कृषी सलग्न व्यवसायासाठी ‘मुद्रा’

मुद्रा योजनेत तीन प्रकारआहेत. शिशू कर्ज,रक्कम रु.५०,००/- पर्यन्त, किशोर कर्ज रु.५०,०००/- पेक्षा जास्त ते रु. ५ लाखापर्यंत आणि तरुण कर्ज हे ५ लाखापेक्षा जास्त ते १० लाखापर्यंत.त्यामुळे हे मुद्रा कर्ज फायद्याचे आहे.
cow shed
cow shed

मुद्रा योजनेत तीन प्रकार आहेत.  शिशू कर्ज,रक्कम रु.५०,००/- पर्यन्त, किशोर कर्ज रु.५०,०००/- पेक्षा जास्त ते रु. ५ लाखापर्यंत आणि तरुण कर्ज हे ५ लाखापेक्षा जास्त ते १० लाखापर्यंत.त्यामुळे हे मुद्रा कर्ज  फायद्याचे आहे.

राम आणि शाम यांची बँकेतच भेट झाली. बँक अधिकाऱ्यांची वाट  पाहत थांबलेले असताना दोघामध्ये सहज बोलणे सुरू झाले. दोघांचीही स्थिती जवळपास एकसारखीच. शामने पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर काही काळ नोकरी शोधण्याची धडपड केल्यानंतर त्यांनी शेतीत लक्ष घातले होते. शाम गेली वर्षभर शेती करत होता. शेतीमध्ये प्रथमच ठिबकसारख्या सुधारणा करत त्याने जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी कुक्कुटपालनाची मांसल (ब्रॉयलर) आणि अंडी उत्पादन (पुलेट फार्म) अशी दोन प्रशिक्षणेही घेतली होती. बँकेत कर्जाविषयी विचारणा केला असता ब्रॉयलर फार्मसाठी त्रिपक्षीय कराराला प्राधान्य असल्याचे समजले. त्यांच्या सांगण्यानुसार त्याने एक दिवसाची  पिल्ले, खाद्य, औषधे आणि विक्रीची शाश्वती यासाठी एका कंपनीशी करार केला. त्याप्रमाणे ६००० पक्ष्यांचा प्रकल्प तयार करून बँकेस सादर केला.   रामनेही त्याची कहाणी स्पष्ट केली. रामचे शिक्षण होते बारावीपर्यंत. पाच वर्षापासून शेती करताना त्याने दुग्धोत्पादनाचा व्यवसाय सुरू केला होता. सुरुवातीला त्यांच्याकडे चार संकरीत गायी होत्या. मात्र, गेल्या वर्षापासून या गायी कमी केल्या. अलिकडे त्याचा गोठा रिकामाच होता. त्याला देशी गायींचा व्यवसाय करायचा होता. त्यासाठी देशी गायी संगोपनाचे प्रशिक्षण घेतले आहे. या देशी दूधाच्या विक्रिची सोय करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने तयार केलेल्या प्रकल्पानुसार पहिल्या टप्प्यात बँकेनेही ६ देशी गायींसाठी कर्ज द्यायचे मान्य केले होते.    दोघांचे संभाषण सुरू असतानाच बँकेचे शाखा अधिकारी व कृषी अधिकारी आले. त्यांनी या दोघांना एकत्र केबिनमध्ये बोलावले. शाखा अधिकारी म्हणाले, “तुमच्या दोघांचीही प्रकरणे मुद्रा योजनेअंतर्गत मंजूर केली आहेत. मुद्रा योजनेत कृषी सलग्न प्रकल्प समाविष्ट केले असून, त्यामध्ये तुमचे प्रकल्प येतात. आम्हा बॅंकानाही मुद्रा योजनेअंतर्गत उद्दीष्ट पूर्ण करायचे आहे. “ दोघांना कर्ज मंजूर झाल्याचा आनंद झाला तरी त्यांच्या बोलण्यातील मुद्रा हे काय प्रकरण आहे, ते कळले नव्हते. मग धाडस करून शामने शंका उपस्थित केली. तो म्हणाला, “ मुद्रा योजनेत आम्हाला काय फायदा? या योजनेत व बँकेच्या कर्ज योजनेत काय फरक आहे? ”      त्यावर बॅंकेच्या कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्टिकरण दिले. ते म्हणाले की, मुद्रा योजनेत तीन प्रकार आहेत.  शिशू कर्ज,रक्कम रु.५०,००/- पर्यन्त, किशोर कर्ज रु.५०,०००/- पेक्षा जास्त ते रु. ५ लाखापर्यंत आणि तरुण कर्ज हे ५ लाखापेक्षा जास्त ते १० लाखापर्यंत. तुम्हा दोघांची कर्जे तरुण या प्रकारात मोडतात. यामध्ये स्वतःचे भांडवल लागते ते केवळ १५%. तसेच ज्या प्रकल्पासाठी कर्ज घेतले आहे, तेच तारण राहते. बॅंकेच्या अन्य कर्जासाठी स्वतःचे भांडवल लागते ते २५ टक्क्यांपर्यंत आणि तारणही वेगळी प्रॉपर्टी ठेवावी लागते. त्यामुळे हे मुद्रा कर्ज तुमच्यासाठीही फायद्याचे आहे. मुद्रा योजनेसाठी आमच्या शाखेला उद्दिष्ट दिले आहे आणि तुमची दोन्ही प्रकरणे या योजनेत बसतात. त्यामुळे तुमची प्रकरणे या योजनेखाली घेत आहोत.’’ राम आणि शाम दोघांनाही हे ऐकून समाधान वाटले. शाखा अधिकारी यांनी पुढे सांगितले, ``उद्या आपल्या शाखेमार्फत कर्ज वाटपाचा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयात होणार आहे. बँकेचे वरिष्ठ अधिकारी व जिल्हा अधिकारी यांचे हस्ते विविध योजनेखाली जी प्रकरणे मंजूर झाली आहेत, त्यांना कर्ज वाटप, कर्ज मंजुरीचे पत्र दिले जाणार आहे. तुम्ही दोघांनी उद्या यायचे आहे.’’        दुसऱ्या दिवशी बँकेनेआयोजित केलेल्या कर्ज मेळाव्यात दोघांनाही जिल्हा अधिकारी यांच्या हस्ते कर्ज मंजुरीची पत्रे मिळाली. 

प्रधान मंत्री मुद्रा योजना  उद्देश   ज्यांच्याजवळ पुरेसे भांडवल नाही, अशा व्यक्तींना उद्योग किंवा व्यवसाय उभा करण्यासाठी  किंवा आहे त्या व्यवसायात वाढ करण्यासाठी कर्ज पुरवठा करणे. मुद्रा योजना कोणासाठी ?

  • ग्रामीण व शहरी भागातील छोटे व्यावसायिक, प्रोप्रायटर किंवा भागीदारी, उत्पादक फर्म, लहान दुकानदार, भाजी विक्रेते, ट्रक चालक, खाद्य पदार्थ सेवा देणारे, विविध वस्तू दुरुस्त करणारे, यंत्र चालक, लघू उद्योग, बलुतेदार, अन्न व खाद्य पदार्थ बनविणारे इ.
  • कृषी पूरक व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, मधुमक्षिका पालन, कुक्कुट पालन, पशूपालन, दुग्ध व्यवसाय, अॅग्रो क्लिनिक, अॅग्री बिझिनेस सेंटर,अन्न व कृषी प्रक्रिया इ. 
  • साखळी (फ्रंचायजी) व्यवसाय, वितरक (डिलर), किरकोळ व्यापारी, वाहतूक चालक, विविध कंपन्यांना सेवा पुरवठा करणारे इ. 
  • या सर्वांना त्यांच्या  चालू व्यवसायात वाढीसाठी किंवा नवीन व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला जातो.
  • कशा प्रकारे व किती कर्ज मिळू शकते ? मुदत कर्ज आणि / किंवा खेळते भांडवल जास्तीत जास्त रु. १० लाख.

    कर्जाचे तीन प्रकार  

  • शिशू  : रु. ५०,००० पर्यंत,
  •  किशोर  : रु. ५०,००० पेक्षा जास्त  व रु. ५ लाख पर्यंत ,
  •  तरुण  : रु. ५ लाखांपेक्षा जास्त व रु. १० लाख पर्यंत. 
  • कर्जदाराची स्वत:ची रक्कम / भांडवल :

  • शिशू     काही नाही 
  •  किशोर     १५%
  • तरुण     १५% 
  • परतफेड 

  • अल्प मुदतीसाठी ( Demand Loan) :  कमाल ३६ महिने.
  •  मुदतीचे कर्ज ( Term Loan) : कमाल ८४ महिने.
  • तारण  

  • कर्जातून निर्माण झालेले  (Assets) बँकेकडे तारण, इतर कोणतेही अतिरिक्त तारण ( Collateral Security) लागत नाही.
  • व्याज दर : रिजर्व बँक ऑफ इंडिया / बँक यांच्या नियमानुसार.  
  • - अनिल महादार, ८८०६००२०२२ ,  (निवृत्त सहायक महाप्रबंधक, बॅंक ऑफ इंडिया)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com