धिंगरी अळिंबीचे उत्पादन तंत्र

धिंगरी आळिंबी ही कमी खर्चात चांगला आर्थिक फायदा मिळवून देते. धिंगरी अळिंबीच्या रंग, रूप, आकारमान व तापमानाची अनुकूलता यानुसार विविध जाती विकसित करण्यात आलेल्या आहेत.
mushroom production
mushroom production

धिंगरी आळिंबी ही कमी खर्चात चांगला आर्थिक फायदा मिळवून देते. धिंगरी अळिंबीच्या रंग, रूप, आकारमान व तापमानाची अनुकूलता यानुसार विविध जाती विकसित करण्यात आलेल्या आहेत. 

धिंगरी अळिंबीमध्ये (मशरूम) अनेक पौष्टिक आणि औषधी गुणधर्म असतात. आधुनिक पद्धतीने अळिंबी लागवड केल्यास आर्थिकदृष्टया फायदेशीर ठरू शकते. अत्यंत कमी भांडवलाची गुंतवणूक करून धिंगरी अळिंबीची लागवड करता येते. गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी धिंगरी अळिंबीच्या जाती, लागवड पद्धत, पिकाची निगा, काढणी, प्रतवारी आणि पॅकिंग या बाबी महत्त्वाच्या आहेत.  आपल्याकडे बटण आणि धिंगरी (ऑयस्टर) आळिंबाचे उत्पादन घेतले जाते.  बटण आळिंबीच्या लागवडीसाठी जास्त खर्च येतो. तर धिंगरी ही कमी खर्चात चांगला आर्थिक फायदा मिळवून देते. धिंगरी आळिंबीच्या रंग, रूप, आकारमान व तापमानाची अनुकूलता यानुसार विविध जाती विकसित करण्यात आलेल्या  आहेत. 

जागेची निवड  आळिंबी उत्पादनासाठी ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण होईल अशा निवाऱ्याची गरज असते. पक्के किंवा कच्चे बांधकाम असलेली खोली किंवा शेड असावी. जागेमध्ये तीव्र सूर्यप्रकाश येणार नाही आणि हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.

लागवडीसाठी माध्यम  अळिंबी लागवडीसाठी पिष्टमय पदार्थ अधिक असणाऱ्या घटकांची आवश्यकता असते. शेतातील पिकांचे अवशेष, भात पेंढा, गव्हाचे काड, ज्वारी, बाजरी, मका यांची ताटे , कपाशी, सोयाबीन, तूर काड्या, उसाचे पाचट, नारळ झावळ्या, केळीची पाने, भुईमूग शेंगांची टरफले, वाळलेले गवत व पालापाचोळा इत्यादी घटकांचा  वापर करता येतो.

लागवडीसाठी वातावरण 

  • आळिंबीसाठी २२ ते ३० अंश सेल्सिअस तापमान आणि ६५ ते ९०   टक्के आर्द्रतेची आवश्‍यकता असते. 
  •  लागवडीच्या ठिकाणाचे तापमान आणि आर्द्रतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जमिनीवर, हवेत तसेच चोहोबाजूंनी गोणपाटाचे आवरण लावून त्यावर स्प्रे पंपाने पाणी फवारण्याची व्यवस्था करावी. 
  • सर्वसाधारणपणे २५ अंश सेल्सिअस तापमानास धिंगरी आळिंबीची उत्तम वाढ होते. 
  • लागवड पद्धत 

  • काडाचे २ ते ३ सेंमी लांबीचे बारीक तुकडे पोत्यामध्ये भरून थंड पाण्यात ८ ते १० तास बुडवून भिजत ठेवावेत. काडाचे पोते थंड पाण्यातून काढून त्यातील जादा पाण्याचा निचरा करावा.
  • काडाचे निर्जंतुकीकरण  आळिंबी उत्पादन प्रकल्पाचे यश प्रामुख्याने काडाच्या निर्जंतुक करण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असते. 

    उष्णजल प्रक्रिया  भिजलेल्या काडाचे पोते ८० अंश सेल्सिअस तापमानाच्या गरम पाण्यात एक तास बुडवावे. त्यानंतर पाण्याचा निचरा होण्यासाठी पोते सावलीत तिवईवर ठेवावे.

    उष्ण बाष्प प्रक्रिया  या प्रक्रियेमध्ये बॉयलरच्या साहाय्याने पाण्याची वाफ तयार करण्यात येते. ही उष्ण वाफ (८० अंश सेल्सिअस तापमान) एका बंद खोलीत ओल्या काडामध्ये १ तास सोडली जाते. जास्तीची वाफ बाहेर जाण्यासाठी खोलीच्या वरील बाजूला एक व्हेंटीलेटर ठेवण्यात येतो.

    अ‍ॅटोक्लेव्हिंग प्रक्रिया 

  • ही प्रक्रिया करण्यासाठी विविध आकारमानाचे अ‍ॅटोक्लेव्ह उपलब्ध आहेत. प्रकल्पाच्या क्षमतेनुसार अ‍ॅटोक्लेव्ह निवडून त्यामध्ये ओल्या काडाची पोती भरावीत.  विजेवर चालणाऱ्या स्वयंचलित यंत्रामध्ये बाष्प १५ पौड दाबाला १५ मिनिटे ठेवावे. त्यानंतर अ‍ॅटोक्लेव्ह बंद करून थंड केला जातो. साधारण अर्ध्या तासानंतर काड बाहेर काढून थंड होऊ द्यावे.
  •  ही पद्धत खर्चीक असली तरी यामध्ये काड पूर्णपणे निर्जंतुक होतात. त्यामुळे आळिंबीच्या वाढीच्या काळात हानिकारक जीवजंतूचा प्रादुर्भाव होत नाही.
  •   रासायनिक प्रक्रिया 

  • ही कमी खर्चाची व सोपी पद्धत आहे. मात्र याद्वारे काड प्रक्रिया करण्यास जास्त वेळ लागतो, तसेच आळिंबी वाढीच्या काळात अन्य जिवाणूची वाढ होण्याची शक्यता असते. 
  •  या पद्धतीमध्ये पाण्याच्या हौदात किंवा ड्रममध्ये १०० लिटर पाण्यात ७.५ ग्रॅम कार्बेन्डाझीम अधिक १२५ मिलि फॉर्मेलीन मिसळतात.
  • वाळलेल्या काडाचे तुकडे पोत्यात भरून पाण्याच्या द्रावणात १६ ते १८ तास भिजत ठेवावे. त्यानंतर पोती बाहेर काढून जास्त पाण्याचा निचरा करावा.
  • लागवडीसाठी जाती

    महाराष्ट्रात प्लुरोटस साजोर काजू, प्लुरोटस इओस, प्लुरोटस फ्लोरिडा आणि प्लुरोटस ऑस्ट्रीट्स या जाती प्रचलित आहेत. महाराष्ट्रात धिंगरी आळिंबीस अनुकूल हवामान असून वर्षभर लागवड करता येते. प्लुरोट्स साजोर काजू 

  • आळिंबी करड्या रंगाची असून तापमान व आर्द्रतेच्या बदलास प्रतिकारक्षम आहे. 
  • चांगल्या वाढीसाठी २० ते ३० अंश सेल्सिअस  तापमान आणि ८० ते ९० टक्के आर्द्रतेची आवश्यकता असते. 
  • आळिंबी शिंपल्याच्या आकाराची, आकर्षक  असल्याने चांगली मागणी असते. 
  • प्लुरोट्स इओस

  • आळिंबी गुलाबी रंगाची असते.
  • २० ते २५ अंश सेल्सिअस तापमान व ६५ ते ९० टक्के आर्द्रता असलेल्या वातावरणात चांगली वाढते.
  • गुच्छ स्वरूपात बेडवर तयार होते.
  • फळे शिजवल्यानंतर थोडी रबरासारखी वाटतात.
  • प्लुरोटस फ्लोरिड

  • अळिंबीचा रंग पांढरा शुभ्र असतो. 
  • आळिंबी काढणीस उशीर झाल्यास मऊ पडून नंतर काळसर होते. 
  • बेडवर आळिंबी फळे गुच्छ पद्धतीने उगवते. आकाराने मोठी असतात. 
  • प्लुरोट्स ऑस्ट्रीटस

  • आळिंबी अंकुर अवस्थेत निळ्या रंगाची दिसते. नंतर हा रंग फिक्कट होत जातो. 
  • आळिंबी गुच्छ पद्धतीने बेडवर येत असल्यामुळे उत्पादन चांगले मिळते. 
  • चवीला उत्तम असल्याने बाजारात चांगली मागणी आहे.
  • काढणी

  • आळिंबीच्या कडा आत वळण्यापूर्वी काढणी करावी. लहान, मोठी सर्व आळिंबी एकाच वेळी काढून घ्यावी. आळिंबीच्या देठाला धरून पिरगळून काढणी करावी.
  • पहिली काढणी पिशवी भरल्यापासून २० ते २५ दिवसांत करावी. काढणीपूर्वी १ दिवस अगोदर आळिंबीवर पाणी फवारू नये. यामुळे आळिंबी कोरडी व तजेलदार राहते.  
  • दुसरे पीक घेण्यापूर्वी, त्याच बेडवर हलका हात फिरवून कुजलेल्या व मोकळ्या झालेल्या काडाचा पातळ थर अलगद काढावा. दिवसातून २ ते ३ वेळा नियमितपणे पाणी फवारावे. त्यानंतर ८ ते १० दिवसांनी दुसरे पीक व पुढील ८ ते १० दिवसांनी तिसरे पीक तयार होते. 
  • साधारणपणे ३ किलो ओल्या काडाच्या (१ किलो वाळलेले काड) एका बेडपासून ५० ते ६० दिवसांत ०.८ ते ०.९ किलो ताज्या अळिंबीचे उत्पादन मिळते.
  • साठवणूक

  • ताजी आळिंबी पालेभाजीप्रमाणे अल्पकाळ टिकणारी व नाशवंत असते. काढणीनंतर काडी कचरा बाजूला काढून स्वच्छ केलेली आळिंबी छिद्रे पाडलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये दोन दिवस आणि फ्रीजमध्ये ३ ते ४ दिवस टिकते.
  • ताज्या आळिंबीस बाजारपेठ नसल्यास आळिंबी उन्हामध्ये वाळवावी. आळिंबी उन्हामध्ये दोन ते तीन दिवसांत पूर्णपणे वाळते. वाळलेली आळिंबी हवाबंद प्लॅस्टिक पिशवीमध्ये सहा महिन्यापेक्षा अधिक काळ चांगल्या स्थितीत राहते. वाळलेल्या आळिंबीचे वजन ओल्या आळिंबीच्या तुलनेत १/१० इतके कमी होते.  
  • -  रुपेशकुमार चौधरी, ९४०३२४१६८४ (वनस्पती रोगशास्त्र विभाग, केवळरामजी हरडे कृषि महाविद्यालय, चामोर्शी जि.गडचिरोली)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com