तपासा बियाण्याची सजलीकरण शक्ती

प्रत्येक जातीच्या बियाणाची उगवण शक्ती वेगवेगळी असते. आणि ती जमिनीतील उपलब्ध पाण्यावर अवलंबून असते. यालाच बियाण्याची सजलीकरण शक्ती म्हणतात. त्याची तपासणी महत्त्वाची आहे.
seed germination
seed germination

प्रत्येक जातीच्या बियाणाची उगवण शक्ती वेगवेगळी असते. आणि ती जमिनीतील उपलब्ध पाण्यावर अवलंबून असते. यालाच बियाण्याची सजलीकरण शक्ती म्हणतात. त्याची तपासणी महत्त्वाची आहे.

मागील १५ वर्षात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा वाढला. सोयाबीनच्या वेगवेगळ्या जाती बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. सन१९७५ ते १९७६ मध्ये अशाच प्रकारे संकरित ज्वारीच्या नवीन जाती बाजारात आल्या. सीएसएच- १ या संकरित ज्वारीच्या जातीची लागवड वाढली. त्यावेळी सीएसएच-५  ही जात बाजारात आली. ही जात सीएसएच- १ पेक्षा सरस होती. परंतु १९७६ मध्ये सीएसएच-५ जातीची उगवण काही चांगली झाली नाही.   बियाणे तपासणी प्रयोगशाळेमधील अहवालामध्ये उगवणशक्ती चांगली होती, प्रत्यक्षात मात्र शेतामध्ये संकरित सीएसएच-५  जातीचे बियाणे उगवले नाही. शासनाकडे शेतकऱ्यांच्या खूप तक्रारी आल्या आणि त्यावर चौकशी नेमून बियाणे तपासणीसाठी विद्यापीठाकडे पाठवले. तेव्हा असे आढळून आले की प्रत्येक जातीच्या बियाणाची उगवण शक्ती वेगवेगळी असते आणि ती जमिनीतील उपलब्ध पाण्यावर अवलंबून असते. यालाच बियाण्याची सजलीकरण शक्ती ( Seed hydration value) म्हणतात. साध्या भाषेत सांगायचे तर समजा जमिनीमध्ये वापसा स्थितीमध्ये जेवढे पाणी असायला पाहिजे त्यापेक्षा ५० टक्के कमी आहे, अशा वेळी पिकाची एक जात उगवते, तर दुसरी अत्यंत कमी उगवते, कारण बियाण्याची सजलीकरण शक्ती वेगवेगळी असते. अशावेळी कोरडवाहू शेतीमध्ये बियाणांची  उगवण चांगल्या प्रकारे होत नाही. यावर अधिक संशोधनाची गरज आहे. आजही बियाणे शिफारशीत करतेवेळी बियाण्याची सजलीकरण शक्ती तपासली जात नाही, आणि त्याचे मापदंड उपलब्ध नाहीत.  यावर्षी आपण पाहतोय की कोरडवाहू शेतीमध्ये सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात बियाणे उगवले नसल्याबद्दलच्या तक्रारी आहेत. अशावेळी जर बियाण्याची सजलीकरण शक्ती जर माहिती असेल, तर जमिनीमध्ये किती ओलावा आल्यावर सोयाबीनची कोणती जात पेरावी याविषयी शेतकऱ्यांना सूचित करता आले असते.

सोयाबीनमधील प्रयोग      चार वर्षांपूर्वी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये सोयाबीनच्या बियाण्याची सजलीकरण शक्ती तपासण्याचे संशोधन माझ्या मार्गदर्शनाखाली एक विद्यार्थ्याने हाती घेतले होते. त्याचे काही निष्कर्ष  आपणापुढे ठेवणार आहे. सदरील संशोधनावर अवलंबून कोणतीही शिफारस अद्याप झालेली झालेली नाही. भविष्यामध्ये पिकाच्या जाती शिफारस करतेवेळी बियाण्याची सजलीकरण शक्ती निर्देशित करूनच शिफारस केली तर शेतकऱ्याचे कष्ट, पैसा , हंगाम आणि वेळ वाया जाणार नाही. त्यासाठी मी हे संशोधन आपणासमोर ठेवत आहे.

  • सोयाबीन पिकाच्या एकूण सहा जाती या प्रयोगामध्ये निवडण्यात आल्या होत्या. जेएस -३३५, एमएयूएस-७१, एमएयूएस-१५८, एमएयूएस-१६२, एमएयूएस-५०४ आणि  एमएयूएस-६०९ या जातींची उगवणशक्ती ५० टक्के आणि १०० टक्के जमिनीची जलधारण शक्ती एवढे पाणी घेण्यात आले.
  • त्यामध्ये उगवण शक्ती पाहिली असता त्यामध्ये असे आढळून आले की, ब्लॉटींग पेपर वर पाहिलेली  उगवणशक्ती सर्व जातींमध्ये चांगली होती, मात्र जेव्हा जमिनीतील पाण्याचे प्रमाण बदलले, तेव्हा एमएयूएस- ५०४   आणि एमएयूएस- १५८ या जातींची बियाणे सजलीकरण शक्ती अत्यंत कमी आहे, त्यामुळे कमी पाणी असेल तरीही या जातींची उगवण चांगली झाली. म्हणजेच कोरडवाहू पिकासाठी कमी पाऊस असेल तरीही  या जाती चांगल्या प्रकारे उगवू शकतात. परंतु जमिनीत एवढेच पाणी असताना जेएस-३३५ आणि एमएयूएस-७१ या जातींची उगवण कमी दिसून आली कारण या जातींची सजलीकरण शक्ती जास्त होती. 
  •  सारांशाने असे म्हणता येईल की, जमिनीतील ओलाव्याची पातळी या दोन जातींसाठी जास्तीची आहे. अशा वेळी जमिनीमध्ये भरपूर ओलावा असेल तरच या जातींचे बियाणे पेरावे अन्यथा पेरणी करू नये. अशा प्रकारचे संशोधन सर्वच कोरडवाहू पिकाच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचे आहे. याकरीता विद्यापिठाने शिफारस करतेवेळी बियाणाची सजलीकरण शक्ती पाहूनच योग्य जातींची शिफारस करावी. यामुळे कोरडवाहू शेतीमध्ये पेरणीसाठी योग्य जाती उपलब्ध होतील,पिकांचे अपेक्षित उत्पादन मिळेल. 
  • - डॉ.विलास पाटील,९४२२८७७७९० (माजी संचालक शिक्षण आणि मृदा शास्त्रज्ञ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com