तेलबिया पिके अन् मधमाशीपालनामध्ये संधी

सर्व तेलबिया पिकांमध्ये मधमाश्‍या व त्याद्वारे होणारे परागीभवन याचे फार मोठे योगदान असते. मधमाशी आणि तेलबिया यांचे उत्पादन यांचा परस्पर संबंध आहे. म्हणूनच मधमाश्या खाद्यतेलाच्या उत्पादनात मोठी वाढ करू शकतात.
honey bee in Sunflower field.
honey bee in Sunflower field.

सर्व तेलबिया पिकांमध्ये मधमाश्‍या व त्याद्वारे होणारे परागीभवन याचे फार मोठे योगदान असते. मधमाशी आणि तेलबिया यांचे उत्पादन यांचा परस्पर संबंध आहे. म्हणूनच मधमाश्या खाद्यतेलाच्या उत्पादनात मोठी वाढ करू शकतात.  

पृथ्वीवरील ८० टक्के पिके ही परपरागीभवन होणारी आहेत. परपरागीभवन हे कीटक, पक्षी, हवा अशा अनेक माध्यमांतून होते. यामध्ये मधमाशीद्वारे जवळपास ८० टक्के परागीभवन होते. या परागीभवनामुळे पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होत असते. अजूनही सूर्यफुलाच्या पिकात काही ठिकाणी स्वतः शेतकरी हाताने परागीभवन करतात. खरे तर हे काम मधमाश्यांचे आहे.  मधमाशी आणि खाद्यतेल उत्पादन याचा परस्पर संबंध आहे. तेलबिया उत्पादनक्षेत्रात एक राज्य म्हणून सक्षम होण्यासाठी  काही बाबींकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रात सूर्यफूल, मोहरी व इतर पिकांची हंगामानुरूप नियोजनपूर्वक लागवड करून खाद्यतेल उत्पादनात अग्रेसर होण्याची संधी मिळणार आहे.  सूर्यफूल लागवडीला चालना

  • आपल्याकडे सूर्यफूल, मोहरी, सोयाबीन, भुईमूग, खुरासणी, करडई व तीळ यांच्या लागवडीला पोषक वातावरण आहे. त्यापैकी सूर्यफूल महाराष्ट्रासाठी वरदान ठरणार आहे. सूर्यफुलाची लागवड तीनही हंगामांमध्ये करता येते, मात्र सद्य:स्थितीत उन्हाळी आणि रब्बी हंगामांत उत्तम उत्पादनाची हमी मिळते. आपल्याकडेही सूर्यफुलाचे संकरित आणि सरळ अशा जाती विकसित झालेल्या आहेत. जातीनुसार युक्रेन, रशियामध्ये सूर्यफूल भरघोस उत्पादन मिळते. तसेच आपल्या हवामानातही सूर्यफुलाचे चांगले उत्पादन मिळते. 
  • राज्यात गेल्या आठ वर्षात सूर्यफुलाचे उत्पादन खूप कमी झाले आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे त्यातून मिळणारे कमी उत्पन्न. सूर्यफुलाचे उत्पादन कमी होण्याचे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे मधमाश्यांचे अस्तित्व अनेक भागांतून नष्ट झाले आहे. सूर्यफूल हे परपरागीभवनावर अवलंबून असलेले पीक आहे. त्यात परागीभवन झाले नाही तर एकूण उत्पादन कमी येते. दिसताना सूर्यफूल पूर्ण भरलेले, आकर्षक दिसते, मात्र परागीभवनाअभावी हे बी अपरिपक्व (पोकळ) राहते, उतारा खूप कमी मिळतो.
  • मधमाशीपालनाचा फायदा

  • काही वर्षांपूर्वी केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या मार्गदर्शनाखाली स्वपरागीभवन तसंच मधमाश्यांद्वारे होणारे परागीभवन या विषयी सप्रयोग संशोधन झाले. त्या प्रयोगातील पाहणीत करडई २८ टक्के, तीळ ३२ टक्के, मोहरी ४३ टक्के, सूर्यफूल ४८ टक्के याप्रमाणे वाढ दिसून आली. खुरासणीत तर १९९ टक्के वाढ मिळाली. ही पिके परपरागीभवन होणारी आहेत. भुईमूग आणि सोयाबीन ही दोन महत्त्वाची पिके स्वपरागीभवन होणारी आहेत. अशा पिकांमधील मधमाशीचा वावर हा देखील अतिशय उपयुक्त ठरतो. या पिकांच्या उत्पादनातही मधमाश्यांमुळे लक्षणीय वाढ दिसून येते. 
  • सर्व तेलबिया पिकांमध्ये मधमाशा व त्याद्वारे होणारे परागीभवन याचे फार मोठे योगदान असते. मधमाशी आणि तेलबिया यांचे उत्पादन यांचा परस्पर संबंध आहे. म्हणूनच मधमाश्या खाद्यतेलाच्या उत्पादनात मोठी वाढ करू शकतात.
  •  महाराष्ट्राचा विचार केला तर तीन स्तरावर मधमाशीपालन करणे दूरदृष्टीने आवश्यक आहे. यामध्ये तेलबिया पिकांमध्ये लक्षणीय उत्पादन वाढ, मध, मेण, पराग व त्यावर आधारित उत्पादन आणि सर्वांत जास्त उपयुक्त म्हणजे सर्व पिकांमध्ये परागीभवन वाढणार आहे. यामुळे कृषी उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
  •  तेलबियांसोबतच तीनही हंगामांत येऊ शकणाऱ्या व मधमाशीपालनासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या बाजरी, ज्वारी, मका, तूर, शेवगा,आवळा. डाळिंब अशा पारंपरिक पिकामुळे चांगले परिणाम समोर येणार आहेत. प्रत्येक विभागात घेतल्या जाणाऱ्या पिकांसोबतच तेलबिया वर्गीय पिकांची जर योग्य नियोजन करून लागवड केली तर मधमाशीपालन यशस्वी होईल. मधमाशीमुळे होणाऱ्या परागीभवनामुळे इतर पिकांच्या उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. या सर्व पिकांवर विशेष करून कीटकनाशकांच्या जास्त फवारण्या होत नसल्यामुळे मधमाश्यांना ते पूरक असणार आहे.
  •  मध तयार करण्यासाठी मधमाश्यांना खूप जास्त फुलोरा आवश्यक असतो. तो दोन प्रकारे उपलब्ध होऊ शकतो. पहिला नैसर्गिकरीत्या जंगलामध्ये उपलब्ध असलेला फुलोरा आणि दुसरा म्हणजे विविध प्रकारच्या पिकांमध्ये उपलब्ध असलेला फुलोरा. 
  • सूर्यफूल आणि मोहरी ही दोन पिके मध उत्पादनासाठी खूप महत्त्वाची आहेत. सूर्यफूल हे आकाराने मोठे असते. मधमाश्यांना आकर्षित करणारे असते. सूर्यफुलापासून मधमाशीला आवश्यक पराग आणि मकरंद दोन्ही घटक मिळत असतात.
  •  गावागावांत तरुण शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी तेलबिया (विशेषतः सूर्यफूल) लागवड केली आणि त्यासोबत मधमाशी पालन सुरू केले तर अनेक स्तरांवर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. तेलबिया पिके वाढल्याने राज्यस्तरावर तेलाचे उत्पादन वाढेल. मधाचे उत्पादनसुद्धा वाढेल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संबंधित गावातील इतर पिकांचे उत्पादनसुद्धा परागीभवन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
  •  मधाच्या उत्पादनासोबतच सूर्यफुलाच्या तेलाचे लघुउद्योग सुरू करता येतील. आजकाल लाकडी घाण्याच्या तेलाला मोठ्या प्रमाणात मागणी येत आहे. सूर्यफूल आणि लाकडी घाणा याचा उतारा तसा परवडणारा नसला तरी ऑइल मिलच्या माध्यमातून तालुका पातळीवर हे उद्योग सुरू होऊ शकतात. 
  • मध उत्पादनातील संधी 

  •  सूर्यफूल आणि मोहरी यांच्या फुलांपासून खूप चांगल्या दर्जाचे व मोठ्या प्रमाणात मध तयार होत असते. या दोन्ही फुलांपासून जो मध तयार होते त्याला लवकर स्फटिकीभवन होण्याचा गुणधर्म असतो. याला प्रचलित भाषेत आपण मध गोठणे असे म्हणतो. खरेतर हा मध अतिशय उत्तम व शुद्ध असते, परंतु भारतात त्याचे महत्त्व सर्वसामान्य लोकांना समजलेले नाही. पिवळ्या रंगाच्या फुलांपासून मिळणारा मध हा इतर रंगाच्या फुलांपासून मिळणाऱ्या मधापेक्षा लवकर गोठतो.
  • मोहरी व सुर्यफुलापासून तयार होणाऱ्या मधाला परदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. कारण या मधाचे लवकर स्फटिकीभवन होते. अशा मधाला पाश्‍चिमात्य देशात ‘स्प्रेड हनी’ म्हणून मोठी मागणी असते.
  • मधमाशीपालनातून ग्रामीण तरुणांना रोजगार 

  •  परागीभवनाबाबत हिमाचल प्रदेशातील शेतीचा अभ्यास केला तर खूप काही शिकता येईल. सफरचंदाच्या परागीभवनासाठी हिमाचल प्रदेशात सुमारे ५०,००० मधमाशी वसाहती वापरल्या जातात. सफरचंद लागवडीखाली हिमाचल प्रदेशात अंदाजे एक लाख हेक्टर जमीन आहे. या परागीभवन सेवेमुळे हिमाचल प्रदेशमधील सफरचंदाच्या उत्पादनामध्ये खूप सकारात्मक परिणाम झाले आहेत. अशाच प्रकारची परागीभवन सेवा महाराष्ट्रात खूप फायदेशीर ठरू शकते.
  •  महाराष्ट्रातील फळबागांच्या पिकांचा विचार केला तर अंदाजे पाच लाख हेक्टर क्षेत्रावर फळबागा आहेत. या क्षेत्रासाठी अंदाजे पाच लाख मधमाशी वसाहती परागीभवनासाठी आवश्यक आहेत. आपण या अंतर्गत भाजीपाला, डाळी, तेलबिया क्षेत्राचा विचार केलेला नाही. जर आपण हे देखील गणित केले, तर मधमाशी वसाहतींची आवश्यकता दहा लाखांपेक्षा अधिक असेल. 
  •  प्राथमिक माहितीनुसार राज्यात परागीभवन सेवेसाठी कमीत कमी दोन लाख मधमाशी वसाहती आवश्यक असतील. सध्या महाराष्ट्रात जवळपास २५,००० मधमाशी वसाहती उपलब्ध आहेत. यावरून आपल्या हे लक्षात येते, की मधमाश्‍यांच्या वसाहतींची संख्या वाढवण्याची चांगली संधी आहे. आज परागीभवनासाठी मधमाशी वसाहतीचे मासिक भाडे सुमारे १५०० रुपये आहे. मधमाशी वसाहतींची संख्या वाढल्यास मासिक भाडेही कमी होईल. हे भाडे कमी झाल्याने शेतकरी सुद्धा परागीभवन सेवा घेण्यास प्रोत्साहित होतील.
  • मधमाशीपालन ग्रामीण भागात व विशेषतः जंगल असलेल्या डोंगराळ भागात यशस्वी होऊ शकते. गाव पातळीवर जर काही तरुणांनी एकत्र येऊन व योग्य ते प्रशिक्षण घेऊन मधमाशीपालन सुरू केले तर गावाचे अर्थकारण बदलू शकेल.
  • कृषी विभाग, खादी ग्रामोद्योग मंडळ, महाराष्ट्रातील मधपाळ आणि यामध्ये कार्यरत असलेल्या संस्थांनी एकत्र येऊन प्रयत्न केले तर ही मधुक्रांती व तेलक्रांती शक्य आहे.
  • - संजय पवार,९४२३९७९३५४ (लेखक पिंपळगाव बसवंत, जि. नाशिक येथील बसवंत मधमाशी उद्यान आणि प्रशिक्षण केंद्राचे कार्यकारी संचालक आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com