Agriculture Agricultural News Marathi article regarding poultry management | Page 2 ||| Agrowon

‘बर्ड फ्लू’बाबत जागरूक राहा

डॉ. सुधाकर आवंडकर, डॉ. महेश कुलकर्णी
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

पक्ष्यांमध्ये अनेकदा बर्ड फ्लूचा संसर्ग नैसर्गिकरीत्या होतो.आजार जगभरात पाणथळ ठिकाणी तसेच पाण्यात विहार करणाऱ्या पक्ष्यांमध्ये नेहमीच आढळून येतो.

पक्ष्यांमध्ये अनेकदा बर्ड फ्लूचा संसर्ग नैसर्गिकरीत्या होतो.आजार जगभरात पाणथळ ठिकाणी तसेच पाण्यात विहार करणाऱ्या पक्ष्यांमध्ये नेहमीच आढळून येतो. कोंबड्या, बटेर आणि बदकांसह वन्य पक्ष्यांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकते. प्रतिबंधासाठी कुक्कुटपालनात कडक जैवसुरक्षेचा अवलंब करावा लागतो.

बर्ड फ्लू हा पक्ष्यांचा अत्यंत घातक स्पर्शजन्य आजार आहे. हा आजार मनुष्यात संक्रमित होऊ शकतो. मात्र या विषाणूत सध्यातरी विशिष्ट जनुकीय बदल दिसत नसल्यामुळे तशी शक्यता नगण्य वर्तविली जात आहे. कारण हा प्रामुख्याने पक्ष्यांचा विषाणूजन्य आजार असून तो ‘एव्हिअन इन्फ्लुएन्झा टाइप अ’ या विषाणूमुळे होतो. या विषाणूंच्या प्रथिनांचे १६ एच  आणि ९ एन प्रकार असून यापैकी एच५ आणि एच७ उपप्रकारच तीव्र रोगकारक असल्याचे आतापर्यंतच्या निरीक्षणात दिसून आले आहे. एव्हिअन इन्फ्लुएन्झा विषाणू ढोबळमानाने तीव्र रोगकारक (HPAI) आणि मंद रोगकारक (LPAI) या दोन गटांमध्ये मोडतात. 

 • पक्ष्यांमध्ये अनेकदा बर्ड फ्लूचा संसर्ग नैसर्गिकरीत्या होतो.आजार जगभरात पाणथळ ठिकाणी, पाण्यात विहार करणाऱ्या पक्ष्यांमध्ये आढळून येतो.
 •  या आजाराचा संसर्ग १०० पेक्षा जास्त प्रजातींच्या पक्ष्यांमध्ये दिसून येतो.जंगली पक्षी सहसा लक्षणे दाखवीत नाहीत.
 •  बाधित पक्ष्यांच्या किंवा त्यांची विष्ठा,  नाका-डोळ्यांतील स्राव,  लाळ, दूषित पृष्ठभाग, खाद्य, पाणी इत्यादींच्या सरळ संपर्काने तीव्र वेगाने पसरतो.
 •  बाधित पक्ष्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, त्यांचे कपडे, वाहने, वाहने, खाद्य, अंड्यांचे ट्रे, कुक्कुटपालनातील उपकरणे इतर साहित्य यामार्फत या आजाराचा प्रसार होऊ शकतो.
 •  इतरत्र फेकून दिलेले मरतुक पक्षी खाल्ल्याने कुत्रे, मांस भक्षी प्राणी तसेच पक्ष्यांमार्फत सुद्धा प्रसार होण्याची शक्यता असते.

लक्षणे 

 •  रोगाचा उष्मायन काळ (विषाणूस शरीरात प्रवेश मिळाल्यानंतर प्रत्यक्ष रोगास आरंभ होईपर्यंतचा काळ) सर्वसाधारणपणे २ ते ५ दिवस असतो.
 •  लक्षणे साधारणत: रानीखेत आजारात दिसणाऱ्या लक्षणांसारखी असतात.पक्ष्यांचे वय, प्रकार आणि विषाणूच्या उपभेदानुसार वेगवेगळी लक्षणे असू शकतात. बाधित पक्षी बऱ्याच वेळी लक्षणे न दाखविता मेलेले आढळतात.
 •  मंद रोगकारक (LPAI) विषाणू संसर्गाने सहसा बाधा झाल्याचे दिसून येत नाही किंवा झालेली बाधा अतिशय सौम्य असते. त्यात बाधित पक्ष्यांचे पंख अस्ताव्यस्त झाल्याचे तसेच अंडी उत्पादन घटल्याचे दिसून येते. मात्र लक्षणे अत्यंत सौम्य असल्याने दुर्लक्षित राहतात.
 •  तीव्र रोगकारक (HPAI) विषाणू संसर्गाने अतिशय तीव्र स्वरूपाचा आजार जडतो. बाधित पक्ष्यांच्या थव्यात तो अतिशय जास्त वेगाने पसरतो. बाधित पक्षी अशक्त होतात. खाद्य कमी खातात. पक्ष्यांचे पंख अस्ताव्यस्त होतात. त्यांची चाल अनियमित होते. आजारी पक्षी बसून राहतात किंवा जमिनीवर डोके टेकवून आडवे पडलेले दिसतात. 
 •  आजारी कोंबड्या नरम कवच असलेली अंडी देते आणि त्यानंतर अंडी देणे बंद करते. डोक्यावरील तुरा आणि चोचीखालील गलोल काळपट लाल ते निळसर पडतात. चेहरा सुजलेला दिसतो. त्यावर ठिकठिकाणी सुईच्या टोकासारखा रक्तपात दिसून येतो. 
 •  आजारी पक्ष्यांत अतिसार होतो. ते तहानतात. श्वसनास अडथळा निर्माण होत असल्याने त्रास होतो. पंख नसलेल्या कातडी आणि पायावर रक्तपात दिसून येतो. काही पक्ष्यांत डोळ्याच्या पापण्या आणि चेहरा सुजलेला दिसतो.

रोग निदान

 •  लक्षणांवरून या आजाराचे प्राथमिक निदान करता येते. पक्या निदानासाठी रक्तजल किंवा बाधित पक्ष्यांचे योग्य नमुने प्रयोगशाळेत पाठवावी लागतात.
 •  रानीखेत (व्ही.व्ही.एन.डी.), डक प्लेग, तीव्र विषबाधा, फाउल कॉलरा इत्यादी आजारांपासून वेगळा ओळखावा लागतो.

उपचार आणि प्रतिबंध 

 •  पक्ष्यांसाठी या आजारावर सध्यातरी विशिष्ट उपचार उपलब्ध नाही.
 •  रोग प्रतिबंधात्मक लस भारतात देत नाहीत.
 •  रोग प्रतिबंधासाठी कुक्कुटपालनात कडक जैवसुरक्षेचा अवलंब करावा लागतो. जंगली आणि पाळीव पक्ष्यांचा संपर्क येऊ देऊ नये.
 •  मरतुक झालेले पक्षी खोल खड्डा करून चुन्याची भुकटी टाकून पुरून टाकावी.
 •  पक्षी पालक आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर कुणीही आजारी किंवा मृत पक्ष्यांच्या संपर्कात येऊ नये.
 •  आजाराचा उद्रेक झालेल्या ठिकाणाच्या एक किलोमीटर परिघास नियमानुसार बाधित क्षेत्र आणि १० किलोमीटर क्षेत्र निगराणी क्षेत्र म्हणून घोषित केले जाते. त्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे.

मनुष्यातील प्रसार

 • अपवादात्मक परिस्थितीतच मनुष्यात या आजाराची लागण होऊ शकते. त्यामुळे अवास्तव घाबरून जाऊ नये.
 •  विशिष्ट मात्रेत विषाणू डोळे, तोंड किंवा नाकावाटे मानवी शरीरात गेल्याने आजाराची लागण होते.
 •  एखादा व्यक्ती बर्ड फ्लूचा संसर्ग झालेल्या पक्षाच्या सरळ संपर्कात आल्याने त्याला या आजाराची लागण होऊ शकते.  
 • आजाराचा सर्वाधिक धोका आजारी पक्ष्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींना असतो. बाधित व्यक्तीपासून इतर व्यक्तींना संसर्ग होण्याची शक्यता कमी असते. 
 •  विषाणूने दूषित असलेले अर्धे कच्चे मांस किंवा अंडी खाल्ल्याने हा आजार होवू शकतो.

मनुष्यातील लक्षणे

 • साधारणतः बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्यानंतर २ ते  ८ दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरवात होते. 
 •  संसर्ग झालेल्या व्यक्तीस सामान्य फ्यूसारखा आजार जडल्याचे दिसते.
 •  विषाणू रक्ताभिसरण संस्थेत पोहोचून ताप येतो.  खोकला, घशात खसखस, पोटदुखी, उलटी,अतिसार, डोकेदुखी, सांधेदुखी,  इनसोमनिया आणि डोळ्यांचे आजार यांसारखी लक्षणे दिसून येतात. 
 •  संक्रमण वाढून न्यूमोनिया होऊ शकतो. कधी कधी श्वास घेण्यासही त्रास होऊ शकतो.

उपचार आणि प्रतिबंध

 •  या विषाणूवर ओसेल्तावीर, पेरामिवीर आणि झानामिवीर अशी विषाणूरोधी औषधे उपलब्ध आहेत. मात्र ती पक्ष्यांना देत नाहीत. मनुष्यामध्ये या औषधी गरजेप्रमाणे वापरता येतात. 
 •  हा विषाणू या औषधांना प्रतिरोध निर्माण करतो असे दिसून आले आहे. म्हणून त्यांचा योग्य आणि सुरक्षित वापर करावा. 
 •  साबणाने नियमित हात धुवावेत. वैयक्तिक स्वच्छता पाळावी. नियमित मास्क घालावा.

जागरूक रहा

 • बर्ड फ्लू संबंधी शास्त्रीय माहिती अवगत करून घ्यावी.
 •  पशुसंवर्धन खात्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणात सहकार्य करावे.
 •  आजाराची लागण झाल्याचा संशय आल्यास कुक्कुट पालकाने तत्काळ नजीकच्या पशुसंवर्धन खात्याच्या अधिकाऱ्यास किंवा १८००२३३०४१८ या टोल फ्री क्रमांकावर त्याची सूचना द्यावी.
 •  बर्ड फ्लू उद्रेकादरम्यान मुक्त संचार करणारे पक्षी जमिनीवर आजारी किंवा मृत पडलेले दिसून आल्यास त्वरेने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यास सूचित करावे.
 •  आजारी आणि मृत पक्षी हाताळताना हातमोजे, मास्क, चष्मा, गमबूट, अप्रोन वापरावे. पी.पी.ई. कीट वापरावी.
 •  मृत झालेले पूर्ण पक्षी प्लास्टिक पिशवीत गुंडाळून स्क्रू कॅप कुपिमध्ये बंद करून बर्फावर प्रयोगशाळेत पाठवावे.
 •  पशुवैद्यक अधिकाऱ्याच्या सल्ल्याने सुरक्षा प्रणालीचा प्रभावीपणे वापर करावा.
 •  प्रत्येक कुक्कुटपालकाने एक लिटर पाण्यात ७ ग्रॅम धुण्याचा सोडा (सोडिअम बायकार्बोनेट) टाकून त्या द्रावणाने कोंबड्यांची खुराडे, शेड, उपकरणे, नाल्या, गटार, पक्ष्यांचा वावर असणारी ठिकाणे, गोठे, जमिनीवर १५ दिवसांच्या अंतराने तीनदा फवारणी करावी. प्रवासी आणि जंगली पक्ष्यांपासून दूर राहावे. 

काय करू नये 

 • संशयित किंवा प्रतिबंधित क्षेत्रात जाऊ नये.
 • संशयित किंवा प्रतिबंधित क्षेत्रातून पक्ष्यांची ने-आण किंवा वाहतूक करू नये.
 •  अनावश्यक व्यक्तींनी कुक्कुटालय आणि परिसरात जाऊ नये.
 •  बर्ड फ्लू उद्रेकादरम्यान मुक्त संचार करणारे पक्षी जमिनीवर आजारी किंवा मृत पडलेले दिसून आल्यास त्यांना हात लावू नये. मृत पक्ष्यांचे शव विच्छेदन करू नये.

 

- डॉ. सुधाकर आवंडकर,
  ९५०३३९७९२९ 
(पशुवैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र  विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

 


इतर ताज्या घडामोडी
पाच दिवसांत तब्बल ५० टन काजू बी खरेदी सिंधुदुर्गनगरी ः फळपीक बागायतदार संघाने गेल्या...
वाढत्या तापमानातील द्राक्ष बागेतील...प्रत्येक भागात सध्याच्या परिस्थितीचा विचार करता...
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...
फळाचे ‘प्रमोशन’, मूल्यवर्धन होण्याची...चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू...
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारनारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या...
सामूहिक प्रयत्नातून काजू उत्पादकांची...जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या...
क्षेत्र वाढ, प्रक्रियेसाठी सरकारी...देशात पेरू लागवडीचे सुमारे तीन लाख हेक्टर आणि...