‘स्ट्रॉबेरी‘ला बाजारपेठ विस्ताराची गरज

स्ट्रॉबेरी उत्पादक पट्यात पॅकहाउस आणि शीतकरण सुविधा महत्त्वाची आहे. त्यामुळे फळांची टिकवणक्षमता वाढेल. देश,विदेशातील बाजारपेठ विस्तारामुळे प्रक्रिया उद्योग वाढीला चांगली संधी आहे. यंदाच्या वर्षातील स्ट्रॉबेरी पिकाचा घेतलेला आढावा...
Strawberry fruits
Strawberry fruits

स्ट्रॉबेरी उत्पादक पट्यात पॅकहाउस आणि शीतकरण सुविधा महत्त्वाची आहे. त्यामुळे फळांची टिकवणक्षमता वाढेल. देश,विदेशातील बाजारपेठ विस्तारामुळे प्रक्रिया उद्योग वाढीला चांगली संधी आहे. यंदाच्या वर्षातील स्ट्रॉबेरी पिकाचा घेतलेला आढावा... महाराष्ट्रात स्ट्रॉबेरीची लागवड प्रामुख्याने सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी, वाई परिसरात केली जाते. या परिसराचा देशातील उत्पादनात ८५ टक्के इतका वाटा आहे. स्ट्रॉबेरी फळ मऊ आणि अत्यंत नाशवंत आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्मांसह पुष्कळ पौष्टिक मूल्य आहेत. महाबळेश्वर,पाचगणी पट्ट्यात स्ट्रॉबेरीची लागवड ब्रिटिश राजवटीपासून आहे. नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात स्ट्रॉबेरी उत्पादनाची क्रांती झाली. या काळात विविध जातींची मातृ रोपे आयात करणे आणि त्याची रोपे तयार करण्यास सुरुवात केली. यामुळे लागवड क्षेत्रात वाढ झाली, लहान, अल्पभूधारक स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न व जीवनमानही उंचावण्यास हातभार लागला. सध्या महाबळेश्वर,पाचगणी,वाई  पट्ट्यात स्ट्रॉबेरी लागवडीखालील क्षेत्र सुमारे ४५०० एकर आहे. सुमारे ४००० शेतकरी याची लागवड करतात. प्रत्येक शेतकऱ्याचे स्ट्रॉबेरी लागवडीखालील सरासरी क्षेत्र  एक एकर इतके आहे. एकरी अंदाजे १२ टनापर्यंत उत्पादन मिळते. शेतकरी साधारणतः ५० हजार रुपये प्रतिटन दराने विक्री करतात.  शेतकऱ्यांचा लागवड, पीक व्यवस्थापन आणि विक्रीचा खर्च वजा जाता  एकरी सुमारे दोन लाख रुपये नफा शिल्लक राहतो. हे बाजारपेठेतील दरावर अवलंबून आहे. मात्र प्रत्यक्षात हे उत्पन्न कमी आहे.  अमेरिकेसारख्या स्ट्रॉबेरी उत्पादक देशांमध्ये  श्रमांच्या खर्चाचा हिस्सा एकूण खर्चाच्या ९० टक्के इतका आहे. सातारा जिल्ह्यातील अल्पभूधारक ०.७५ एकर क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्याला सुमारे १.५ लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळते.यावरून असे लक्षात येते की, शेतकऱ्यांना मिळणारा परतावा हा अनुकूल हवामान परिस्थितीत मिळतो. मात्र मागील काही वर्षात प्रतिकूल हवामानामुळे निव्वळ परतावा खूप कमी झाला.       स्ट्रॉबेरीची बाजारपेठ  स्ट्रॉबेरीचे उत्पादन जसे वाढत गेले तसे पूर्वी पुणे आणि मुंबईसारख्या जवळपासच्या ठिकाणी मर्यादित असलेल्या बाजारपेठादेखील विस्तृत झाल्या.  हैदराबाद आणि बंगळुरूसारख्या दूरच्या बाजारपेठेत वाहतूक करणे शक्य झाली. निर्यातही  होऊ लागली. एकंदरीत, स्ट्रॉबेरी पिकाची लागवड ज्या भागात केली जात आहे त्या भागाच्या समृद्धीस निश्चितच हातभार लागला आहे. मात्र प्रतिकूल हवामानाचा पीक उत्पादनावर परिणाम होत असतो.

  • स्ट्रॉबेरी पिकासाठी यंदाचे वर्ष हे प्रतिकूल होते. जगभरातील कोरोना साथीमुळे  सर्व देशभरात लॉकडाऊन झाले. मोठा खरेदीदार उपलब्ध नसल्यामुळे काढणी थांबली. विक्रीच्या अडथळ्याचे  संकट आणखीच वाढले, कारण मागील हंगामातील पावसाळ्याचा कालावधी जास्त होता, त्यामुळे लागवड आणि काढणीस उशीर झाला. डिसेंबर २०१९ मध्ये पीक बाजारात येऊ लागले. स्थानिक पातळीवर महत्त्वाच्या प्रक्रिया उद्योगातील कंपनीची खरेदीक्षमता फेब्रुवारी २०२० मध्येच संपली होती. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मार्चमध्ये अचानक सर्व व्यवहार बंद झाले. त्यामुळे इतर प्रक्रिया, किरकोळ विक्री आणि दूरच्या बाजारपेठांत होणारी विक्री थांबली.
  • महाबळेश्वर-पाचगणीतील स्ट्रॉबेरी उत्पादक संघातील सदस्यांशी झालेल्या चर्चेत असे आढळून आले की, एप्रिल,मे महिन्यातही काही भागातील फळांची काढणी झाली नाही.विक्री न झाल्याने साठा पडून राहिला.किमती ४० टक्यांनी घसरल्या.त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघाला नाही. पश्चिमेकडील स्ट्रॉबेरी पट्यात सुमारे १५ ते २० कोटी रुपयांचे नुकसान झाले.
  • पुढील हंगामात ही स्थिती आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. कारण, स्वीट चार्ली, कॅमरोसा, नाबिला इत्यादी स्ट्रॉबेरी जातींची मातृरोपे अमेरिका, इटली, स्पेन आणि इतर देशांमधून आयात केली जातात. या देशांमध्ये कोरोना साथीचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे २०२०-२१ या हंगामात मातृरोपे आयात करणे शक्य होणार  नाही. प्रत्येक मातृरोपांपासून १५ रनर रोपे तयार होतात.प्रत्येकी सरासरी सहा रुपयांना हे रोप विकले जाते. रोपनिर्मितीमध्ये स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध होतो. परंतु आयात बंद असल्याने मातृ रोपांची उपलब्धता अनिश्चित आहे.
  • योग्य धोरणाची आवश्‍यकता 

  • स्ट्रॉबेरी उत्पादकांना  आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. ही परिस्थिती दूर करण्यासाठी सरकारने अनेक पाऊले उचलली आहेत.  
  • स्ट्रॉबेरी फळाला जाम, जेली, आइस्क्रीम, योगर्ट आणि डेसर्टस निर्मितीमध्ये मोठी मागणी आहे. मात्र पुरवठा कमी आहे. सध्या एकूण उत्पादनाच्या केवळ १० ते १५ टक्के उत्पादनावर प्रक्रिया केली जाते. 
  • स्ट्रॉबेरी पिकाला भौगोलिक निर्देशन मिळाले आहे. जागतिक बाजारपेठेत या फळाची स्पर्धात्मकता आहे.  
  • जागतिक आयातदारांकडून स्ट्रॉबेरीची मागणी ही गोठवलेल्या स्वरूपात आहे आणि भारत ही मागणी पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. म्हणूनच यासाठी पॅकहाउस आणि शीतकरण सुविधा महत्त्वाची आहे त्यामुळे टिकवणक्षमता वाढू शकेल आणि बाजारपेठ विस्तारामुळे प्रक्रिया उद्योग वाढू शकतील, असे स्थानिक शेतकरी आणि मोठ्या प्रक्रिया उद्योगांतील तज्ज्ञांनी सांगितले. प्रक्रिया उद्योगांनी पॅकहाऊस आणि शीतकरण सुविधांसाठी सरकारी पातळीवर परवानगीसाठी चर्चा केली आहे.याचा फायदा स्ट्रॉबेरी उत्पादकांच्या बरोबरीने इतर फळ उत्पादकांना होणार आहे. 
  •  - संगीता श्रॉफ, ९९२३०६३६८८

    गोखले अर्थशास्त्र  आणि राज्यशास्त्र संस्था, पुणे 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com