तंत्र दर्जेदार मुरघास निर्मितीचे

मु रघास तयार करताना एकदल चारा आणि द्विदल चारा यांचे प्रमाण ७०:३० एवढे असावे. हिरवा चारा टंचाईच्या काळात जनावरांना मुरघासाच्या रूपाने हिरवा चारा मिळतो. हा चारा पचनास सोपा, तसेच चवीला चांगला असल्या कारणाने जनावर आवडीने खातात.
cattle feeding
cattle feeding

मु रघास तयार करताना एकदल चारा आणि द्विदल चारा यांचे प्रमाण ७०:३० एवढे असावे. हिरवा चारा टंचाईच्या काळात जनावरांना मुरघासाच्या रूपाने हिरवा चारा मिळतो. हा चारा पचनास सोपा, तसेच चवीला चांगला असल्या कारणाने जनावर आवडीने खातात.  

हवाबंद परिस्थितीत हिरवा चारा काही कालावधी करता साठवून ठेवल्यावर त्यावर किण्वन प्रक्रिया होऊन जो लुसलुशीत व चवदार चारा मिळतो, त्याला मुरघास असे म्हणतात. हिरवा चारा साठवून ठेवण्याची ही अत्यंत उत्कृष्ट पद्धत आहे. याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे काही महिन्यांनंतरही यातील अन्न घटक जसेच्या तसे साठविले जातात.  मुरघास बनविण्याचे तंत्र    

  • मुरघास बनवण्याची पद्धत ही रासायनिक तसेच किण्वन प्रक्रियेवर अवलंबून आहे. ज्या वेळेस आपण ६५ ते ७० टक्के इतके पाण्याचे प्रमाण असलेला चारा हवाबंद वातावरणात साठवतो, तेव्हा जिवंत वनस्पती पेशी श्‍वसन क्रियेसाठी तेथील ऑक्सिजन वापरून कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर सोडतात. त्यामुळे थोड्याच दिवसांत तिथे ऑक्सिजन विरहित वातावरण तयार होते. याच बरोबर जिवाणू, ईस्ट, कवक यामुळे किण्वन प्रक्रिया चालू होते. 
  • मुरघास खड्ड्यात म्हणजेच सायलो मधील तापमान वाढते. कर्बोदकांचे विघटन होऊन ॲसिटिक, प्रोपियनिक, लॅक्टिक आम्ल तयार होतात. ऑक्सिजन विरहित वातावरणात जेव्हा आम्लता वाढते, तेव्हा वरील जिवाणू कवकांची प्रक्रिया थांबते. परंतु ऑक्सिजन विरहित वातावरणात वाढणाऱ्या जिवाणूंमुळे कर्बोदकांचे विघटन होऊन अधिक लॅक्टिक आम्ल तयार होते. ज्या वेळेस चाऱ्याची आम्लता ४.८  सामूच्या (पीएच) खाली जाते तेव्हा या जिवाणूंची वाढ थांबते व याच बरोबर चाऱ्यातील अन्नघटकांचे विघटन होणे थांबते. अशा प्रकारे हिरवा चारा मूळ अवस्थेत साठविला जातो.  
  • मुरघास तयार करण्यासाठी योग्य पिके 
  • कोणत्याही प्रकारच्या हिरव्या चाऱ्यापासून मुरघास बनविता येतो, परंतु एकदल चारा पिकांना मुरघास बनवण्यास प्राधान्य दिले जाते. कारण त्यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण अधिक असते, जे मुरघास तयार होण्याच्या प्रक्रियेत उपयुक्त ठरते. 
  • ज्या पिकांचा बुंधा जाड, भरीव आहे असा चारा मुरघास बनविण्याकरिता योग्य मानावा कारण जाड बुंधा असल्यामुळे चारा व्यवस्थित दाबून हवाबंद परिस्थितीत ठेवता येतो. 
  • ज्वारी, बाजरी, मका ही एकदल पिके आणि संकरित नेपियर (हत्ती गवत) यांसारख्या गवतापासून उत्तम प्रतीचे मुरघास बनवले जाऊ शकते. 
  • लसूण घास, बरसीम यासारखी द्विदल पिकेदेखील मुरघास तयार करण्यासाठी वापरता येतात. परंतु यामध्ये शर्करेचे प्रमाण कमी असल्यामुळे ती एकदल चाऱ्यासोबत मुरघास बनवण्यासाठी वापरावीत. अशावेळी एकदल चारा आणि द्विदल चारा यांचे प्रमाण ७०:३० एवढे असावे.  
  •  चारा कापणीची वेळ, मुरघासाचा खड्डा 
  • ज्वारी आणि बाजरीचे पीक पोटरीत असताना कणसे येण्यापूर्वी, तर मक्याचे पीक पोटरीवर येऊन दाणे दुधाळ परिस्थिती असताना  म्हणजेच चिकात असताना कापणी करावी. 
  • द्विदल पिके फुलोऱ्यात असताना कापावीत, बहुवार्षिक चारा पिके डी एच एन -६ आणि १० ही पिके पहिल्या कापणीनंतर पुढील कापणी सहा ते आठ आठवड्यांनंतर करून मुरघासासाठी वापरावी.
  • कापणी केलेल्या चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण ८० ते ८५ टक्के असते. पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी कापणी केलेला चारा सावलीत वाळवून त्याचे पाण्याचे प्रमाण ६५ ते ७० टक्यांपर्यंत खाली आणावे. याकरिता साधारणतः  पाच ते सात तास लागतात. मुरघास बनवताना हिरव्या चाऱ्यामधील पाण्याचे प्रमाण ६५ ते ७० टक्के असावे. शुष्क घटक ३० ते ३५ टक्के प्रमाणात असावेत. 
  • अशा चाऱ्याचे कुट्टी यंत्राच्या साह्याने अर्धा ते पाऊण इंच लांबीचे तुकडे करून घ्यावेत. चाऱ्यातील पाण्याचे प्रमाण तपासण्यासाठी कुट्टी केलेल्या चाऱ्याचा हाताच्या साह्याने गोल चेंडू करावा, चेंडू लगेच उलगडला तर पाण्याचे प्रमाण कमी आहे असे समजावे, जर  चाऱ्याचा चेंडू तसाच राहिला, तर पाण्याचे प्रमाण जास्त आहे असे समजावे. चाऱ्याचा चेंडू हळूहळू उघडला तर चाऱ्यातील पाण्याचे प्रमाण योग्य आहे असे समजावे. 
  • मुरघास तयार करण्यासाठी खड्डा म्हणजेच सायलो तयार करताना उंच भागावरील जमिनीची निवड करावी. असे केल्याने मुरघासाच्या खड्ड्यापासून पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो. जमिनीवर १० ते १२ फूट उंच आकाराची टाकी बांधून मुरघास साठविता येतो. 
  • मोठ्या प्रमाणात साठवणीसाठी आयताकृती, चौकोनी, वर्तुळाकार खड्डा पद्धतीने बांधकाम करून मुरघास बनविता येतो. अत्यंत कमी भांडवल वापरून प्लॅस्टिकचे पिंप, टाक्या, प्लॅस्टिक पिशव्या आणि बांबूची चौकट वापरून मुरघास तयार करता येतो. 
  • मुरघासासाठी केलेला खड्डा २.४  ते ३ मीटर खोल असावा. लांबी व रुंदी ही साठवण करण्याच्या क्षमतेनुसार असावी. मुरघास करण्याआधी तो प्लॅस्टिक कागदाने सर्व बाजूंनी आच्छादून घ्यावा.  
  • मुरघास बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सायलोचे आकारमान किती असावे हे तुम्हाला किती किलो मुरघास बनवायचा आहे यावर अवलंबून असते. 
  • मुरघास किती प्रमाणात तयार करावा हे तुमच्याकडे असलेल्या जनावरांच्या संख्येवरून ठरवावे, तसेच किती काळ आणि किती प्रमाणात मुरघास जनावरांना द्यायचा आहे, ही बाब देखील लक्षात घ्यावी.  
  • समजा एखाद्या शेतकऱ्याकडे चार गाई आहेत आणि चाराटंचाईचा काळ ९० दिवस आहे. प्रत्येक गाईला प्रति दिवस २० किलो हिरव्या चाऱ्याची आवश्यकता आहे. म्हणजेच, 
  •  ४  गाई × २० किलो × ९० दिवस = ७,२०० किलो मुरघास 
  •  साधारण १ फूट × १ फूट × १  फूट एवढ्या जागेत १६ किलो हिरव्या चाऱ्याची कुट्टी मावते. ७२०० किलो मुरघास तयार करण्यासाठी ४५० घन फूट जागा लागेल (७२०० भागिले  १६) . त्यासाठी १५ फूट  लांब × ६ फूट रुंद × ५ फूट खोल असा एक किंवा ७.५ फूट लांब × ६ फूट रुंद × ५ फूट खोल या आकाराचे दोन खड्डे करावेत.
  • मुरघास देण्याची पद्धत  

  • खड्डा भरल्यानंतर दीड ते दोन महिन्यांत मुरघास तयार होतो 
  • मुरघास दिसायला सोनेरी हिरवट असतो, त्याचा आंबट-गोड वास येतो. 
  • मुरघास सायलो मधून जनावरांना खाण्यासाठी काढायचा असल्यास एका बाजूने उघडून आवश्यक तेवढा मुरघास बाहेर काढावा, पुन्हा झाकून टाकावा.
  • सायलो पूर्णपणे उघडू नये असे केल्यास सायलोमध्ये हवा शिरते. मुरघास खराब होऊ शकतो.
  • मुरघास जनावरांना टप्प्याटप्प्याने रोज कोरडी वैरण व पशू खाद्यासोबत द्यावा. 
  • जनावरांना मुरघास खाण्याची आवड निर्माण झाल्यानंतर त्यांच्या इच्छेप्रमाणे खाऊ घालावा.     
  • मुरघासाचे फायदे 

  • हिरव्या चाऱ्याची प्रत व दर्जा कायम राखला जातो.
  • हिरवी वैरण उपलब्ध नसते, अशा काळात हिरवी वैरण म्हणून दुधाळ जनावरांना पर्याय.
  • दूध उत्पादनात सातत्य टिकून राहते त्यामुळे नियमितपणा येतो. 
  • हिरवी वैरण एकाच वेळी जमिनीवरून मुरघास बनवण्याकरिता कापणी केल्याने जमीन इतर लागवडीकरिता मोकळी होते.
  • कमी जागेत जास्तीत जास्त वैरण साठवून ठेवता येते.
  • -  डॉ. गणेश गादेगावकर, ९८६९१५८७६० (पशू पोषण शास्त्र विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com