पोल्ट्रीशेडमध्ये जैवसुरक्षा आवश्यक

जैविक कारणांमध्ये रोगकारक जिवाणू, विषाणू, कवक, कृमी, परोपजीवी, रोगाणूंचे वाहक इत्यादी बाबी येतात. कुक्कुटपालनात जैवसुरक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
poultry bird
poultry bird

जैविक कारणांमध्ये रोगकारक जिवाणू, विषाणू, कवक, कृमी, परोपजीवी, रोगाणूंचे वाहक इत्यादी बाबी येतात. कुक्कुटपालनात जैवसुरक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते  बर्ड फ्लूच्या निमित्ताने प्रकर्षाने अधोरेखित होते. त्यामुळे पोल्ट्री शेडमध्ये जैवसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे.

कुक्कुटपालनात जैवसुरक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते बर्ड फ्लूच्या निमित्ताने प्रकर्षाने अधोरेखित होते. जैवसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. आपल्या कोंबड्यांचे आजाराच्या जैविक कारणांपासून रक्षण करणे म्हणजेच जैवसुरक्षा होय. या जैविक कारणांमध्ये रोगकारक जिवाणू, विषाणू, कवक, कृमी, परोपजीवी, रोगाणूचे वाहक इत्यादी बाबी येतात. सुयोग्य दैनंदिन नियोजनाद्वारे या बाबींचा बंदोबस्त करणे आणि आपले पशू-पक्षी निरोगी राखणे याला जैवसुरक्षा म्हणतात. कुक्कुटपालन करीत असताना जैवसुरक्षा राखण्याची जबाबदारी या व्यवसायाशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष निगडित सर्व व्यक्तींवर असते. म्हणून संबंधित प्रत्येकाने जैवसुरक्षेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केल्यास बर्ड फ्लू सारख्या अतिशय तीव्र आणि गंभीर संसर्गाचे परिणाम कुक्कुटपालकांना भोगावे लागणार नाहीत. पोल्ट्रीमधील उत्तम जैवसुरक्षा

  •  पोल्ट्रीची जागा उंच ठिकाणी असावी. ती वर्दळीचे रस्ते, मानवी वस्ती आणि पाण्याच्या स्रोतापासून लांब असावी. 
  • जमिनीपासून कमीत कमी २ फूट उंच असावी. गादी पद्धतीत शेडची लांबी ३० फुटांपेक्षा जास्त नसावी.
  •  दोन शेडमध्ये कमीत कमी ५० फूट अंतर असावे. 
  •     ब्रूडिंग, ग्रोइंग आणि लेइंग शेडमधील अंतर १५० फुटांपेक्षा कमी नसावे.
  •  खाद्य यंत्र आणि भांडार गृह मुख्य शेडपासून किमान १५० फूट दूर असावे.
  • आजारी कोंबड्यांना विलगीकरण शेड असावे. असे शेड मुख्य शेडपासून कमीत कमी ५०० फूट अंतरावर असावे. 
  • साधारणतः १ कि.मी. परिघात दुसरे शेड असू नये.
  • शेडमधील वायुविजन पुरेसे असावे. तसेच योग्य तापमान राखले जाईल याची दक्षता घ्यावी. जागा कोंबड्यांना पुरेशी असावी.
  •  शेडच्या सभोवती पुरेशी जागा सोडून दाट झाडे लावावीत. ही झाडे कोंबड्यांना आकर्षित करणारी नसावीत.
  •  शेडला कुंपण घालावे. जेणेकरून इतर पशुपक्ष्यांच्या संपर्काने रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही.
  •  शेडचे बांधकाम कच्च्या स्वरूपाचे असल्यास उंदीर, घूस, सरपटणारे प्राणी बीळ करून किंवा अन्य मार्गाने शिरकाव करून इतर शेडमधील  आजार संक्रमित करू शकतात. 
  • पक्क्या शेडमध्ये ऊन, वारा, पाऊस, तसेच बीळ करणाऱ्या आणि सरपटणाऱ्या प्राण्याद्वारे संक्रमित होणाऱ्या आजारापासून संरक्षण मिळते. त्याचप्रमाणे स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने सोयीचे ठरते.
  •  शेडच्या प्रवेशद्वारावर निर्जंतुक द्रावण अथवा चुन्याच्या पुडीने भरलेला ट्रे असावा. त्यात पादत्राणे बुडवून आत प्रवेश करावा. 
  • मुख्य प्रवेशद्वाराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत निर्जंतुक द्रावणासाठी अर्धा फूट खोल आणि पाच फूट रुंद हौद असावा. शक्य असल्यास दोन्ही बाजूंनी फवारे लावून घ्यावेत.
  • दैनंदिन व्यवस्थापन 

  •  ऑल इन ऑल आउट पद्धतीचा अवलंब करावा.
  • नवीन पिले आणण्यापूर्वी संपूर्ण शेड आणि उपकरणे निर्जंतुक करून घ्यावीत.
  • उत्तम वंशावळीची निरोगी पिले घ्यावीत. वेळापत्रकानुसार नियमित लसीकरण करावे.
  • ताणरहित वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करावा.कोंबड्यांना सकस व समतोल आहार आणि पुरेसे नितळ आणि स्वच्छ पाणी दिल्यास, त्यांची वाढ उत्कृष्ट होऊन रोगप्रतिकारशक्ती वृद्धिंगत होते. 
  •  कोंबड्यांमध्ये पूर्ण विकसित झालेल्या रोगप्रतिकारशक्तीला पुढे चालना मिळण्यासाठी नियमीत लसीकरण प्रभावी ठरते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती सशक्त बनून रोगाणूंचा प्रतिकार करण्यास सज्ज होते.
  •  सज्ज झालेली रोगप्रतिकारशक्ती पूर्णपणे कार्यक्षम राहण्यासाठी कोंबड्यांना ताणरहित वातावरण ठेवावे.
  •  वेगवेगळ्या प्रकारचे किटकांचा प्रादुर्भाव पोट्री शेडमध्ये झाला असता, रोगांचा प्रसार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत सहज होऊ शकतो. असंख्य प्रमाणात वाढणाऱ्या कीटकांचा नायनाट करणे जिकिरीचे ठरते. त्यामुळे एकात्मिक कीटक व्यवस्थापनासारख्या योजनांची अंमलबजावणी केल्यास कीटकांवर नियंत्रण मिळवून रोगप्रसारास आळा घालता येतो.
  • पोल्ट्री शेडमध्ये कोंबड्यांची विष्ठा,मूत्र साचत असते. त्यातून मोठ्या प्रमाणात घातक असलेला अमोनिया वायू उत्सर्जित होत असतो. असे वातावरण रोगाणूंच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते.
  •  लिटर व्यवस्थापन काटेकोर असावे. ती ओली किंवा अगदी सुकी असू नये.
  • शेडमध्ये रोगाणूंची वाढ होऊन ते इतरत्र संक्रमित होऊ नये म्हणून वेळोवेळी शेड आणि त्या ठिकाणी वापरात असलेल्या उपकरणांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करावे. 
  • शेडमधील ठरावीक कोंबड्यांसाठी वापरात असलेले साहित्य ः जसे पिण्याचे, खाद्याचे भांडे इत्यादीचा वापर त्या ठरावीक घरापुरता किंवा कोंबड्यांपुरता मर्यादित असावा. अदलाबदल करू नये. 
  • शेडमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी नेमून दिलेल्या कामाची क्रमबद्धरीत्या अंमलबजावणी करावी. दैनंदिन कार्य करताना लहान, तरुण आणि प्रौढ या क्रमाने  कोंबड्यांची हाताळणी करावी.
  • खाद्य, पाणी आणि लिटरपासून रोग संक्रमित होऊ नये याकरिता योग्य ती दक्षता घ्यावी.
  • शेडमध्ये  वापरात येणारी पाणी, खाद्याची भांडी आणि इतर उपकरणे नियमित स्वच्छ आणि निर्जंतुक करावीत. आपल्या शेडमधील उपकरणे इतरांना वापरण्यास देऊ नये. इतरांचीही आपण वापरू नये.
  • शेडमध्ये कोणतेही काम करताना त्यास लागणारा पूर्ण वेळ द्यावा. लघु मार्ग अवलंबू नये. मात्र दैनंदिन कामे नेमून दिलेल्या वेळेत पूर्ण करावे.
  • मांसल आणि अंड्यावरील कोंबड्या एकत्र पाळू नये.
  • कोंबड्या आणि वराहांचा संपर्क येऊ देऊ नये.
  • आजारी कोंबड्यांचे व्यवस्थापन    

  •  कोंबड्यांचे रोज निरीक्षण करावे. एखाद्या कोंबडीमध्ये आजारपणाची लक्षणे आढळून आल्यास त्वरित पशुवैद्यकास पाचारण करून निराकरण करून घ्यावे.
  • आजारी कोंबड्यांना त्वरित विलग करून त्यांना विलगीकरण शेडमध्ये ठेवावे. त्वरित उपचार सुरू करावेत. मृत कोंबड्यांना शेडपासून लांब खोल खड्ड्यात चुना व मीठ टाकून पुरावे.
  • शेडमधील कामगारांना आणि प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस हात मोजे, कपडे, पादत्राणे, टोपी आणि मास्क घालून काम/प्रवेश करण्याची सक्ती असावी. शेडमध्ये आणि बाहेर वापरण्याचे पादत्राणे आणि कपडे वेगवेगळे असावेत. 
  • शेडमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी परसातील पक्षी, जंगली पक्षी, श्वापदे, पक्षी खरेदी विक्रीचे ठिकाण, मांस बाजार तेथील व्यक्ती यांच्या संपर्कात येऊ नये. विविध शेडमधील कामगारांनी एकमेकांच्या सरळ संपर्कात येणे टाळावे. एका शेड मध्ये काम करणाऱ्याने स्वच्छ न होता दुसऱ्या शेड मध्ये जाऊ नये.
  • आजारी कोंबड्यांची निगा घेणाऱ्या व्यक्तीने मुख्य शेडमध्ये जाऊ नये.
  • शेडमध्ये आगंतुक व्यक्तींना आणि वाहनांना प्रवेश देऊ नये. प्रवेश दिल्यास त्यांना जैवसुरक्षेचे नियम सांगून काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्यावी.
  • चिकन,अंडी खाण्यासाठी सुरक्षित 

  • बर्ड फ्लूचा उद्रेक नसलेल्या भागातील कुक्कुट उत्पादने खाण्यास पूर्ण सुरक्षित आहेत.
  • चिकन आणि अंडी पूर्ण शिजवून खावीत. ७० अंश सेल्सिअसच्या वर अर्धा तास शिजविलेले चिकन आणि अंडी खाण्यास पूर्ण सुरक्षित आहेत.
  •  कुठल्याही प्रकारच्या अफवा किंवा खोटी माहिती पसरवू नयेत. 
  •  सामाजिक माध्यमांचा वापर संयमाने आणि जबाबदारीने करावा.
  • बर्ड फ्लूची भारतातील सद्यःस्थिती

  •  भारतात सद्यःस्थितीत आढळून आलेला विषाणू एच५एन१ उप भेदाचा आहे असे भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. मात्र बीड येथील नमुन्यात एच५एन८ हा उपभेद दिसून आलेला आहे.
  •  या विषाणूचा उद्रेक आज पर्यंत मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, झारखंड, केरळ, महाराष्ट्रासह इतर काही राज्यांत झाल्याचे दिसून येत आहे.
  • महाराष्ट्रात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मरतुक दिसून येत असून, त्यापैकी काही ठिकाणाचे रोग निदान अहवाल येणे बाकी आहेत.
  •  कावळे, चिमण्या, बदके, कबुतरे, मोर, साळुंकी, भारद्वाज, कोंबड्या इत्यादी पक्ष्यांमध्ये संक्रमण दिसून येत आहे.
  • - डॉ. सुधाकर आवंडकर,९५०३३९७९२९  (पशुवैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र  विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com