ग्रामविकासातील अडथळे

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना आहेत. तरीदेखील गावांचा विकास का होत नाही, हा मूलभूत प्रश्‍न आहे. या प्रश्‍नाच्या अनुषंगाने निर्माण होणारे जनसामान्यांचे प्रश्‍न आणि त्याची उत्तरे आजच्या भागात पाहूयात.
women self help group
women self help group

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना आहेत. तरीदेखील गावांचा विकास का होत नाही, हा मूलभूत प्रश्‍न आहे. या प्रश्‍नाच्या अनुषंगाने निर्माण होणारे जनसामान्यांचे प्रश्‍न आणि त्याची उत्तरे आजच्या भागात पाहूयात.

ग्रामसभेत लोकांची अनुपस्थिती आणि ग्रामविकासकामात लोकसहभाग का नसतो? 

  • बहुतेक गावांमध्ये काही ठरावीक लोकांच्या हातात सत्ता असते. ज्यांच्याकडे सत्ता असते ते लोक इतरांपर्यंत माहिती पोचू देत नाहीत. त्यामुळे माहितीच्या अभावी, अज्ञान असल्याने गावातील लोक सहभागी होत नाहीत. 
  • गावागावांत वेगवेगळे परस्परविरोधी राजकीय विचारांचे पक्ष काम करतात. त्यामुळे तिथेही राजकीय सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष असे राजकारण सुरू असते. त्यामुळे एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम आखला किंवा विकासयोजना तयार केली, की दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध करायचा हे ठरलेले असते. त्यामुळे लोकसहभाग मिळविण्यात अपयश येते. आलेल्या विकास योजना गावाला वापरता येत नाहीत किंवा वापरल्या असे दाखविण्याचा प्रयत्न होतो. 
  • गावातील युवा मंच, प्रतिष्ठान, उत्सव मंडळे हीदेखील राजकीय पक्षांचे गावातील सूत्रधार चालवत असतात. वर्षभर चालणारे उत्सव,  राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांचे वाढदिवस यामध्ये युवाशक्ती गुंग आहे. त्यामुळे या व्यापातून त्यांना आपल्या स्वतःच्या व गावाच्या विकासाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. तशी इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये दिसत नाही. गावातील युवकांचे प्रशिक्षण वेगळ्याच मार्गाने चालले आहे. 
  • गावातील महिला बचत गट हेदेखील बहुतेक गावांमध्ये नावापुरते राहिले आहेत. गट प्रमुख, अध्यक्ष, सचिव यांना स्वतःच्या क्षमतेची जाणीव नाही. कारण हे गटदेखील अनेक ठिकाणी राजकीय पक्षांच्या आदेशानुसारच कामकाज करतात. त्यांना निवडणुकीच्या काळात प्रचार साधन म्हणूनच वापरण्यात येते. असे अकार्यक्षम बचत गट गावाच्या विकासात सक्रिय सहभाग कसा देतील? 
  • मला काय मिळणार, अशा भावनेतून सहभागाचा निर्णय ठरत असल्याने, आपला काय फायदा आहे असाच विचार सर्वांमध्ये रुजत चालला आहे, त्यामुळे व्यापक हिताचा विचार गावागावात होताना दिसत नाही. 
  • गावातील विविध निवडणुका व त्यातून निर्माण होणारे वैमनस्य, वादविवाद, भांडणे ही तात्पुरती रहात नाहीत, ती पुढील निवडणुकांपर्यंत टिकून राहतात. त्या निवडणुकीतही मागील निवडणुकीचा सूड घ्यावयाचा असतो म्हणून मध्यंतरीचा पाच वर्षांचा काळ हा एकमेकांना दोष देण्यात व विरोध करण्यात एकमेकांचे पाय खेचण्यात वाया जातो. गावाचा विकास कासवाच्या गतीने सुरू राहतो किंवा काही ठिकाणी पूर्ण थांबतो. त्यामुळे गावाचा विकासनिधी परत करावा लागतो किंवा जिरवला जातो. 
  • प्रत्येक गावात अनेक प्रगतिशील शेतकरी, युवा उद्योजक, युवा कार्यकर्ते, त्या-त्या भागाचे भाग्यविधाते आहेत असे विविध प्रसंगी गावात लागणारे फ्लेक्‍स आणि लग्नपत्रिकेतील नावाच्या यादीवरून दिसून येते. मात्र ही सगळी मंडळी गावाच्या विकासकार्यात सहभाग देताना फारशी दिसत नाही. त्यापासून अलिप्तच असतात. 
  • प्रत्येक गावामध्ये जातीचे तंटे, भावकी, जमीन मालमत्तेचे वाद असतात. त्यातून भांडणे, कोर्टकचेऱ्या चालू असतात. त्याचाही परिणाम म्हणून विकासकामांना विरोध होऊन सहभाग मंदावतो. 
  • गावाच्या आजी-माजी नेतृत्त्वात (सरपंच, उपसरपंच इ.) सलोखा, सहभागाची, सहकार्याची भावना दिसत नाही. त्यांच्यातील परस्पर विरोधामुळेही गावाच्या विकासासाठी एकत्र येणे होत नाही. तसेच गावातील ग्रामपंचायत व इतर सत्तेच्या संस्था या वेगवेगळ्या गटांच्या ताब्यात असतात. त्यामुळे गटातटाच्या राजकारणात लोकसहभाग मिळत नाही, विकासकार्य मागे पडते. 
  • ग्रामसभेस उपस्थिती नसते, त्यासाठी काय करावे? 

  • या प्रश्‍नाचे उत्तर शासन आदेशामध्ये दिलेले आहे. ग्रामविकास आराखडा तयार करण्यासाठी किंवा इतर महत्त्वाच्या विषयावर ग्रामसभा घेण्यापूर्वी गावात त्याबाबत पुरेशी माहिती प्रसारित करणे हे ग्रामपंचायतीचे काम आहे. ही माहिती व त्याबाबत जाणीव निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायतीने विविध मार्गांचा अवलंब करावा.
  • लोकांपर्यंत ग्रामसभा व विकास योजनांची माहिती पोचविण्याचे कोणते मार्ग आहेत? 

  • शासन निर्णय असे सांगतो, की अंतिम ग्रामसभा किंवा त्या अगोदर घ्यावयाच्या महिला, वंचित घटक व बालसभा यामध्ये लोकसहभागी व्हावेत म्हणून जाणीव जागृतीचे व माहिती प्रसारणाचे अभियान राबवावे.  या अभियानाचा परिणाम वाढावा, लोकांचा लोकसहभाग मिळावा म्हणून पुढील काही उपाय ग्रामपंचायतीने करावेत. 
  • प्रत्येक ग्रामसभेची सूचना ग्रामसभेपूर्वी सात दिवस अगोदर द्यावी. ग्रामसभेचा विषय, स्थळ, वेळ याची माहिती फ्लेक्‍सच्या माध्यमातून गावातील प्रत्येक वार्डामध्ये मोक्‍याच्या ठिकाणी व गावात ग्रामपंचायत इमारत, शाळा व मध्यवर्ती ठिकाणी लावावी. 
  • प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याने (सरपंचासह) किमान दहा ग्रामस्थांना ग्रामसभेस घेवून यावे. त्यासाठी त्यांनी आपल्या वार्डात घरोघरी जावे. 
  • ग्रामसभेचे परिपत्रक (माहितीपत्रक) तयार करून गावातील प्रत्येक कुटुंबात वाटावे. 
  • तरुणवर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्यांच्या शाळांमध्ये जावून ग्रामसभा म्हणजे काय?ग्रामसभेचे महत्त्व, गरज आणि फायदे समजावून सांगावेत. त्यांच्या विविध स्पर्धा, गावाच्या विविध प्रश्‍नांबाबत घ्याव्यात. 
  • एखादी दवंडी द्यावी. सायकल, रिक्षा यांचा वापर करून गावात ग्रामसभेचा प्रचार करावा. 
  • गावातील सर्व राजकीय पक्षाच्या अधिकारी व कार्यकर्त्यांना ग्रामसभेचे निमंत्रण द्यावे. 
  • गावात स्थापन झालेल्या सर्व महिला स्वयंसहाय्यता बचत गटांच्या अध्यक्षांना ग्रामसभेचे निमंत्रण द्यावे. 
  • गावात असलेल्या विविध मंडळे, प्रतिष्ठान, युवा मंच, मित्र मंडळे, उत्सव समित्या यांना ग्रामसभेचे निमंत्रण द्यावे. 
  • ग्रामसभेचा दिवस व वेळ ग्रामस्थांच्या सोयीची निवडावी. सुट्टीचा दिवस सगळ्यांना सोयीचा असतो. शेतीच्या कामांमुळे सकाळ किंवा संध्याकाळ ही वेळ ग्रामस्थ व महिलांना जास्त सोयीची असते, अशी वेळ निवडावी. 
  • सोशल मीडिया व डिजिटल माध्यमांचा प्रभावी उपयोग करून ग्रामसभेबाबत लोकांना जागृत  करावे. 
  • ग्रामसभा झाल्यानंतर ग्रामविकास आराखडा पहायला मिळतो का? 

  • होय, सर्व ग्रामस्थांना विकास आराखडा पहायला मिळावा म्हणून ग्रामसभेने मंजूर केलेली ग्रामविकास आराखडा शासनाने दिलेल्या नमुन्यात तयार करून त्याचा बोर्ड ऑईल पेंटने रंगवून तो ग्रामपंचायतीच्या इमारतीवर लावावा असा शासन निर्णय आहे. त्यामुळे ग्रामसभेनंतर असा ऑईल पेंटमध्ये रंगविलेला फलक/ बोर्ड ग्रामपंचायत इमारतीवर लागला आहे का  हे गावातील जागृत नागरिकांनी पहावे. त्याचा पुन्हा पुन्हा अभ्यास करावा. 
  • ग्रामविकास आराखड्यात घेतलेली कामे, प्रकल्प यांची गुणवत्ता राखण्यासाठी काय करावे? 

  • गावातील विकासकामे व हाती घेतलेले प्रकल्प यांची कामे गुणवत्तापूर्ण होतात, की नाही हे पाहण्याची जबाबदारीही गावाची आहे. त्यासाठी शासन निर्णय ४ नोव्हेंबर, २०१५ मधील मुद्दा क्र. ७.५.२ अन्वये प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या गावात एक कार्यगट स्थापन करायचा आहे. या कार्यगटाने विकास आराखड्यातील कामांची गुणवत्ता व प्रगती याची पाहणी करून अंमलबजावणी बाबतचा अहवाल ग्रामपंचायत व ग्रामसभेकडे सादर करावयाचा असतो. त्यादृष्टीने प्रत्येक ग्रामपंचायतीने असा कार्यगट स्थापन करून, कार्यान्वित करावा असे निर्देश आहेत. तसेच गावाला आपल्या गावाचा कार्यगट समजावा म्हणून या कार्यगट सदस्य बोर्ड/ फलक ग्रामपंचायत इमारतींवर लावावा असे या शासन निर्णयात स्पष्ट आदेश आहेत. 
  • - डॉ. कैलास बवले, ८८८८८९२७५७ (समन्वयक, डॉ. धनंजयराव गाडगीळ शाश्‍वत ग्रामविकास केंद्र,  गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com