दुधी अळिंबी लागवड तंत्रज्ञान

दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्जंतुकीकरण आवश्‍यक आहे. लागवडीसाठी पक्क्या इमारतीपेक्षा गवत, प्लॅस्टिक कागद किंवा तत्सम साधन सामुग्रीपासून बनविलेल्या कच्च्या शेड किंवा झोपडीचा वापर करावा.
mushroom production
mushroom production

दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्जंतुकीकरण आवश्‍यक आहे. लागवडीसाठी पक्क्या इमारतीपेक्षा गवत, प्लॅस्टिक कागद किंवा तत्सम साधन सामुग्रीपासून बनविलेल्या कच्च्या शेड किंवा झोपडीचा वापर करावा.

दुधी अळिंबी ही उष्णकटीबंधीय आणि उप-उष्णकटीबंधीय भागात लागवडीसाठी योग्य अळिंबी आहे. उच्च जैविक उत्पादन क्षमता, उत्तम गुणवत्ता, साधी लागवड प्रक्रिया आणि पांढरा आकर्षक रंग या गुणधर्मामुळे ही अधिक लोकप्रिय आहे. या अळिंबीच्या वाढीसाठी २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान आणि ८० ते ९० टक्के आर्द्रता आवश्‍यक असते. दुधासारखा पांढरा असल्याने या अळिंबीला ‘दुधी अळिंबी’ म्हटले जाते. अळिंबीचा देठ लांब व फळाचा आकार मोठा असतो. या अळिंबीच्या उत्पादनाची पद्धत बटन अळिंबीपेक्षा वेगळी आहे. यामध्ये काही बाबी धिंगरी व बटन अळिंबीच्या उत्पादन पद्धतीसारख्या आहेत. 

  •   शास्त्रीय नाव ः कॅलोसायाबी इंडिका (Calocybe indica)
  •   मराठी नाव ः दुधी अळिंबी किंवा स्वेथा अळिंबी
  • आहारातील महत्त्व 

  •   अळिंबीमध्ये प्रथिने १७.६९ टक्के, स्निग्ध पदार्थ ४.१ टक्के, तंतुमय पदार्थ ३.४ टक्के व पिष्टमय पदार्थ ६४.२६ टक्के असतात.
  •   पोटॅशिअम, सोडिअम, फॉस्फरस, लोह, कॅल्शिअम ही खनिजे आणि जीवनसत्त्व बी-१२, ई, सी अधिक प्रमाणात. 
  •   अळिंबीच्या सेवनामुळे विविध आजारातून लवकर बरे होण्यास मदत होते. आजारी व्यक्ती अधिक लवकर तंदुरुस्त होते. 
  • सुधारित लागवड पद्धत

  •   लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्जंतुकीकरण आवश्‍यक.
  •   लागवडीसाठी पक्क्या इमारतीपेक्षा गवत, प्लॅस्टिक कागद किंवा तत्सम साधन सामुग्रीपासून बनविलेल्या कच्च्या शेड किंवा झोपडीचा वापर करावा. 
  • अळिंबीची बुरशी मिसळणे (स्पॉनिंग)  

  •   निर्जंतुक केलेल्या काडातील जास्तीचे पाणी पूर्ण निथळून घेतले जाते. त्यानंतर या काडात अळिंबीचे बियाणे (स्पॉन) मिसळून ते प्लॅस्टिकच्या पिशवीत भरले जाते, यास ‘स्पॉनिंग’ असे म्हणतात. 
  •   ३० बाय ४५ सें.मी. किंवा गरजेनुसार आकाराच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या घ्याव्यात. या पिशव्या ५ टक्के फॉरमॅलीन च्या द्रावणात निर्जंतुक कराव्यात.
  •   पिशवी भरताना तळाला प्रथम थोडे अळिंबी बियाणे टाकावे. त्यानंतर ५ ते ६ सें.मी. जाडीचा निर्जंतुक केलेल्या काडाचा थर आणि त्यावर पुन्हा स्पॉनचा थर द्यावा. 
  •   अशा प्रकारे समान प्रमाणात ५ ते ६ थर भरून पिशवी दोऱ्याने घट्ट बांधावी. 
  •   पिशवी भरताना काडावर मध्यम प्रमाणात हाताने दाब द्यावा. पिशव्या भरताना (स्पॉनिंग) ओल्या काडाच्या वजनाच्या ४ टक्के स्पॉन वापरावे. त्यानंतर पिशवीला टाचणी किंवा सुईने ३० ते ३५ छिद्रे पाडावीत.
  •   पिशव्या उबवण्यासाठी (स्पॉनरन) बंद खोलीत रॅकवर १८ ते २२ दिवस ठेवाव्यात. या काळात पिशव्यांवर पाणी मारू नये. परंतु खोलीतील तापमान २५ ते ३५ अंश सेल्सिअस व आर्द्रता ८० ते ९० टक्के राहील याची काळजी घ्यावी.
  • केसिंग करणे 

  •   सर्वसाधारण १८-२२ दिवसात पिशवीतील सर्व काडांवर पांढरी बुरशी वाढलेली दिसते. त्यानंतर पिशवीचा वरील भाग दुमडून काडाच्या वरच्या पृष्ठभागावर निर्जंतुक केलेल्या केसिंग मातीचा ३ ते ४ सें.मी. जाडीचा थर दिला जातो, त्यास ‘केसिंग’ असे म्हणतात. 
  •   केसिंग मिश्रण तयार करण्यासाठी चांगले कुजलेले कंपोस्ट आणि पोयटा माती १:१ प्रमाणात किंवा कोकोपीट आणि पोयटा माती ३:१ या प्रमाणात घ्यावी. त्यामध्ये कॅल्शिअम कार्बोनेट पावडर मिश्रणाच्या वजनाच्या ३ टक्के मिसळावी. 
  •   कोकोपीटचा वापरणार असल्यास ते १५ दिवस अगोदर दररोज भरपूर पाणी मारून ओले करून ठेवावे. आणि त्यानंतरच मिश्रण तयार करावे.
  •   केसिंग मिश्रण तयार झाल्यानंतर ते निर्जंतुक करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्याचे ॲटोक्लेव्हींग करावे. 
  •   किंवा फॉरमॅलीनचा वापर करून निर्जंतुकीकरण करताना, मिश्रणावर ५ टक्के तीव्रतेचे फॉरमॅलीनचे द्रावण पंपाचे साहाय्याने फवारावे. मिश्रणाच्या सर्व कणांवर फॉरमॅलीन पडणे गरजेचे आहे. 
  •   त्यानंतर हे मिश्रण प्लॅस्टिकच्या कागदाने तीन दिवस झाकून ठेवावे. चौथ्या दिवशी कागद दूर करून मिश्रणाची उलथापालथ करावी.
  •   फॉरमॅलीनचा वास तीव्र स्वरूपात येत असल्यास, पाचव्या दिवशी पुन्हा २ वेळा उलथापालथ करावी. म्हणजे फॉरमॅलीनचा वास व वाफ नष्ट होईल. 
  •   त्यानंतर हे मिश्रण केसिंगसाठी वापरण्यास तयार झाले असे समजावे. उबवणीनंतर पिशवीवर पातळ ३ ते ४ सें.मी. जाडीचा थर द्यावा.
  • पिकाची निगा 

  •   पिशव्यांवर केसिंग माध्यम पसरून झाल्यानंतर त्या अळिंबी वाढीच्या जागेमध्ये (शेड, झोपडी किंवा पक्के बांधकाम केलेली जागा) रॅकवर ठेवाव्यात.
  •   या जागेत हवा खेळती राहण्यासाठी सोय करावी.
  •   केसिंगवर लहान नोझलच्या पंपाद्वारे गरजेनुसार दिवसातून २-३ वेळा पाणी फवारावे. जेणेकरून अळिंबी बेड सतत ओलसर राहतील.
  •   खोली किंवा शेडमधील तापमान २५ ते ३५ अंश सेल्सिअस व आर्द्रता ८० ते ९० टक्के ठेवावी.
  •   खोलीमध्ये दिवसभर (१० ते १२ तास) चांगला प्रकाश येण्याची सोय असावी. प्रकाश व्यवस्थित येत नसल्यास, आवश्यकतेनुसार बल्ब लावावेत.
  •   गरज भासल्यास शेडच्या भिंतीवर गोणपाट किंवा वाळ्याचे पडदे बांधून त्यावर पाणी फवारावे. तसेच जमिनीवर देखील पाणी मारावे. याद्वारे खोलीतील तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा २-३ अंश सेल्सिअस ने कमी करता येते. तसेच आवश्यक आर्द्रता राखता येते.
  •   उन्हाळ्यात या जागेत फॉगर किंवा मीस्ट सयंत्र बसवून तापमान व आर्द्रता नियंत्रित करता येते. अति थंडीचे दिवस सोडून वर्षभर या अळिंबीची लागवड करता येते.
  • दुधी अळिंबी उत्पादनाचे फायदे 

  •   जास्त तापमानात देखील चांगली वाढते. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व भागात ही चांगली वाढू शकते. 
  •   उन्हाळ्यामध्येही या अळिंबीपासून चांगले उत्पादन घेता येते.
  •   आकर्षिक पांढरा रंग व उत्तम चव असल्याने बाजारात चांगली मागणी आहे.
  •   शेतातून वाया जाणाऱ्या कोणत्याही सेंद्रिय पदार्थांवर वाढते.
  •   साठवणुकीचा काळ धिंगरीपेक्षा ४ ते ५ दिवस अधिक असतो. त्यामुळे सोयीनुसार वापरता किंवा विकता येते. 
  •   उत्पादन क्षमता अधिक असून बाजारात चांगला भाव मिळतो.
  • काढणी 

  •   केसिंग केल्यानंतर साधारणतः १० ते १२ दिवसांत अळिंबीचे अंकुर पिशवीवर दिसू लागतात. त्यापुढील ६-७ दिवसात अळिंबी काढणीसाठी तयार होते.
  •   अळिंबीच्या टोप्या त्याच्या देठापासून पूर्णपणे वेगळ्या झाल्यानंतर किंवा फळे ५ ते ७ सें.मी. आकाराची झाल्यानंतर काढणी करावी.
  •   काढणी करताना अळिंबीच्या देठाला धरून पिरगळून काढावीत. आणि बेडवर त्वरित पाण्याचा हलका फवारा मारावा.
  •   त्यानंतर पुढील १० ते १२ दिवसांच्या अंतराने ३-४ वेळा अळिंबीची काढणी करावी. 
  • उत्पादन 

  •   एकूण कालावधी पिशव्या भरल्यानंतर ६० ते ७० दिवसांचा आहे.
  •   या काळात १ किलो वाळलेल्या काडाच्या प्रमाणात पिशवीतून ६०० ते ८०० ग्रॅम ताजी अळिंबी निघते.
  •   काढलेली अळिंबी प्लॅस्टिकच्या पिशवीत भरावी. 
  •   बाजारात विक्रीसाठी पाठविताना भरलेल्या पिशवीला ३-४ छिद्रे पाडणे गरजेचे असते.
  •   सर्वसाधारण हवामानात ३-४ दिवस चांगली टिकते. 
  •   पिशव्या फ्रीजमध्ये ५-७ अंश सेल्सिअस तापमानास २० दिवसापर्यंत चांगल्या राहतात.      
  • - डॉ. अनिल गायकवाड   ९४२०४९८८११   (लेखक अळिंबी तज्ज्ञ आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com