Agriculture Agricultural News Marathi article regarding success story of Khanjodwadi,Dist.Sangli | Page 3 ||| Agrowon

दर्जेदार डाळिंबाची खांजोडवाडी

अभिजित डाके
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

खांजोडवाडी (ता.आटपाडी,जि.सांगली) दुष्काळी पट्यातील एक गाव. परंतु प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गावकऱ्यांनी एकमेकांच्या सहकार्याने डाळिंबाच्या बागा फुलविल्या.

खांजोडवाडी (ता.आटपाडी,जि.सांगली) दुष्काळी पट्यातील एक गाव. परंतु प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गावकऱ्यांनी एकमेकांच्या सहकार्याने डाळिंबाच्या बागा फुलविल्या. डाळिंब पिकामुळे गाव शिवारात दरवर्षी सुमारे ५० कोटींची उलाढाल होते. शेती,जलसंधारण आणि ग्रामविकासामध्ये खांजोडवाडीने प्रगतीची दिशा पकडली आहे.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुका हा दुष्काळी टापू म्हणून ओळखला जातो. अत्यंत कमी पाऊस, अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या सुविधा आणि खडकाळ, डोंगराळ जमीन अशी या भागाची ओळख. याच तालुक्यातील माणगंगा नदीच्या परिसरात वसलेले खांजोडवाडी हे गाव. गावापासून माणगंगा नदी अवघ्या एका किलोमीटरवर. पण ती कोरडीच. १९९५ पूर्वीचा काळ, गाव लहान होतं, कोरडवाहू शेती. केवळ पावसावर पिके अवलंबून, यावर कुटुंब चालणे शक्य नव्हते. त्यामुळे गावातील लोक परजिल्ह्यात रोजंदारीवर जायचे. या मिळकतीवर आपला उदरनिर्वाह करायचे.  त्याकाळात ऊसतोडणी, शेतमजुरी हेच चरितार्थाचे मुख्य साधन. यातील अनेक जणांकडे जमिनी होत्या; पण त्या अगदी डोंगराळ. माळरानाशिवाय तेथे काहीच नाही. परंतु या सर्व प्रतिकूल परिस्थितीशी झगडत शेती सुधारणा तसेच प्रगती करण्याचा मार्ग शोधणारे काही धडपडे शेतकरी गावामध्ये होते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांनी गावशिवारातील माळरानामध्ये डाळिंब लागवडीतून आर्थिक प्रगतीची दिशा दाखविली.

डाळिंब लागवड क्षेत्रात वाढ 
साधारणपणे १९९५ नंतर गावकऱ्यांनी उपलब्ध परिस्थितीमध्ये शेतीचे नियोजन सुरू केले. पाण्याचा स्रोत नव्हता. त्यामुळे विहीर खोदण्यास सुरुवात केली. काही जणांच्या विहिरीला पुरेसे पाणी लागले.  काही शेतकऱ्यांनी कापूस लागवडीला सुरुवात केली. पिकही चांगले येऊ लागले. उत्पन्न ही अपेक्षित मिळाले. परंतु काही वर्षांनी कापूस लागवड थांबली. या दरम्यान  जिल्ह्याच्या इतर भागात पैसा देणारे पीक म्हणून डाळिंब लागवडीने गती घेतली होती. त्यामुळे गावातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी डाळिंब लागवडीला सुरुवात केली. पहिल्यांदा काही शेतकऱ्यांनी गणेश  जातीची लागवड केली. बहुतांश शेतकरी स्वतःच्या बागेमध्ये मजूर न लावता व्यवस्थापन सांभाळू लागल्याने लागवडीपासून ते विक्रीपर्यंत माहिती होत गेली.  हळूहळू कोणता बहर धरायचा, कशा पद्धतीने डाळिंबाची निगा राखायची याची माहिती झाली. पिकाचा अभ्यास पक्का होत गेला. त्यामुळे गावात हळूहळू डाळिंबाची लागवड वाढू लागली. गाव लहान असल्याने एकमेकांचे चांगले सहकार्य मिळू लागले. आता गावशिवारात भगवा जातीच्या डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. 

दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी टेंभू उपसा सिंचन योजना सुरू झाली.  या योजनेत सांगली जिल्ह्यातील कडेगाव, विटा, आटपाडी तालुक्यांचा समावेश होता. खांजोडवाडी परिसरातही टेंभूचे पाणी आले. ही योजना व्यवस्थित सुरू झाल्याने पाणी प्रश्न सुटला. डाळिंबाला कमी पाण्याची गरज असली तरी, भविष्यात पाणी कमी पडू नये यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या शेततळे योजनेत सहभाग नोंदविला. त्यामुळे आता गावातील अनेक शेतकऱ्यांच्याकडे एक एकरापासून ते दोन एकरापर्यंत शेततळी आहे. शाश्वत पाणी मिळाल्याने भगवा डाळिंबाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

बंधाऱ्यामुळे पाणी साठा
माणगंगा नदी ही सातारा जिल्ह्यातून आटपाडी परिसरात येते. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात म्हणजेच माण, खटाव भागात मुसळधार पाऊस झाला, तरच या नदीला पाणी येते. बहुतांश वेळा ही नदी कोरडीच असते. तालुक्यात पाऊस झाला तर पावसाचे पाणी नदी पात्रामध्ये साठावे आणि जमिनीत मुरावे यासाठी नदीवर २००७ मध्ये बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे काही प्रमाणात जमिनीतील पाणी साठा वाढण्यास मदत झाली. 

निर्यातक्षम डाळिंबावर भर

  जसजशी परिस्थिती बदलेल,त्याप्रमाणे युवा वर्गाने शिक्षण घेतले. अनेक जण नोकरी करू लागले. परंतु नोकरीत युवा वर्ग रमला नाही. नोकरी सोडून उपक्रमशील युवक गावी आले. शिक्षणाचा उपयोग त्यांनी शेती विकासासाठी केला. बाजारपेठेनुसार निर्यातक्षम डाळिंब उत्पादनाचे तंत्र शिकून घेतले. युवा शेतकऱ्यांनी एकत्र येत डाळिंब निर्यातीसाठी पुढाकार घेतला. गावातील तरुणांमध्ये डाळिंबशेतीची आवड निर्माण झाल्याने फळबागेचे क्षेत्र वाढले. उत्पन्नात वाढ होऊ लागली. आज या गावातून दिल्ली, पश्चिम बंगाल,केरळ,तामिळनाडू या राज्यात डाळिंब जातात. तसेच   चीन,रशिया,युरोप देशात डाळिंब निर्यात करणाऱ्या कंपन्या येथील डाळिंबाला पसंती देत आहेत. परदेशातील आयातदार देखील दरवर्षी या गावामधील डाळिंब लागवड क्षेत्राला भेट देतात. 
 

दृष्टिक्षेपात खांजोडवाडी 

 • गावाची लोकसंख्या ः ९३१
 •   कुटुंब संख्या ः १५०
 •   क्षेत्र ः ३१९ हेक्टर
 •   डाळिंब क्षेत्र ः २०० हेक्टर
 •   प्रत्येक कुटुंबाकडे ५०० ते १५,००० पर्यंत डाळिंबाची झाडे
 •   एकरी उत्पादन ः ८ ते १२ टन
 •   गावामध्ये ४०० मजुरांना वर्षभर रोजगार.
 •   डाळिंब निर्यात ः  युरोप, रशिया,चीन
 •   गावाचे डाळिंबातून उत्पन्न ः  ४० ते ५० कोटी
 •   शेततळ्यांची संख्या ः ७०
 •   आटपाडी बाजार समिती, यासह अन्य राज्यातील बाजारपेठेत डाळिंब विक्री
 •   स्थानिक बाजार पेठेत मिळणारा दर ः ५० ते ६० रुपये प्रति किलो
 •  युरोप निर्यात मिळणारा दर ः १०० ते १३० रुपये प्रति किलो
 •  गलाई व्यवसायातील संख्या ः १००
 •  शिक्षकांची संख्या ः १५
 •  लोकसहभागातून शाळा आणि ग्रामदैवत श्री. भैरवनाथ मंदिराची उभारणी.
 •  प्रत्येक घरात पिण्याचे पाणी, स्वच्छतेवर भर.
 •  बिनविरोध निवडणुकीची परंपरा. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त अभियानाचा पुरस्कार.

डाळिंबातून प्रगती
आम्ही रोजंदारीवर जायचो. मजुरीसाठी बुलडाणा येथे गेलो होतो. सुमारे १० वर्षे तिथे कराराने शेती कसायला घेतली होती. ते काम सोडून आम्ही पुन्हा गावाकडे आलो. घरी बैल जोडी होती. सकाळी सात वाजता बैलजोडी घेऊन दुसऱ्याच्या शेतात जाऊन मशागत करायचो. घरची ५१ एकर शेती परंतु पाणी नसल्याने काहीच पिकवू शकत नव्हतो. मात्र परिसरातील डाळिंबाची शेतीचा अभ्यास केला आणि आमच्या जमिनीत लागवड सुरू केली. आता संपूर्ण क्षेत्र डाळिंब लागवडीखाली आणले आहे. यातूनच आमची आर्थिक प्रगती झाली आहे.
मच्छिंद्र सूर्यवंशी, प्रकाश सूर्यवंशी 

एकजुटीने शेती विकास
कोरडवाहू पट्ट्यात पैसा देणारे पीक म्हणून डाळिंबाकडे आम्ही पाहतो. डाळिंब पिकाने आमचे जीवनमान उंचावले आहे. आम्ही कुटुंबातील सर्वजण एकजुटीने शेती करत असल्याने कोणतीही अडचण येत नाही.
— लालासो सूर्यवंशी

निर्यातक्षम उत्पादनावर भर
गावातील आम्ही  शेतकरी एकत्र येऊन डाळिंबाची निर्यात करू लागलो आहोत. यामुळे डाळिंबाला चांगला दर मिळाला, आर्थिक प्रगतीदेखील झाली. सर्व शेतकरी एकजुटीने डाळिंब शेती करत असल्याने गावाला चांगला फायदा होत आहे.
— पोपट सूर्यवंशी

डाळिंबाने आणली समृद्धी
अल्पभूधारक शेतकरी आज डाळिंब पिकातून सक्षम झाला आहे. आमदार अनिल बाबर यांच्या पुढाकाराने आमच्या गावात टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी आले. त्यामुळे गावाचा कायापालट झाला. ग्रामविकासाचे विविध उपक्रम आम्ही राबवीत आहोत.
— रामदास सूर्यवंशी, (सरपंच) ९७६३६४०२२३

 

 

 

 

 


फोटो गॅलरी

इतर ग्रामविकास
लोकसहभागातून हिंगणगाव झाले ‘पाणी’दारपाणीटंचाई आणि कित्येक वर्षांपासून दुष्काळाशी...
चुडावा बनले रेशीम शेतीचे क्लस्टरचुडावा (ता.पूर्णा,जि.परभणी) गावातील येथील...
स्वच्छ, सुंदर स्मशानभूमीसाठी ग्रामस्थ...परभणी : जिल्ह्यातील आव्हई (ता.पूर्णा) येथील...
शेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात...पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता....
गावी परतलेल्यांसाठी आधार ठरेल मनरेगाग्रामीण भागातील लोकांना काम मिळण्याचा हक्क अबाधित...
बारीपाडा शिवारात रुजली शाश्वत शेती,...बारीपाडा (जि.धुळे) गावाने शाश्वत शेती, वनीकरण आणि...
जलसंधारणातून प्रगतीकडे पाऊल कोळपांढरी (ता.शहादा,जि.नंदुरबार) येथील...
डोंगरदऱ्यातील कुमशेत आर्थिक उन्नतीच्या...एकेकाळी ओसाड माळरानावर वसलेले व टँकरचे गाव म्हणून...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
गावातच होणार शेती नियोजनगावच्या शेतीचे नियोजन आता गावातच होणार आहे. कृषी...
लोकसहभागातून देशवंडी झाले पाणीदारजिल्ह्यातील देशवंडी(ता.सिन्नर) हे डोंगराळ भागात...
मावळंगे बनले रोपवाटिकांचे गावसाधारणपणे १९६५ मध्ये मावळंगे (जि.रत्नागिरी) गावात...
शेती, जलसंधारण, ग्रामविकासामधील ‘दिलासा‘ग्रामीण भागातील वंचित घटकांचा उत्कर्ष नजरेसमोर...
दर्जेदार डाळिंबाची खांजोडवाडीखांजोडवाडी (ता.आटपाडी,जि.सांगली) दुष्काळी...
जैवविविधता, कृषी अन् शिक्षणाचा जागरबत्तीस शिराळा (जि.सांगली) या तालुक्यातील युवकांनी...
लोकसहभागातून दुष्काळावर केली मात कोठली (जि.नंदुरबार) गावातील पाणीटंचाई...
पुणेवाडीचे शिवार एकीतून झाले पाणीदारपुणेवाडी (ता. पारनेर, जि.नगर) या पठारावरील...
तंत्रज्ञानावर आधारीत शेतीतून लाखेगावची...औरंगाबाद जिल्ह्यातील लाखेगावातील शेतकऱ्यांनी...