पे जैवविविधता सर्वेक्षण

  • प्राणी व वनस्पतीशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांच्याकडून प्रकल्पाच्या जागेचे जैवविविधता सर्वेक्षण करावे. मातीची तपासणी करून घ्यावी. निसर्ग तज्ज्ञांच्याकडून प्रकल्पाची जागा निश्चित करावी.
  • देशी झाडांची निवड 

  • जैवविविधता सर्वेक्षणातून देशी झाडांची यादी तयार करावी. प्रकल्पासाठी लागणाऱ्या झाडांची निवड करून रोपांची उपलब्धता करावी.  
  • जमिनीची मशागत आणि आखणी 

  • प्रकल्पाच्या जागेची योग्य आकारात आखणीकरून एक मीटर खोल जमीन खोदून घ्यावी. माती परीक्षणाच्या अहवालानुसार खोदलेल्या मातीमध्ये शेणखत, गांडूळखत मिसळून माती पसरून घ्यावी.
  • रोपांची लागवड 

  •  १० मीटर X १० मीटर क्षेत्राच्या जागेत एकूण ३०० रोपांची लागवड करता येते. निवड केलेल्या जागेत १ मीटर  X १ मीटर आकाराचे चौरस आखून घ्यावेत. एका चौकोनात दीड फूट अंतराने एकूण तीन रोपांची लागवड करावी. लागवडीसाठी एक वर्षाची रोपे निवडावीत.
  • जंगल प्रकल्पासाठी कमीत कमी एक गुंठा क्षेत्र असावे.
  • रोपांना आधार 

  • रोपांना बांबू काठीचा आधार द्यावा. जमिनीवर भात पिंजाराचे आच्छादन करावे.  
  • व्यवस्थापन

  • लागवडीपासून पुढील दोन वर्ष रोपांच्या गरजेनुसार नियमित पाणी देणे आवश्यक असते. तसेच लागवडीनंतर या जंगलातील जैवविविधतेच्या नोंदी ठेवण्यास सुरुवात करावी.
  • बत्तीस शिराळा येथील प्रकल्प मियावाकी पद्धतीनुसार अनेक देशांमध्ये स्थानिक, देशी वृक्षांच्या रोपांची निवड करावी. रचना संपूर्णपणे स्थानिक व देशी जैवविविधतेला अनुसरून करणे फायदेशीर ठरते.

  • संस्थेने बत्तीस शिराळा (जि. सांगली) गावामध्ये डॉ. नितीन जाधव आणि डॉ. कृष्णा जाधव यांच्या सहकार्याने जुलै, २०१९ मध्ये मियावाकी जंगलाची उभारणी केली.एकूण ८००० चौरस फूट क्षेत्रात ६०० पेक्षा जास्त रोपांची लागवड केली आहे. जुलै, २०१९ मध्ये जंगलातील रोपांची उंची २ ते ३ फूट होती. एक वर्षानंतर रोपांची उंची १३ ते १५ फूट झाली आहे. आता जंगल घनदाट होत आहे.  
  • या ठिकाणी मियावाकी जंगल क्षेत्रात ५२ देशी प्रजातींची ५४० रोपांची लागवड आहे.  फळबाग क्षेत्रात २२ प्रजातीची फळझाडे आणि फुलपाखरू उद्यानात फुलांच्या १८ प्रजातीची लागवड आहे.
  • या प्रकल्पात पिंपळ, उंबर, वड या फायकस प्रजाती आहेत. जांभूळ, रायजांभूळ, करंज, आंबा, फणस या वन्य फळे देणाऱ्या प्रजाती;  ताम्हण, कांचन, बहावा, पळस, काटेसावर या वन्य फुले असणाऱ्या प्रजाती; तसेच बेहडा, हिरडा, रिठा, आवळा, कडुनिंब आणि कढीपत्ता या औषधी वनस्पतींची लागवड आहे.
  • जंगल निर्मितीसाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर. कोणतेही रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर नाही. या जंगलातून मिळणारे सर्व उत्पादन सेंद्रिय आणि नैसर्गिक असणार आहे.
  • जैवविविधतेची नोंद

  • गेल्या वर्षभरात जंगलामध्ये ४१ प्रजातीचे पक्षी, २ प्रजातीचे सस्तन प्राणी, ४ सरपटणारे प्राणी, ११ उभयचर प्राणी तसेच फुलपाखरांच्या ३४ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे.
  • पक्षी ः  गुलाबी फिंच, लाहोरी, बदामी घुबड, पिंगळा, मोर, लांडोर, होला, बुलबूल, साळुंखी, इत्यादी.
  • सरपटणारे प्राणी ः  धामण, कवड्या, डुरक्या घोणस, हरणटोळ सर्प.
  • फुलपाखरे ः  कॉमन रोझ, टेल्ड जे, कॉमन जाजबेल.
  • - आकाश पाटील: ९४२०४४९१११,

    - प्रणव महाजन: ९६५७४९३१६१ (लेखक बत्तीस शिराळा,जि.सांगली येथील प्लॅनेट अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com