Agriculture Agricultural News Marathi article regarding snake bites in animals. | Agrowon

जनावरातील सर्पदंशाचे निदान अन्‌ उपचार

डॉ. अनिल भिकाने, डॉ. रविंद्र जाधव
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

जनावरांना नागदंश व मण्यार दंश झाल्यास मज्जासंस्था बाधित होऊन अर्धांगवायू सदृश लक्षणे आढळून येतात. घोणस व फुरसे यांचा दंश झाल्यास रक्तातील घटकांशी निगडीत लक्षणे दिसतात. लक्षणे तपासून विषबाधा वेळीच उपचार करून आटोक्यात आणावी.

सध्याच्या काळात चराईला जाणाऱ्या जनावरांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सर्पदंश दिसून येत आहे. जनावरांना नागदंश व मण्यार दंश झाल्यास मज्जासंस्था बाधित होऊन अर्धांगवायू सदृश लक्षणे आढळून येतात. घोणस व फुरसे यांचा दंश झाल्यास रक्तातील घटकांशी निगडीत लक्षणे दिसतात. लक्षणे तपासून विषबाधा वेळीच उपचार करून आटोक्यात आणावी.

आ पल्या देशात जवळपास ६० विषारी सापांच्या प्रजाती आढळतात.त्यामधील नाग, मण्यार, फुरसे व घोणस या प्रमुख आणि अत्यंत विषारी प्रजाती आहेत. सापाच्या प्रजातीप्रमाणे प्रामुख्याने सहा वेगवेगळ्या प्रकारचे विष (नेक्रोटीक, मज्जासंस्थेस  बाधा करणारे, रक्त गोठवण थांबविणारे, रक्त गोठविणारे,  पेशींना इजा करणारे,  रक्तातील लाल पेशींना इजा करणारे व रक्तस्राव करणारे) बाधित जनावरांमध्ये लक्षणे व विषबाधा करण्यास कारणीभूत ठरतात. 

सर्पदंशाचे जास्त प्रमाण प्रामुख्याने पावसाळ्यात आढळून येते. पावसाळ्यात पावसामुळे कुरणात उंच वाढलेले दाट गवत जिथे साप राहतात, अशा ठिकाणी जनावरे चरावयास गेल्यास त्यांचा संपर्क सापाशी येऊन दंश होण्याची शक्यता असते. ग्रामीण भागामध्ये मशागतीची कामे आटोपून सायंकाळी उशिरा व सकाळी लवकर चरावयास सोडलेले बैल हे सर्पदंशास जास्त प्रमाणात बळी पडतात. याशिवाय चरावयास जाणाऱ्या गायी-म्हशीही सर्पदंशास बळी पडतात. गोठ्याशेजारी स्वच्छता नसेल व अडगळीची जागा असेल तर निवाऱ्यासाठी गोठ्यात बांधलेली जनावरेही सर्पदंशास बळी पडू शकतात. 

प्रमुख लक्षणे 
नाग (कोब्रा) दंश

 • नागामध्ये प्रामुख्याने मेंदू व हृदय या अवयवांना इजा करणारे विष असते. नाग दंश झाल्यानंतर बाधित जनावरांमध्ये दंश झालेल्या जागेवर सूज येणे, तोंडातून लाळ गळणे, अर्धांगवायूसदृश लक्षणे दिसणे, जनावराचा तोल जाणे अशी लक्षणे दिसून येतात. 
 • वेळेत उपचार न झाल्यास अशी जनावरे श्वसनसंस्थेच्या अर्धांगवायूने मृत्यू पावतात.

फुरसे व घोणस (व्हायपर) दंश

 • प्रजातींमध्ये रक्त गोठवणं थांबविणारे, रक्तातील लाल पेशींना इजा करणारे व रक्तस्राव करणारे विषारी घटक असतात. 
 • बाधित जनावराच्या शरीरावर ज्या ठिकाणी दंश केला आहे, त्या ठिकाणाहून रक्तस्राव होणे, पायावर दंश झाल्यास सूज मोठ्या प्रमाणात वरच्या दिशेने चढत जाणे, वेदना होणे, अस्वस्थ वाटणे, चालताना लंगडणे, खाणे-पिणे मंदावणे इत्यादी लक्षणे आढळून येतात. 
 • दंश तोंडाच्या भागामध्ये झाला असल्यास तोंडावर जास्त प्रमाणात सूज येते. ती खालच्या बाजूस असेल तर श्वसनास त्रास होतो. योग्य उपचार न झाल्यास जनावर दगावू शकते. 
 • या सर्पदंशात रक्त गोठवणाऱ्या पेशींची (प्लेटलेट्स) संख्या कमी होते. उपचारास विलंब झाल्यास जनावरांमध्ये विविध अवयवातून रक्तस्राव होऊ शकतो. नाकातून, आतड्यातून (रक्तमिश्रित शेण), लघवीतून (रक्तमिश्रित लघवी) रक्तस्राव होऊन जनावरांत रक्तक्षय होतो. 
 • वेळेवर उपचार न मिळाल्यास बाधित जनावरे तीव्र रक्तस्राव होऊन दगावतात.

मण्यार (कॉमन क्रेट) दंश

 • मण्यारमध्ये मज्जासंस्था तसेच रक्ताशी निगडीत अवयवांना इजा करणारे विष असते. 
 • दंश झालेल्या ठिकाणी मोठी सूज येणे, श्वसनाचा वेग वाढणे, रक्तस्राव होणे, हृदयाचे ठोके वाढणे, ताप येणे, अशक्तपणा व नंतर बसून राहणे अशी लक्षणे दिसून येतात.
 • वेळेवर उपचार न झाल्यास श्वसनसंस्थेचा अर्धांगवायू होवून जनावरे दगावतात.

प्रतिबंध आणि उपाययोजना  

 • जनावरांना सुरक्षित निवारा उपलब्ध करून द्यावा. 
 • गोठ्यात व परिसरात कोणत्याही प्रकारची अडगळ नसावी. परिसर नियमितपणे स्वच्छ ठेवावा.
 • जनावरांना दाट कुरणात चरावयास सोडणे शक्यतो टाळावे.चराऊ जनावरांना कुरणात चरावयास नेल्यानंतर नियमित निरीक्षणाखाली ठेवावे.
 • जनावरांना सर्पदंश झाल्याचे निदान झाल्यास दंश झालेल्या ठिकाणी रक्तस्राव, सूज येणे अशी लक्षणे अर्ध्या तासात दिसून आल्यास तात्काळ पशुवैद्यकाकडून योग्य औषधोपचार करून घ्यावा.
 • सापाच्या आकार, लांबी व रंगावरून सर्वसाधारणपणे सापाचा प्रकार ओळखायला सोपे असून असा साप विषारी आहे याची खात्री करावी.
 • सर्पदंश झाला म्हणून किंवा जनावराच्या शेजारून साप गेलेला पाहून पशुपालकांनी अजिबात घाबरून जाऊ नये. आपल्या जनावरांस पायावर किंवा तोंडावर सूज येण्यास सुरुवात होणे किंवा दंश झालेल्या ठिकाणी चाव्याची खूण (फ्यांग मार्क) दिसणे व रक्तस्राव दिसणे अशी लक्षणे दिसली तरच तत्काळ पशुवैद्यकीय डॉक्टरांची मदत घ्यावी. याविरुद्ध उपरोक्त नमूद प्रसंग घडूनही जनावरांत कोणतेही लक्षण न दिसल्यास जनावर फक्त निरीक्षणाखाली ठेवावे जेणेकरून सर्पदंश यशस्वी किंवा अयशस्वी होता हे ठरविता येईल. 
 • यंत्राद्वारे रक्त तपासणी व रक्त गोठवण वेळ तपासणी करून त्यामध्ये रक्त गोठवणाऱ्या पेशींची  (प्लेटलेट्स) संख्या कमी झाल्यास व रक्त गोठवण्यास जास्त वेळ (> २० मिनिटे) लागल्यास सर्पदंशाच्या तीव्रतेचा अंदाज बांधता येतो. अशा जनावरांवर पशुवैद्यकाकडून तात्काळ उपचार करून घ्यावेत.

सर्पदंशावर  उपचार पद्धती  
गाई,म्हशी ः घोणस व फुरसे सर्पदंश झाल्यास सुरुवातीला २० मिली पॉली व्हॅलंट अॅन्टी-स्नेक व्हेनम शिरेतून व त्यानंतर १० -२० मिली पहिल्या २४ तासात लक्षणांच्या तीव्रतेनुसार, प्रतिजैविके ५-७ दिवस.
नर व भाकड मादी जनावर ः  डेक्झामीथॅसोन ८०, ४० व २० मिलिग्रॅम शिरेतून पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी व तदनंतर वेदनाशामक औषधे (मेलोक्झीकॅम)
गाभण जनावरांत वेदनाशामक औषधे (मेलोक्स्सीकाम) ५-९ दिवस, डेक्सट्रोज सलाईन ४-६ लिटर ५ दिवस, फ्रुसेमाइड १ मिग्रा/किलो ५ दिवस, कारबझोक्रोम सॅलीसायलेट १० मिली ३-५ दिवस, ब जीवनसत्त्व ५-१० मिली ५ दिवस व लोह खनिजयुक्त गोळ्या पाचव्या दिवसापासून पुढे १० दिवस.
(टीप ः सदर उपचार पशूतज्ज्ञांकडूनच करून घ्यावेत.)  

  - डॉ. अनिल भिकाने, ९४२०२१४४५३
  - डॉ. रविंद्र जाधव,९४०४२७३७४३
(डॉ. भिकाने हे स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला येथे सहयोगी अधिष्ठाता आणि
डॉ. जाधव पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, 
उदगीर, जि. लातूर येथे कार्यरत आहेत)

 

 

टॅग्स

इतर कृषिपूरक
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
व्यवस्थापन म्हशींच्या माजाचेदुग्ध व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी म्हशीने दर १३...
सुधारीत पद्धतीने लाव्ही पक्षीपालनजपानी लाव्ही पक्षांची खाद्याची गरज फार कमी असते....
जनावरांची रक्त तपासणी महत्त्वाची...आजार करणारे रोगजंतू जनावरांच्या शरीरामधील आंतरिक...
गोठ्यातील माश्यांचे एकात्मिक व्यवस्थापनगोठ्यात होणाऱ्या अस्वच्छतेमुळे कीटकवर्गीय...
जनावरांतील परोपजिवींचे नियंत्रण...सध्याच्या काळातील परोपजिवींच्या प्रादुर्भावामुळे...
पावसाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनपावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आर्द्रता वाढते आणि अशा...
दुधाळ जनावरांच्या आहारात कॅल्शिअम...जनावरांच्या खाद्यामध्ये विकसित होणारी बुरशी तसेच...
प्रसुती दरम्यान जनावरांची काळजीगाभण जनावरांना शेवटचे तीन आठवडे रानात तसेच डोंगर...
गाई, म्हशीमधील प्रजनन व्यवस्थापनकालवडी साधारण १२ ते १८ महिने आणि वगारी २४ ते ३६...
स्वीकारा फक्त दुग्धसमृद्धी रेतमात्राभरपूर उत्पादक पिढी देणाऱ्या रेतमात्रेचा वापर...
मजुरांशिवाय कुटुंब झाले दुग्धव्यवसायात...पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यालगत शहरीकरण वाढले...
बाजारपेठेत वाढतेय ‘चीज'ला मागणीआपल्या देशामध्ये प्रामुख्याने प्रक्रियायुक्त चीज...
लंम्पी स्कीन डिसीज आजाराचे नियंत्रणलंम्पी स्कीन डिसीज हा प्रामुख्याने गाई, बैल,...
दुग्धोत्पादनासाठी प्रजननाची पंचसूत्रीदुग्धोत्पादन हे गाई,म्हशींच्या प्रजननावर अवलंबून...
अन्न सुरक्षेेचा प्रश्न ऐरणीवर...अंतर्गत संघर्ष, हिंसा या मानवी कारणांसोबतच विविध...
जनावरांतील धर्नुवाताची लक्षणे अन्...जनावरांच्या शरीरावरील जखमांतून धर्नुवात आजाराचे...
परसबागेमध्ये वनराजा कोंबडीपालनमुक्तपद्धत, अर्धबंदिस्त पद्धत आणि, बंदिस्त...
शेळ्या- मेंढ्यांमधील आंत्रविषारमोठ्या शेळ्या-मेंढ्या तीव्रतेनुसार काही...
शेततळ्यातील मत्स्यपालन झाले उत्पन्नाचे...करडा (जि. वाशीम) येथील कृषी विज्ञान केंद्राने...