आजारांपासून कोंबड्यांचे संरक्षण

कोंबड्यांना होणाऱ्या आजारांचे वेळीच व्यवस्थापन करणे अत्यावश्यक असते. हे आजार विषाणूजन्य, जिवाणूजन्य, बुरशीजन्य किंवा परजीवीमुळे होऊ शकतात. कोंबड्यांमध्ये मरतुकीचे प्रमाण वाढून नुकसान होते. आजाराचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घ्यावी.
poultry bird
poultry bird

कोंबड्यांना होणाऱ्या आजारांचे वेळीच व्यवस्थापन करणे अत्यावश्यक असते. हे आजार विषाणूजन्य, जिवाणूजन्य, बुरशीजन्य किंवा परजीवीमुळे होऊ शकतात. कोंबड्यांमध्ये मरतुकीचे प्रमाण वाढून  नुकसान होते. आजाराचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घ्यावी. 

कोंबड्यांना होणारा आजार कामगार किंवा पोल्ट्रीला भेट देणाऱ्याच्या पायास किंवा चप्पल/बूट यांच्या सोबत येणाऱ्या रोगकारक घटकांमुळे पसरतात. त्यासाठी प्रवेशद्वाराजवळ एक पोते किंवा तरट सतत जंतुनाशकयुक्त द्रावणामध्ये बुडवून ठेवावे. जंतुनाशक द्रावणाने भरलेले कुंड प्रवेशद्वाराजवळ असावे. 

  • कामगारांचे कपडे व हात स्वच्छ असावेत, कारण कामगारांचा शेडमध्ये वावर असतो.
  • प्रथम निरोगी कोंबड्यांची हाताळणी करावी. नंतर आजारी कोंबड्यांना हाताळावे. प्रत्येक वेळी हात स्वच्छ जंतुनाशक पाण्याने धुवून मगच निरोगी कोंबड्यांना हात लावावा.
  • आजारी कोंबड्या आणि त्यांची खाद्य, पाणी पिण्याची भांडी वेगळी ठेवावी.
  •  बाहेरून विकत आणलेल्या किंवा प्रदर्शनात नेलेल्या कोंबड्या, संसर्गजन्य आजारांना बळी पडण्याची शक्यता असते. त्यांना झालेला आजार सुप्तावस्थेत असल्यामुळे लक्षणे दिसत नाहीत. म्हणून अशा कोंबड्या एकदम आपल्या शेडमध्ये मिसळू नयेत. त्या काही दिवस वेगळ्या ठेवाव्यात. त्या आजारी नसल्याची खात्री झाल्यावर मग शेडमध्ये मिसळाव्यात.
  • विशेषतः अंडी उबवण्यासाठी आणलेल्या कोंबड्यामध्ये जर आजार सुप्तावस्थेत असेल किंवा गोचिडांचा त्रास असेल तर पिल्लांमध्ये आजार पसरण्याची दाट शक्यता असते.
  • कोंबड्या वाहतुकीसाठी उपयोगात आणलेल्या टोपल्या नेहमी उन्हात टाकून किंवा जंतुनाशक औषधांनी प्रथम जंतुरहित करून घ्याव्यात.
  • सकाळी कोंबड्यांना सोडताना त्यांच्यावर लक्ष ठेवावे. ज्या कोंबड्यांची विष्ठा पातळ असेल, तर ती  आजारी असल्याची शक्यता असते. कारण कोंबड्यांच्या आजारात पातळ जुलाब हे एक सर्वसाधारण लक्षण आहे. सुस्त व खुराड्यात मागे राहणाऱ्या कोंबड्या आजारी  असू शकतात. त्यांचे निरीक्षण बारकाईने करून रोगाचा संशय येताच त्या त्वरित वेगळ्या ठेवाव्यात.
  • जवळपास एखाद्या आजाराची साथ आल्यास पाण्यात अँटीबायोटिक व व्हिटॅमिन्सयुक्त औषधे कोंबड्यांच्या पिण्याच्या पाण्यात शिफारशीनुसार मिसळावीत.
  • कोंबड्यांची घरे स्वच्छ व कोरडी ठेवावीत. त्यांना चुना लावावा किंवा जंतुनाशक औषधाचा फवारा मारून स्वच्छ ठेवावीत.
  • शेडमधील फटीत गोचिडे दडून बसतात, तसेच फटीमध्येच अंडी घालतात. कोंबड्यांना सतावतात, म्हणून अशा सर्व जागांवर  शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी करावी. 
  • आजाराने मेलेल्या कोंबड्या खोल पुराव्यात किंवा जाळून टाकाव्यात.
  • सकस खाद्य न मिळाल्यामुळे, कोंबड्या दुबळ्या होऊन आजारास बळी पडतात. तसेच अनियमित खुराकाने त्यांची पचनशक्ती बिघडते. त्यामुळे देखील आजारी पडतात. नियमित सकस खाद्य देऊन कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी.
  • कोंबड्यांना नियमित स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात द्यावे.
  • कोंबड्या खुराड्यात दाटीने ठेवू नये.भरपूर हवा व उजेड न मिळाल्याने त्या आजारी पडतात. खुराड्यात मोकळी जागा, हवा व उजेड असावा.
  • शरीरावरील गोचीड, उवा व पोटातील जंतू कोंबड्यांचे रक्त शोषून त्यांना अशक्त बनवतात. जिथे  कोंबडीपालन करणार आहोत, तिथे वरील सर्व रोगकारक घटक किंवा परजीवी नसल्याची खात्री करावी. असा कोणताही प्रादुर्भाव जाणवत असेल, तर उपाययोजना कराव्यात. उंदीर, साप, घूस व अन्य रानटी जनावरांपासून कोंबड्यांचे संरक्षण करावे.
  • अंडी देणाऱ्या कोंबड्यांची साल्मोनेला व मायकोप्लास्मा संसर्गासाठी तपासणी करावी.
  • उपचारापेक्षा प्रतिबंध उत्तम, ही गोष्ट कोंबडीपालन करणाऱ्या व्यक्तींनी विशेष लक्षात ठेवावी. कारण कोंबड्यांच्या काही आजारात इलाज करण्याइतपत वेळ मिळत नाही. कोंबड्या पटापट मरतात किंवा इलाज करूनही विशेष उपयोग होत नाही.हे टाळण्यासाठी स्वच्छतेसह वेळीच  लसीकरण करावे.
  •    - डॉ. अमोल जायभाये, ८०८७८७८५८६, ९५७९५३४९७९ (परोपजीवीशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com