stem borer
stem borer

ज्वारीवरील खोडकिडीचे नियंत्रण

सध्या ज्वारीवर खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्याच्या व्यवस्थापनासाठी त्वरित प्रयत्न करावेत.

सध्या ज्वारीवर खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्याच्या व्यवस्थापनासाठी त्वरित प्रयत्न करावेत.

महाराष्ट्रातील प्रमुख तृणधान्य असलेले ज्वारी हे पीक मानवी आहार आणि पशुआहार यासाठी उपयुक्त ठरतो. हे पीक खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात विशेषतः पावसाच्या पाण्यावर घेतले जातात. परिणामी उत्पादकता कमी आहे. त्याचबरोबर येणाऱ्या विविध किडींचा प्रादुर्भाव हे देखील ज्वारीचे उत्पादन कमी येण्यामागीस मुख्य कारणांपैकी एक आहे.  खोड किडा 

  • ही ज्वारीवरील महत्त्वाची कीड असून, तिच्या प्रादुर्भाव पूर्ण भारतात आढळून येतो. 
  • या किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या सर्व अवस्थेत आढळून येतो. 
  • ही कीड वर्षभर सक्रिय असते, मात्र रब्बी हंगामात उष्ण हवामानात जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. 
  • संकरित वाण या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात बळी पडतात. 
  • ओळख 

  • या किडीचा पतंग हा गवती रंगाचा असून, याचे समोरील पंख राखाडी पिवळसर रंगाचे असतात. त्यांच्या कडावर लहान लहान ठिपके असतात. मागील पंख पांढरट असतात. 
  • या किडीची अळी ही मळकट पांढऱ्या रंगाची असून, तिचे डोके तपकिरी रंगाचे असते. संपूर्ण शरीरावर गडद रंगाचे ठिपके असतात. पूर्ण वाढ झालेली अळी साधारणतः १२ ते १९ मि.मी. लांबीची असते.  तिच्या अंगावर चार विस्तारित पट्ट्या असतात. 
  • नुकसानीचा प्रकार 

  • नुकतीच अंड्यातून निघालेल्या लहान अळ्या सुरवातीला पानावर उपजीविका करतात. नंतर रोपाच्या मुख्य गाभ्यात शिरून तिथेच एक ते दोन दिवस उपजीविका करतात. मुख्य गाभ्यात शिरताना गाभ्याला छिद्र पडल्यामुळे ते पान उघडल्यानंतर तिथे एका सरळ रेषेत बारीक गोल छिद्रे दिसतात. नंतर अळी मुख्य खोडात शिरते. तिथेच उपजीविका करते. त्यामुळे पोंगे मर होऊन झाड मरून जाते. 
  • पीक लहान अवस्थेत असताना झालेल्या प्रादुर्भावामुळे नुकसान जास्त होते. 
  • या किडीचा प्रादुर्भाव कणसे बाहेर पडण्याच्या अवस्थेपर्यंत आढळून येऊ शकतो. जर असे झाल्यास कणसाच्या देठावर छिद्रे दिसतात. अशी धाटे चुकून वाऱ्याने मोडू शकतात. 
  • ही कीड मुख्यतः ज्वारीवर येत असली तरी ती मका, बाजरी, ऊस व अन्य काही तृणवर्गीय गवतावर  देखील आढळून येते. 
  • जीवनक्रम 

  • मादी पतंग पानाच्या खालच्या बाजूस मुख्य शिरेपाशी किंवा कधीतरी देठापाशी पुंजक्यामध्ये पांढऱ्या  रंगाची अंडी घालते. एक माशी ३०० पर्यंत अंडी देऊ शकते. 
  • अंड्यातून सहा दिवसांनी अळी बाहेर पडते. अळी अवस्था तीन ते चार आठवड्यांची असते. 
  • कोषावस्थेत जाण्यापूर्वी अळी पतंगाला बाहेर पडण्यासाठी खोडाला एक छिद्र पाडून खोडातच कोषावस्थेत जाते. कोषावस्था ७ -१० दिवसांची असते.
  • पतंग २-४ दिवस जिवंत राहू शकतो. 
  • अशा प्रकारे एक अळी तिचा जीवनक्रम सहा ते सात आठवड्यांत पूर्ण करते. एका वर्षात तिच्या चार पिढ्या पूर्ण करते. 
  • अळी अवस्थेत ही कीड धसकटात किंवा कडब्याच्या खोडामध्ये सुप्तावस्थेत राहू शकते.
  • एकात्मिक व्यवस्थापन 

  • जमिनीची खोल नांगरट व कुळवणी करून काडी, कचरा धसकटे वेचून शेत स्वच्छ ठेवावे. ज्वारीची कापणी झाल्यावर शेताची नांगरणी करून व त्यातील धसकटे गोळा करून नष्ट करावीत. त्यामधील सुप्त अवस्थेतील अळ्यांचा नाश होईल. 
  • रब्बी ज्वारीची पेरणी सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. 
  • काही कारणाने पेरणी लांबली तर इमिडाक्लोप्रिड (७० टक्के) ५ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे बीज प्रक्रिया केल्यानंतरच पेरणीसाठी वापरावे. 
  • प्रादुर्भावग्रस्त शेतातील मळणी झाल्यावर खळ्याभोवती अथवा  
  • मळणी यंत्राभोवती पडलेली कणसाचे अवशेष गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. त्यातील सुप्तावस्थेतील अळ्यांचा व कोषांचा नाश होईल. शिवाय साठवून ठेवलेले कुटार १५ मेपूर्वी जनावरांना खाऊ घालून संपवावे. 
  • नियंत्रण

  • खोडकिडीमुळे दहा टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळून आल्यास, साधारणतः उगवणीनंतर ३० दिवसांनी फवारणी प्रति लिटर पाणी ः 
  • क्विनॉलफॉस (२५ इसी) ३ मि.लि. किंवा क्लोरपायरीफॉस (२० टक्‍के प्रवाही) २.५ मि.लि. 
  • फवारणी करतेवेळी द्रावण पोंग्यात जाईल, याची दक्षता घ्यावी.    
  • टीप ः  कीडनाशकांची शिफारस लेबल क्लेम किंवा ॲग्रेस्को संमत आहे. 
  •  - डॉ. भैय्यासाहेब गायकवाड, ९४२०४५९८०८ (विषय विशेषज्ञ -कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com