वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळख

सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी (ता. पलूस) गावातील सतरा महिला एकत्र आल्या. त्यांनी श्री गणेश ग्राम महिला बचत गटाची स्थापना केली. या गटाच्या माध्यमातून वनीकरणासाठी लागणाऱ्या रोपांची रोपवाटिका तयार करून वेगळी ओळख तयार केली आहे.
forest nursery
forest nursery

सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस) गावातील सतरा महिला एकत्र आल्या. त्यांनी श्री गणेश ग्राम महिला बचत गटाची स्थापना केली. या गटाच्या माध्यमातून वनीकरणासाठी लागणाऱ्या रोपांची रोपवाटिका तयार करून वेगळी ओळख तयार केली आहे. याच बरोबरीने प्रक्रिया उद्योगाच्या दिशेने गटाची वाटचाल सुरू आहे. ग्रामीण भागातील कष्टकरी महिला आपल्या शेतीसह दुसऱ्याच्या शेतामध्ये गरजेनुसार रोजंदारीला जाऊन संसाराला आर्थिक हातभार लावतात. यातूनच कौटुंबिक आणि आर्थिक प्रगतीचा त्यांचा प्रयत्न असतो. खंडोबाचीवाडी (ता. पलूस, जि. सांगली)  गावातील सतरा कष्टकरी महिलांनी श्री गणेश ग्राम महिला बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक प्रगतीसाठी वनरोपवाटिकेचा मार्ग निवडला आणि परिसरात वेगळी ओळख तयार केली आहे. या गटातील उपक्रमशील सदस्या म्हणजे श्रीमती सरिता माने. त्यांचे माहेर खंडोबाचीवाडी. सासर शिरटे. सरिताताईंचे शिक्षण बारावीपर्यंत झालेले. लग्नानंतर कुटुंब आनंदी होते. पण २००५ मध्ये सरिताताईंच्या पतींचे निधन झाले. त्यातूनही त्या सावरल्या आणि माहेरी वडिलांच्या घरी राहू लागल्या. आर्थिक मिळकतीसाठी भिलवडी येथील गारमेंटमध्ये त्यांनी नोकरी सुरू केली. परंतु अवघ्या तीन महिन्यांत हा गारमेंट उद्योग बंद पडला. त्यामुळे त्यांना काय करावे सुचत नव्हते. कितीही संकटे आली तरी जिद्दीने उभे रहायचे, ही त्यांची चिकाटी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. शिक्षण कमी असल्याने नोकरीची शाश्‍वती नव्हती. या अडचणीतून मात करण्यासाठी २००७ मध्ये सरिताताईंनी महिला बचत गटाची स्थापना केली. गटाच्या माध्यमातून कोणता व्यवसाय सुरू करता येईल, याचा अभ्यास सुरू केला. सांगली जिल्ह्यातील अनेक गावात सुरू असलेल्या महिला बचत गटांना त्यांनी भेटी दिल्या. बहुतांश ठिकाणी बचत गट हे पापड, लोणचे, शेवया निर्मितीमध्ये कार्यरत होते. हे लक्षात आल्यानंतर सुरुवातीच्या काळात त्यांनी पापड, लोणचे निर्मितीला सुरुवात केली. मात्र या उत्पादनांच्या विक्रीमध्ये त्यांना अडचणी येत होत्या. त्यामुळे बचत गटातील महिलांना आर्थिक उत्पन्न मिळविण्यासाठी त्यांनी नवे कोणते पूरक उद्योग सुरू करता येतील याबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली.  रोपवाटिकेला सुरुवात  बचत गटाच्या वाटचालीबाबत सरिताताई म्हणाल्या, की मला गारमेंटचा व्यवसाय सुरू करायचा होता. परंतु त्यासाठी लागणारे भांडवल नव्हते. त्यामुळे तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांना भेटून गटातील महिलांनी सिमेंट चुलींची निर्मिती, ऊस रोपनिर्मिती, वनीकरणासाठी लागणाऱ्या रोपांची निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. परिसरात वनीकरणासाठी रोपांच्या मागणीचा विचार करता २००९ पासून आमचा गट रोपांची निर्मिती करू लागला आहे. या रोप निर्मिती उद्योगातून ५०  महिलांना रोजगार मिळाला आहे. आमच्या गटाला रोपवाटिकेसाठी लागणारी एक एकर जमीन माझे वडील लक्ष्मण पवार यांच्याकडून भाडेतत्त्वावर घेतली. त्यामध्ये रोपवाटिकेचे काम सुरू झाले. सुरुवातीच्या काळात स्व. पतंगराव कदम यांनी वनविभागासाठी लागणाऱ्या रोपांच्या निर्मितीचे काम गटाला दिले. त्यामुळे गटाकडे विविध रोपांची मागणी वाढू लागली. गटाला काम मिळाले, पण रोपनिर्मितीची जुजबी माहिती होती. त्यासाठी लागणारे बियाणे, पिशव्यांच्या उपलब्धतेसाठी वनविभाग, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे रोपनिर्मितीचे काम सोपे झाले. रोपवाटिकेसाठी लागणाऱ्या बिया, माती, पिशवी, शेणखत, पॉलिथिन पेपर यासाठी रोजगार हमी योजनेत आर्थिक तरतूद केलेली असते. या योजनेच्या माध्यमातून गटाला अर्थ साह्य मिळते. बचत गटातील सदस्यांना कर्जाचे वाटप केले जाते. तसेच गरज पडल्यास रोपांची निर्मिती करण्यासाठी कर्जदेखील काढले जाते. सदस्या या कर्जाची वेळेत परतफेड करतात. व्याजातून जी रक्कम येते, ती सदस्यांना समान दिले जाते. त्यामुळे महिलांना आर्थिक आधार मिळाला आहे. राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांनी देखील बचत गटाच्या उपक्रमांना चांगले सहकार्य केले आहे. सध्या गटामध्ये श्रीमती सरिता माने (अध्यक्षा), सौ. सारिका, पवार (सचिव), सौ. सुनीता होगले, सौ. सुवर्णा होगले, सौ. सुनीता पवार, सौ. शोभा शिंदे, सौ. शकुंतला यादव, सौ. नंदा चेंडगे, सौ. वैशाली शिंदे, सौ. रेखा शिंदे, सौ. कौशल्या डोलारे, सौ. रूपाली शिंदे, सौ. सुनीता शिंदे, सौ. रूपाली शिंदे, सौ. वैशाली शिंदे, सौ. सुमन शिंदे, सौ. शारदा पवार या सदस्या कार्यरत आहेत.  पूरक उद्योगासाठी प्रयत्न   बचत गटातील सदस्यांना गरजेनुसार कर्जवाटप केले जाते. रोपवाटिकेत काम करणाऱ्या महिलांचे ग्रामपंचायतीमध्ये जॉब वर्क कार्ड काढले जाते. या महिलांना रोजगार हमीतून पगार होतो. सध्या रोपवाटिकेत काम करणाऱ्या महिलांचा बचत गट स्थापन केला आहे. या गटाच्या माध्यमातून प्रक्रिया व्यवसाय सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी केळी, बटाट्याचे वेफर्स व्यवसायाची माहिती घेतली जात आहे. विविध रोपांची निर्मिती 

  • रोपनिर्मितीसाठी बियांची कोल्हापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून खरेदी.
  • कडुनिंब, चिंच, सिसू, शिरस, शिवळ,आवळा, खैर, बांबू, काशीद, करंज रोपनिर्मितीवर भर.
  • रोपांच्या चांगल्या वाढीसाठी खत वापर, कीडनाशकांची फवारणी केली जाते.
  • मागणीनुसार दरवर्षी १५ प्रकारच्या वृक्षांच्या दीड ते तीन लाख रोपांची निर्मिती. 
  • रोपांची मुळे जमिनीत घुसू नयेत यासाठी पिशव्या आच्छादन पेपरवर ठेवल्या जातात.
  • पलूस-कडेगाव तालुक्यातील वनविभागात रोपांची विक्री.
  •  नगरपंचायत, पाटबंधारे विभाग, पोलिस स्टेशन, ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालयाच्या मागणीनुसार रोपांचा निर्मिती. 
  • शिक्षण, प्रशिक्षण महत्त्वाचे... शैक्षणिक वाटचालीबाबत सरिताताई म्हणाल्या, की माझे शिक्षण बारावीपर्यंत झालेले, पतीच्या निधनानंतर नोकरीसाठी माझे कमी शिक्षण आड येत होते. त्यामुळे मी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. या शिक्षणाच्या जोरावर भारती मेडिकल कॉलेजमध्ये क्लार्क म्हणून रुजू झाले. आता माझे एमबीएचे पहिले वर्ष पूर्ण झाले असून, दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासाची तयारी सुरू आहे. याचबरोबरीने बचत गटातील महिलांना वर्षभर रोजगारनिर्मितीसाठी वनरोपवाटिकेची चांगली सुरुवात झाली आहे. आता प्रक्रिया उद्योगाच्या दृष्टीने आमच्या गटाची वाटचाल सुरू आहे. या सर्व उपक्रमांसाठी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांची चांगली साथ मिळत आहे. - सरिता माने,  ७९७२९६०१२७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com