प्रक्रिया उद्योगासाठी सोलर ड्रायर

SOLAR DRYER
SOLAR DRYER

सौरऊर्जेचा वापर करून पदार्थ वाळवणे हा सर्वोत्कृष्ट व स्वस्त पर्याय उपलब्ध आहे. अशा प्रकारे प्रक्रिया केलेल्या पदार्थांना लागणारे मनुष्यबळ रोजगार निर्मितीकरिता निश्चित स्वरुपात हातभार लावेल. त्याचप्रमाणे अशा प्रक्रियांचा उपयोग करून मत्स्य व्यावसायिक व शेतकरी वर्ग यांचे होणारे नुकसान टाळता येईल.

सूर्याच्या उष्णतेचा उपयोग पदार्थ वाळविण्यासाठी करण्यात येतो. अन्नपदार्थ टिकविणे व त्यातील पाण्याचा अंश कमी झाल्यास एकूण वजन कमी होऊन हाताळणी सुलभ होते. मात्र उघड्यावर खाद्यपदार्थ वाळविल्यास त्यामध्ये खालील त्रुटी आढळतात.

  • वाळवणी प्रक्रियेवर नियंत्रण नसल्यामुळे आवष्यकतेपेक्षा कमी किंवा जास्त प्रमाणात पदार्थ वाळविले जातात.
  • समप्रमाणात वाळविण्यात न आल्यामुळे एकूण प्रत व दर्जा खालावतो.
  •  अन्नपदार्थांची नासाडी होते.
  •  पाऊस व धूळ यापासून संरक्षण नसते.
  •  पशु, पक्षी, उंदीर, कीड, कीटक इत्यादींपासून मोठया प्रमाणात नुकसान होते.
  • सौर वाळवणी संयंत्र (सोलर ड्रायर)

    सौर वाळवणी यंत्रामध्ये पदार्थ ठेवण्यासाठी एक बंदिस्त भाग असतो. ज्याचा अंतर्भाग काळ्या रंगाने रंगविण्यात आलेला असतो व पारदर्शक काचेच्या सहाय्याने सूर्यकिरणे आतील भागांवर पडतात. काळ्या रंगाद्वारे ही सरळ पडणारी किरणे शोषली जातात व अंतर्भागातील तापमान वाढते. पदार्थांमधील पाण्याचे बाष्पात रुपांतर होते. याकरिता सूर्यापासून मिळणारी उष्णता व अंतर्भाग गरम झाल्यामुळे निर्मित उष्ण वायू या दोघांचा वापर होतो. नैसर्गिक वायू झोताचा वापर काही संयंत्रामध्ये करण्यात येतो किंवा पंख्याच्या सहाय्याने संकलकातील उष्ण वायू पदार्थांवर सोडण्यात येतो. या प्रकारची वाळवणी यंत्रे जादा कार्यक्षम असून, मोठ्या प्रमाणावर तसेच अल्पावधीमध्ये पदार्थ वाळवू शकतात. 

    सौर ड्रायरचे फायदे

  • पशू, पक्षी, उंदीर, कीटक इत्यादीपासून वाळवण पदार्थांचे संरक्षण होते.
  • धान्य, भाजीपाला व फळे वेगाने (लवकर) सुकविल्यामुळे नुकसान कमी होते.
  • साठवणीच्या काळात पदार्थाला बुरशी लागण्याचे प्रमाण नगण्य असते. 
  • कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त ऊर्जा वापरली जात नाही.  
  • सौर वाळवणी संयंत्राचे विविध प्रकार

  • डायरेक्ट सोलर ड्रायर
  • इनडायरेक्ट सोलर ड्रायर
  • टनेल टाईप सोलर ड्रायर
  • डायरेक्ट सोलर ड्रायर

    डायरेक्ट सौर ड्रायरमध्ये मुख्यतः धान्य, फळे व भाजीपाला सुकविला जातो. या ड्रायरमध्ये सूर्याची किरणे काचेच्या पारदर्शक आवरणामधून वाळवण्याच्या पदार्थांमध्ये शोषली जातात. त्यामुळे या ड्रायरला डायरेक्ट सौर ड्रायर असे म्हणतात. ड्रायरचे मुख्य भाग 

  •   संकलक
  •  पारदर्शक काचेचे आवरण
  •  वाळवण पदार्थ ठेवण्याचा ट्रे
  •  गरम हवा जाण्याकरिता चिमणी
  •  सौर संकलकाचा आतील भाग काळया रंगाचा असून, त्याचा उपयोग उष्णता शोषून घेण्यासाठी होतो. या सौर ड्रायरमध्ये एकूण चार वाळवणी ट्रे असून, त्यामध्ये सरासरी १० ते १२ किलो धान्य किंवा १२ ते १५ किलो भाजीपाला सुकवला जाऊ शकतो. 
  •  सौर संकलकाच्या वर असलेल्या पारदर्शक काचेच्या आवरणातून सौर किरणे आतील असलेल्या काळ्या रंगामुळे शोषली जातात व आतील तापमान वाढते. 
  •  सौर संकलकातील गरम हवा व सूर्यकिरण या दोन्हींमुळे पदार्थांची आर्द्रता कमी होऊन पदार्थ लवकर सुकण्यास मदत होते.
  • वातावरणातील हवा आत जाण्यासाठी सौर ड्रायरच्या खालील बाजूस सच्छिद्र दार असते. वातावरणातील थंड हवा काळ्या रंगाच्या गरम संकलकाच्या संपर्कात येऊन वजनाने हलकी झाल्यामुळे नैसर्गिक गुणधर्माने वरच्या बाजूस सरकते. 
  • गरम हवा वरच्या बाजूने सरकताना पदार्थातील आर्द्रता शोषून घेते. वरील चिमणीवाटे सौर संकलकाच्या बाहेर जाते. यामुळे सौर संकलकातील पदार्थांची वाळवणी लवकर होते. 
  • -  हेमंत श्रीरामे, ९४२२५४५९१५  -  पूनम चव्हाण, ९४२२५४७८७३ (विद्युत आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com