शहर अन् गावाचा अनोखा मिलाफ - सिलेज

Dr.Kakodkar Sir Interact with Cillage team of BAIF
Dr.Kakodkar Sir Interact with Cillage team of BAIF

‘सिलेज' ही संकल्पना ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ  डॉ. अनिल काकोडकर यांच्या वैचारिक बैठकीतून आकाराला आली. शहर (सिटी) आणि गाव (व्हिलेज) यांचा नावीन्यपूर्ण मिलाफ म्हणजे ‘सिलेज’ होय. या प्रकल्पांतर्गत आदिवासी शेतकरी कुटुंबीयांच्या उन्नतीसाठी विविध उपक्रमांना सुरुवात झाली आहे.  

देशातील नामांकित संस्था सिलेजमध्ये प्रत्यक्ष सहभागी झाल्या आहेत. यामध्ये बाएफ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार, एमकेसीएल आणि बीएआरसी या संस्थांचा समावेश आहे. डॉ. काकोडकर यांना विज्ञानाच्या बरोबरीने शेती व ग्रामविकासात कमालीचा रस आहे. बाएफमध्ये एक विश्वस्त म्हणून डॉ. काकोडकर कार्यरत आहेत. राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष म्हणून विज्ञान आणि बाएफ संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भाग आणि शेतशिवाराशी डॉ. काकोडकर जोडलेले आहेत. त्यांनी नुकतीच नंदूरबार परिसराला भेट देऊन सिलेज उपक्रमात सहभागी झालेल्या संस्थांशी चर्चा केली.  अशी आहे सिलेज संकल्पना राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे सल्लागार अजित पाटणकर म्हणाले की, गेल्या दोन दशकांपासून आम्ही डॉ. काकोडकर यांच्यासोबत सिलेज संकल्पनेवर काम करीत आहोत. खेड्यांमध्ये समृध्दी, नावीन्यपूर्ण उपक्रमातून विकास साधण्यासाठी ज्ञान, तंत्रज्ञानाचा वापर करून उद्यमशिलता आणण्याचा हेतू आहे. ही संकल्पना व्यापक, मानवी समूह, निसर्गाची उन्नती साधणारी आहे. याचा विकास हळूहळू होत असला तरी तो शाश्वत आहे. नंदूरबारमधील बाएफचे वरिष्ठ प्रकल्पाधिकारी लिलेश चव्हाण म्हणाले की, सिटी लाईक व्हिलेज किंवा सिटी इन द व्हिलेज अशी संकल्पना डॉ. काकोडकर यांनी मांडली. त्यातून बाएफ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, नंदूरबार, एमकेसीएल आणि बीएआरसी, राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग अशा नामांकित संस्थांनी प्रेरणा घेतली. सिलेज प्रकल्पातून पंढरपूर, नंदूरबार भागात काही संकल्पना मूर्त रुपात येत आहेत. शैक्षणिक साधनांचा विकास  खानदेशात विविध संस्थांच्या माध्यमातून आकाराला येणारा असलेला सिलेज प्रकल्प सुमारे २५ कोटी रुपयांचा आहे. पहिल्या टप्प्यात २५ गावांची निवड झाली आहे. इतर गावांमध्ये सर्वेक्षण सुरू आहे. सव्वाशे कोटी भारतीयांच्या जीवनमानाचा पाया शेती हाच असल्याने खेड्यांमधील ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांच्या परंपरागत ज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड दिल्याशिवाय प्रगती साधली जाणार नाही. ग्रामीण कुटुंबांच्या उन्नतीसाठी सिलेजमधून पैसा हाती येईल. ग्रामीण भागात उच्च शिक्षण, विकास व तंत्रज्ञानयुक्त वातावरण निर्माण करणे ही आपली प्राथमिकता असायला हवी. शहरी सुविधा, ज्ञान विकास, तंत्रज्ञान हे सर्व ग्रामीण परिसरांकडे वळवणारे वातावरण आपण निर्माण करायला हवे. सिलेज संकल्पनेमागे हाच विचार असल्याचे डॉ. काकोडकर नमूद करतात.  सिलेजमधून ग्रामीण भागातील आदिवासी शेतकऱ्यांना शहरी शिक्षण आणि ज्ञान अशा दोन्ही पातळ्यांवर बांधण्यासाठी सायबर मंच तयार होत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची सांगड घातलेले ‘उद्योजक संसाधन केंद्र’ तयार होत आहे. कष्टकरी आदिवासी शेतकरी कुटुंबातील मुलांमधून नवउद्योजक तयार करण्याचा केंद्राचा हेतू आहे. यासाठी एक अभ्यासक्रम तयार होत आहे. याचबरोबरीने  पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांनी दिली.  बाएफच्या प्रमुख कार्यक्रम समन्वयक राजश्री जोशी म्हणाल्या की, स्थानिक संस्था आणि घटकांना बरोबर घेत वैज्ञानिक पायावर ग्रामीण भागातील समूहांचा सर्वांगीण विकास हा सिलेजचा हेतू आहे. त्यामुळे पारंपरिक शिक्षण देणारी विद्यापीठे किंवा कृषी शिक्षण देणारे कृषी विज्ञान केंद्रांचा यात सहभाग आहे. 

संशोधनासहीत बीजोत्पादन  कोणताही आदिवासी दुर्गम भाग पाहिल्यास बियाणे हा पारंपरिक शेतीचा आत्मा आहे. शेकडो पिढ्यांपासून शेतकऱ्यांनी विविध पिकांच्या अनेक जाती निवडल्या. त्यात सुधारणा केल्या आणि त्याचा अन्न व पोषण सुरक्षा, आर्थिक उन्नतीसाठी वापर केला. परंतु, सध्या सुरू असलेल्या एकांगी पद्धतीच्या पीक जाती सुधारणा कार्यक्रमामुळे अनेक जाती दुर्मिळ झाल्या. निवडक जातींच्या लागवडीखाली हजारो एकर जमीन आली आहे. यामुळे जैवविविधता धोक्यात आली. जनुकीय विविधता ही जातींमधील विविधता टिकवण्यासाठी देखील अत्यंत आवश्यक आहे. सिलेज प्रकल्पात बाएफकडून हीच बियाणे विविधता जोपासण्याचा सूक्ष्म विचार केला जात आहे. नंदूरबार भागातील वातावरण बदलात तग धरणाऱ्या, पोषण समृद्ध, कीड-रोग प्रतिकारक स्थानिक वाणांचा शोध घेऊन लोकसहभागातून संवर्धन करण्याचा बाएफचा प्रयत्न आहे.  तयार होताहेत बियाणे बॅंका  शेतकऱ्यांच्या पारंपरिक बियाणांच्या संवर्धनावर सिलेजमध्ये बारकाईने काम व्हावे, अशी डॉ. काकोडकर यांची इच्छा आहे. याबाबत बाएफमधील पीक जातींचे अभ्यासक संजय पाटील म्हणाले की, पिकांच्या पारंपरिक जाती आणि त्या संदर्भात स्थानिक ज्ञानाचे माहिती संकलन सिलेज प्रकल्पाच्या माध्यमातून होत आहे. केवळ बियाणे संकलन नव्हे तर शेतकऱ्यांकडील पारंपरिक जातींमधील गुण वैशिष्ट्ये, पोषणतत्वे, जनुकीय बाबींवर संशोधन सुरू आहे. पीकनिहाय संवर्धन केंद्रे तयार करून प्रत्यक्ष शेतावर शेतकरी सहभागातून बियाणे निवड, संवर्धन आणि उत्पादन घेण्याचे ध्येय आहे. बियाणे बँका निर्माण करून देवाणघेवाण आणि धान्य विक्री केली जाईल. बियाणे संवर्धक शेतकऱ्यांचे जाळे तयार करणे,मेळावे व बियाणे प्रदर्शनातून संकल्पनेचा प्रसार सुरू आहे. जनूक कोष संकल्पनेला गती  पालघर भागात २००९ मध्ये बाएफने स्थानिक पीक जाती आणि पोषणाच्यादृष्टीने उपयुक्त जंगली वनस्पती संवर्धनाचा कार्यक्रम सुरू केला. शेतकऱ्यांना भेटून पिकांच्या स्थानिक जातीबद्दल ज्ञानाचे संकलन, शास्त्रीय अभ्यास, बीजोत्पादन, मूल्यवर्धन तसेच विक्री व्यवस्था हे मुख्य हेतू होते. महाराष्ट्र जनुक कोश कार्यक्रमामुळे ही संकल्पना शासनाने उचलून धरली. राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाने गती दिली. आयोग आणि राज्य शासनाच्या समन्वयातून २०१४ पासून जव्हार (पालघर), अकोले (नगर), जुन्नर (पुणे), धडगाव (नंदुरबार), एटापल्ली (गडचिरोली), कुडाळ (सिंधुदुर्ग) येथे जनुक कोषासंबंधी काम सुरू आहे. सिलेजमध्ये ग्राम बीजोत्पादनाला महत्त्व आहे. पारंपरिक बियाण्यांवर बाएफ पहिल्यापासून काम करत आहे. बीबीसीने २०१८ मध्ये जगातील १०० महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांच्या यादीत बियाणे संवर्धक राहीबाई पोपेरे (अकोले, जि. नगर) यांचा समावेश केला. राहीबाईंच्या कष्टाला शास्त्रशुद्ध मार्गदर्शनाची जोड बाएफकडून मिळत आहे. हे लक्षात घेऊन डॉ. काकोडकर यांनी बाएफ संस्थेला सिलेज संकल्पनेत सामावून घेतले आहे.    - लिलेश चव्हाण, ९४२२९९५१२१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com